आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडवाणींना भीष्‍म म्हणणे हा भीष्‍मांचा अपमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाभारत हा इतिहास असो किंवा काल्पनिक महाकाव्य; भारतीयांच्या जीवनावर गेली सुमारे अडीच हजार वर्षे या ग्रंथाचा प्रभाव टिकून आहे. भारताच्या सामाजिक जीवनात कोणतीही खळबळजनक किंवा नाट्यपूर्ण घटना घडली की, महाभारताचे दृष्टांत दिले जातात. ज्यांच्या नावाचा गाजावाजा चालू असतो त्यांना महाभारतातील व्यक्तींच्या उपमा दिल्या जातात. सध्या लालकृष्ण अडवाणींच्या ज्या लीला सुरू आहेत, त्यामुळे त्यांना ‘भीष्म पितामह’ व ‘ययाती’ म्हटले जात आहे. अडवाणींना भीष्म म्हणणे हा भीष्मांचा अपमान आहे व ययाती म्हणून त्यांची संभावना करणे हे अडवाणींचे अवमूल्यन आहे. महाभारत न वाचता केलेल्या या तुलनेने त्या महान ग्रंथाचे विकृतीकरण सुरू आहे.


लालकृष्ण अडवाणींचा जन्म कराचीत 1927मध्ये झाला. राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत त्यांची घडण झाली. युवकावस्थेत शिक्षक म्हणून जीवनाची कारकीर्द सुरू करून निर्वासित कुटुंबाचे घटक म्हणून ते भारतात आले. उच्चशिक्षित होऊन 38व्या वर्षी त्यांनी महाभारतात सर्वश्रेष्ठ ठरवलेल्या गृहस्थाश्रमात प्रवेश केला. आर.एस.एस.चे सरसंघचालक व काही त्या मुशीतून तयार झालेले नेते (अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी इ.) देशाचा संसार चालवण्यासाठी स्वत: अविवाहित राहतात. अडवाणींनी संसारी जीवन जगून प्रत्यक्ष सत्तेचा उपभोग घेतला. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा अजूनपर्यंत फळाला न आल्याने ते जे काही राजकारण करत असतात, त्यामुळे स्वजनांच्या टीकेचे धनी झाले आहेत. त्यांनी आजपर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात तीन वेळा राजीनामे देऊन प्रत्येक वेळी माघार घेतलेली आहे. 85व्या वर्षी त्यांचा उत्साह व सत्ताकांक्षा तरुणाला लाजवणारी आहे. भीष्मांनी कधीही प्रतिज्ञा मोडली नाही वा सत्तेसाठी केविलवाणी धडपडही केली नाही.


भीष्म व अडवाणी ही तुलना कशी चूक आहे, हे शांतनु-गंगापुत्र देवव्रताचा भीष्म कसा झाला पाहिल्यावर कळेल. गंगेने देवव्रताचा ताबा घेतला व त्याला असुर पुरोहित गुरू शुक्राचार्य, देवगुरू बृहस्पती, ऋषिश्रेष्ठ वसिष्ठ व भार्गव परशुराम यांच्याकडून सर्वज्ञ बनवून शांतनुच्या ताब्यात दिला. देवव्रत हस्तिनापूरचा युवराज झाला. अडवाणींच्या वाट्याला अशी अद्वितीय गुरुपरंपरा व युवराजपद आलेले नाही.


