आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयपूरचा साहित्य उत्सव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल अर्थात, हे संमेलन जयपूरमध्येच होते. यंदाचा हा सहावा फेस्टिव्हल ऊर्फ जेएलएफ. मूळ फक्त 17 रसिक प्रेक्षकांच्या साक्षीने हा फेस्टिव्हल सुरू झाला. दरवर्षी जानेवारीतच होणारा हा फेस्टिव्हल तब्बल पाच दिवस चालतो. जयपूरमधल्या डिग्गी पॅलेस या विशाल राजवाड्याच्या परिसरात एकूण पाच मांडवांमध्ये हा उत्सव होतो. त्याला दीड-दोन लाख लोक सहज हजेरी लावतात. पाच मांडवांमध्ये मिळून सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळात प्रत्येकी एक तासाचे एक अशी एका दिवसात किमान 30 सत्रे होतात. म्हणजे पाच दिवसांत दीडशे तरी. पुस्तकांचे प्रकाशन, सेलिब्रिटी लेखकांशी गप्पा, मुलाखती, प्रामुख्याने हिंदी कवींचे कार्यक्रम, विख्यात इंग्रजी लेखक/विचारवंतांच्या मुलाखती, विशिष्ट साहित्यिक, सामाजिक, राजकीय विषयांवर चर्चा गर्दीच्या साक्षीने सुरू असते. मग संध्याकाळी श्रमपरिहारासाठी संगीताचा कार्यक्रम असतो.

या गर्दीत असतात मुद्दाम आलेले शेकडो परदेशी पर्यटक, जयपूरबाहेरचे भारतीय साहित्यप्रेमी आणि इंग्रजीत लिहिणारे भारतभरातील साहित्यिक. एक मोठा घटक असतो दिल्लीतला, फॅशन म्हणून या फेस्टला येणारा. म्हणजे पुण्यात डिसेंबरात सवाईला काही लोक जातात, तसा. या सगळ्यात मराठी टक्का विचाराल तर (एका) हाताच्या बोटावर मोजता येण्याजोगा. गेल्या वर्षीच्या पाच दिवसांच्या उत्सवात मला एकच मराठी बोलणारी व्यक्ती भेटली होती, मुंबईतले तमाम पुस्तकप्रेमी ज्याच्याकडून नवनवीन पुस्तके घेत असतात, तो शशिकांत सावंत. यंदा विख्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे आणि नाटककार मकरंद साठे यांचा या फेस्टमध्ये सहभाग होता.

नि:शुल्क प्रवेश, रंगणारी सत्र, आवडत्या लेखकाशी गप्पा, उत्तम राजस्थानी पदार्थाचे भोजन या उत्सवाची काही वैशिष्ट्ये आहेत. इथे प्रवेश चक्क चकटफू असतो. फक्त वैध फोटो आयडी सोबत असावे लागते. आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथलं जेवण. ज्यांनी आधी नोंदणी केलेली आहे, असे लेखक/पत्रकार आदींसाठी दुपारच्या भोजनाची, रक्त व श्वेत वारुणीसह, सोय असते. आपल्या आवडत्या लेखकाशी गप्पा मारण्याची, त्याच्यासोबत फोटो काढून घेण्याची ही उत्तम संधी असते. जेवणात अर्थातच राजस्थानी स्पेशालिटी असतातच. जवळपास प्रत्येक सत्र इंटरेस्टिंग असते, अगदी वेळेवर सुरू होऊन वेळेवर संपते आणि 90 टक्के सत्रांसाठी असलेल्या गर्दीमुळे बसायला खुर्ची मिळणे उशीर झाल्यास अशक्य असते. त्यामुळे जेवताना हा विचार करावाच लागतो. या सगळ्याचा खर्च प्रायोजकांनी केलेला असतो. मकरंद साठे म्हणाले तसे, एवढा खर्च पाहून अचंबित व्हायला होते आणि केवळ एका सहभागी वक्त्यावर होणा-या एकूण खर्चाइतके पैसे मिळाले, तर त्यात तीन नाटके करू शकू महाराष्‍ट्रा च्या गावागावात.

जयपूर विरासत फाउंडेशनचे आयोजन
जेएलएफचे निर्माते आहेत टीमवर्क प्रॉडक्शन्स. तो जयपूर विरासत फाउंडेशनचा एक इनिशिएटिव्ह आहे. त्याचे दोन संचालक आहेत, नमिता गोखले आणि विल्यम डॅलरिम्पल. आणि निर्माता संजय रॉय. यंदा दैनिक भास्कर, हिंदुस्थान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू, राजस्थान पत्रिका, गुगल, टाटा स्टील, चित्रपट महोत्सव संचालनालय, हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, पेंग्विन, राजस्थान व भारतीय पर्यटन विभाग आदी याचे प्रायोजक होते.

पुस्तकांचा मात्र एकच स्टॉल
जेएलएफ आणि आपल्या संमेलनातला मोठा फरक म्हणजे इकडे पुस्तकांचा एकच स्टॉल असतो. फुल सर्कल नावाची पुस्तकांच्या दुकानाची साखळी आहे, त्यांच्यातर्फे पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतात, पण तीही फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या लेखकांचीच. किमतीवर सूट नसते. फेस्टिव्हलमध्ये इतरही अनेक स्टॉल्स असतात, ज्यात राजस्थानी हातमाग, हस्तकला, दागिने आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विकले जातात.

