आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वगताच्या संगतीनं : एकाकी लढवय्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुस्लिम स्त्रीवर सतत टांगती असलेली ही तलाकची तलवार कायमची दूर व्हावी, यासाठी मुस्लिम समाजातील पुरुषांनीच पुढे आले पाहिजे, आणि आपल्या आयाबहिणींना या जाचातून सोडवले पाहिजे. यासाठी एक एकांडा शिलेदार गेली पन्नास वर्षे अविरत झगडतोय, त्यांचे नाव सय्यदभाई! ‘दगडावरची पेरणी' हे सय्यदभाईंचं आत्मकथन, नाही तर कार्यकथन आहे.

भारत हे एक ‘सेक्युलर’ अर्थात धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पण याचा अर्थ इथे सर्व धर्म समान, एका पातळीवर आहेत असा लावता येत नाही. तर इथे प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वर्तन करण्याचा अधिकार आहे, असा लावला जातोय. दुर्दैवाने, आपल्याकडचे कायदेही गोंधळाच्या परिस्थितीत भर घालणारे आहेत.

ब्रिटिशांनी इंडिअन पीनल कोड आणून सर्व नागरिकांना समान गुन्हेगारी कायदा लागू केला. इथल्या सामाजिक कायद्यांमध्ये सुधारणा करताना, मात्र ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीचे धोरण स्वीकारले. ज्याचा परिणाम म्हणून आजही देशात समान नागरी कायदा अस्तित्वात नाही. हिंदुनी हिंदूंचे रीतीरिवाज पाळावेत, तर मुस्लिमांनी त्यांच्या धार्मिक धारणांप्रमाणे चालावे असे, असे ढोबळ धोरण स्वीकारून सामाजिक कायदे केले गेले; ज्यामुळे लग्न, वारसाहक्क, घटस्फोट, दत्तक विधान अशा काही बाबी या मुस्लिम समाजाने त्यांच्या शरियतच्या नियम नुसार पाळाव्यात अशी तरतूद ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ अंतर्गत करण्यात आली . शरियतचे पुरातन नियम आजच्या आधुनिक समानतेच्या युगात सर्वप्रकारे गैरलागू होत असल्याचे, अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. शरियतचे नियम हे पुरुषधार्जिणे असून, स्त्रियांसाठी तर ते अत्यंत अन्यायकारक आहेत. परंतु कायद्याची जोड दिल्याशिवाय मुस्लिम स्त्रियांवर या नियमांच्या माध्यमातून जो अन्याय वर्षानुवर्षे होत आहे, तो थांबणे अशक्य आहे. तोंडी तलाक किवा तीन तलाक हे शरियाने मुस्लिम पुरुषाच्या हातात दिलेले सर्वात भयंकर अस्त्र आहे. ज्याचा वापर करून मुस्लिम पुरुष आजही आपल्या पत्नीला एकतर्फी घटस्फोट देवू शकतो, नव्हे देतोय, आणि त्याविरुद्ध स्त्रीला कुठेही दाद मागता येत नाही. गेल्या महिन्यात, शायरा बानू नावाच्या मुस्लिम महिलेने शरियत मधल्या या तरतुदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात तक्रार नोंदवली, आणि या विषयाला पुन्हा एकदा तोंड फुटले.

इद्दत, हलाल आणि बहुपत्नीत्व या इस्लामने मान्यता दिलेल्या, पण मुस्लिम स्त्रियांसाठी अन्यायकारक असलेल्या तरतुदींविषयी न्यायालयाने आता सरकारचे मत मागवलेय .
मुस्लिम स्त्रीवर सतत टांगती असलेली ही तलाकची तलवार कायमची दूर व्हावी, यासाठी मुस्लिम समाजातील पुरुषांनीच पुढे आले पाहिजे, आणि आपल्या आयाबहिणींना या जाचातून सोडवले पाहिजे. यासाठी एक एकांडा शिलेदार गेली पन्नास वर्षे अविरत झगडतोय, त्यांचे नाव सय्यदभाई! ‘तलाके जिहाद’ हाच एक ध्यास घेवून सय्यदभाई काम करताहेत. नुकतीच त्यांनी वयाची ८० वर्षे पूर्ण केली. ‘दगडावरची पेरणी' हे सय्यदभाईंचं आत्मकथन, नाही तर कार्यकथन आहे.

स्वतः च्या सख्ख्या बहिणीला जेव्हा तिच्या नवऱ्याने तोंडी तलाक देवून बेसहारा केले, तेव्हा तिला न्याय मिळवून देण्यासाठी सय्यदभाई अनेक मुल्ला-मौलवींकडे गेले, पण सगळ्यांनी शरियतचे नियम बदलता येत नाहीत, असे सांगितले. पदरात दोन लहान मुले असलेल्या आपल्या बहिणीला स्वतःच्या पायावर उभे करताना सय्यदभाईंना या प्रश्नाची दाहकता जाणवली, त्यानंतर मुस्लिम समाजातील ह्या एकतर्फा तलाक पद्धती विरुद्ध लढत राहणे हेच त्यांच्या आयुष्याचे एकमेव उद्दिष्ट बनले.