शांतनु राजाच्या जीवनातून गंगा निघून गेली होती. मत्स्यगंधा सत्यवतीला पराशर कृपेने कृष्णद्वैपायन (महर्षी व्यास) हा कानिनपुत्र (विवाहापूर्वी) प्राप्त झाला होता व पराशरांच्या वरदानाने तिचे कौमार्यही टिकले. ती गंधवती-योजनगंधाही झाली. या मादक सुगंधाचा मागोवा घेत असताना शांतनुच्या जीवनात सत्यवतीचा प्रवेश झाला. शांतनु राजाने कोळी राजाकडे सत्यवतीला मागणीच घातली. हस्तिनापूरच्या राजाची मनोवस्था अचूक हेरून त्याने ‘माझा नातू हस्तिनापूरचा युवराज होणार असेल तरच मी विवाहास मान्यता देईन’, अशी अट घातली. शांतनु विमनस्क परतला. एकीकडे सत्यवतीची मोहिनी व दुसरीकडे देवव्रतावरचे प्रेम या विचित्र अवस्थेत तो मनोदौर्बल्याने ग्रासला गेला. पित्याच्या अशा अवस्थेचे कारण समजल्यावर देवव्रत स्वत:च कोळीवाड्यात सत्यवतीच्या पित्याला भेटला. सत्यवतीला अनुरूप असा राजपुत्र स्वत:साठी नव्हे तर पित्यासाठी कन्येला मागणी घालतोय, हे पाहिल्यावर त्याने आपली अट पुन्हा स्पष्ट केली. लगेचच ‘स्वर्गस्थ देवहो! मी हस्तिनापूरचा युवराज देवव्रत राज्यावरचा हक्क सोडण्याची प्रतिज्ञा करतोय.’ असा आवाज दशदिशांत घुमला. धीवर राजाने ‘तू राज्यत्याग केलास, पण तुझे वंशज या गादीवर हक्क सांगतील’, अशी शंका उकरून काढली. देवव्रताने क्षणार्धात दुसरी घोर प्रतिज्ञा केली, ‘मी आत्तापासून अविवाहित राहून ब्रह्मचर्याचे पालन करीन.’ देवांनीच या प्रतिज्ञेला भीष्म (भयंकर!) प्रतिज्ञा असे नाव दिले व देवव्रत भीष्म नावाने ओळखला जाऊ लागला. या दोन्ही प्रतिज्ञांचे जीवनभर भीष्मांनी तंतोतंत पालन केले. अडवाणींच्या प्रतिज्ञांचे नेहमीच हसे झाले.


