आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगबिरंगी व्‍हॅलेंटाइन डे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम व्यक्त करण्याच्या नाना तऱ्हा बघितल्यावर वेगळा ‘व्हॅलेंटाइन डे’ कशाला हवा, असा प्रश्न पडतोच. मात्र नव्या पिढीच्या युवा-युवतींना असा प्रश्न पडताना दिसत नाही. त्यांच्यासाठी तर हा दिवस एकदम रंगबिरंगीच!

आमच्या लहानपणी आजच्याप्रमाणे तेव्हाही फेब्रुवारी-मार्च महिना यायचा. सर्व वृक्षवेलींची पानगळ होऊन ते पुन्हा ताज्या हिरव्या पालवीने बहरून यायचे. फुलांना नवे रंग मिळायचे. पलाश वृक्षाला फळे यायची. त्याचप्रमाणे कैऱ्या, बोरे यांचा मौसम सुरू व्हायचा. भिरभिरणाऱ्या हवेला वेगळाच सुगंध मिळायचा. त्या हवेच्या गंधाने साऱ्या सृष्टीला एक नवचैतन्याची धुंदी यायची. वैद्याच्या सल्ल्याप्रमाणे गावातील ज्येष्ठ मंडळी पहाटेच्या निरोगी वातावरणात फिरून आपली प्रकृती अधिक शक्तिवान करताना दिसत असत. गावातील स्त्रिया-मुली सूर्योदयाच्या आधी नदीवर माघस्नान करण्यासाठी जाताना दिसायच्या. गावातील वयोवृद्ध स्त्रिया सांगायच्या की, पहाटे माघस्नान केलं की, आयुष्य वाढतं. किती निरोगी आल्हाददायक वातावरण असायचं. शरीर कसे अंतर्बाह्य रोमांचित व्हायचे. सांगायला जरा संकोच वाटतोय, पण हे सांगणं काही गैर होणार नाही. 

तरुण वयात आपल्या बरोबरीच्या मुलींच्या सान्निध्यात राहायला खूप आवडायचं. असं वाटायचं की, स्वर्गीय परीने जादूच्या छडीने त्यांना सुंदर पऱ्या केलंय. आपल्या चारी बाजूला अशा पऱ्याच वावरताहेत. एकदा मात्र अशीच एक सुंदर परी एकाबरोबर पळून गेली होती. या वसंत ऋतूच्या फुलत्या काळात आम्ही काय काय रंगढंग करणार आहोत, याची वार्ता पार नदीघाटापासून भुईमूग, वाटाण्याच्या शेतापर्यंत पसरायची. या वेळी मटार, हरभरा कसे मऊसूत, लुसलुशीत झालेले असायचे. हे दाणे सोलून खात-खात खिलवत-खिलवत लहानपणीच्या प्रेमप्रकरणावर आमची चर्चा दिलखुलास व्हायची. सांगायची गोष्ट ही की, इतर दिवसांत लांब राहणाऱ्या या मुली वसंतोत्सवात अगदी आमच्याजवळ यायच्या. इतक्या जवळ यायच्या की, आमच्या सुनसान वाळवंटाचं रूपांतर आपोआपच मऊ मुलायम हिरवळीत व्हायचं. आम्ही चित्रपटातील गाणी म्हणत असताना त्याही हळू आवाजात चोरून गाणी म्हणत आम्हाला साथ देत आणि ती गाणी तरी कुठली असत माहितेय? शाम ढले, खिडकी तले तुम सीटी बजाना छोड दो, किंवा भोली सूरत दिल के खोटे, नाम बडे और दरसन छोटे, किंवा सैया दिल में आना रे, आके फिर ना जा ना रे, किंवा पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में... ही असत. 

