आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राहुल जागे झाले; संघटना ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल गांधी नव्या जोमाने कामाला लागले, असे वरवर पाहता दिसते. गेल्या आठवड्यात तेलंगणात शेतकर्‍यांना भेटले. त्या आधी अमरावती जिल्ह्यात गुंजी ते तोंगलाबाद पायी चालले. पाच गावे, नऊ आत्महत्याग्रस्त परिवार, १६ किलोमीटर; दहा-बारा तास लोकांसोबत होते.

वऱ्हाड किंवा तेलंगणाच्या गर्मीत पाय तुडवत चालणे गंमत नाही. तरुण आहेत; चाललेच पाहिजे. गुंजीत काँग्रेसवाले राहुलबाबाच्या दर्शनासाठी पांढर्‍या कपड्यांत गर्दी करून होते. गम्मत होती. पार्टीचे उपाध्यक्ष लोकांच्या भेटीसाठी आले होते, तर खबरी नेते त्यांच्या. ते चालले. त्यांच्या मागे सुरुवातीला काही नेते दिसले. अस्सल जुन्या चेहर्‍यांवर कमालीचा त्रास दिसत होता : काय हा बाबा भर उन्हाळ्यात आम्हाले पायी चालवत आहे! याचे जमल; आमचे? विदर्भातील एक-दोन सोडले, तर स्थानिक दिग्गज कुठेच नव्हते. लहान-सहान नेतेसुद्धा मधूनच सटकले; काही गुंजीतून परतले. मोठ्या इतमामात नागपूर विमानतळावर आदल्या रात्री आले होते, हार तुरे घेऊन. पण पदयात्रेत नव्हते. तसेही कास्तकाराशी त्यांचे काय घेणे देणे? राहुल खुळे नसतील तर कोण चालले, कोण नाही, याचा समाचार ठेवतील. गावांतील इरसाल लोक बोलले : पद नाही, आता पदयात्रा काय काढता? पण गावांत राहुल भाऊ आले तर सामान्य बाया-माणसांस आनंदच झाला! इकडे कोण फिरकत नाही. हा गडी आला तरी. वऱ्हाडी थाटात म्हणाले, भाऊ असेच येत चला अधूनमधून; विसरजा नको.

मोदी सरकारने एक वर्ष पूर्ण केले. बरेच लोक आकलन करतीलच. या एक वर्षात मात्र विरोधी पक्षांच्या भूमिकेलाही तेवढाच तवज्जो मिळाला पाहिजे. विशेषतः काँग्रेस पक्षाला. मोदींचे जे व्हायचे ते होईल; पण गेल्या वर्षी जमीनदोस्त झालेल्या देशातील सर्वात जुन्या पक्षाचे भवितव्य काय आहे? त्याचे उत्तर राहुल गांधी पक्षात सर्वमान्य होतील का, आणि झालेच तर त्यांना देशातील लोकांचे विषय पेलवतील का? यांवर निर्भर आहे. गेल्या महिन्यापर्यंत तरी त्यांचा पक्ष त्यांना गंभीरतेने घेत नव्हता आणि त्याला त्यांची धर-पकड कार्यपद्धती कारणीभूत होती. गेलं वर्षभर संसदेत आणि संसदेच्या बाहेर काँग्रेस नावाचा पक्ष आहे, असे जाणवत नव्हते.

मधु दंडवते दहा लोकांना घेऊन ऐंशीच्या दशकात लोकसभा गाजवत असत. ते शांतपणे मुद्देसूद बोलत. सरकारला सळो की पळो करून सोडत. विपक्ष नेता भक्कम आणि अभ्यासू असला तर मोठी छाती असून चालत नाही. सरकारला उत्तरे द्यावीच लागतात. राहुल गांधी संसदेत बोलायला लागले आणि रस्त्यावर आले तेव्हा काँग्रेसप्रेमींच्या जिवात जीव आला. कार्यकर्ते अजून साशंक आहेत; पण नेता चालतो, म्हटल्यावर निराशेत झोपलेले थोडे उठून सरळ तर बसले. जे लोक अमरावतीत त्या दिवशी चालत होते, ते सामान्य होते. जे आले नाहीत, ते पक्षाचे नेते!