भीष्माच्या पुढाकाराने पिता शांतनुचा सत्यवतीशी विवाह झाला. ‘युद्धात तुझा कधीही वध होणार नाही व तुला इच्छामरण प्राप्त होईल’, असा वर भीष्माला शांतनुने दिला. सत्यवतीचे वारस लहान असताना भीष्मच हस्तिनापूरचे संरक्षण करीत होता. शांतनुपुत्र विचित्रवीर्यासाठी, काशीराजाच्या कन्यांच्या स्वयंवरात अनाहूतपणे भीष्म उपस्थित झाला व समस्त राजांच्या देखत तिन्ही कन्यांना रथात घालून हस्तिनापूरला निघाला. या पराक्रमाने भेदरलेले राजे जेव्हा युद्धार्थ चालून गेले, तेव्हा पराभूत होऊन माघारी परतले. एकट्या शाल्वराजाने प्रतिकार करण्याचे धाडस केले, पण शाल्वराजाही पाठ दाखवून परागंदा झाला. सत्यवतीला एकदम तीन सुना मिळाल्या, परंतु त्यातील एक अंबा रडत होती. तिने व शाल्वराजाने एकमेकांना मनोमनी वरलेले होते. सर्वसंमतीने भीष्माने तिची शाल्वराजाकडे इतमामात पाठवणी केली; परंतु दुस-याने पळवलेल्या व परपुरुषाकडे राहिलेल्या अंबेला त्याने शीलभ्रष्ट ठरवून नाकारली. पित्याघरचेही दरवाजे बंद असल्याने अंबा रानोमाळ भटकू लागली. एका आश्रमात तिची गाठ तिच्या आजोळच्या आजोबांशीच पडली. होत्रवाहन आजोबाने तिची व्यथा भीष्मगुरू परशुरामाच्या कानावर घातली. परशुरामाने भीष्मालाच दोषी ठरवून ‘अंबेशी विवाह कर’ अशी आज्ञा केली. भीष्माने प्रतिज्ञाभंग करणार नाही, असे गुरूलाही ठाम उत्तर दिले. गुरू आज्ञा न पाळणा-या भीष्माने परशुरामाचे युद्धाचे आव्हान स्वीकारले. ब्रह्मास्त्रांसह सर्व अस्त्रांचा वापर झाला, तरी भीष्माचा पराभव खुद्द परशुरामही करू शकला नाही, हे अंबेने प्रत्यक्ष पाहिले. भीष्म वधाचा स्वत: निर्धार करून अंबेने चितेत प्रवेश केला. हीच अंबा ध्रुपदराजाच्या पोटी प्रथम शिखंडिनी म्हणून जन्माला आली व यक्षाचे पौरुषत्व प्राप्त होऊन शिखंडी म्हणून भीष्मवधाला सिद्ध झाली. नव्हे, सिद्ध झाला! अडवाणींनी आर.एस.एस. गुरूंच्या पुढे संघर्ष टाळून नमते घेतले आहे. याहूनही दुर्धर प्रसंग भीष्मापुढे विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर आला. स्त्रीसंगाच्या अतिउपभोगामुळे सत्यवतीचा हा पुत्र रक्तक्षयाने अकालीच गेला. तरुण राण्यांना वैधव्य प्राप्त झाले व त्या विनापत्यच राहिल्या. राज्याच्या वारसाची चोख व्यवस्था करणा-या कोळी राजाचे सर्व मनोरथ धुळीला मिळाले. सत्यवती, पुत्र भीष्मासमोर अगतिक होऊन म्हणाली, ‘भीष्मा! हस्तिनापूरला वारस दे. अंबिका-अंबालिकांच्या पोटी पुत्रांना जन्माला घाल.’ प्रतिज्ञापूर्तीसाठी गुरूशी युद्ध करणारा भीष्म आपल्या मातेसमोरही ठाम राहिला; पण अराजकाचे संकट टाळण्यासाठी त्याने एक पर्याय मातेसमोर ठेवला. ‘हस्तिनापूरला वारस देण्याचे पुण्यकर्म ब्राह्मणांना द्रव्य देऊन करवून घे. क्षत्रिय वंश क्षीण झाला, तेव्हा अशाच पद्धतीने तो वृद्धिंगत झालेला आहे.’ भीष्माने वसिष्ठ मुनींनीही असे केल्याचा उल्लेख केला व सत्यवतीचे मन वळवले. स्वत: ब्रह्मचर्यापासून ढळला नाही. सत्यवतीने विचारांती कानिनपुत्र महर्षी व्यासांवर ही जबाबदारी सोपवली. धृतराष्‍ट्र व पांडू या व्यासपुत्रांचा विचित्रवीर्याचे वारस, सत्यवतीचे नातू म्हणून भीष्माने पुत्रवत सांभाळ केला. दुर्योधनादी कौरव व पाच पांडवांचा भीष्म ‘पितामह’ झाला. कौरव पांडवांच्यात वितुष्ट येऊ नये म्हणून भीष्माने हस्तिनापूरचे विभाजन केले. पांडवांचे इंद्रप्रस्थ निर्माण झाले, तरीही जुगारामुळे बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास द्रौपदीसह पांडवांना भोगावा लागला. इतकेही करून महाभारत युद्ध अटळ झाले. दुर्योधनाने भीष्माला सेनापतिपद देऊन पांडवांच्या शरणागतीची रणनीती आखली. तेही व्यर्थ ठरले. शिखंडीसमोर शस्त्र धारण करणार नाही व पांडूपुत्रांना मारणार नाही, या अटींवर भीष्माने सेनापतिपद स्वीकारले. ‘अर्थस्य पुरुषो दास:’ म्हणून त्याला कौरवांचे नेतृत्व करावे लागले. शिखंडी युद्धार्थ पुढे उभा ठाकल्यावर शिखंडीवर भीष्माने कोणतेही शस्त्र चालवले नाही. शिखंडीच्या आडून अर्जुनाने भीष्माला नि:शस्त्र केले व बाणांच्या पिंज-यात सुरक्षित ठेवले. युद्ध समाप्तीनंतर कृष्ण व व्यासांनी धर्मोपदेशासाठी भीष्मांची नियुक्ती केली व धर्मराजाला वनवास घेण्यापासून परावृत्त केले. त्याला राजधर्म शिकवला. उत्तरायण सुरू झाल्यावर त्यांचा देह उरला. अडवाणींना भीष्म पितामह म्हणून त्यांनी उत्तरायणाची वाट पाहावी, हेच सुचवले जात आहे. हा भीष्मांचा अपमान आहे व महाभारताचे विकृतीकरण. ते होऊ नये, म्हणून हा लेखप्रपंच.


(लेखक भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य आहेत.)