आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यही सच है ! (जान्हवी खांडेकर)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होळी आली की हमखास आठवण येते, हिंदी हास्य कविसंमेलनांची. हिंदी साहित्य जलशांची आणि अत्यंत समृद्ध साहित्यिक परंपरा तेवढ्याच ताकदीने पुढे नेत राहिलेल्या थोर हिंदी साहित्यिकांची. हिंदी साहित्यविश्वाची सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे, हिंदी साहित्याची नवोन्मेषशालीनता! सतत नवनवीन प्रयोग करण्यात हिंदी साहित्यक्षेत्र फार पूर्वीपासूनच आघाडीवर होते. त्यातले काही प्रयोग फसलेही. असाच एक फसलेला प्रयोग होता, ‘ग्यारह सपनों का देश’ ही कादंबरी. कोलकात्याच्या ‘ज्ञानोदय’ मासिकात सदर रूपानं एक प्रयोग म्हणून ही कादंबरी छापण्यात आली होती. सुरुवात आणि शेवट एकाच लेखकानं केला होता. बाकी नऊ प्रकरणे निरनिराळ्या शहरात राहणाऱ्या नऊ लेखकांनी लिहिली होती. परंतु लेखकांमधील संवादाअभावी हा प्रयोग फसला.
त्यानंतर अशाच प्रकारे झालेला सहलेखनाचा वेगळा प्रयोग मात्र यशस्वी ठरला. त्यामध्ये सहभागी लेखक होते, हिंदीतील सुप्रसिद्ध साहित्यिक दाम्पत्य मन्नू भंडारी आणि राजेंद्र यादव. ‘एक इंच मुस्कान’ ही ती कादंबरी. १९६१मध्ये ‘ज्ञानोदय’मध्येच ती प्रसिद्ध झाली. त्या वेळी एक प्रकरण राजेंद्र यादव यांनी, तर एक प्रकरण त्यांची पत्नी मन्नू भंडारी यांनी लिहिले होते. राजेंद्र यादव हे कथाकादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होतेच. मन्नू भंडारी हिंदी वाचकांच्या प्रिय कथालेखिका होत्या. त्यांनी लिहिलेले कथासंग्रह, कादंबऱ्या गाजल्या, आणि अनेक कथांवर टेलिफिल्म्स बनल्या. बासू चटर्जींसारख्या प्रतिभावान दिग्दर्शकाने त्यांच्या ‘यही सच है’ या कथेवर ‘रजनीगंधा’सारखा तरल चित्रपट बनवला. बासुदांच्या गाजलेल्या ‘स्वामी’ या चित्रपटाचे पुनर्लेखनही मन्नू भंडारी यांनी केले होते. शरदचंद्रांच्या मूळ कथेवरील या चित्रपटात शबाना आझमी आणि गिरीश कर्नाड यांनी संस्मरणीय भूमिका बजावल्या होत्या. पुढे ‘रजनी’ या बासुंदाच्या दूरदर्शनवर गाजलेल्या मालिकेचे काही कथाभागही त्यांनी लिहिले होते. त्यांच्या ‘आप का बंटी’, ‘महाभोज’ या कादंबऱ्या व त्यावर आधारित नाटक हिंदी साहित्य-जगतात महत्त्वाचे मानले जाते.
स्त्रीच्या भावविश्वातील प्रचंड उलथापालथ ही त्यांच्या कथांचे प्रमुख सूत्र होते. त्या हाडाच्या कथालेखिका असल्याने आपले आत्मचरित्रही त्यांनी ‘एक कहानी यह भी’ या नावाने लिहिले. मंगला आठलेकरांनी ‘एक कहाणी अशीही’ या नावाने ती अनुवादित केली आहे. मॅजेस्टिक प्रकाशनाने ती प्रसिद्ध केली आहे. मन्नू भंडारींची ही आत्मकथा एका लेखिकेची आत्मकथा आहेच; पण त्याचसोबत एका प्रथितयश लेखकपत्नीचीही गोष्ट आहे. अशी पत्नी जी लेखनाच्या ओढीतून राजेंद्र यादवांसारख्या लेखकाकडे आकृष्ट झाली. लेखनातील समान आवडीमुळे दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला. मन्नूजी लिहितात- “त्या वेळी मला वाटायचे की, राजेंद्रशी लग्न करताच माझ्या लेखनासाठी जणू राजमार्ग खुला होईल. परंतु लग्न होताच लेखक आणि पत्नी या दोन भूमिकांत माझी विभागणी होईल, हे मी कसे विसरून गेले?”

