आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीजींचा दूत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसानं ओढ दिली आणि दुष्काळाच्या झळांनी सारा महाराष्ट्र होरपळला. पाण्याचा मोठाच बिकट प्रश्न राज्यासमोर उभा राहिलाय. शहरी भागात पाणी कपातीसारखे काही जुजबी उपाय करून परिस्थितीला तोंड दिलं गेलं; पण ग्रामीण भागात मात्र न भूतो न भविष्यति परिस्थिती पाहायला मिळाली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी या प्रश्नाची दाहकता सगळ्यांच्याच ध्यानी यावी. दुष्काळाच्या निमित्ताने शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबरच ग्रामीण भागाचे प्रश्न अधोरेखित व्हायला लागलेत. ‘भारत आणि इंडिया' या शेतकरी नेते शरद जोशींनी केलेल्या मांडणीची ठळक प्रचिती यावी, असे हे दिवस आहेत. ग्रामीण भारताकडे आजवर अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं चित्र स्पष्ट आहे.

महात्मा गांधींची "खेड्याकडे चला, खेडी स्वयंपूर्ण बनवा' ही शिकवण त्यांना मानणाऱ्या आणि त्यांच्या नावाचा सतत उपयोग करणाऱ्या राज्यकर्त्यांनी कधीच अंगीकारली नाही. दुसरीकडे शहरांची मात्र अनावर वाढ होत राहिली. शहरेही बकाल झाली. या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भारताची खडान् खडा माहिती असलेले प्रदीप लोखंडे आणि त्यांच्या ‘रुरल रिलेशन्स' या संस्थेच्या कार्याची दखल घ्यायलाच पाहिजे.
प्रदीप लोखंडे, पुणे- १३. फक्त या एवढ्याच पत्त्यावर तुम्ही कुठल्याही पोस्टात पत्र टाका, ते लोखंडेंना मिळतेच. सविस्तर पत्ता लिहूनही पत्र मिळाले नाही, असा अनुभव आपण घेत असतो. लोखंडेंच्या बाबतीत मात्र तसं घडत नाही. कारण गेल्या २५ वर्षांत प्रदीप लोखंडेंच्या या पत्त्यावरून अक्षरशः लाखो पत्रे भारताच्या हजारो खेड्यांमध्ये पाठवली गेली आहेत आणि लाखो पत्रे या पत्त्यावर त्यांना आली आहेत. लोखंडेंच्या रुरल रिलेशन्स या संस्थेने पोस्टाद्वारे ग्रामीण भारतातील हजारो खेड्यांची माहिती मिळवून ती संकलित करण्याचं प्रचंड मोलाचं काम केलं आहे. आजमितीला ४९०० गावांची इत्थंभूत माहिती रुरल रिलेशन्सच्या कार्यालयातल्या संगणकामधे उपलब्ध आहे. गावांची माहिती म्हणजे नेमकी कशा-कशाची माहिती? ती कुणी कशी गोळा केली? आणि आजवर कुणी कणी त्या माहितीचा कशा-कशासाठी उपयोग केला? या सगळ्या प्रश्नांची सविस्तर आणि अत्यंत रंजक माहिती प्रदीप लोखंडेंच्या या आत्मकथनपर पुस्तकातून मिळते. प्रदीप लोखंडेंची ही कहाणी सुमेध वडावाला- रिसबूड यांनी शब्दबद्ध केली आहे. मेनका प्रकाशनाने २०१२मध्ये ती ‘प्रदीप लोखंडे पुणे १३' या वेगळ्या पण समर्पक नावाने प्रसिद्ध केली आहे.

