आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ती आणि मी'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऊन-पाऊस, हिरवंगार गवत, रंगीत फुलं, वेगवेगळे पक्षी, रंगीबेरंगी फुगे हे सगळं मी बघते.
कारण, मला ते दिसतंय, पण ‘ती’... तिला हे दिसत नसलं तरी या प्रत्येक गोष्टीचा आनंद खऱ्या अर्थानं ‘ती’ घेत असते. अंधाऱ्या जगात ‘ती’ प्रकाश निर्माण करत असते.

नेहमीप्रमाणे आज लायब्ररीत येऊन बसलीये. सकाळी लवकर उठणं खरं तर नकोच वाटत असतं. पण, लायब्ररीत जागा मिळणार नाही, या विचारानं स्वत:ला जबरदस्तीने उठवून ढकलत आणत असते. दहा मिनिटांपूर्वीच वाचता-वाचता जरा झोप लागली. जागी झाले. आणि ‘ती’ आलेली बघितलं. ‘ती’ – खरं तर मी तिला रोजच बघते. होस्टेलला, डिपार्टमेंटला, कधी कँटीनला. पण, कधी बोलले नाही मी तिच्याशी. तिचं नावही मला माहीत नाही. म्हणून फक्त ‘ती’. तर, ही ‘ती’ लायब्ररीत आलीये. पण, ‘ती’ दरवाजाजवळ येऊन थबकली, दोन मिनिटं स्तब्धच राहिली. आणि मी तिच्याकडे बघून स्तब्ध झाले. आता ही पुढे कशी जाईल? आणि लायब्ररीत जागा नाहीये, हे तिला कसं कळलं? उठून तिला बसवू का कुठे? याच विचारात होते मी. पण, मी काही कृती करण्याआधीच ती पुढे चालू लागली. समोरून तिची मैत्रीण आली. तिने तिच्यासाठी जागा ठेवलीच असणार आणि हाताला धरून त्या जागेच्या दिशेने दोघीही गेल्या. मला आता ‘ती’ दिसतही नाहीये. कुठे बसली, तेही समजलं नाही. एव्हाना, तिने अभ्यासही सुरू केला असेल. पण, मी मात्र तिचाच विचार करत आहे. या पाच मिनिटांच्या प्रसंगानं तिला मी जिथं-जिथं बघत आलीये ना आजपर्यंत, त्या सगळ्याच जागा आठवतायेत, त्या जागेवर हसत उभी असणारी ‘ती’ समोर येतीये.

तिला मी एक दिवस एल-८ (होस्टेल नं.-८) जवळ बघितलं, हातात रंगीत फुगे होते तिच्या. वेगवेगळ्या रंगांचे लाल, गुलाबी, हिरवा, पिवळा. अजून बरेच आणि खूप गोड हसत होती ती. फुग्यांकडे मीसुद्धा कधी इतक्या आनंदानं, कुतूहलानं बघितलं नव्हतं, जे कुतूहल मला तिच्या अंधारानं भरलेल्या नजरेत दिसलं. त्या फुग्यांचं तिला विलक्षण कौतुक वाटलेलं. स्पर्शाने तो आनंद ती अनुभवत होती.

नंतर, त्या आधी की त्यानंतर. आठवत नाही, पण एक दिवस तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती ती. होस्टेलच्या आवारात. मी त्या वेळी केस वाळवत उन्हात थांबलेली. खरं तर, तिच्याविषयीच्या कुतूहलानेच! मैत्रिणीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा. टेन्शनमध्ये होती ती. मग या ‘ती’ला ती ते सांगत होती. ‘ती’ने ते ऐकलं आणि खूप शांतपणे समजावू लागली. खूप मोठं तत्त्वज्ञान नव्हतं तिच्या बोलण्यात. पण, खूप साध्या शब्दांत ती दिलासा देत होती, आयुष्य सोपं करणारं गणित तिने मांडलं. ‘अगं, हे चालायचंच आणि नाही विचार करायचा इतका, प्रत्येक दिवस सारखा नसतोच.’ असं अजून बरंच. पण, बोलताना कुठंही स्वत:चं उदाहरण म्हणून दिलं नाही की, आदर्शही ठेवला नाही. आपणा सर्वांना सवय असते ना, कुणी थोडंसं रडलं, दु:ख शेअर केलं, की लगेच स्वत:चं घोडं पुढे दामटायचं आणि म्हणायचं की, ‘अरे, तुझ्या बाबतीत एवढंच झालं, मला तर एवढं भोगावं लागलंय, इतकं सहन केलंय मी.’ किंवा मग, ‘तुझ्या वाटेला आलंय ना त्यातून मीसुद्धा गेलीये. खूप त्रास झाला मला.’ वगैरे. वगैरे. आणि मग, समोरची व्यक्ती अर्थातच स्वत:चं दु:ख विसरतेही थोडं. पण मग अश्रू पुसून पुन्हा आपलंच सांत्वन करू लागते, मग आपल्यालाच ‘सहानुभूती’ मिळते. समजूत घालणाऱ्यांच्या जागांची अशी अदलाबदली होताना दिसते. पण ‘ती’ मात्र या बाबतीतही वेगळी!

