आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुन्‍न वास्‍तवाचे प्रभावी चित्रण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
समकालीन वास्तवाला प्रभावीपणे शब्दांत पकडायचं, देव-धर्म-समाज आदींना अडचणीत टाकणारे प्रश्न करायचे आणि एवढं करूनही कायमस्वरूपी छाप सोडून जायचं - हे सारं राजन खान यांची प्रस्तुत कादंबरी  लीलया साधते...
 
 
‘आता तू मोठा हो’ या कादंबरीतला हा एक संवाद -
साम वडिलांना विचारतो - ‘मुसलमान आणि हिंदू वेगळे असतात का?’ वडील सांगतात- ‘माणूस म्हणून नसतात वेगळे, पण आपण वेगळे आहोत, असं ते समजतात.’
 
 
हा संवाद पुरेसा बोलका आहे. धर्म हा स्वतःच्याच प्रेमात असतो आणि त्याचमुळे तो माणसाला नीटपणे जगू देत नाही. माणूस असण्यापेक्षा आजही लोकांना त्यांचं हिंदू किंवा मुसलमान असणं महत्त्वाचं वाटतं. धर्मापुढे माणूस, माणूस म्हणून जगण्यातला आनंदच विसरला आहे आणि याच अस्वस्थ करणाऱ्या वास्तवावर या कादंबरीत नेमकं बोट ठेवण्यात आलं आहे. राजन खान यांची अस्सल गावरान भाषा; खुमासदार तर आहेच, पण एक अत्यंत संवेदनशील विषय त्यांनी अतिशय समतोल आणि संयतपणे हाताळला आहे. कादंबरीच्या नायकाला ‘साम’ला त्याच्या वडिलांनी उद्देशून म्हटलेलं वाक्य आहे - ‘आता तू मोठा हो’, पण आपण सगळ्यांनीच धर्माच्या बाबतीत मोठं व्हायला हवं. गणेश चतुर्थी आणि ईद एकाच दिवशी आल्यानं त्या लहान मुलाला प्रश्न पडलाय आपण कुठल्या सणाचा आनंद घ्यायचा? तेव्हा वडील त्याला ‘मोठा हो’, असा सल्ला देतात. ही कादंबरी त्या अर्थानं सगळ्यांच्याच डोळ्यात अंजन घालणारी आहे. 
 
 
‘तू आता मोठा हो’ ही राजन खान यांची खळबळजनक नवी कादंबरी. ‘सदामंगल पब्लिकेशन’ या नवीन प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केलेली. साम ताहिरा सदानंद हा मुलगा या कथेचा नायक. त्याची आई - मुसलमान तर वडील हिंदू. दोघांनीही घरच्यांचा विरोध पत्करून पळून जाऊन लग्न केलेलं. त्यानंतर पाच वर्षांनी त्यांना मुलगा होतो. या सगळ्यांचा धर्म असतो, माणूस. सामचं जग आई-वडिलांमध्ये सामावलेलं. अचानक ताहिराचे वडील आजारी पडतात, आणि हे तिघंही त्यांच्या मूळ गावी जातात. त्यानंतर सामचं आयुष्य नवं वळण घेतं. 
 
 
दोन्हीकडचा गोतावळा आणि धर्म या अनोळखी गोष्टींशी त्याची ओळख व्हायला लागते. तेव्हा तो जेमतेम अकरा वर्षांचा असतो. अकरावीत जाईपर्यंत मग तो गावाला जाऊन दोन्हीकडचे सण साजरे करतो, पण म्हणून दोन्ही घरची माणसं एकमेकांना स्वीकारतात का - तर नाही. सोळा वर्षांनंतर वडिलांची अखेरची इच्छा म्हणून त्यांना भेटायला आलेली ताहिरा आणि तेव्हाचं आपल्या घरच्यांना परत भेटणारा सदानंद. हे दोघंही घरच्यांपासून परकेच राहतात, कारण त्यांच्या घरचे त्यांच्यासाठी धर्माचा पगडा झुगारून द्यायला तयार नाहीत. कोणतीही भाषा कोणत्याही धर्माची किंवा धर्माच्या मालकीची नसते. हे या कादंबरीतलं आणखी एक वाक्य. खरं तर कुठल्याही भावनेला धर्म किंवा जातीचं बंधन असू नये. प्रेमाला आणि आनंद साजरं करायला तर ते नसतंच. हेच राजन खान यांनी अत्यंत रसपूर्ण शैलीत सांगितलं आहे. ही कादंबरी वाचताना अनेक ठिकाणी डोळेही पाणावतात- कारण त्यात सच्चेपणा आहे. प्रसंग उभे करण्याची लेखकाची ताकद निर्विवाद तर आहेच, पण लेखनात रंजकताही आहे. मुसलमान आणि हिंदू वेगळे असतात का- माणूस म्हणून नसतात वेगळे, पण आपण वेगळे आहोत, असं ते समजतात.
 
 
धर्म नीट जगू देत नाही. मुळात, देव म्हणजे काय, तेच माझ्या लक्षात येईना
आम्ही माणूस झालो, अश्रूंना नसतो धर्म
आपण हिंदू पण नाही न् आपण मुसलमान पण नाही. आपण कुठल्याच धर्माचे नाही. आपण फक्त माणूस आहोत. माणूस असण्यापेक्षा त्यांना त्यांचं हिंदू-मुसलमान असणं मोठं वाटतं...
मरण मरणच असतं. समान 
प्रेमाला धर्म, जात लागत नाही...
ही कादंबरीतली वाक्यं मनावर कायमस्वरूपी कोरली जातात आणि हेच या कादंबरीचं यशही ठरतं.
 
आता तू मोठा हो
लेखक : राजन खान
प्रकाशन : सदामंगल पब्लिकेशन
पृष्ठे : १२०
किंमत : १५० रु.
 
- प्रज्ञा जांभेकर
jambhekar.prajna@gmail.com
बातम्या आणखी आहेत...