आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकल्पविरोधी आंदोलन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे निर्माण झालेले विरोधाचे वादळ शमण्याची अद्याप चिन्हे नाहीत. उलटपक्षी प्रकल्पविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या घोषणा सातत्याने होत आहेत. या प्रकल्पाची सर्वांगीण चर्चा आणि चिकित्सा करणारे मधु मंगेश कर्णिकलिखित ‘जैतापूरची बत्ती’ नावाचे पुस्तक अलीकडेच ‘मौज’तर्फे प्रकाशित झाले आहे. त्यातील हा उतारा...

माडबन-जैतापूरवासीयांच्या प्रकल्पविरोधाची पार्श्वभूमी, त्यांच्या शंका आणि संशय याबद्दल आपण समजून घेतले. त्यांच्या शंकांचे अधिकृत, जाणकार, जबाबदार व्यक्तींनी, शास्त्रज्ञांनी केलेले निरसन समजून घेतले. त्यांची प्रकल्पासाठी संपादित केलेली जमीन ही पडीक होती; नापीक नव्हती, हे म्हणणे आपण मान्य करूया. त्या जमिनीवर पीक काढण्यात येत नव्हते, या अर्थाने ती पडीक होती, नापीक नव्हती; पण आपण कोणते पीक तिच्यावर घेणार होतो? नाचणी, तीळ ही पिके कुणी कधी घेतल्याचे अलीकडे पाहिलेले नाही. बाउलमधील भात सोडले तर त्या सड्यावर भातशेती उपलब्ध नाही. आजघडीला तरी आंबा, नारळ, काजू उपलब्ध नाहीत. पण जर भरपूर पैसा खर्च केला आणि त्यातून पाणी, कुंपण उपलब्ध करून जर सुरुंगाने किमान दीड-दोन फुटांचे खड्डे कातळावर पाडले, तर उत्तम आंबा बागायत होऊ शकेल; पण स्थानिक जनतेकडे एवढा पैसा नसल्यामुळे सडा पडीक राहिला. काही पिढीजात जमीनदार बागायती राखून आहेत. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीही नाही. प्रकल्पामुळे जमिनीचे जे भाव वाढणार आहेत, त्यावर त्यांचा डोळा आहे, हे ग्रामस्थांनीच सांगितले. स्थानिकांचे पुढारीपण करणारा त्यातील एक जमीनदार आहे व दुसरा व्यापारी जमीनदार आहे. प्रकल्पामुळे त्यांचे काडीचेही नुकसान होणार नाही. झाला तर अलोट फायदाच होईल; परंतु ‘स्टरिलाइज्ड झोन’मुळे त्यांची खरी पंचाईत झाली आहे. त्यामुळे ते स्थानिकांना, मच्छिमारांना भडकवतात, असे तिथलीच मंडळी सांगतात. ते खरे मानले तरी सामान्य माणसाची सारासार विवेकबुद्धी, शहाणपण कुठे पेंड खाते? माणसे आंधळ्यासारखी त्यांच्यामागून का जातात?
समाजशास्त्रीय पद्धतीने कुणा अभ्यासकाने अभ्यास करावा, असा हा विषय आहे. मी यापूर्वी कोकणी माणसाच्या मानसिकतेबद्दल लिहिले आहे. माझ्यासारख्या एका कोकणी माणसाने आपल्याच भाईबंदांचे केलेले ते परीक्षण होते. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा कोकणच्या खडकाळ जमिनीने दिलेला बाणा आम्ही कसोशीने जपत आहोत; पण आम्ही तेवढेच धूर्त, बेरकी आणि मतलबीही आहोत. म्हणूनच कोकणाबाहेर, आम्ही पायाच्या अंगठ्याने मारलेली गाठ दोन्ही हाताच्या बोटांनी सुटणार नाही, अशी आमची संभावना होते. तिरकसपणे बोलणारे, वागणारे म्हणूनही आमची अपकीर्ती खूप आहे.
‘अंतू बर्वा’ हा आमचा प्रतिनिधी. गुहागरला मी प्रत्यक्ष पाहिले. एकेकाळी जे लोक ‘एन्रॉन’ला प्राणपणाने विरोध करत होते, तेच लोक संजीव खांडेकर या सीईओकडे आपणास किती कंत्राटे मिळतील, कोणकोणते फायदे मिळतील, यासाठी मनधरणी करत होते. माडबन-जैतापूरला असे काही होईलसे वाटत नाही. इथला पीळ भलताच कडक आहे. तो सैल करण्यासाठी ज्ञानवंतांचा शहाणपणाच उपयोगी पडेल.
