आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अलौकिक आवाजाची आशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशाच्या गायकीची हीच देणगी की, ती बलशाली मनाची ओळख दाखवते. शास्त्रीय मैफिली न करता, फक्त भावगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं, गझला गाणाऱ्या या गायिकेचा आठ सप्टेंबर हा ८४वा वाढदिवस. त्या निमित्ताने तिच्या काही अविस्मरणीय गाण्यांची उजळणी...

एवढी जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका लता मंगेशकर सख्खी मोठी बहीण असताना ‘आशा भोसलेला भारतीय वा मराठी संगीताच्या दुनियेत तोड नाही’ हे विधान धाडसाचं नव्हे, तर ढोंगी ठरेल आणि असं ढोंग करत गुण गावेत इतकी काही आशा भोसले संगीताच्या प्रांतात लहान नाही. तेव्हा सुरुवातीलाच आपण म्हणून टाकूया की, सुरेलपणात आणि माधुर्यात पहिला नंबर लताचा. कुठल्याही स्तोत्राच्या आरंभी गणेशाला वंदन केलेलं असतं, तसं लताचं स्मरण इथेच केलेलं बरं. पुढचं काम सोपं होतं. 

शास्त्रीय संगीत बाजूला ठेवलं, तर हिंदी आणि मराठी गाण्यांत फरक आहे. हिंदी गाणी आपण ओळखतो ती केवळ चित्रपटातली. मध्यंतरीच्या काळात गझला आणि भजन यांची चलती होती. पण आता ती लाट ओसरलेली दिसते. रॅप किंवा तत्सम टीव्ही गाण्यांचा प्रकार अजून रूढ आहे. तेव्हा साठसत्तर वर्षांपूर्वीपासून आजतागायत आपल्याला परिचयाचा असलेला हिंदी गाण्यांचा प्रकार म्हणजे चित्रपटगीतं. याचा एक परिणाम असा झाली की, हिंदी पार्श्वगायक-गायिकांना विशिष्ट व्यक्तिमत्त्व मिळालं. त्या व्यक्तिमत्त्वाला अनुरूप अशीच गाणी बहुतकरून त्यांनी गायली. मराठी गाण्यांमध्ये विविधता आहे. चित्रपटसंगीत, भावगीतं, नाट्यसंगीत आणि लोकगीतं अशी वेगवेगळी रूपं घेऊन संगीत आपल्यापुढं येतं. (शास्त्रीय संगीत आपण अगोदरच बाजूला ठेवलेलं आहे.) आता, भावगीत म्हणजे भावगीत. त्याचा जो भाव तोच गाण्याऱ्याला व्यक्त करावा लागतो. परिणामी मराठी गायक-गायिकांना, हिंदीमध्ये आहे त्याप्रमाणात स्वतंत्र पृथक व्यक्तिमत्त्व नाही. उदाहरणार्थ ‘चांदणे शिंपीत जाशी’ हे आशा गाणार आणि ‘दळीता कांडिता’ हेही गाणार. पहिलं हृदयनाथची लखलखीत धारधार चाल घेऊन येणारं आणि दुसरं वसंत प्रभूच्या भक्तिरसपूर्ण शांत चालीत येणार आणि नाही म्हटलं तरी आशाची रेंज मोठीच.

आशाच्या आवाजातल्या अवखळपणामुळं लहान मुलाच्या तोंडची गाणी अगदी सहजसुंदर होतात. ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण’ या गाण्याच्या शब्दांमधला लहान मुलाच्या मनातला कोवळा भाव आशाच्या शब्दांमध्ये कसा पूर्ण व्यक्त होतो. चाल, उंची, गेय आणि आशाची सहजता याचा संगम इतका परस्परपूरक ठरतो की, वाटतं मराठी न समजणाऱ्यालादेखील हे गाणं समजेल. त्याचा आशय कुणाही अमराठी श्रोत्याच्या अचूक ध्यानात येईल. तसंच ‘झुक झुक झुक झुक आगीन गाडी’ हे गाणं. त्यातली गाडीची शिट्टी, मामाच्या घरी जाऊन काय काय होईल, हे वयाने लहान आणि ऐपतीने गरीब असणाऱ्या मुलाच्या बुद्धीत मांडणारे शब्द आणि आशाचा उत्फुल्ल, अवखळ आवाज. अगदी साधं गाणं आहे आणि त्या साधेपणातलं सौंदर्य आशाच्या आवाजामुळे इतकं जिवंत होतं की, गाणं त्याच्या पूर्ण आशयानिशी ऐकू येतं.

‘नाच रे मोरा’ हे तर मराठीतील अद्वितीय बालगीत. एवढ्या सुंदर शब्दांचं, गोड चालीचं दुसरं बालगीत मराठीत नाही. जेमतेम ऐकू येऊ लागलेल्या तान्ह्यापासून ते त्या गाण्याच्या भाषेची पूर्ण मजा घेऊन शकणाऱ्या किशोरापर्यंत कोणीही हे गाणं ऐकताना गुंग होतो. त्या अमर गीताला आशाच्या आवाजाने कोंदण दिलेले नाही, तर शरीर दिलं आहे. शब्द-चाल-आवाज-वाद्यमेळ-ठेका हे रसायन इतकं एकजीव झालेलं आहे की, आशाशिवाय दुसऱ्या कोणाच्याही आवाजात हे गाणं ऐकण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. संगीतातली मजा शब्दात मांडायचा प्रयत्न करणं हे एक मनाला हताश करणारं काम आहे. समाधान होत नाही. 

