आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janhvi Khandekar Article On Isis Terrorist Organization

धर्मांतर... असेही आणि तसेही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ धर - Divya Marathi
सिद्धार्थ धर
धर्मांतराने मनुष्य आमूलाग्र बदलतो. सिद्धार्थ धर उर्फ जिहादी जॉन २ धर्मांतरानंतर अमानुष अतिरेकी बनला; तर लक्ष्मीबाईंसारख्या साध्या देवभोळ्या, पतीपरायण स्त्रीचे मानवतावादी समाजसेविकेत रूपांतर झाले...
इसिस दहशतवादी संघटनेनं सध्या सगळ्या जगाला वेठीला धरले आहे. इस्लामिक स्टेट ऑफ इराण अँड सीरिया असं नाव असलेल्या या संघटनेकडं जगभरातले तरुण आकर्षित होत आहेत, अशा बातम्या आहेत. अत्यंत क्रूरपणे निरपराध लोकांच्या हत्या करून वर परत त्याचे चित्रीकरण करून त्या चित्रफिती प्रसारित करण्याचे प्रचारतंत्र ही जहाल दहशतवादी संघटना सर्रास वापरताना दिसतेय. ‘जिहाद’ हा त्यांचा परवलीचा शब्द आहे. धर्मासाठी पंचप्राण उधळून टाकायला तयार झालेल्या तरुण-तरुणींची मोठीच फौज इसिस बाळगून आहे, असं आजचं चित्र आहे. इस्लामसाठी लढणाऱ्या या संघटनेचा प्रमुख शूटर जिहादी जॉन काही महिन्यांपूर्वी मारला गेला. इसिस ज्यांना काफिर ठरवेल त्यांचे गळे निर्घृणपणे चिरणे, ही या जिहादी जॉनची खासियत होती. तो मेल्यावर त्याच्या जागी कोण, असा प्रश्न विचारला जात असतानाच इसिसने पंधरवड्यापूर्वी एक चित्रफित प्रसिद्ध केली, ज्यात इसिसचे लोक आपल्या ताब्यातील काही जणांना डोक्यात गोळ्या घालून थंडपणे संपवत असल्याची दृश्ये होती. त्यांचे नेतृत्व जिहादी जॉन-२ करत असल्याचे इसिसकडून नंतर सांगण्यात आले. त्यामुळे जिहादी जॉन पुन्हा चर्चेत आला.

या जिहादी जॉन-२ची कथा मोठी विस्मयकारक आहे. त्याचे मूळ नाव ‘सिद्धार्थ धर’. भारतीय वंशाचा, खरं तर काश्मिरी मुळे असलेला हा तरुण ब्रिटिश नागरिक आहे. त्याचे आईवडील ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. बहिणीसह लंडनमध्ये राहात असताना सुमारे १० वर्षांपूर्वी हा सिद्धार्थ एका मुस्लिम युवतीच्या प्रेमात पडला. तिच्याशी विवाह करता यावा, यासाठी त्याने धर्मांतर करून मुस्लिम धर्म स्वीकारला. आता प्रश्न असा आहे की, या धर्मांतरित सिद्धार्थला आपल्या नव्या धर्माविषयी एवढे प्रेम कसे आणि का वाटतेय की, ज्यासाठी तो आपला जीव द्यायला आणि दुसऱ्यांचा सहजी जीव घ्यायलाही तयार झाला? मुळात प्रेमासाठी धर्मांतर आणि नंतर धर्मासाठी प्रेमाचेच काय सर्वस्वाचे बलिदान द्यायला जेव्हा एखादी व्यक्ती तयार होते, तेव्हा धर्माचे आणि प्रेमाचेही माणसाच्या जीवनातले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते.
जन्मदत्त धर्माचा सहजासहजी त्याग करणे कुणालाही शक्य नसते. मात्र, आपल्या मराठी समाजाने दोन ठळक धर्मांतरे अनुभवली. दोन्ही धर्मांतरांनी महाराष्ट्राचे समाजमन ढवळून निघाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६मध्ये बौद्धधर्मात केलेला प्रवेश हे आपल्याकडचे एक ठळक धर्मांतर. पण ते दुसरे. त्या आधी १० फेब्रुवारी १८९५ रोजी नारायण वामन (ना. वा.) टिळक यांनी ख्रिश्चन धर्मात केलेला प्रवेश हे पहिले महत्त्वाचे धर्मांतर. या दोन्ही धर्मांतरांमागे हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी, समजुती आणि परंपरांवरचा राग आणि त्या बदलता येत नसल्याबद्दलची हतबलता होती. त्या वेळच्या परंपराप्रिय समाजाला ‘समता’ या महत्त्वाच्या मानवी मूल्याची जाणीव करून देणे आणि ते अंगीकारायला भाग पाडणे अशक्य होते आहे, हे जेव्हा लक्षात आले, तेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तर आपल्या कल्पनेतला, समतेचा पुरस्कार करणारा धर्म स्वतःच स्थापन करावा, अशा विचारात असताना ना. वा. टिळक ख्रिश्चन धर्माच्या संपर्कात आले. त्यातील जातीविरहित समाजरचना पाहून ते भारावले आणि मग स्वतःचा धर्म स्थापण्याचा विचार सोडून देऊन व साऱ्या समाजाचा विरोध पत्करून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