डॉ. माँतेरिओ या सद््गृहस्थांबद्दल मला फारशी माहिती नाही. पण डॉ. सुलभा ब्रह्मे, माधव रा. गाडगीळ, प्रा. एच.एम. देसरडा यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. त्यांच्या मतांचा मी प्रतिवाद करणार नाही. तेवढा मी विचारवंत, ज्ञानी नाही. ते जे म्हणतात ते त्यांच्यापुरते खरेच असते; पण प्रा. देसरडांनी, डॉ. अनिल काकोडकर व डॉ. माशेलकर या थोर वैज्ञानिकांना ‘विज्ञान माफिया’ म्हटल्याचे मला खूप दु:ख झाले. प्रा. देसरडा यांच्यासारख्या जबाबदार नियोजनतज्ज्ञाने असे उद््गार काढावेत हे खेदजनक वाटले. खरोखरच त्यांना विज्ञानाचे वावडे आहे? सकारात्मकपणे त्यांना अणुऊर्जेकडे पाहता येत नाही? माडबन-जैतापूरमधील अनभिज्ञ लोक, त्यांचे अनभिज्ञ पुढारी आणि डॉ. सुलभा ब्रह्मे, माधवराव गाडगीळ, प्रा. देसरडा यांच्या बौद्धिक उंचीमध्ये खूप फरक आहे. ज्ञानवंतांनी ज्ञानेश्वरांसारखे वागून जनसामान्यांचे प्रबोधन करावे. त्यांच्यापर्यंत ज्ञान नेण्याचा प्रयत्न करावा, आपल्या पूर्वग्रहांतून निर्माण झालेल्या अंधाराच्या जाळ्यात सामान्य लोकांना अडकवू नये. ते लोक तुम्हाला विचारवंत, शहाणेसुरते समजतात, म्हणूनच ते तुमचे ऐकण्यासाठी जमतात. ज्ञानेश्वरांनी विश्वासाठी मागितलेले ‘पसायदान’ तुम्ही आमच्या माडबन-जैतापूरकरांसाठी मागावे आणि त्यांचे अज्ञान दूर करून नव्या युगाचा विज्ञानधर्म त्यांना शिकवावा, अशी माझ्यासारख्याची निकोप अपेक्षा आहे. कारण तुम्हाला बरेवाईट समजते. विज्ञानाची महती तुम्ही जाणता. देशाला वीज पुरेशा प्रमाणात हवी हेही तुम्ही जाणता- ती अणुऊर्जेतूनच मिळेल, हेही तुम्ही जाणता. मग माडबन-जैतापूरच्या लोकांचे प्रबोधन करून एक मोठे देशकार्य तुम्ही का पार पाडत नाही?
2006 मध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली आणि आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनाला सुरुवातीपासून नकारात्मक स्वरूप लाभले. मी याआधी म्हटल्याप्रमाणे कोकणी माणसांच्या मूळ प्रवृत्तीनुसार प्रकल्पाकडे संशयी नजरेने पाहण्यास सुरुवात झाली. तोपर्यंत स्थानिक पुढारी कुठेच नव्हते, ते जागे झाले. त्यांना मुंबईकर ‘अनुभवी’ आंदोलनकर्त्यांचा पाठिंबा मिळाला. मुंबईमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात भूतकाळात जी आंदोलने झाली, ती बहुतांश कोकणी लोकांनी केलेली आहेत. मग गिरण्यांचे संप असोत, गोवा मुक्ती आंदोलन असो, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन असो वा शिवसेनेचे कोणतेही आंदोलन असो, कॉम्रेड डांगे हे कोकणी गिरणी कामगारांचे लोकप्रिय पुढारी. ते गमतीने म्हणत- ‘संप कोकणी कामगारांनी करायचा नि घाटावरच्यांनी फोडायचा! कारण घाटावरचे कामगार राज्यकर्त्यांच्या गावचे, कोकणी कामगार जन्मजात विरोधी पक्षाचे!’ त्यामुळे जैतापूर प्रकल्पाविरुद्ध परंपरेनुसार आंदोलन उभे राहिले आणि हळूहळू ते स्फोटक बनू लागले.