‘नाच रे मोरा’ कसं आहे? ‘नाच रे मोरा’ ‘नाच रे मोरा’ आहे म्हणजे काय, हे कसं समजावून घ्यायचं? तर हे गाणं ऐकूणतच समजेल. अवखळपणाचं वय वाढलं की, तो चावट होतो. संगीताला चावटपणाचं वावडं नाही. मराठीला तर नाहीच नाही. ‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ काय छान चावट आहे. कसा रसरशीत शृंगार आहे. ‘धरा तुम्ही माझ्यावर चंदनाची छाया’ यातल्या शृंगाराला ‘राया,’ ‘छाया,’ ‘काया’ या शब्दांच्या उच्चारात कसं टोक आलं आहे. जणू पूर्ण बहरलेला, मादक वासाचा मोगरा. ‘रेशमाच्या रेघांनी’मधला शृंगार मनमोकळा. स्वतःच्या शरीरात फुलून आलेल्या शृंगाररसाला जणू कुणा ‘ती’ने मोकळं सोडलंय आणि स्वतःवरच खूश होऊन ती नाचता नाचता गातेय. हे गाणं मुरकत नाही, लचकत नाही. ते खटके घेतं, गिरक्या घेतं, तारुण्याच्या मुक्त उन्मादाचं दर्शन देतं.

रात्रीची वेळ असावी. सर्वत्र शांतता असावी. मन रिकामं असावं. व्यावहारिक जगण्याचे सगळे संदर्भ सुटलेले असावेत आणि अशा एकटेपणात आशाच्या आवाजातली लावणी ऐकावी ‘बुगडी माझी सांडली गं.’ चालीत आणि आवाजात कुठेही उच्छृंखलपणा नाही, जोश नाही, मंद ठेक्यावर अख्खं गाणं चालत राहातं. पुन्हा पुन्हा ऐकावं. ऐकता ऐकता शृंगारातून पलीकडे जाणं कधी होतं उमजतसुद्धा नाही. ‘बुगडी माझी’ हे शब्द उच्चारायच्या अगोदर आशाच्या आवाजातला नाजूक वळसा एका बाजूने चेतवणारा असू शकतो, तर पुढच्या कोरसमधले ‘चुगली नका...’ या शब्दांचं श्रवण गंभीर व्हायला भाग पाडतं. शृंगार थिल्लरपणे घेण्याची चीज नाही, त्याचा स्वीकार गंभीरपणेच केला पाहिजे, हा आग्रह या गाण्याच्या चालीत अगदी स्पष्टपणे ऐकू येतो. 

स्त्रीला लागलेली पुरुषाची ओढ अशी शृंगाराच्याच रस्त्याने व्यक्त व्हायला हवी असं काही नाही. प्रेम हा मार्ग आहेच. हे प्रेम व्यक्त करणारी अगणित गाणी आहेत. एकूण गाण्यांमध्ये प्रेमाची गाणी अर्धी तरी असतील. संख्येने उदंड असणाऱ्या प्रेमगीतांची राणी शोभेल असं गाणंही आशानेच आपल्याला दिलं आहे. कसलाही आडपडदा, संकोच न बाळगता थेट ‘माझा होशील का’ अशी आर्त साद घालत. मराठी भाषेतल्या प्रेमगीतांमध्ये या गाण्याची बरोबरी करणारी गाणी शोधताना खूप प्रयास होतील. प्रत्येक गाण्याला एक तोल असतो. गाण स्थिर नसतं, तर वाहातं असतं. अशा प्रवाहात वळसे, वळणं, ताना, मुरके घेताना त्या प्रवाहात किंचितही विक्षेप निर्माण होऊ न देता, प्रत्येक वळणाने, तानेमध्ये प्रवाहाचं सौंदर्य अधिक खुलवणं आणि हे करताना प्रवाहाची लयबद्धता कायम राखणं हा तोल. ‘माझा होशील का’ची लय काय अप्रतिम आहे! अशा जोमदार लयीत आशाचा आवाज इतका सुंदर नाचतो की, कुठेही कानाकोपरा, खाचखळगा येतच नाही. अख्खं गाणं लयीत बुडालेलं आणि ‘माझा होशील का’ या शब्दांमधली आर्तता तीव्र, तीक्ष्णपणे व्यक्त करणारं. या एका गाण्यासाठी आशाचं कायमचं ऋणी राहावं. मराठी गाण्यांमध्ये लय आणि माधुर्य आणि कुठल्याही गाण्याचं सगळ्यात मध्यवर्ती वैशिष्ट्य म्हणजे गेयता. त्यांचं कंत्राट वसंत प्रभूच्या नावावर आहे. 

