आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक जन्माची कथा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केवळ ‘शिक्षणसेवक’ हा शिक्का पुरेसा नाही. ज्याचं आशयज्ञान पक्कं तो खरा शिक्षक. त्यासाठी शिकणे-शिकवण्याची ऊर्मी हवी. प्रयोगशील मन हवं... प्रल्हाद काठोलेंची आत्मकथा हेच अधोरेखित करते, प्रेरकही ठरते.

गणेश उत्सवाची धूम सुरू आहे. गणपती हा विद्यादाता म्हणून आद्यशिक्षक मानला जातो. या वर्षी ५ सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी नेमकी गणेश चतुर्थीदेखील होती. त्यानंतर चारच दिवसांनी ८ सप्टेंबरला असतो आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस. या वर्षी ५०वा जागतिक साक्षरता दिवस जगभर साजरा केला गेला. या निमित्ताने शिक्षणव्यवस्था आणि ज्यांच्या जिवावर ही व्यवस्था चालते ते शिक्षक यांच्याविषयी बरेच काही लिहिले, बोलले गेले. एरवी शिक्षक, विद्यार्थी आणि यांना जोडणारे माध्यम म्हणजे शाळा हे तीन कुठल्याही शिक्षण व्यवस्थेचे मूलभूत घटक आहेत. यात अर्थातच सर्वात महत्त्वाची भूमिका असते ती शिक्षकाची. दुर्दैवाने आज अशी स्थिती आहे की, ज्याला इतर काहीच जमत नाही तो शाळामास्तर होतो. एक काळ होता जेव्हा गावात मास्तरांना मान असायचा, त्यांच्या शब्दाला किंमत असायची. तेव्हाही मास्तरांना पोटापुरताच पैसा मिळे, पण प्रतिष्ठा अमाप होती. आज शहरीकरणाच्या लाटा गावांवर आदळताहेत आणि गावांचं रूप पालटून गेलंय. आता शाळामास्तर हा गावातलाच नाही तर समाजातही सर्वात दुर्लक्षित घटक वाटावा, अशी स्थिती आहे. त्यातून गेली काही वर्षे शासनाने सुरू केलेला ‘शिक्षणसेवक’ हा प्रकार म्हणजे तर हंगामी नोकरी, तुटपुंजा पगार आणि भरमसाठ काम. अशा स्थितीत शिक्षकाची नोकरी खूप आनंदाने, सजगतेने करणाऱ्या शिक्षकांविषयी कौतुक वाटल्यावाचून राहात नाही.