पण त्या दिवसांत व्हॅलेंटाइन डेची रंगबिरंगी माहिती आम्हाला नव्हती. ते नाव कशाचं आहे, याची आम्हाला अंधुकशी कल्पनादेखील नव्हती. गावातल्या प्राथमिक शाळेत बालभारतीच्या पुस्तकात वसंत आला वसंत आला, फुले उमलली फांद्यावरती, भुंग्यांची गुणगुण, पाने तालावर डोलती... ही नाजूक मुलायम कविता शिक्षक इतक्या रुक्षतेने शिकवायचे की, त्यातील सौंदर्य नष्टच व्हायचे. हिंदी गाणी कशी लगेच गळ्याखाली उतरतात. पाठ होतात. पण शाळेतील वसंत कवितेवर मात्र चार ओळी निबंध लिहा म्हटले, तर त्यासाठी मार मात्र खावा लागायचा. आम्हाला शाळा म्हणजे कैदखाना वाटायचा. गुरांना कोंबून कसे हाल करतात, तसा कोंडवाडा वाटायचा आणि जगातला खडूस माणूस म्हणजे गुरुजी. त्या फुलपंखी दिवसांत डोळ्यात रंगबिरंगी स्वप्नं तरळत असायची. ते दिवस तसेच राहावेत, असे वाटत असताना नेमकी त्याच वेळी परीक्षा असायची. त्या परीक्षेमुळे आमच्या सुंदर स्वप्नांचा भंग व्हायचा. त्या मोसमातली परीक्षा म्हणजे मागे लागलेली पीडाच वाटायची. पण या परीक्षेत पास तरी व्हायला पाहिजे, नाही तर आमचा सगळा भविष्यकाळ काळवंडून जाईल, या भीतीने परीक्षेच्या तयारीला लागत असू. पुस्तकाचं प्रत्येक पान कसं रूक्ष असायचं. 

आम्ही इतिहासात वाचलं होतं की, देशात सुवर्णकाळ नांदत होता तेव्हा मौर्य चंद्रगुप्त यांच्या काळात मदनोत्सव म्हणजेच वसंतोत्सव मोठ्या धामधुमीत साजरा केला जायचा. या उत्सवात गावातील सारे जण अगदी न्हाऊन निघायचे. वसंतपंचमी दिवशी गुरुजी सरस्वती पूजन करून गव्हाच्या पिठात साखर घालून केलेला प्रसाद वाटत. आम्हा विद्यार्थ्यांना ‘या कुंदेंदुतुषार हार धवला’सारखे श्लोक हातात छडी घेऊन मारकुटे गुरुजी अतिशय नीरसपणे शिकवत आणि त्याच वेळी आम्ही मनाने लाल छडी मैदान खडी, क्या खूब लडी क्या खूब लडी, कमर पे चोटी लटके, हो गया दिल का पुरजा-पुरजा अशा गाण्यांत रमून गेलेलो असायचो. वर्गातल्या, स्वप्नातल्या पऱ्या भेदरलेल्या आवाजात पेटी-तबल्याच्या साथीवर सरस्वती गीत गात. छे! कुठं वसंतऋतूचं रमणीय स्पंदन आणि कुठं हे प्रार्थनागीत! कुठलाच ताळमेळ नसे. या सुंदर वसंत ऋतूच्या काळात आम्हाला असा कडुलिंबाचा कडवट काढा प्यायला लागायचा. बाहेरची सृष्टी विविधतेने नटायची, बहरायची, अनेक रंगांतून फुलायची नि आम्ही दिवसरात्र मेहनत करून गणित, रसायन, विज्ञान, हिंदी अशा विषयांच्या कोयनेलच्या गोळ्या चघळायचो. सृष्टी चैतन्यात न्हालेली असायची नि त्या रंगात कधी न्हाता आले नाही, केवढे हे दुर्दैव!

त्या वेळी आम्हाला व्हॅलेंटाइन डेचे नाव माहीत नव्हते. हा असा हवेत तरंगविणारा प्रेमोत्सव आमच्या उमलत्या वयात का नाही बहरला. डिस्को डान्स आमच्या काळात का नाही अनुभवायला मिळाले? आजच्यासारख्या चॉकलेट, गुच्छ, भेटवस्तू इत्यादीचं देणं-घेणं आमच्या उमलत्या काळात आम्हाला असं कधी आनंददायी अनुभव का नव्हता? आमच्या काळात आम्ही अर्धेकच्चे पेरू, मटारच्या शेंगा एकमेकांना देऊन तो फसवा व्हॅलेंटाइन डे साजरा करत होतो. एवढ्याशा छोट्या भेटीनेही आमच्या त्या स्वप्नातल्या पऱ्या खूश होऊन जात. कुणी म्हणतात, प्रेम हा एक शुद्ध वेडेपणा आहे. पण या वेडेपणामागे काही हेतू नक्की आहे. या बाबतीत आजच्या पिढीला उपदेश करणं मुळीच योग्य होणार नाही. कारण तसं पूर्वीचं वातावरण आता राहिलं नाहीय.
 
kjagannath08@gmail.com
बातम्या आणखी आहेत...