आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासींचा गुरुजी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाप्रति आपण काही देणे लागतो याची जाणीव चिरंतन ठेवत शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आदिवासींचे अज्ञान दूर करणारे जे काही बोटावर मोजण्याइतके लोक आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील नटावद गावचे नटावदकर कुटुंबीय अग्रणी म्हटले पाहिजेत.
परंपरागत रूढी-परंपरा, अंधश्रद्धा आणि मागासलेपण... केवळ या कारणांमुळे आदिवासी बांधव पिढ्यान्पिढ्या समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर राहत आला. अशा भोळ्याभाबड्या आदिवासींचे खडतर जीवन प्रकाशमान करण्याच्या उद्देशाने ज्ञानयज्ञ प्रज्वलित करण्याचे कार्य स्वातंत्र्योत्तर काळामध्ये कै. जयंतराव नटावदकर यांनी शिक्षकाप्रमाणे अर्थात गुरुजीप्रमाणे केले अन् त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. सुहास हेच कार्य मोठ्या नेटाने पुढे चालवत आहे. राज्यामध्ये आदिवासी नेतृत्वाच्या आधाराने सत्ताधीश झालेल्यांची संख्या बरीच मोठी आहे. पण ज्या आदिवासींच्या जिवावर आपण मोठे झालो, राजकीय व सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करू शकलो, समाजाच्या सर्व थरांमध्ये ऊठबस वाढली, अशा मंडळींना कालौघात समाजाचे विस्मरण झाले. तथापि, समाजाप्रति आपण काही देणे लागतो याची जाणीव चिरंतन ठेवत शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आदिवासींचे अज्ञान दूर करणारे जे काही बोटावर मोजण्याइतके आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार जिल्ह्यातील नटावद गावचे नटावदकर कुटुंबीय अग्रणी म्हटले पाहिजेत.
नंदुरबार हा अतिदुर्गम आदिवासी जिल्हा म्हणून सरकारदरबारी ओळखला जातो. त्याच दृष्टिकोनातून शासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष अन् त्या परिसरातील आदिवासींच्या सेवार्थ कार्य करणा सेवाभावी संस्था वा संघटनाही त्याकडे पाहत असतात. वास्तवामध्ये आजमितीला उपरोक्त चित्र बच मोठ्या प्रमाणात बदललेले आहे वा उत्तरोत्तर बदलत आहे. अशा या परिवर्तनास वा बदलास शिक्षणाचे जाळे अतिदुर्गम भागातील गाव-पाड्यापर्यंत पसरवणा कै. जयंतराव नटावदकर यांचे कार्य कारणीभूत ठरते. राजकारणामध्ये स्वत: आदिवासी असल्याचा फायदा बरीच मंडळी उचलतात. नंदुरबार जिल्ह्यातील मोजक्या ज्येष्ठ राजकारण्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करता येऊ शकेल. कारण यातील बहुतेकांनी दोन, तीन वा त्याहून अधिक दशके आदिवासी जनतेवर राज्य गाजवले आहे. स्वत:च्या खिशाला साधा स्पर्शही होऊ न देता सरकारी योजना आदिवासींच्या पुढ्यात न्यायच्या अन् बिचा आदिवासींना त्या योजनांचा लाभ मिळो ना मिळो, स्वत:चे उखळ पांढरे करून घेण्यात मात्र ही मंडळी तसूभरही मागे राहिलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर कै. जयंतराव नटावदकर यांचे उदाहरण निश्चित वेगळे म्हणता येऊ शकेल. त्यांनी राजकारण केले, राजकारणाची सुरुवात काँग्रेसच्या माध्यमातून केली, मुंबई प्रांताचे आमदार म्हणून 1947 ते 1951 या काळामध्ये कार्य केले, 1952 ते 1957 या कालावधीत खासदार म्हणून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
