आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंपिंग जपांग देखने का नहीं

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणरणत्या दुपारी कॉलनीतील मुलं दंगामस्ती करत होती. म्हणून त्यांच्याकडे थोडीशी रागानेच गेले, तर ही सर्व मुले काही तरी बडबडत एकसारखे नृत्य (डान्स स्टेप्स) करत होते. प्रकार थोडा वेगळा वाटला म्हणून विचारलं कुठलं नवीन गाणं आहे का म्हणून. त्यावर सगळी दयेच्या भावनेने माझ्याकडे बघत हसायला लागली. एक जण म्हणाला, काकू, तुम्हाला माहीत नाही! ही ‘आयपीएल’ची हिट धून आहे. ‘जंपिंग जपांग’ सिर्फ देखने का नहीं. किती वेळा टीव्हीवर दाखवतात. मग डोक्यात प्रकाश पडला.


घरी आल्यावर मुद्दाम टीव्ही ऑन केला तर पाचच मिनिटांत तीच जाहिरात दिसली. आपले ज्येष्ठ क्रिकेटपटू कपिल देव, नवज्योतसिंग सिद्धू, अजय जडेजा त्यावर थिरकत होते. जाहिरात पुढे सरकली. ती फराह नामक वजनदार कोरिओग्राफर बाई धाडकन दरवाजा आपटून एका घरात येते आणि तिच्यापेक्षा लहान असणा-या व्यक्तीला अत्यंत उर्मटपणे ‘ए अंकल, ऊठ’ असे दरडावते. एक तर ती त्याला अंकल म्हणते आणि वर ‘ए’ असे एकेरी संबोधते. त्यावर त्याची बायको, ‘ही इज जस्ट अ बॅड डान्सर’ म्हणून त्याला झुरळासारखे झटकते. नाही म्हटलं तरी ही जाहिरात बघून बरंचसं खटकलंच. वडीलधा-या मंडळींना आदराने ‘अहो’ म्हणणारी आपली खरी संस्कृती आहे. मग असे परदेशी संस्कारांसारखे एकेरी संबोधणारे वाक्य कशासाठी? भरीस भर म्हणजे यात जे नृत्यप्रकार (स्टेप्स) दाखवले आहेत ते बीभत्स नाहीत का? सार्वजनिक स्वच्छतागृह, रेल्वेस्टेशन, बाथरूममध्ये लठ्ठ माणसांचे विचित्र अंगविक्षेप यात दाखवले आहेत. फराहसारख्या व्यक्तीकडून यापेक्षा किती तरी चांगल्या दर्जाच्या नृत्यप्रकारांची अपेक्षा होती.


आयपीएलच्याच वेळी कमी कपड्यांत नाचणा-या चिअरलीडर्स पाहूनही लाज वाटते. मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून आयपीएलसारखे सामने सुटीत पाहू द्यावे की नाहीत, असा प्रश्न या प्रकारामुळे पडू लागला आहे. नाही तर एखाद्या वेळी सकाळी सकाळी ‘ए बाबा, ऊठ,’ असे म्हणत छडी हातात घेऊन मुलगा उभारलेला पाहायला मिळायचा. म्हणूनच मग ‘जंपिंग जपांग देखने का नहीं’ असेच ठरवावे लागेल.