नेमाडेंची संमेलनाला प्रथमच हजेरी
भालचंद्र नेमाडे पहिल्यांदाच फेस्टिव्हलला आले होते. सहभागी वक्ते म्हणून आल्याने त्यांची बडदास्त होती. पण त्यांना अधिक कौतुक वाटले ते याचे की प्रत्यक्ष गोखले, डॅलरिम्पल वा रॉय यांची एकदाही भेट झाली नाही आणि घ्यावीही लागली नाही. सगळी सोय कशी आपसूक झाली होती. त्यांना सगळीकडे फिरायला मुभा, आवडते कार्यक्रम ऐकण्याची संधी होती.

सत्रात प्रश्न विचारणा-या तरुणाईची संख्या मोठीच
मराठी साहित्य संमेलनाची नि या फेस्टिव्हलची तुलना साहजिक होती. जयपूरला तरुणाईची उपस्थिती डोळ्यांत भरण्याजोगी असते. शबाना आझमी, जावेद अख्तर, गुलजार, शर्मिला टागोर, प्रसून जोशी यांच्यासारख्या फिल्मी सेलिब्रिटींच्याच कार्यक्रमांना नव्हे तर रुचिर शर्मा, गायत्री चक्रवर्ती स्पिवाक, मायकल सँडल यांच्यासारख्या विचारवंतांच्या सत्रांनादेखील. पाऊण तासाच्या चर्चेनंतर सुमारे 15 मिनिटे श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची संधी असते, इथल्या तरुणाचे राजकीय/आर्थिक/सामाजिक भान आणि त्यांचा स्मार्टनेस आपल्याकडे दिसून येत नाही, असे नेमाडे यांना जाणवल्याचे ते म्हणाले. मात्र, त्यांनी चित्रपट वा क्रिकेट या विषयांवरील चर्चेबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली. मकरंद साठेंनाही त्या विषयांवरची सत्रे अस्थायी वाटली.

मराठीचा आग्रह, यंदा प्रथमच इतर भाषासाहित्यावर भर
नेमाडे म्हणाले की, आपल्याकडे एकाच कवीच्या कार्यक्रमाला एकाच मांडवात हजारो लोक बसलेले असतात. त्यापेक्षा दोन-तीन मांडवांमध्ये कार्यक्रम ठेवले तर वेगळं खूप ऐकता येईल. यंदा प्रथमच जेएलएफमध्ये इंग्रजी वगळता इतर भाषांमधील साहित्यावर भर देण्यात आला होता. गुजराती लेखक सीतांशू यशचंद्र (हे मराठी जाणतात व कवी कुसुमाग्रज पुरस्कारप्राप्त लेखक आहेत आणि उत्तम इंग्रजी बोलतात,) तामिळ लेखिका अंबई, मल्याळी लेखक बेंजमिन डॅनियल, हिंदी लेखक अशोक बाजपायी, अशोक चक्रधर, बंगाली लेखिका अरुणा चक्रवर्ती आदींचा सहभाग होता. मकरंद साठे यांना मराठीत वाचण्याचा आग्रहही केला होता.

अनुवादासह स्त्रीवादी लेखनावर विशेष सत्रे
यंदाच्या फेस्टिव्हलचा शुभारंभ विख्यात लेखिका महाश्वेता देवी यांनी केला. तसेच स्त्रीवादी लेखनावर काही विशेष सत्रेही त्यात होती. अमेरिकन, आफ्रिकन, लॅटिन अमेरिकन, हिंदी आणि पाकिस्तानी कवयित्री व लेखिकांचा या सत्रांमध्ये सहभाग होता. उपस्थित प्रेक्षकांमध्ये, महत्त्वाचे प्रश्न विचारणा-यांमध्ये तरुण मुलींची संख्या आश्वासक वाटावी इतकी मोठी होती.

अनेक चर्चासत्रांमध्ये अनुवाद हा विषय स्पर्शिला गेला. अनुवादाने भाषा समृद्ध होत जातात, हा त्या सर्वांचा सूर होता. मात्र तसे करतानाही, अनेक कलाकृती असतात की ज्यांचा अनुवाद कठीण असतो वा त्यांच्या अनुवादात मूळ साहित्यकृती पूर्णपणे उतरत नाही, असे मत अंबई यांनी व्यक्त केले होते. नेमाडे यांनी या अनुवादाच्या संदर्भात वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की अनेक मराठी मुली आज लग्नानंतर महाराष्ट्र सोडून परप्रांतात जातात. त्यांनी तिथली स्थानिक भाषा शिकून त्या भाषेतील साहित्य मराठीत आणले पाहिजे.

संगीत-चित्रपट विषयाशी निगडित साहित्यावर चर्चा
या जेएलएफला लिटरेचर फेस्टिव्हल म्हणत असले तरी त्यात संगीत आणि चित्रपट या विषयांशी निगडित साहित्यावरही चर्चा होते. ती केवळ गर्दी खेचण्यासाठी आयोजित केली जाते, असा आक्षेप अनेक जण घेतात. परंतु गौरव सोलंकी, जयदीप साहनी, नीलेश मिश्र यांसारखे तरुण पटकथालेखक जेव्हा बोलते होतात, तेव्हा ते पटकथा या साहित्य प्रकाराबाबतच बोलत असतात, हे विसरून चालणार नाही.

सांस्कृतिक-साहित्यिक जयपूरचा आनंद घ्या
जयपूर अनेक इव्हेंट्सनी गजबजलेले असते. जेएलएफ संपल्यावर दोनच दिवसांनी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल सुरू होतोय. रविवारी मॅरेथॉनही झाली. हा माहोलही अनुभवण्याजोगा असतो. थंडीचा आनंद घेतच खास शुद्ध तुपातले घीवर, सर्दी के लड्डू न विसरता चव घ्यावी असे असतात. जेएलएफला यावे नि काव्यशास्त्रविनोदेन पाच दिवस मेंदू, मन व हृदय यांना मनसोक्त समाधान मिळू द्यावे, हे बरे.