आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'माझा पाकिस्तान'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्रान खानला आपण आधी ओळखतो ते पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू म्हणून. मात्र इम्रान खानने लिहिलेले ‘माझा पाकिस्तान’ हेे आत्मकथन वाचकाला चकवा देणारे ठरते, कारण त्यात क्रिकेटपटू इम्रान वाचकाला भेटत नाही. या आत्मकथनात प्रकर्षाने दिसत राहतो तो राजकारणात उलाढाली करू पाहणारा, किंबहुना राजकारणात स्वतःविषयी मोठ्या अपेक्षा निर्माण करून स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेला इम्रान.

भारत-पाकिस्तानच्या सीमेवर, दोन्ही बाजूच्या सैन्यामध्ये नेहमीच लहानमोठ्या कुरबुरी चालू असतात. मागच्या दोन आठवड्यांपासून सीमेवरचा तणाव वाढलेला आहे. उरी इथे भारतीय सैनिकांना मारून पाकिस्तानने भारताची आगळीक काढली. त्याला सर्जिकल स्ट्राईक करून भारताने पाकला तोडीस तोड जबाब दिला. पाकिस्तानमध्ये घुसून अतिरेक्यांची ठाणी उद‌्ध्वस्त केली जावीत, ही दीर्घकाळापासूनची जनभावना पूर्णत्वाला गेली. पण तरीही आजची स्थिती अशी आहे की, कुठल्याही क्षणी भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होतेय की काय, असे वाटावे! पाकिस्तानातील घडामोडींवर जरासा कटाक्ष टाकला तर एक गोष्ट लक्षात येते की, तिथल्या राजकारण्यांनी कायमच ‘भारतद्वेष’ हाच आपल्या यशाचा मंत्र मानला आहे. भारताविरोधात गरळ ओकत जनतेची दिशाभूल करत राहण्याचे सोपे तंत्र त्यांनी अवलंबले आहे. दोन्ही देशांमधे कायम तणाव राहावा, यासाठी सतत जनतेच्या धार्मिक भावना भडकवणारी प्रक्षोभक भाषणे करायची, हेच त्यांचे एकमेव प्रचारसूत्र असते. भारताचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानात गेल्या आठवड्यात एक भव्य मोर्चा निघाला होता.

‘तेहरीक-ए-इन्साफ’ या पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी या मोर्च्याचे आयोजन केले होते. मोर्च्याला तुफान प्रतिसाद मिळाला. पण त्यामध्ये पंतप्रधान मोदींपेक्षा पाकिस्तानचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांच्यावरच हल्लाबोल केला गेला. नवाझ शरीफ भारताला सामील आहेत, पैशासाठी ते काहीही करू शकतात, मोहरमनंतर आम्ही शरीफना सत्तेवर राहू देणार नाही, अशी भाषणे या वेळी झालेल्या सभेत दिली गेली. या मोर्च्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादाने साऱ्या जगाचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेण्यात इम्रान खान यशस्वी झाला.
खरे तर, आपण इम्रान खानला ओळखतो ते पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू म्हणून. भारताच्या कपिलदेव इतकाच पाकिस्तानचा इम्रान खान सर्व क्रिकेटप्रेमींच्या लक्षात असतो. मध्यंतरी त्याचे आत्मचरित्र ‘माझा पाकिस्तान’ वाचनात आले. इम्रान खानचे हे आत्मकथन वाचकाला चकवा देणारे ठरते, कारण क्रिकेटपटू इम्रान यात आपल्याला भेटत नाही. आपले बालपण किंवा क्रिकेटमधले महत्त्वपूर्ण प्रसंग याचे फारच त्रोटक वर्णन इम्रान आपल्या या आत्मकथनात करतो. त्यात प्रकर्षाने दिसत राहतो तो राजकारणात उलाढाली करू पाहणारा, किंबहुना राजकारणात स्वतःविषयी मोठ्या अपेक्षा निर्माण करून स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेला इम्रान.