मार्केटिंगमध्ये रुची आणि गती असलेल्या धडपड्या आणि कल्पक तरुण प्रदीप लोखंडेंनी मित्रांच्या भागीदारीत स्वतःचा व्यवसाय सुरू केला तोही विपणन अर्थात मार्केटिंगचाच. दोन-तीन वर्षांच्या काळातच विविध उत्पादनांच्या विपणनाच्या निमित्ताने पुणे शहर अक्षरशः पिंजून काढले. याच काळात व्यवसायातले बरे-वाईट अनुभव गाठीशी आले. ज्यातून अनेक शहाणपणाचे कायमस्वरूपी धडेही मिळाले. त्यातूनच सरळ विक्री करण्यापेक्षा कंपन्यांच्या सेल्स प्रमोशन पॉलिसीज लक्षात घेऊन मोफत नमुना वाटप, सर्वेक्षण ही कामे सुरू केली. त्यासाठी आधी पुणे शहराची लोकसंख्येच्या प्रतवारीवरून अ, ब, क, ड अशी पद्धतशीर वर्गवारी केली. हीच होती, त्यांच्या पुढच्या कामागिरीसाठीची मूलतः पायाभूत तयारी. यामुळे कुठल्या एरियामध्ये कुठले उत्पादन विकले जाईल, त्यासाठी कसे प्रमोशन करावे लागेल, हे कंपन्यांना समजून देणे सोपे झाले. तोवर या कामासाठी जवळपास ४०० मुले प्रदीपजींच्या संपर्कात आलेली होती, ज्यांना घरोघरी फिरून विक्री करणे आणि मोफत नमुना वाटप करण्याचा अनुभव मिळाला होता. त्याशिवाय सर्वेक्षणाच्या कामातही ही मुले तरबेज झाली होती. याच सगळ्या कौशल्याच्या आधारावर बजाज, हिंदुस्तान लिवर यांसारख्या महाकाय आणि नामांकित कंपनीच्या उत्पादनांचे प्रमोशन केले.

असा सगळा प्रगतीचा चढता आलेख असतानाही प्रदीपजी अस्वस्थ होते, पण ही बेचैनी नेमकी का आहे, ते कळले एका व्याख्यानाच्या निमित्ताने. कार्पोरेट क्षेत्रात विपणन विषयात मोठे नाव असलेले गुरुचरण दास यांचे ते भाषण. भारताची ७० टक्के लोकवस्ती ग्रामीण भागात राहते आणि उद्याचा भारत किंवा उद्याचे मार्केट हे ग्रामीण भारतातच असणार आहे, हे त्यांचे म्हणणे. आणि हेच तर आपल्यालाही म्हणायचे होते, असे प्रदीपजींना त्या क्षणी उमजले. त्या क्षणापासून सुरू झाले एक अनोखे मिशन- रुरल रिलेशन्स. पुण्यात नावारूपाला आलेला व्यवसाय भावाच्या ताब्यात देऊन प्रदीपजींनी या नव्या कार्याला वाहून घेतले. उद्दिष्ट होते, दोन हजार ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या खेड्यांशी संपर्क प्रस्थापित करायचा, त्यांची समग्र माहिती मिळवायची.

हा काळ होता साधारण ९२-९३ चा. त्या काळात मोबाइल फोन आलेले नव्हते. प्रत्येक खेड्यात फोन असेलच असेही नव्हते, शिवाय फोन फार खर्चिकही होते. तेव्हा प्रत्येक गावातले तीन प्रमुख म्हणजे सरपंच, पोस्ट मास्तर आणि शाळा मास्तर हे तीन ग्रामस्तंभ मानून त्यांना पत्रे पाठवायची आणि त्यांच्याकडून गावाची माहिती जमवायची, अशी अभिनव कल्पना राबवायचे ठरवले. त्यासाठी पोस्टाची हजारो जोडकार्डे आणली. एका कार्डावर गावाची माहिती पुरविण्याचे आवाहन केले आणि दुसऱ्या कार्डावर "रुरल रिलेशन्स'चा पत्ता लिहिला, जेणेकरून ग्रामस्तंभांना जोडकार्डावर फक्त माहिती लिहून ते पोस्टात टाकायचे काम ठेवले. महाराष्ट्रातल्या ६७०० गावांना अशी पत्रे त्या वेळी पाठवली. या पत्रातून फक्त तीन प्रश्न विचारले होते ते म्हणजे - आपल्या गावात आठवडी बाजार भरतो का? कोणत्या वारी भरतो? बाजाराला साधारण किती लोक येतात? पत्रलेखनाचं प्रचंड काम प्रदीपजींच्या पत्नी आणि त्यांच्या वडिलांनी कित्येक वर्षे केलं. कारण सुरुवातीला खूपच नगण्य आणि धीमा प्रतिसाद येत होता. तरीही चिकाटीनं लोखंडे कुटुंबीयांनी गावोगावी पत्र पाठवण्याचा महायज्ञ अखंड सुरू ठेवला. जो आजतागायत चालू आहे. प्रतिसाद वाढावा म्हणून भारतीय मानसिकता ओळखून निरनिराळ्या क्लृप्त्या केल्या, ज्यांना अपेक्षित यश आलं. पत्रव्यवहाराच्या जोडीनं प्रदीपजींनी हजारो गावांना स्वतः भेटी दिल्या. त्यांच्या मते, प्रत्येक गावात पंचमहाभुतं असतात. ती म्हणजे गावातला प्रतिष्ठित शेतकरी, माध्यमिक शाळेचा मुख्याध्यापक, सरपंच व कार्यशील पंचायत सदस्य, पोस्ट मास्तर आणि दुकानदार. याशिवाय गावातल्या प्रत्येकाचा संबंध येतो, तो न्हावी आणि चर्मकाराशी. हे दोघे गावाचे पूरक कारभारी. यांच्याशी बोलून गावाची कुंडली आपल्याला मांडता येते. प्रदीपजींनी ही माहिती मिळवली, तिचे संकलन केले, ते पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून. दोन वर्षांत मिळवलेल्या या अस्सल माहितीच्या आधारे त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांच्या उत्पादनांच्या मोफत नमुना वाटप, विक्री प्रसार, ग्राहक प्रतिसाद, सर्वेक्षणाची असंख्य कामे केली. कुठल्याही सुप्रतिष्ठित उत्पादनाचे किंवा कंपनीचे नाव घ्या, त्यांच्यासाठी लोखंडेंच्या रुरल रिलशन्सने काम केलेले आहे.