प्रल्हाद काठोले या अशाच एका सजग शिक्षकाचे ‘गोष्ट गुरुजी घडण्याची’ हे छोटेखानी आत्मकथन लक्षवेधी ठरते. समकालीन प्रकाशनाने याच वर्षी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रल्हाद काठोले हे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात एका लहानशा खेड्यात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. या भागातल्या सामान्य कुटुंबातून आलेले. पाचवीपर्यंत गावातल्या शाळेत आणि नंतर सहावीपासून पुढे बारावीपर्यंत नवोदय विद्यालयात काठोले यांचे शिक्षण झाले. नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला म्हणूनच केवळ त्यांचे शिक्षण होऊ शकले, तेही सीबीएसइ अभ्यासक्रमातून. तिथे त्यांना सरकारकडून सर्व काही विनाशुल्क मिळत असे. अन्यथा जमिनीच्या लहानशा तुकड्यावर गुजराण करणाऱ्या त्यांच्या कुटुंबासाठी मुलांना शिकवणे फारच अवघड होते. बारावी झाल्यानंतर ‘मागायची नसेल भीक तर मास्तरकी शिक’ ही एकच गोष्ट माहीत असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना डीएड करायला लावले. डीएड ही प्राथमिक शिक्षक होण्यासाठीची अनिवार्य पात्रता. या कोर्सविषयी काठोलेंनी अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत, ज्यांची दखल घेऊन कोर्समध्ये काळानुसार आवश्यक ते बदल करायला पाहिजेत. अर्थात, काठोलेंनी हे प्रशिक्षण घेऊन १५ वर्षे झाली आहेत. त्या वेळचे काही प्रसंग फारच विस्मयचकित करणारे आहेत. एकदा गणित शिकवणाऱ्या बाई आजारी होत्या, म्हणून त्यांच्या जागी बदली बाई आल्या. त्यांना काही गणित शिकवता येत नव्हते. त्या बाई भूमितीच्या पुस्तकातली वाक्ये खडाखडा वाचून दाखवत होत्या. नंतर बाईंनी ‘समजले का?’ असे विचारले असता काठोलेंनी ‘नाही’ सांगितले. तेव्हा बाईंनी सरळ काठोलेंच्या पाठीत एक दणका ठेवून दिला. एवढ्या मोठ्या वयाच्या विद्यार्थ्यांनाही मार देणाऱ्या बाईंचा विषय खरे तर शारीरिक शिक्षण हा होता आणि त्यांना गणित शिकवायला पाठवले होते. असा सगळा गोंधळ.
डीएड प्रशिक्षणाचा महत्त्वाचा भाग म्हणजे, शाळाशाळांमध्ये जाऊन निरनिराळ्या वर्गात घ्यायचे पाठ. काठोलेंचे या बाबतीतील निरीक्षण महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचे विषयाचे पूर्वज्ञान, आकलनशक्तीची पातळी याविषयी काहीही माहिती नसताना या पाठांचे नियोजन केले जाते. त्यामुळे अर्थातच हे पाठ प्रभावी होणे एकूणच कठीण असते. चांगला शिक्षक होण्यासाठी एखाद्या घटकाचे नियोजन करून सलगपणे एखाद्या वर्गावर शिकवण्याचा अनुभव घेणे हे खरे तर प्रशिक्षणाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचे आहे. काठोलेंच्या मते, आपला डीएड अभ्यासक्रम या दृष्टीने फारच अपुरा पडतो. त्यांचे दुसरे निरीक्षण आहे आशयज्ञानाबद्दलचे. (डीएड झालेला शिक्षक आठवीपर्यंतचे सर्व विषय शिकवण्यास कायद्याने पात्र ठरतो. शाळेत जाऊन त्याला प्रत्येक विषय शिकवावा लागतो.) सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे असेल तर शिक्षकाचे त्या त्या विषयाचे किमान दहावीपर्यंतचे आशयज्ञान पक्के असायला हवे. मात्र प्रशिक्षणकाळात शाळेत शिकवाव्या लागणाऱ्या विषयाचे त्यांचे ज्ञान पक्के आहे की नाही, याचा विचारच केला जात नाही. डीएड प्रशिक्षणातली ही एक मोठी त्रुटी आहे. डीएड झाल्यानंतर दोन वर्षांनी काठोलेंना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणसेवक म्हणून नोकरी मिळाली. त्या वेळचे त्यांचे नवखेपणातले अनुभव त्यांनी मोकळेपणाने, प्रसंगी स्वतःकडे कमीपणा घेत मांडले आहेत. ते वाचताना वाटते की, काठोले यांना स्वतःचा शिक्षक म्हणून शोध घेता आला, स्वतःला घडवता आले. पण काठोलेंसारखे किती शिक्षक स्वतःला शिक्षक म्हणून घडवायला तयार असतात?
त्यानंतरचा काठोलंेचा प्रवास फारच प्रेरणादायी आहे. आदिवासीबहुल पाड्यातल्या शाळेत शिकवणारा एक शिक्षक आंतरिक ऊर्मीने मुलांसाठी नवनवे प्रयोग करू पाहतो. तो ज्या व्यवस्थेचा भाग असतो, त्या व्यवस्थेकडून कुठलेही सहकार्य, प्रोत्साहन मिळत नसतानाही आपला उत्साह टिकवून ठेवतो, हे फारच आशादायी चित्र आहे. यातील अजून एक लक्षणीय बाब म्हणजे, काठोलेंच्या पाठचा धाकटा भाऊ किशोरही त्यांच्याप्रमाणेच शिक्षक बनतो.

काठोलेंप्रमाणेच त्यालाही विद्यार्थ्यांसाठी नवीन प्रयोग करून बघण्याची ऊर्मी असते. असेच एकदा दोघांनी मिळून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवासी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान त्यांचा संपर्क ‘क्वेस्ट’ या स्वयंसेवी संघटनेशी आला. काठोलेंच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉइंट ठरला. ‘क्वेस्ट’च्या निलेश निमकरांच्या मार्गदर्शनामुळे काठोलेंच्या विचारांना एक दिशा मिळाली. दोघेही काठोले बंधू निमकरांच्या अभ्यासगटात सक्रिय झाले. त्यातून त्यांचे शिक्षणविषयक विचार तर स्पष्ट होत गेलेच आणि जीवनविषयक दृष्टिकोनही व्यापक झाला. निमकरांनी त्यांना टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या ‘मास्टर्स इन एलिमेंटरी एज्युकेशन’ या अभ्यासक्रमाची माहिती दिली. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवणे खरे तर फार कठीण असते. काठोलेंनी तेही दिव्य पार केले. या कोर्सने काठोल्यांचे संपूर्ण व्यक्तिमत्त्वच बदलून गेले.
काठोल्यांची ही आत्मकथा तरुण शिक्षकांनी तर वाचलीच पाहिजे, पण शिक्षणाविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येकाने ती जाणून घेतली पाहिजे. त्याचबरोबर क्वेस्टसारख्या संस्थाही उभ्या राहिल्या पाहिजेत. त्यांच्या सहकार्याने शिक्षकांची जडणघडण होत राहिली पाहिजे, तरच प्रभावी शिक्षक तयार होतील; जे उद्याची पिढी घडवण्याचं सर्वात महत्त्वाचं काम उत्साहाने आणि तळमळीने करत राहतील.
(janhavip@yahoo.com)
बातम्या आणखी आहेत...