अजून एकदा मी तिला मेसमध्ये बघितलं जेवताना. मी जेवणाचं ताट घेतलं आणि चेहराच उतरला. ताटातली पोळी चांगली नव्हती, अर्धी कच्ची तर अर्धी काळी कुट्ट. मग, जेवताना चांगली तेवढी खायची आणि नको असणारे तुकडे बाजूला काढायचे, असं माझं जेवण सुरू झालं. जेवणाची चव तिला ‘बेचव’ वाटत नसेल? अर्धवट शिजलेल्या पोळीचा स्पर्श तिला कळतच असेल ना? पण ‘ती’ मात्र ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ असं म्हणून आनंदाने ते खात होती. मैत्रिणीशी हसत-बोलत तिचं जेवण सुरू झालं. मेसच्या भाज्या म्हणजे फक्त गरम पाणी, हे लक्षात येऊन तिचा चेहरा कधीच पडत नसेल? काय फरक आहे आम्हा दोघींत? फक्त दिसण्याचा आणि न दिसण्याचा? प्रकाशमय आणि अंधारलेल्या जगण्याचा? काळं आणि रंगीत. दिवस-रात्र. एवढाच? मला दिसतंय, मी बघू शकतीये. पण, तिला नियतीने तो अधिकारच नाही दिला. एवढाच फरक असेल आम्हा दोघीत? छे! हा फरक असला तरी फक्त यापुरतीच तुलना होऊ शकत नाही आमची. सुरुवातीला मला तिच्याविषयी खूप सहानुभूती वाटायची. नियतीचा, देवाचा रागही यायचा. पण, आता तिच्याकडे बघून स्वत:ची दया येते.

मला दिसतंय, मी हे सुंदर जग बघू शकते, ऊन-पाऊस, हिरवंगार गवत, रंगीत फुलं, विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या खारुताई, वेगवेगळे पक्षी, रंगीबेरंगी फुगे हे सगळं मी बघते. कारण, मला ते दिसतंय. पण ‘ती’ तिला हे दिसत नसलं तरी या प्रत्येक गोष्टीचा आनंद खऱ्या अर्थानं घेत असते. जे दिसतंय त्या जगात मी फक्त नसणाऱ्याच गोष्टी शोधत असते, तक्रार करत असते, डोळे बंद करून अंधारात रडतही असते. पण ‘ती’ अंधारलेल्या जगात प्रकाश निर्माण करते. काळ्याकुट्ट ढगात वेगवेगळे रंग पसरवते. नसणाऱ्या गोष्टीही ती अनुभवू शकते. एवढंच नाही, तिच्या जगात तिला हवं तसं जग ‘ती’ निर्माण करते. कुठलीच तक्रार न करता. मी तिला कधीच रडताना बघितलं नाही. कारण, ती रडणारी नाहीये.

आज लायब्ररीत येणं नकोसं वाटतं होतं मला. पण, ‘ती’ किती उत्साहनं आलीये. ती रोजच येत असणार. कारण, तिला एक ‘प्रकाशमय जगणं’ हवंय!

फरक फक्त दिसणं-नं दिसणं, इतकाच नाहीये. तो असलाच तर ‘जगण्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा’ आहे, हो ना?
jagrutibodhan@gmail.com