आधी पंजाब, नंतर अमरावती, दिल्ली आणि आता तेलंगणा – ५७ दिवसांत देशाबाहेर असताना कोणती भाकरी खाल्ली माहीत नाही; पण राहुल गांधींमध्ये थोडासा बदल झालेला दिसतो. १९७७मध्ये इंदिराबाई हरल्या तेव्हा थेट पवनारला आल्या. त्या वेळचा हा किस्सा. विनोबा मौनव्रतात होते. पण बाई हैराण आहेत, असे पाहून त्यांनी व्रत तोडले
म्हणतात. काय करावे? बाईंच्या समोर प्रश्न. विनोबा म्हणाले, लोकांकडे परत जा. ते दाखवतील मार्ग. बाई गेल्या. नंतरचा इतिहास सांगायला नको. राहुल बाईंच्या अंगा-खांद्यावर खेळलेले आहेत. पण आजची परिस्थिती तशी नाही. आजचा तरुण वर्ग कमालीचा अस्वस्थ आहे. नोकर्‍या नाहीत आणि पैशाचे सोंग करता येत नाही. गावांत तर बघायलाच नको. खरीप डोक्यावर आहे, पण लोकांकडे मोजायला पैसे नाहीत. गेल्या हंगामात हाती पीक आले नाही. काम नाही.
असे असून संसदेत वा विधानसभेत पक्षाचे नेते प्रश्नांवर बोलत नाहीत. लोकांमध्ये फिरत नाहीत. निवडणुका संपल्या. राजकारण बाजूला. आता लोक-संपर्क असला पाहिजे, पण राज्यभर फिरल्यावर लक्षात येते की, सत्तापक्ष बेफिकीर आहे, आणि विरोधी पक्षाचा धाक नाही. लोकांचे कोण बघणार?

देशात विरोधी पक्ष नाही तर लोकशाही स्वस्थ राहणार नाही. देश-पातळीचा विरोधी पक्ष नसेल तर जो माज आज सोशल मीडियात दिसतो, तो उद्या रस्त्यावर दिसेल. सध्या देशात सक्षम आणि भक्कम विरोधी पक्ष किंवा नेता नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी त्या जागा घेऊ शकतील; पण त्यासाठी पक्षाचे सर्व स्तरांवर पूर्ण-वेळ काम करणारे संघटन लागेल. त्यासाठी लोक लागतील, कार्यकर्ते लागतील, नुसते धंदेवाईक नेते नाही.

केवळ पदयात्रेने किंवा मीडियात झळकून पक्ष जिवंत कसा होईल?
ज्या दिवशी राहुल गांधी लोकसभेत मोदींच्या ‘सुट-बुटच्या’ सरकारविरोधात बोलत होते, त्याच दिवशी औरंगाबादेत महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस मुळानिशी संपली. सबंध महाराष्ट्रामध्ये पक्षाची अवस्था बिकट. एक उदाहरण : नागपूर जिल्ह्यात रामटेक तालुक्यात मोवाड आहे. तिथल्या नगरपालिकेत काँग्रेसला निवडणुकीत तिकिटाला लोक सापडले नाहीत. ओढूनताणून आणावे लागले.