राजेंद्रांनी लेखक म्हणून आपल्या घडणीला प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले, त्यांच्यामुळे साहित्यिक वातावरण मिळाले, नामवंत लेखकमंडळींबरोबर गप्पागोष्टी, मैत्रीची संधी मिळाली. ज्यामुळे लेखनाला गती आली, आकार आला, हे मन्नूजी आवर्जून सांगतात. पण त्याचबरोबर पती म्हणून राजेंद्र यादव यांनी आपल्या पत्नीरूपावर सतत प्रहार केले, आणि ते ज्या पद्धतीने केले त्याचा दाहक परिणाम आपल्यातल्या लेखिकेला भोगावा लागला, असे त्या लिहितात. ज्यामुळे आत्मविश्वास नाहीसा झाला आणि अंती लेखन पूर्णपणे थांबले.
राजेंद्र यादव आणि मन्नू भंडारी या प्रथितयश दाम्पत्याच्या जवळपास चार दशकांच्या प्रदीर्घ वैवाहिक आयुष्याचा शेवट एकमेकांपासून दूर होण्यात झाला, त्या वेळी हिंदी साहित्यसृष्टीत साहजिकच खळबळ माजली. संवेदनशील लेखन करणाऱ्या या दोन्ही व्यक्ती आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर असताना असा टोकाचा निर्णय घेतात, तेव्हा साहजिकच त्यांच्या चाहत्यांमध्ये याविषयी तर्कवितर्क लढविले गेले. ‘एक कहाणी अशीही...’मध्ये मन्नूजींच्या वाचकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. पण त्याहीपेक्षा या आत्मकथेतून त्यांनी त्यांच्या कथालेखनाच्या प्रक्रियेविषयी जी विस्तृत टिपणे लिहिली आहेत, ती महत्त्वाची आहेत. एक लेखक म्हणून त्यांची प्रत्येक कथेतील गुंतवणूक, त्यातल्या पात्रांशी कधी एकरूप होणं, तर कधी तटस्थपणे पाहणं... आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेल्या व्यक्ती, त्यांनी सांगितलेले त्यांचे अनुभव, त्यांच्या जीवनातील घटना यांच्या नोंदी मन्नूजींमधली लेखिका घेत गेली. त्यांना जेव्हा कुठलीही गोष्ट, घटना, व्यक्ती वैशिष्ट्यपूर्ण वाटे, तेव्हा त्या त्याची नोंद आपल्या डायरीत करून ठेवत. पुढे त्या नोंदींवरून त्यांची कथा फुलत असे. ‘त्रिशंकू’, ‘स्त्रीसुबोधिनी’, ‘इसा के घर इन्सान’ अशा काही कथा आपल्याला कशा सुचल्या, याचे मन्नूजींनी लिहिलेले वर्णन प्रत्यक्ष कथांएवढेच रंजक आहे. त्यांच्या कथांचा अनुवाद इतर अनेक भाषांमध्ये झाला. एकट्या मराठीतच त्यांच्या कथांचे तीन संग्रह प्रसिद्ध आहेत.
लेखन प्रवासाबरोबरच मन्नूजींनी त्यांचा साहित्यिक मित्रपरिवार, स्नेहीजन, त्यांच्याशी होणाऱ्या भेटी, त्यांच्याबरोबर रंगणाऱ्या गप्पांच्या मैफली यांचेही फार मनोज्ञ वर्णन केले आहे. त्यामध्ये मनमोहन ठाकोरपासून बासू चटर्जी, मोहन राकेश, कमलेश्वर, डॉ. निर्मला जैन अशा हिंदी साहित्यातल्या अनेक रथीमहारथींचा समावेश आहे. मन्नूजींची आत्मकथा वाचताना हिंदी साहित्यविश्व आणि दिल्लीतल्या त्यांच्या निकटवर्तीयांच्या आपापसातील सौहार्दाचे फार मनोहारी दर्शन घडते.

या सर्वांबरोबर राजेंद्र यादव यांच्याविषयी एक लेखक आणि एक पती म्हणून त्या एकीकडे सांगत राहतात. कारण ‘लग्नानंतरही मी लेखक म्हणून माझे स्वतंत्र आयुष्य जगणार’ असे राजेंद्रजींनी आधीच सांगितलेले. त्यामुळे घराची आणि मुलीची आर्थिकसह सर्व जबाबदारी मन्नूजींनीच घेतली. पण, ही जबाबदारी निभावताना पती किंवा पिता म्हणून कुठलेही सहकार्य राजेंद्रजींकडून मिळाले नाही. त्यामुळे झालेली ओढाताण, पतीकडून झालेल्या प्रतारणेमुळे आलेली हतबलता, याचा लेखनावर विपरीत परिणाम झाला. सहन होत नसूनही इतकी वर्षे का सहन करत राहिलो, याचे उत्तर देता आले नाही तरीही राजेंद्रजींची एक साहित्यिक म्हणून असलेली गुणवत्ता, त्यांचे व्यक्तिमत्त्व यांना आपण बांधले गेलो होतो, असे त्यांना वाटते.

मन्नूजींनी खरे तर १९९२मध्ये ही आत्मकथा लिहायला घेतली. पण निराशा, शारीरिक व्याधींमुळे ती लांबणीवर पडत गेली. दरम्यान, राजेंद्र यादव यांचे आत्मचरित्र ‘मूड मूड के देखता हूँ’ प्रसिद्ध झाले. ते वाचल्यानंतर आपल्या खासगी जीवनातल्या काही बाबी उत्तरार्थ तरी सांगाव्या लागणार, असे मन्नूजींना वाटले आणि आत्मकथेच्या शेवटी पूरक प्रसंग म्हणून काही गोष्टी त्यांनी लिहिल्या. मन्नू भंडारींची आत्मकथा वाचताना हेच जाणवत राहते की, एका वैफल्यग्रस्त पत्नीची, आयुष्यभर वाहणारी भळभळती जखम सहन करण्याची ताकद त्यांना त्यांच्या लेखनातूनच मिळत राहिली. आणि त्यांच्यासाठी ‘यही सच है’ हेच सार्थ ठरले.
janhavip@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...