कै. जयंतरावांना आमदार वा खासदार म्हणून जवळपास दशकभराचीच कारकीर्द लाभली. पण या काळातही त्यांनी लोकप्रतिनिधीची भूमिका वठवतानाच पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाच्या माध्यमातून जिल्हाभर पसरलेल्या शिक्षण क्षेत्राच्या जाळ्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. राजकारणाआधीही आदिवासींमध्ये शिक्षणाचा प्रसार वाढावा आणि त्यायोगे त्यांच्यातील अज्ञानाचा अंधार दूर व्हावा, या उद्देशाने 1938 मध्येच ज्ञानदानाचे कार्य सुरू केले होते. सातपुड्याच्या कुशीतील गाव-पाड्यापर्यंत शिक्षणाचा प्रसार-प्रचार व्हावा म्हणून ठक्कर बाप्पा, गुला महाराज, जनार्दन महाराज वळवी यांच्यासारख्या गांधीवादी विचारांच्या ज्येष्ठांच्या सहकार्यातून पश्चिम खान्देश भिल्ल सेवा मंडळाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1951 पासून 1978 पर्यंत कै. नटावदकर मंडळाचे अध्यक्ष राहिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी माध्यमिक व प्राथमिकच्या आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. त्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांवर शैक्षणिक संस्कार केले गेले. अतिदुर्गम जिल्ह्यात शिक्षणाची कवाडे खुली झाल्याने पालक मोठ्या प्रमाणात मुले-मुली शाळेत दाखल करू लागले. परिणामी एकट्या जिल्ह्यामध्ये माध्यमिक व प्राथमिकच्या मिळून एकूण 14 आश्रमशाळा कार्यरत आहेत. याच मंडळाची एक आश्रमशाळा शेजारच्या गुजरात राज्यातील उच्छल तालुक्याच्या भडभुंजा गावामध्ये सुरू आहे. साधारणपणे 1955 मध्ये येथे ही आश्रमशाळा कार्यरत झाली होती.
आधी समाजकारण अन् नंतर राजकारण, अशा क्रमाने कै. जयंंतरावांची कार्यशैली राहिल्याने प्रथम आदिवासी भागातील शिक्षण प्रसारावर भर दिला. काँग्रेसच्या मुशीत घडलेल्या कै. नटावदकरांचा राजकीय प्रवासही आश्चर्यकारक आहे. अगदी सुरुवातीला काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले, नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले. पुढे काँग्रेसविरुद्ध बंड करत ते जनसंघात दाखल झाले. 1970 च्या सुमारास तळोदा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जनसंघाच्या तिकिटावर लढवली. आणीबाणीच्या काळात म्हणजेच 1977 मध्ये जनता दलातर्फे नंदुरबार विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी केली. निवडणुकीतील यशापयशाचा विचार न करता
कै. नटावदकरांनी शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मात्र अखेरपर्यंत नेटाने पुढे रेटले. कै. जयंतरावाचे शैक्षणिक व राजकीय कार्य त्यांचा मुलगा डॉ. सुहास नटावदकर पुढे चालवत आहे. वडलांकडूनच जनसंघाचा विचार मिळाल्यामुळे डॉ. सुहास यांचीही राजकीय वाटचाल त्याच विचाराला धरून चालू राहिली. डॉ. सुहास यांनी 2004 व 2009ची लोकसभा निवडणूक नंदुरबार मतदारसंघातून लढवली. हा मतदारसंघ काँग्रेसचा परंपरागत किल्ला असताना दोन्ही वेळा सुहास नटावदकरांनी काँग्रेसच्या उमेदवाराला चांगलीच टक्कर दिली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सुहासिनी नटावदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवारी केली होती. त्या निवडणुकीमध्ये नटावदकर कुटुंबीयांच्या पदरी अपयश आले असले तरी गावितांसारख्या मातब्बर उमेदवाराला हैराण करण्यात ही मंडळी यशस्वी ठरली होती. याचेही कारण नटावदकर कुटुंबीयांचा शिक्षणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासींमध्ये सर्वदूर असलेला संपर्क अन् कै. जयंतरावांनी अनेक दशके वठवलेली ‘गुरुजी’ भूमिका हेच त्याला कारणीभूत असावेत.