आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयसिसला वेसण घालण्‍यासाठी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (आयसिस) या दहशतवादी संघटनेचे सिरियामधील तळ उद‌्ध्वस्त करण्यासाठी अमेरिकेने हवाई हल्ले सुरू केले. त्याच वेळी सायप्रस येथून ब्रिटनच्या हवाईदलाची विमाने २७ सप्टेंबर रोजी झेपावली, ती इराकमधील आयसिसचे तळ नष्ट करण्यासाठी. या हवाई हल्ल्यांच्या कारवाईत अमेरिकेबरोबर सौदी अरेबिया, जॉर्डन, संयुक्त अरब अमिरातीज हेदेखील सहभागी झाले.

अल‌् काईदाशी संबंधित नुसरा फ्रंट ही दहशतवादी संघटनाही इराक, सिरियामध्ये सक्रिय आहे. गेल्या आठ ऑगस्टपासून अमेरिकी हवाईदलाने नुसरा फ्रंटची पाळेमुळे उखडण्यासाठी एकट्या इराकमध्ये सुमारे २०० हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत बोलताना समर्थनच केले. दहशतवादाचा कर्करोग आम्हाला समूळ संपवायचा आहे, असे उद‌्गार ओबामा यांनी त्या वेळी काढले होते.
सिरियाच्या पूर्व भागातील मयादिन नावाच्या शहरानजीक चार तेलशुद्धीकरण प्रकल्प व तीन तेलसाठ्यांवर आयसिसच्या दहशतवाद्यांनी कब्जा केलेला आहे. त्यातील तेल विकून आयसिसचे दहशतवादी पैसा उभा करतात. त्याचा वापर इराक व सिरियामध्ये दहशतवादी हल्ले चढविण्यासाठी केला जातो. ही पैशाची रसद अमेरिकेला तोडायची आहे. आयसिसच्या ताब्यात असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांतून रोज ३०० ते ५०० पिंपे तेल उपलब्ध होते. हे तेल विकल्यानंतर रोज २० लाख डॉलर आयसिसच्या हातात खुळखुळू लागतात. तेलाची विक्री तस्करीच्या मार्गाने केली जाते.

सिरियामध्ये अमेरिकेने हवाई हल्ले सुरू केले, त्यात सिरियातील रक्का शहर हे मोठे लक्ष्य आहे. इराकमधील इर्बिल हे शहर. तेथे अब्दुल कादिर हरिरी नुकताच आपल्या कुटुंबीयांना घेऊन राहायला आला आहे. खरे तर तो मूळचा उत्तर सिरियातील रक्का या शहरातला. आयसिसने रक्कावर कब्जा केला व आपला मुख्य तळ त्या शहरात उभारला, तेव्हापासून हे शहर धुमसते आहे. तेथे दहशतवादी कारवायांबरोबरच अमेरिकी हवाईदलाचे होणारे आता नित्याचेच प्रकार झाले आहेत. काही हजार नागरिकांप्रमाणेच अब्दुलनेही रक्कामधून काढता पाय घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणेच पसंत केले.

अब्दुल नावाचा रहिवासी पहाटे चार वाजता इर्बिलमधील आपल्या घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्याची नजर आकाशाकडे होती. अचानक आकाशात प्रकाशाचे लोळ निर्माण झाल्याचे त्याला जाणवले. त्याने ओळखले की, अमेरिकेच्या हवाईदलाने रक्का व इर्बिलच्या परिसरात आयसीसच्या तळांवर हल्ले चढवणे सुरू केले आहे. हे प्रकाशाचे लोळ बघण्यासाठी अब्दुलचा शेजारीही मग ओट्यावर येऊन बसला. आपल्या रक्का शहराचे नेमके भवितव्य काय असेल, याची चिंता अब्दुलला भेडसावत आहे.

गेल्या दोन आठवड्यांपासून रक्कामधील दहशतवादी व नागरिक यांना अमेरिकेचे हल्ले सुरू होणार, याची जाणीव झालेली होती. सकाळच्या वेळेस रस्त्यावरून पेट्रोलिंग करणे आयसिसच्या दहशतवाद्यांनी बंद केले होते. कारण अमेरिकेच्या ड्रोन विमानांनी विशिष्ट विभागात आपल्याला कॅमेराबंद केले तर तिथे रात्री हल्ल्यांना सामोरे जावे लागेल, अशी भीती त्यांना वाटते.

रक्कामधील अबु मोहम्मद हा रहिवासी गेल्या आठवड्यात रात्री आपल्या घरात शांतपणे झोपी गेलेला होता. रात्री बॉम्बहल्ल्यांचे आवाज ऐकू येऊ लागल्यानंतर अबु आपल्या कुटुंबीयांसह शेजारच्या घरात आश्रयासाठी गेला. त्या घरातील तळघरात ते बराच वेळ दडून राहिले. बॉम्बहल्ल्यांचे आवाज जसे विरले तसे ते बाहेर आले. तेव्हा असे लक्षात आले की, त्यांच्या ओळखीची एक महिला हे हल्ले सुरू झाल्याच्या धक्क्याने हृदयविकाराचा झटका येऊन मरण पावली होती. रक्कामध्ये या आधी सिरियाचे लष्करच आयसिस संघटनेच्या तळांवर हल्ले चढवित होते. सिरियाची विमाने चढवित असलेले बॉम्बहल्ले तेवढे अचूक नसत. पण अमेरिकेच्या हवाईदलाने आपल्या हल्ल्यांमध्ये अशी चूक होऊ दिलेली नाही.
रक्कावर सुरू असलेल्या अमेरिकी हवाईदलाच्या हल्ल्यांमध्ये अजून तरी मोठी जीवितहानी झालेली नाही; पण भविष्यात तसे काही घडूही शकते, असे अब्दुल कादिर हरिरीला वाटते. रक्कामधून जिवाच्या भीतीने पळून गेलेेले नागरिक सध्या तरी बचावले आहेत; पण जे अजूनही त्या शहरात आहेत, ते जीव मुठीत धरून जगत आहेत. सिरियामध्ये तसेच रक्कामध्ये आयसिसच्या सुरू असलेल्या कारवायांना तेथील सगळेच लोक पाठिंबा देतात, असे नाही. जे विरोध करतात ते दहशतीमुळे फारसे बोलू शकत नाहीत. अमेरिकी हवाईदलाने शहरी भागांत हवाई हल्ले चढवू नयेत, असे अब्दुल कादिर हरिरीला वाटते. तर या हल्ल्यांना अबु मोहम्मदचा पाठिंबा आहे.

सिरियातील रक्का शहर असो वा त्या देशाचा अन्य भाग- तिथे आयसिसने आणखी हातपाय पसरू नये, म्हणून आता आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही वेगाने हालचाल करण्यात येत आहेत. दहशतवाद्यांसोबतच्या या आंतरराष्ट्रीय संघर्षात सामान्य माणसांचा बळी जाणे, ही अटळ घटना आहे.