या आत्मचरित्रात इम्रानने क्रिकेटबाबतचेही काही प्रसंग सांगितलेत. पण त्यातही आपल्या लक्षात राहतो (आणि इम्रानही मोठ्या चवीने ज्याचे वर्णन करतो) तो प्रसंगही नवाझ शरीफ यांच्याबद्दलचाच आहे. १९८७च्या विश्वचषक सामन्यांच्या आधी लाहोरला पाक आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सराव सामना खेळला जाणार होता, त्या वेळी नवाझ शरीफ हे पाकमधल्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. सामन्याच्या काही वेळ आधी इम्रान खानला निरोप मिळाला की, या सामन्याचे नेतृत्व शरीफ करणार आहेत. इम्रानला या गोष्टीने जेवढा धक्का बसला, त्यापेक्षा मोठा धक्का जेव्हा त्याने शरीफ यांना फलंदाजीसाठी मैदानात जाताना पाहिले, तेव्हा बसला. क्रिकेट विश्वातील वेगवान मशीन्स समजल्या जाणाऱ्या विंडीज गोलंदाजांचा सामना करण्यासाठी हेल्मेट वगैरे काही न घालता शरीफ उतरले होते. केवळ बॅटिंग पॅड्स, टोपी आणि चेहऱ्यावर मंद स्मित धारण करून मैदानात जाणे, म्हणजे प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या मुलाने थेट पी.एच.डी. प्रबंध लिहिण्यासारखे होते, असे इम्रान म्हणतो. पण शरीफ यांनी त्यात यश मिळवून दाखवले.

इम्रानच्या मूळ इंग्रजीत लिहिलेल्या या आत्मचरित्राचे नाव आहे ‘पाकिस्तान-अ पर्सनल हिस्टरी’. ज्याचा मराठी अनुवाद विजय लोणकर यांनी ‘माझा पाकिस्तान’ या नावाने केलाय आणि २०१३मध्ये चिनार पब्लिशर्सने तो प्रसिद्ध केलाय. या पुस्तकातून इम्रान खानने आपल्या राजकीय प्रवासाचे प्रामुख्याने चित्रण केले आहे. इम्रान खानच्या नजरेतून पाकिस्तानचे दर्शन हे पुस्तक वाचकाला घडवते. कट्टर धार्मिक पण गरिबीने गांजलेल्या पाकिस्तानला लष्करशाहीने आणि लोकशाहीचा बुरखा पांघरलेल्या भ्रष्ट राजकीय नेत्यांनी कसा पोखरून काढला आहे, याचेही विदारक दर्शन या पुस्तकातून घडते. पाकिस्तानातील राजकारण, भ्रष्टाचार, नोकरशाही या सर्वांविषयी इम्रान खान टोकदारपणे लिहितो, तेव्हा त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या भारतालाही तंतोतंत लागू पडत आहेत, असं वाटल्यावाचून राहात नाही. पाकिस्तानच्या निर्मितीपासून आजपर्यंत एक राष्ट्र म्हणून पाकिस्तानची वाटचाल कशी होत गेली, याचे फार भेदक वर्णन इम्रान खान करतो. भारतातील बहुसंख्य हिंदूंच्या प्रभावामध्ये वाहून जाण्याच्या भीतीपोटी स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यात आली. इम्रान लिहितो, बहरण्याची संधी मिळाल्यास इस्लाम काय करू शकतो, हे मुस्लिम जगताला दाखविण्याचे आणि त्यांच्यासाठी लखलखते उदाहरण ठरण्याचे आमचे स्वप्न होते. परंतु इतिहासाचे कोणतेही ओझे नसलेल्या नव्या देशाला ही अशी स्वप्न पूर्ण करणे किती जिकिरीचे असते, हे आमच्या निमित्ताने लवकरच समजून चुकले. जसजशी वर्षे गेली तसतसे आम्ही स्वतःच आमचा क्लेशदायी इतिहास निर्माण करत गेलो आणि पाकिस्तानची निर्मिती ज्या प्रेरणादायी आदर्शातून झाली ते आदर्श आमच्यापासून दिवसेंदिवस दूर होत गेले. पाकिस्तानच्या अवनतीची कारणमीमांसा इम्रान अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडतो.

