आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरची यशस्वी \'रेल\'गाथा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूतलावरील स्वर्ग म्हणून ओळखला जाणारा जम्मू-काश्मीरचा प्रदेश सर्वार्थाने आव्हानात्मक ठरला आहे. या विभागात रेल्वेमार्गाची निर्मिती राष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यावश्यक होती. त्यातच अलीकडेच भारतीय सेनेचे प्रवक्ते कर्नल ओबेरॉय यांनी माहिती दिली होती की, सीमेनजीक अतिरेक्यांनी गेल्या काही दिवसांत पक्के काँक्रीटचे बंकर बनवल्याचे आढळून आलेले आहे. अशा विघातक कार्याला तोंड देण्यासाठी या भागात रेल्वे मार्ग अनुकूल ठरतोच; परंतु रेल्वेच्या जाळ्यामुळे भारताच्या इतर भागांशी हा भूलोकीच्या नंदनवनाचा भाग वाहतुकीसाठी जोडला जातो. राष्ट्राच्या एकसंघ दळणवळणाची पूर्तता करता येते. दुर्गम अशा सीमाभागात राष्ट्र रक्षणासाठीची आवश्यकता अधोरेखित होते. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे, काश्मीर खोर्‍यात रस्ता वाहतुकीला आपत्कालीन पर्यायही उपलब्ध होतो. उंच डोंगर, खोल दर्‍या यामुळे रस्ते निर्मिती व दुरुस्त्या यात येणार्‍या अडचणी टाळता येतात.

रेल्वे तंत्रज्ञानाचे वेगळेपण
रेल्वेचे तंत्रज्ञान हे इतर अभियांत्रिकी तंत्रज्ञानाहून वेगळे आहे. कारण त्यात दोन रुळांवर धावणार्‍या रेल्वेगाडीने आपला ताल आणि तोल सुयोग्य पद्धतीने सावरणे आवश्यकच असते. भूगर्भातील हालचाली, गतीमुळे निर्माण होणारी कंपने, गतिमान अवस्थेत असताना वक्रता, हलणार्‍या डब्यांची सर्व बाजूंनी सुरक्षितता, चढ-उतारांचे नियमन, अचानक उद्भवणार्‍या आपत्कालीन उपाययोजना आदींचे भान राखणे गरजेचे असते. निर्मिती, अनुरक्षण आणि परिचालनाशी संबंधित रेल्वेचा कोणताही विभाग इतर विभागांशी कार्याने नित्य जोडलेला असतो आणि हे ‘विना सहकार नही उद्धार’चे मार्गदर्शक तत्त्व रेल्वेच्या कर्मचारीवर्गाला एकसूत्रात बांधून ठेवते.

एरवी, राजकीय संघर्ष, अतिरेकी कारवाया, प्रतिकूल हवामान अशा अनेक गोष्टींमुळे जम्मू-काश्मीरचा विकास ही कायमच कष्टसाध्य गोष्ट ठरली आहे. सन 1983मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जम्मू ते उधमपूर रेल्वेमार्गाची संकल्पना मांडली. त्या वेळी 50 कोटी रुपये खर्चून पाच वर्षांत हा मार्ग पूर्णत्वास नेण्याची योजना होती; परंतु मंजुरीसाठी अनेक समस्या आल्या आणि काम बारगळत गेले... अखेर 2002मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या शासकीय कार्यकाळात राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प म्हणून जम्मू-काश्मीर रेल्वेमार्ग प्रकल्पाला शासकीय मंजुरी मिळाली. कारगिल घुसखोरीच्या वेदना व संसदेवरील हल्ला यामुळे यात काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले.

जम्मू-काश्मीर रेल्वे प्रकल्प आराखडा
लाआओले-बारामुल्ला विभाग इरकॉन या निर्मिती कंपनीला कामासाठी देण्यात आलेला आहे. यातील पीर पंजाल बोगदा टी-80 हा जम्मू विभागाला काश्मीरशी जोडतो. हिमालयाच्या रांगा ओलांडून काश्मीर खोर्‍यात रेल्वेमार्गाची निर्मिती आणि विस्तार करणारा हा प्रकल्प भारतीय अभियंत्यांसाठी सर्वार्थाने आव्हान ठरला आहे. तंत्रज्ञानात आवश्यक बदल करत आणि कार्य कितीही कठीण असो, त्याला न सोडता पुढे नेताना प्रमुख आव्हाने अशी होती वा आहेत.