सध्या राज्यात सहकार क्षेत्रात निवडणुका सुरू आहेत. जवळजवळ अडीच-एक लाख जागांवर. काँग्रेस पक्ष म्हणून कुठे आहे? नगर जिल्ह्यात सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील आपल्याच पक्षाच्या विरोधात भाजप-सेनेबरोबर लढले. पक्षश्रेष्ठी खपवतात म्हणून खपते. राष्ट्रवादीच्या टेकूवर बाळासाहेब थोरात बँकेची निवडणूक जिंकले. लातूर-परभणीचा अपवाद वगळता मोठमोठे दिग्गज सहकारी बँकेच्या निवडणुकीत हद्दपार झाले. तिथे सांगलीत पतंगराव कदम; इकडे नांदेडात अशोकराव चव्हाण. या छोट्या निवडणुकांचे परिणाम पुढील राजकारणात दिसतीलच. दिल्लीत याची हवा नाही. तेथील दरबान इकडचे खरे वास्तव तिकडे सांगत नाही. आणि राहुल गांधींना सध्या दिल्लीच उमजत नाही, तर सातपुड्याच्या अलीकडचे काय कळेल? पक्षाचे राज्य-संपर्क प्रमुख मोहन प्रकाश यांचे काम नेमके आहे तरी काय? गोंदिया ते कोंकण, जिल्ह्या-जिल्ह्यात पक्षाची सूत्रे कोणाच्या हाती आहेत, कार्यकर्त्यांना ठाऊक नाही. मोठाले विषय! पण काँग्रेसजवळ विषयांना उचलायला लोक किंवा संघटन नाही.

जमिनीचे ठेकेदार जमीन अधिग्रहणाविरुद्ध आंदोलन, असे काय बरे करतील? पक्षातील उद्योगपती नेते कष्टकर्‍यांच्या हक्कांबद्दल कसे लढतील? मग राहुल एक बोलतील, त्यांचे नेते दुसरे. ते जोवर राज्या-राज्यांत बसून पक्ष-संघटना तळागाळापर्यंत पोहोचत नाही, तोवर एक लोकाभिमुख पक्ष उभा होणार नाही. एक-दोन पदयात्रेने नाही जमायचे. तंबू ठोकून काम करावे लागेल. खरे तर काँग्रेस पक्ष कोणासाठी आणि कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर बदललेल्या राजकीय आणि आर्थिक संदर्भांमध्ये शोधावे लागेल. नवीन घोषवाक्ये आणि कार्यक्रम लागतील. अन्यथा संघटन उभे राहात नाही तोवर राहुल पायी चालतील, अन‌् दुसरे पक्ष फायदा घेतील. उत्तर प्रदेश निवडणुकीत तेच झाले. राहुल गांधींचा फायदा अखिलेश सिंगला झाला. तेच इकडे होईल. राष्ट्रवादी, बसपा आणि ओवेसींचे पक्ष फायदा घेतील. आव्हाने मोठी आहेत; पण काम करण्यास वावही भरपूर. २०१४मध्ये सर्व क्षेत्रातील लोक-चळवळी संपल्या. चळवळीतील लोक आम आदमी पार्टीत गेले आणि परतीचा मार्ग बंद झाला. त्यांची जागा मोकळी आहे.

राहुल गांधींचे अर्धे काम तर मागील निवडणुकीत लोकांनीच पुरे केले. महाराष्ट्रभर काय, देशभर काँग्रेस नेते आपल्यात येत नाहीत, असे पाहून त्यांना घरी पाठवले. जे जिंकू शकत नाहीत; जे जिंकवून आणू शकत नाहीत; आणि
ज्यांना लोकांकडे जायला वेळ नाही, अशांना पक्षात ठेवून करता तरी काय? असा प्रश्न पक्षाचे लहानसहान कार्यकर्ते अलीकडे विचारत आहेत. जे काही करायचे ते लवकर आणि नियमित करावे लागणार. राहुल गांधींच्या बाजूने वय आणि वेळ आहे; पण त्यांच्या पक्षाला परत उभे करण्यास त्यांना आता मुळीच अवकाश घेता यायचा नाही.

जयदीप हर्डीकर
(लेखक ‘द टेलिग्राफ’ या वर्तमानपत्राचे नागपूरस्थित मध्य भारताचे विशेष प्रतिनिधी आहेत.)
jaideep.hardikar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...