आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्याला आयटीआयचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसाधारण समाजात असा समज असतो की परीक्षेत चांगले गुण मिळवणारे हुशार विद्यार्थी असतात किंवा पुस्तकी ज्ञानाचे प्रदर्शन करून शिक्षकांना प्रभावित करणारे आयुष्यात यशस्वी बनू शकतात, पण तसे नसते. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे किंवा घोकंपट्टी नव्हे तर विद्यार्थ्याकडे अंगभूत कला-कौशल्याचीही गरज असते. अनेक मुलांची विचारधारा ही तंत्रज्ञानाकडे वळलेली असते. लहानपणापासून या मुलांचा यंत्रांकडे कल असतो. या विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे मन लागत नाही. काही मुले तर आर्थिक परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या राज्यात व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजेच व्होकेशनल एज्युकेशनची सुवर्णसंधी उपलब्ध आहे.


राज्याच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या (आयटीआय) वर्ष 2013च्या ऑगस्ट सत्राचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने 24 जूनपासून सुरू झाले आहेत आणि अर्ज भरण्याची शेवटची तारीख 8 ऑगस्ट असून संध्याकाळी 5 पर्यंत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. प्रवेशोच्छुक उमेदवाराने http://www.dvet.gov.in या संकेत स्थळावर लिहिलेल्या सूचना वाचून अचूक अर्ज भरावा.


आयटीआयमध्ये फक्त दहावी आणि बारावी नव्हे, तर आठवी पास विद्यार्थ्यांकरिताही अनेक औद्योगिक अभ्यासक्रम आहेत. रिपेअरिंग अँड मेन्टेनन्स ऑफ हेवी व्हेइकल तथा ड्रायव्हर कम मेकॅनिक (लाइट मोटार व्हेइकल) या कोर्सेस शिवाय इतर कोर्सेसला 14 वर्षे वय असल्यावरही प्रवेश मिळू शकतो. या औद्योगिक प्रशिक्षणाचा फायदा म्हणजे विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाद्वारे तंत्रकुशल मनुष्यबल तयार करणे आणि उमेदवाराला रोजगाराची संधी मिळू शकते. प्रत्येक अभ्यासक्रम स्वयंरोजगाराकरिताही उपयुक्त आहे, एवढेच नव्हे, तर स्वयंरोजगाराला येथे मार्गदर्शनही मिळते.


महाराष्‍ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की भारतात औद्योगिक प्रशिक्षणामध्ये जास्तीतजास्त जागा महाराष्‍ट्राला मिळालेली आहे आणि महाराष्‍ट्राच्या 35 जिल्ह्यांतील प्रत्येक तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. राष्‍ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एनसीव्हीटी) आणि राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदे (एससीव्हीटी) द्वारा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी विविध कोर्सेस चालवले जातात।


आठवीपर्यंत शिकलेल्या उमेदवारांकरिता कॅबिनेट फर्निचर मेकर, कार्पेंटर, एम्ब्रॉयडरी अँड निडलवर्क, फाउंड्री मन, जनरल फिटर कम मेकॅनिक, मेकॅनिक (ट्रॅक्टर), मॅकेनिक (अ‍ॅग्रीकल्चरल मशिनरी), पेंटर जनरल, प्लंबर, शीट मेटल वर्कर असे एक ते दोन वर्षांच्या कालावधीचे विविध कोर्सेस एनसीव्हीटी, एससीव्हीटी द्वारा चालवण्यात येतात.


काही मुलांना शालेय शिक्षण मिळवून पदवी न घेता इंजिनिअरिंग किंवा त्या क्षेत्राशी निगडित व्यवसाय करण्याची इच्छा असते, अशा उमेदवारांकरिता आर्किटेक्चरल असिस्टंट, अटेंडंट ऑपरेटर, ड्रॉफ्ट्समन (सिव्हिल), ड्रॉफ्ट्समन (मेकॅनिकल), इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स, मेकॅनिक असे विविध अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्याकरिता विज्ञान आणि गणित अनिवार्य विषय आहेत. मुलींना इतर अभ्यासक्रमात तर प्रवेश आहेच, पण हेअर अँड स्किन केअर हा एक वर्षाचा अभ्यासक्रम फक्त मुलींकरिताच आहे. हायजीन, फिजियॉलॉजी किंवा बायोलॉजी हे प्रवेशासाठी अनिवार्य विषय आहेत. याच्या व्यतिरिक्त इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या उमेदवारांना फ्रंट ऑफिस असिस्टंटचा कोर्सही करता येतो.


बारावी शिकलेल्या उमेदवारांकरिता डिजिटल फोटोग्राफी, फॅशन टेक्नॉलॉजी, हॉस्पिटल हाऊसकीपिंग हे तीनही नॉन इंजिनिअरिंग, तर मेकॅनिक कॉम्प्युटर हार्डवेअर, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स, ऑपरेटर अ‍ॅडव्हान्स मशीन टूल्स, फिजिओथेरेपी टेक्निशियन हे इंजिनिअरिंग प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण आहे.


शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण 95 कोर्सेस चालवले जातात. या कोर्सेसबद्दल माहिती मिळविण्याकरिता http://www.dvet.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर आयटीआय अ‍ॅडमिशन 2013 वर क्लिक केल्यास अप्लाय ऑनलाइनच्या पर्यायावर क्लिक करावेत आणि नंतर लिस्ट ऑफ ट्रेडस् म्हणजेच व्यवसायाची सूची, प्रवेश पात्रता आणि इतर माहितीची सूची मिळू शकेल.


अशाचप्रकारे महाराष्‍ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन (एमएसबीटीई) या संस्थेमार्फत अनेक तंत्रशिक्षणाशी निगडित डिग्री आणि औद्योगिक पदविका कोर्सेस महाराष्‍ट्रात चालवले जातात. एमएसबीटीईद्वारा चालवले जाणारे हे कोर्सेस विविध कालावधीचे आहेत.


एमएसबीटीईच्या मान्यता प्राप्त संस्थेत व्होकेशनल डिप्लोमा इन फिटिंग, ऑटोमोबाइल, वेल्डिंग, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, कार्पेन्ट्री अँड इंटेरिअर डेकोरेशन, फॅशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिशियन, हॉटेल अँड केटरिंग, मेकॅनिस्ट असे कोर्स उपलब्ध आहेत. ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा कोर्स करायचा असेल त्यांच्याकरिता डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग, डिप्लोमा इन स्टेनोग्राफी अँड सेक्रेटरियल प्रॅक्टिस, डिप्लोमा इन डिजिटल फोटोग्राफी अँड डिजिटल ग्राफिक्स, डिप्लोमा इन फॅशन अँड टेक्सटाइल डिझायनिंग, डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, डिप्लोमा इन डेन्टल टेक्नॉलॉजी असे कोर्सेस आहेत. या शिवाय डायरेक्टोरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन (डीटीई) चे दहावी शिकलेल्या उमेदवारांकरिता डिप्लोमा इन आर्किटेक्चर, ऑटो कॅड, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड मेन्टेनन्स, इंजिनिअरिंग, फार्मसी, डिप्लोमा इन नेटर्वकिंग असे डिप्लोमा कोर्सेसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातही अशा कोर्सची सोय आहे. हे अल्प कालावधीचे कोर्स केल्यामुळे स्वयंरोजगाराला सुरुवात होते व भविष्यात करिअरची वाटही सुकर होते.