परंतु, सय्यदभाईंचे शिक्षण काही खूप झालेले नव्हते. उपजीविकेसाठी ते पेन्सिलीच्या कारखान्यात काम करत होते. या स्थितीत समाजासाठी काम करायचे, तर कोणी तरी गुरु, मार्गदर्शक गाठायलाच पाहिजे, या विचारात असतानाच सय्यदभाईंना पुण्यात हमीद दलवाई यांची सलग तीन भाषणे ऐकण्याचा योग आला. हमीद दलवाई यांचे विचार पटताहेत असं वाटल्यावर, सय्यदभाईंनी एकतर्फा तलाकसंदर्भात त्यांच्याशी अनेकदा सविस्तर चर्चा केली. या सर्व चर्चांची निष्पत्ती म्हणजे, हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखालील मुस्लिम सत्यशोधक मंडळ. २२ मार्च १९७० रोजी या मंडळाची पुण्यात स्थापना करण्यात आली, भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव यासारख्या समाजवादी नेत्यांची मोठीच साथ संघटनेला मिळाली.
मंडळातर्फे तलाक पीडित मुस्लिम स्त्रियांचे मेळावे भरवले गेले. मुस्लिम स्त्रियांसाठी मदत केंद्रे चालवली गेली. दुसरीकडे मुस्लिम समाजात प्रबोधनाच्या हेतूने संपर्क यात्रांचे आयोजन करण्यात आली. अशातच ताहिराबी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ताहिराबी या एकतर्फा तलाक पीडित स्त्रीला तिच्या नवऱ्याने पोटगी दिली पाहिजे, असा महत्वपूर्ण निर्णय दिला. ते वर्ष होते, १९७४. सय्यदभाई लिहितात, मुस्लिम महिलांना पोटगीचा अधिकार देणाऱ्या या निर्णयाला कोणीही आक्षेप घेतला नाही. या निर्णयाविरोधात मुस्लिम समाजातून कसलीही प्रतिक्रिया उमटली नाही. उलट या निर्णयाच्या आधारे अनेक तलाक पीडित मुस्लिम स्त्रिया पोटगीसाठी न्यायालयात गेल्या, तर पोटगीच्या भीतीने अनेकांनी आपल्या स्त्रियांना परत घरात घेतले आणि एकूणच एकतर्फा तलाक देण्याच्या मुस्लिम पुरुषाच्या मनमानीला आळा बसला. दुर्दैवाने, याच सुमारास दलवाईंचे किडनीचे दुखणे विकोपाला गेले आणि १९७६ मध्ये त्यांचा देहांत झाला.

सेनापती नसलेल्या अवस्थेत लढण्याची मोठीच जबाबदारी सय्यदभाईंवर आली. त्यातच दलवाईंचे त्यांच्या इच्छेनुसार, मरणोपरान्त दफन न करता दहन करण्यात आले. आधीच दलवाईंच्या परिवर्तनवादी मतांमुळे मुस्लिम समाजातून त्यांना फार मोठा विरोध होता. दलवाईंच्या दहन विधीमुळे ते नास्तिक होते, आणि नास्तिकांना इस्लाममध्ये स्थान नाही, असे म्हणत मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंडळाशी संबंध तोडला. त्याचा मोठाच फटका चळवळीला बसला. पण त्यापेक्षाही मोठा हादरा डॉ अनिल अवचट यांनी, दलवाईंबद्दल लिहिलेल्या 'हमीद' नावाच्या पुस्तकामुळे बसला. हे पुस्तक बाजारात आल्या क्षणापासून दलवाई विरोधकांनी त्याचे भांडवल केले. त्याचे लगोलग उर्दू भाषांतर करून, ते मुस्लिम समाजामध्ये, वस्त्यांमध्ये प्रसारित करण्यात आले. आधीच सर्वसामान्यांच्या रोषाला कारणीभूत असलेल्या हमीद दलवाईंबद्दल नव्याने गैरसमज पसरवले गेले. परिणामी, मुस्लिम सत्यशोधक मंडळापासून सर्वसामान्य मुस्लिम समाज आणखी दुरावला. अनिल अवचटांनी लिहिलेल्या 'हमीद' या लेखाबद्दल लिहिताना सय्यदभाई, अवचटांनी दिलेली सर्व माहिती चुकीची असल्याचे स्पष्ट करतात. स्वाभाविकत: आपल्याला प्रश्न पडतो की, दलवाईंच्या निधनानंतर त्यांची बदनामी होईल अशा प्रकारचे लेखन अवचटांनी काय साधले? अर्थात, या संदर्भातही अवचटांची म्हणून काही वेगळी बाजूही असण्याची शक्यता आहेच.