अर्थात, हे सगळे करताना ग्रामीण भागातल्या पाच हजार तरुणांना रोजगार मिळवून देण्याचं श्रेयही "रुरल रिलेशन्स'ला जातं. ग्रामीण भागाशी जुळवलेले हे संबंध प्रदीपजी नंतरच्या काळात अधिकच मजबूत करत गेले आणि अजूनही त्यांचा विस्तार चालूच आहे. पण त्यासाठी त्यांनी फार कल्पक कार्यक्रम हाती घेतले. अनिवासी ग्रामस्थ (Nonresident villager)च्या माध्यमातून ३६००हून अधिक गावांना संगणक मिळवून दिले, ज्यामुळे लाखो ग्रामीण विद्यार्थ्यांना संगणक शिकण्याची संधी मिळाली. संगणकाबरोबरच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम साहित्य वाचायला मिळावं, म्हणून "ग्यान की' (ज्ञानाची गुरुकिल्ली अशा अर्थाने) वाचनालयाची योजना ते राबवतात. आतापर्यंत चार हजारहून अधिक शाळांमध्ये ही वाचनालये सुरू झाली आहेत. या सर्व उपक्रमांचे वैशिष्ट्य असं आहे की, या प्रत्येक उपक्रमाला पत्रव्यवहाराची जोड दिलेली आहे. ग्यान की वाचनालयाचा लाभ घेणारे विद्यार्थी, त्या शाळांचे शिक्षक/ मुख्याध्यापक या उपक्रमातून मिळालेल्या पुस्तकांविषयी दात्याचे आभार मानतात, शिवाय विद्यार्थी त्यांची प्रगती, स्वप्नं याविषयीही कल्पकतेने संवाद साधतात. यातून तो अनिवासी ग्रामस्थ आपल्या गावाशी जोडलेला राहतो आणि या उपक्रमात सहभागी होण्याचं त्याचं उद्दिष्ट्य सफल होतं. प्रदीपजींचे हे ग्राम संपर्काचे जाळे आता भारताच्या अनेक राज्यांत पसरले आहे. व्यवसाय म्हणून हाती घेतलेले "रुरल रिलेशन्स'चे काम आता प्रदीपजींच्या मुलीसह ३०० जणांचा चमू सांभाळतो. तर प्रदीपजी आपला जास्तीत जास्त वेळ समजोपयोगी उपक्रमांना देतात.
मार्केटिंगच्या क्षेत्रात हे एकमेवाद्वितीय असे उदाहरण आहे. त्यामुळेच प्रदीप लोखंडे आणि त्यांच्या "रुरल रिलेशन्स'ची नोंद जगद‌्विख्यात मार्केटिंग तज्ज्ञ फिलिप कोटलर यांनीही आपल्या पुस्तकात घेतली आहे. जगभरातल्या व्यवस्थापन शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही "केस स्टडी' अभ्यासावी लागतेच. कोटलरने नोंद घेतलेले लोखंडे हे एकमेव भारतीय आहेत आणि मार्केटिंगच्या माध्यमातून खेड्यांना विकासाच्या वाटेवर नेणारी रुरल रिलेशन्स ही जगभरात एकमेव संस्था ठरली आहे.

जान्हवी खांडेकर
janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...