लता असो, सुमन असो वा आशा, वसंत प्रभूंची गाणी लयबद्ध, मधुर आणि प्रसन्नपणे गेय. ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘राधा गौळण करिते मंथन’, ‘ज्ञानदेव बाळ माझा’, ‘धागा धागा अखंड विणू या’ अशी कितीतरी गाणी आशाने वसंत प्रभूंसाठी गायली. कुठलंही गाणं घेतलं तरी ऐकताना आनंद मिळतो आणि गुणगुणताना रमायला होतं. ‘प्रभाती सूर नभी रंगती’ हे एक सकाळचं गाणं. ‘पानोपानी अमृत शिंपीत उषा हासरी हसते धुंदीत’मधल्या ‘पानोपानी’, ‘अमृत शिंपीत’ या मान डोलवावीशी वाटणाऱ्या तुकड्यामागून येणाऱ्या शब्दांवर ‘हसते’ या उच्चाराने चढवलेला साज म्हणजे फुलांच्या माळेमध्ये येणारं टपोरं फूल. सगळीच गाणी अशी की, कोणीतरी लिहिलं, कोणी चाल लावली, कोणी गायलं आणि कोणी वाद्यं वाजवली, असं काही झालंच नाही. अख्खंच्या अख्खं गाणंच थेट जन्माला आलं आशाच्या मुखामधून. इतकी सहजता आणि चाल-आवाजाची अनुरूपता. सरळ आशयाची सहज अभिव्यक्ती म्हणूनच माधुर्य आणि गेयता.

तरीही माधुर्य ही काही आशाची खासियत नव्हे. चालीबाहेरचा चावटपणा हे आशाचं वैशिष्ठ्य म्हणता येईल. म्हणजे कसं, तर ‘ऐन दुपारी यमुनातीरी’ हे गाणं आशानं खास आशा स्टाइलनं गायलं नसतं, तर त्या गाण्याची चाल तरी उरली असती का? ‘पाठलाग’ या चित्रपटात ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ हे गाणं कमीत कमी साज साथीला घेऊन आशा गूढगोड करून दाखवते, गाण्याचं ‘गाणेपण’ सगळं गळ्यात पेलून दाखवते; पण ‘नको मारूस हाक’ हे गाणं कसं आशाच्या मालकीचं वाटतं! इथेही गाण्याची चाल आणि आशाची गायकी या गोष्टी वेगळ्या करता येत नाहीत. बांधीव चालीत शिस्ताने गाणं म्हणणं हा जणू आशाचा स्वभावच नाही.

थोडं सबूर! आशा मनमोकळेपणाने, गाण्यात रंगून जाऊन गाताना चालीत थोडा मसाला घालते हे जरी खरं असलं, तरी तिला शिस्त पाळता येत नाही, किंवा शिस्तीत गाणं झेपणार नाही, हे साफ साफ चूक. आशाच्या आवाजातली नाट्यगीतं तिच्या सुरेलपणाची, सुरांना पकडीत धरून ठेवण्याच्या तिच्या ताकदीची साक्ष खणखणीतपणे देतात. ‘मानापमान’मधली ‘रवी मी,’ ‘चंद्रिका ही जणू,’ ‘शूरा मी वंदिले,’ ‘युवतीमना दारूण’ या गाण्यांमध्ये कुठे सूर इकडचा तिकडे झालेला नाही की, खटका, लचका आलेला नाही. उपशास्त्रीय संगीत प्रकारामध्ये ठुमरी, होरी, टप्पा येतात. मराठी नाट्यसंगीत का येत नाही, कळत नाही. ध्रुपद, ख्यालनंतर खरं म्हणजे मराठी नाट्यसंगीताचा नंबर लागायला हवा. असो. असं ऐकिवात आहे की, म्हणे आशाने रागदारीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलंच नव्हतं आणि दीनानाथांच्या रेकॉर्ड ऐकून चाली पाठ करून ही गाणी म्हटली. असं जर असेल तर हे अचाट आहे. रियाज करून, सूर घोटवून रागदारी गायली जाते. 

सुरांवर इतकी हुकूमत आशाने केवळ स्वबळावर, कानांवर विसंबून कमावली हे निव्वळ आश्चर्य आहे. ते तसं असो वा नसो, सूर आत्मसात करण्याची आशाची क्षमता तिच्या नाट्यगीतांनी ठणठणीतपणे जगापुढे आणली. भावगीतं, चित्रपटगीतं गाणारी, ‘गरम’ मसाल्याच्या सहाय्याने गाणं आकर्षक बनवणारी, गोड गळा जन्मतःच लाभल्याचा उपयोग करून घेणारी एवढ्या वर्णनात आशा मावत नाही. ती उरते.  आणि नाट्यसंगीतात ठामपणे उभी राहते. ‘एका तळ्यात होती’पासून ‘जिवलगा’पर्यंत आशाच्या गायकीचा पल्ला जातो. आशाच्या  गायकीची हीच देणगी की, पूर्ण स्त्रीत्व असून ती गायकी बलशाली मनाची ओळख दाखवते. 

- जगन्नाथ कुलकर्णी, कोल्हापूर
kjagannath08@gmail.com
बातम्या आणखी आहेत...