पण या साऱ्या घडामोडींमुळे मुस्लिम सत्यशोधक मंडळ अडचणीत आले. त्यावर कळस ठरले ते, 'शाहबानो पोटगी प्रकरण'. १९८४ मधे सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो या ६२ वर्षांच्या तलाक पीडित स्त्रीला तिचा नवरा अहमद खान याने पोटगी द्यावी, असा निर्णय दिला. हा निर्णय शरियतच्या विरुद्ध आहे, असे सांगत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या लोकांनी त्याला विरोध केला. देशभर मुस्लिम समाजाकडून शाहबानो विरोधात निदर्शने करण्यात आली. कट्टर मुस्लिम संघटनांकडून सरकारवर दबाव आणला गेला आणि तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला. पोटगीच्या कलम १२५ मधून मुस्लिम पुरुषांना वगळण्यात आले. त्याऐवजी, तलाक घेताना मेहेर आणि इद्दतची रक्कम मुस्लिम स्त्रीला देण्यात यावी, अशी नवी उपतरतूद करण्यात आली आणि तलाक पीडित मुस्लिम स्त्रीला मिळू लागलेली पोटगी परत एकदा बंद झाली. या एका घटनेने मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे, मुस्लिम स्त्रियांचे आणि पर्यायाने मुस्लिम समाजाचे फार मोठे नुकसान झाले. सय्यदभाईंनी आपल्या पुस्तकात शाहबानो प्रकरण फार नेटकेपणाने मांडले आहे. त्यावेळी त्यांनी प्रमिलाताई दंडवतेच्या मदतीने केलेल्या सर्व प्रयत्नांचे वर्णन आणि त्यावेळी आलेले अनुभव मुळातून वाचावेत असे आहेत.

तीनदा तलाक हा शब्द उच्चारला की, तलाक झाला या विषयीचे विषण्ण करणारे अनेक प्रसंग सय्यदभाईंनी लिहिले आहेत. त्यापैकी दिल्लीतल्या एका सुखवस्तू, सुशिक्षित कुटुंबाच्या बाबतीत घडलेला प्रकार तर भयाण आहे. या घटनेतील सारे कुटुंब उच्चविद्याविभूषित होते. तलाकच्या विषयावरून तेव्हा हवा गरम होती. कुटुंबा-कुटुंबात या विषयीच्या चर्चा, वाद रंगत होत्या. या कुटुंबातील पुरुषाने तीनदा तलाक म्हटल्याने काय होतंय, असे म्हणत मजेमजेतच बायकोला तीनदा तलाक म्हटले. ही गोष्ट मित्रांच्या कानावर गेली, त्यापैकी कोणीतरी ती तथाकथित धर्ममार्तंडांना जाऊन सांगितली. त्यातून साऱ्या प्रकरणाने गंभीर वळण घेतले. या धर्मरक्षकांचा कुटुंबावर प्रचंड दबाव आला. एवढा की, त्या पत्नीला हलाल या महाभयंकर प्रकाराला सामोरे जावे लागले. हलाल म्हणजे, तलाक दिलेल्या स्त्रीचे दुसऱ्या पुरुषाबरोबर लग्न लावून देणे. त्यांचा शरीरसंबध आल्यावर चार महिन्यांनी, त्या स्त्रीला परत तलाक मिळवून, तिचे पुन्हा प्रथम पतीबरोबर लग्न लावून देणे. या दरम्यान जर ती गर्भार राहिली, तर मुलाच्या जन्मानंतरच तिला दुसरा तलाक मिळतो. दिल्लीच्या या कुटुंबातील नवराबायकोचे परस्परांवर खूप प्रेम असूनही त्यांना विभक्त व्हावे लागले. तिचे दिराशी लग्न लावले गेले. पुढे अनेक गोष्टी घडल्या. पण त्यातून कुटुंबाच्या सौख्याची पुरती वाताहत झाली.

दुर्दैव असे की, मुस्लिम स्त्रीला पूर्णपणे असहाय्य करेल, अशी ही जी सगळी रचना आहे, ती बदलण्याचा आग्रह सय्यदभाईंसारखे परिवर्तनवादी मुस्लिम करतात, तेव्हा त्यांच्या पाठीमागे मुस्लिम समाज उभा राहत नाही. इतर समाजातील नेते मतांचे राजकारण करतात आणि त्यांची साथ देत नाहीत. मुस्लिम समाजाने मुख्य प्रवाहात यावे, यासाठी मराठी भाषेतून शिक्षण घ्यावे, असाही आग्रह सय्यद भाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ धरते. पण या कामीही त्यांना पुरेशी साथ मिळत नाही. पण प्रक्षोभक भाषणे करून समाजात दुही माजवणाऱ्या ओवेसी सारख्यांच्या मागे तरूण वर्ग मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसतो. सय्यदभाई आपल्या आत्मकथनातून या साऱ्या मानसिकतेवर झगझगीत प्रकाशझोत टाकतात आणि आपण केलेले आयुष्यभराचे काम म्हणजे, अखेरीस काळ्या पत्थरावर केलेली पेरणी ठरली, असे विषण्णपणे म्हणतात.
जान्हवी खांडेकर
janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...