अतिमहत्त्वाचे आव्हान म्हणजे, लष्कराचा नित्य वरचश्मा असलेल्या आमच्या शेजारी देशातील विघातक शक्तींचे अडथळे, याशिवाय अतिरेक्यांचा अधूनमधून उपद्रव. वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या या पर्वतरांगेची उंची 3,500 मी. पासून 5,000 मी. पर्यंत आढळते. असा दुर्गम भाग, विरळ वस्ती यामुळे कर्मचारी व यंत्रसामग्री नेणे व सक्षम ठेवणे आणि कार्यरत असणा-यांसाठी निवास, दैनंदिन राहणी व पोषण यांच्या व्यवस्थेत येणार्‍या अडचणी.

हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर दरम्यानचा महामार्ग वाहतुकीसाठी बराच काळ बंद असतो. काम करण्यास विरोधी अशा अतिवृष्टी, गोठण बिंदूच्या आसपास असणा-या हवामानाचेच प्राबल्य असते. हिवाळ्यात बर्फाच्छादित असणाºया या पर्वतरांगेचे पंजाबच्या मैदानातून व काश्मीरच्या खोर्‍यातून मुख्यत: मे महिन्यामध्ये दिसणारे दृश्य विशेष रमणीय वाटते, पण काम करण्यासाठी नेमके त्रासदायक ठरते.

हिमालयाचे भूस्तर हे आपल्या सह्याद्री पर्वतासारखे टणक नाही. रेल्वे धावताना होणारी कंपने आणि भूस्तराच्या ऋतुमानाप्रमाणे होणार्‍या नैसर्गिक हालचाली, त्यामुळे तेथे रेल्वेमार्गाची निर्मिती करताना भूशास्त्राचे जाणकार यांचे तंत्र साहाय्य घेणे अत्यावश्यक ठरते. या प्रदेशात भूभागाच्या अंतर्गत भागात सतत होणार्‍या हालचाली लक्षात घेऊन भूकंपाबाबतच्या नोंदींचाही अभ्यास आवश्यक ठरतो. महत्त्वाचे म्हणजे बोगदा खोदणे झाल्यावर झिरपणार्‍या पाण्याचा त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागते.

पीरपंजाल बोगदा तयार करण्याचे हे आव्हानात्मक काम कोकण रेल्वे निगम आणि ‘इरकॉन’ यांच्याकडे सोपवण्यात आले. पुढे ‘उत्तर रेल्वे’ने स्वत:कडे प्रकल्पाची देखरेख घेऊन या कंपन्यांना डिझाइन, सर्वेक्षण आणि निर्मिती ही कामे देण्यात आली. या कामाचे तीन प्रमुख भाग पाडण्यात आले. 1) उधमपूर ते कटरा = 25 किमी. 2) कटरा ते काझीगुंड = 129 किमी.
3) काझीगुंड ते बारामुल्ला = 119 किमी. या कामापैकी अत्यंत आव्हानात्मक काम असलेल्या धरम ते काझीगुंड या 56.54 किलोमीटरच्या मोठ्या विभागाचे कामाच्या सोयीसाठी, चार उपविभाग पाडण्यात आले. त्यात एकूण 44.50 कि.मी. लांबीचे 14 बोगदे व 48 लहान-मोठे पूल, यांचा समावेश आहे. यातील अतिशय अवघड गणल्या गेलेल्या कामात पीर पंजाल हा बोगदा होता. पीर पंजाल या बोगद्याची निर्र्मिती आणि त्यातील लोहमार्ग यासाठी ‘इरकॉन’ कंपनीने बोगद्याचे काम ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन’ यांना दिले. बोगद्याच्या खोदकामाची सुरुवात 2005मध्ये झाली आणि 2011मध्ये ते संपले. या निर्मितीसाठी लोहमार्ग निर्मिती व इतर कामे नुकतीच संपून भारताच्या पंतप्रधानांनी बोगद्याचे रीतसर उद्घाटन केले आणि जम्मू-काश्मीरच्या इतिहासात सर्वार्थाने दोन समाज आणि संस्कृतींचे मनोमिलन घडवून आणणारी यथोगाथा नोंदली गेली...अधिक जाणून घेण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...