पाकिस्तान निर्मितीचा इतिहास आणि नंतरची राजकीय, सामाजिक स्थिती याचे इम्रानने केलेले विवेचन नक्कीच वाचनीय आहे. त्याच्या मते, पाकिस्तानला इक्बाल यांच्यासारखा दूरदृष्टीचा किंवा जिना यांच्यासारख्या उंचीचा किंवा अगदी सांगायचेच झाले तर ज्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे भारतात लोकशाही रुजली, असा नेहरू यांच्यासारखा नेता न मिळाल्याने देशाची सर्वच क्षेत्रात पीछेहाट झाली. तांत्रिकदृष्ट्या पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी म्हणजे १४ ऑगस्ट ४७ रोजी स्वतंत्र झाला. २६ जानेवारी १९५१ रोजी भारताचे संविधान अमलात आले आणि भारत हे लोकशाही पद्धतीचे धर्मनिरपेक्ष सार्वभौम प्रजासत्ताक राज्य म्हणून कामकाजाला सुरुवातही झाली. पाकिस्तानची राज्यघटना तयार व्हायला १९५६ साल उजाडावे लागले आणि १९५८मध्ये सत्तेवर आलेल्या अय्युब खान यांनी ती लगोलग रद्दही केली. पाकिस्तानात लष्करी आणि नागरी अशी आलटून पालटून सत्ता आल्याने राजकीय संस्थांना परिपक्व होण्याची संधीच मिळाली नाही, परिणामी पाकिस्तानचे विभाजन झाले आणि पूर्व पाकिस्तान अर्थात बांगलादेशाची निर्मिती झाली. इम्रान खान सीमेच्या त्या बाजूने असल्यामुळे साहजिकच त्याच्या मते भारताने या संधीचा फायदा उठवला आणि जे नेहरूंना जमले नाही ते इंदिरा गांधींनी केले.

हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते की, क्रिकेटपटू म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती मिळवलेला इम्रान खान फक्त एक पाकिस्तानी म्हणूनच एकांगी विचार करतो. १९६५ आणि १९७१च्या युद्धातील पराभवाचा सल इतर सर्व पाकिस्तान्यांप्रमाणेच त्याच्याही मनात कायम आहे. इतर पाकिस्तानी राजकारण्यांप्रमाणेच तो ही जनतेच्या मनातली ही दुखरी नस हवी तेव्हा दाबून त्यातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतो. सर्वात खटकते ते हे की, भारतीय नेत्यांचा उल्लेख करताना तो त्यांच्याविषयी कुठंही आदर दिसू नये, अशी काळजी घेतो. त्यामुळेच, महात्मा गांधींचा उल्लेख इम्रान सर्वत्र मोहनदास गांधी असा करतो. त्यांना चुकूनही महात्मा म्हणत नाही. या पुस्तकाचे अनुवादक विजय लोणकरांनी आपल्या मनोगतात ही गोष्ट निदर्शनाला आणून दिली आहे.

पाकिस्तानच्या सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या, ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतलेल्या इम्रान खानने सामाजिक जाणिवेतून आपल्या आईच्या स्मरणार्थ गरीब रुग्णांना मोफत उपचार पुरवणारे एक मोठे सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल उभारले आहे. शिवाय एका विद्यापीठाचीही स्थापना त्याने केलीय. १९९६मध्ये स्थापन केलेला ‘तेहरीक ए इन्साफ’ हा इम्रान खान याचा पक्ष या वर्षी २० वर्षांचा झाला आहे. अजून तरी इम्रान खान पाकिस्तानच्या राजकारणावर फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. परंतु सध्याच्या परिस्थितीत शरीफविरोधी वातावरण तयार होऊन इम्रानला त्याचा फायदा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ‘माझा पाकिस्तान’ या पुस्तकातून आपल्यासमोर आलेल्या इम्रानच्या पक्षाला यश मिळाले तरी पाकिस्तानचे भारताबरोबरचे संबंध फार काही सुधारतील, असे काही वाटत नाही.

जान्हवी खांडेकर
janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...