इसिसचा जिहादी जॉन-२ बनलेल्या सिद्धार्थ धरच्या धर्मांतरावरून मनात उठलेल्या प्रश्नांच्या वादळामध्ये म्हणूनच आठवले, लक्ष्मीबाई टिळकांचे आत्मचरित्र ‘स्मृतिचित्रे’. आजच्या घडीपर्यंत, मराठीतील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींमध्ये मानाचे स्थान मिळवलेले, प्रत्येकाने वाचलेच पाहिजे, असे हे आत्मकथन. १९५६मध्ये प्रसिद्ध झालेले. पण गेल्या शतकातील मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारे. १९व्या शतकाच्या शेवटाचा तो काळ. स्त्रीसाठी पती हाच परमेश्वर आणि पतीगृह हाच स्वर्ग. अशा या काळात नारायण वामन टिळकांनी सर्वथा वर्जित असा धर्मांतराचा मार्ग अवलंबला, तेव्हा आप्तस्वकियांनी त्यांची सावलीदेखील नाकारली. पदरी दोन वर्षांचे लहानगे मूल घेऊन भावाबहिणीच्या भक्कम आधारावर लक्ष्मीबाई राहात होत्या खऱ्या; पण टिळकांवरील त्यांचे नितांत प्रेम आणि दुसरीकडून टिळकांच्या मनात असलेली त्यांच्याबद्दलची अपार ओढ... दोघांनाही एकमेकांवाचून जगू देत नव्हती. लक्ष्मीबाईंच्या ना. वा. टिळकांकडे जाण्याला त्यांच्या भावाबहिणीचा विरोध होता. बहिणीविषयीचा जिव्हाळा हे त्यामागचे एक कारण होते; पण त्याबरोबरच तेव्हाच्या समाजधारणांचा दबावही त्यांच्यावर होता. टिळकांकडे गेलीस तर तुला मांस खावे लागेल, शिजवावे लागेल, अशी भीती दाखवत आप्तांनी थांबवून ठेवलेले; तर इकडे टिळकांनी लक्ष्मीबाईंकडे सुरुवातीला जरी सूटचिठ्ठी (सोडचिठ्ठीला तेव्हाचा आणखी एक पर्यायी शब्द) मागितली असली तरी नंतर मात्र तुझी अंतापर्यंत वाट पाहीन, असा शब्द दिलेला. अशा परिस्थितीत लक्ष्मीबाई तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ टिळकांपासून दूर राहिल्या. नंतर मुलाचा आजार बळावला, तेव्हा मात्र सर्वांची नाराजी पत्करून त्यांनी टिळकांकडे जाणे पसंत केले. सुरुवातीला कडक सोवळेओवळे पाळले आणि कालांतराने त्यांचेही मतपरिवर्तन होऊन जातिभेदाच्या भिंती ओलांडून सर्व समाजाला आपलेसे करण्यात त्या यशस्वी झाल्या. एवढेच नाही, तर अनेक निराधार मुलामुलींना आश्रय देऊन त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था लावून देण्याचे मोठे काम त्या करत राहिल्या.

आपल्यापैकी अनेकांना बालभारतीच्या पुस्तकातील ‘तू तर माझ्याही पुढे गेलीस’ या शीर्षकाचा धडा आठवत असेल. रेव्हरंड टिळकांच्या सहवासात राहून लक्ष्मीबाईंचे झालेले मतपरिवर्तन, जातिभेदाच्या पलीकडे गेलेली त्यांची मानसिकता आणि अनाथांना आधार देण्याचे त्यांनी सुरू केलेले काम पाहून थक्क झालेल्या टिळकांनी कौतुकाने काढलेले ते उद्गार होते!
स्त्रियांच्या आत्मकथनात ‘स्मृतिचित्रे’नं नेहमीच अग्रणी स्थान मिळवले आहे. टोकाच्या लहरी स्वभावाचे वडील, ज्यांच्या स्वभावाचे वर्णन करणे केवळ अशक्य आहे असे आणि लक्ष्मीबाईंचा कमालीचा छळ करणारे सासरे यांच्या जाचातून मार्गक्रमणा करीत राहिलेले त्यांचे जीवन हे त्या वेळच्या स्त्रीच्या वाट्याला येणारे सर्व भोग दर्शवणारे आहे.

लक्ष्मीबाईंचे आत्मकथन वाचताना सर्वात आकर्षून घेते ती त्यांची अत्यंत साधी, सरळ, गोड भाषा, त्यांच्या लिखाणातील प्रामाणिकपणा आणि स्वतःवर आलेल्या कठीण प्रसंगांचेही त्यांनी हसत हसत केलेले, नर्मविनोदी शैलीतले वर्णन. लक्ष्मीबाईंचे बरेचसे आयुष्य आजारपणात गेले. पण त्याविषयी कुठेही बाऊ न करता त्या येणाऱ्या प्रत्येक अनुभवाचे आपल्या परीने विश्लेषण करत राहिल्या. आपल्या आजाराविषयी टिळकांना त्यांचे स्नेही डॉ. ह्यूम “the ever dying wife of yours” असे लिहून कसे चिडवत, तेही त्यांनी नमूद केले आहे.
धर्मांतराने मनुष्य आमूलाग्र बदलतो. सिद्धार्थ धर उर्फ जिहादी जॉन २ धर्मांतरानंतर अमानुष अतिरेकी बनला; तर लक्ष्मीबाईंसारख्या साध्या देवभोळ्या, पतीपरायण स्त्रीचे मानवतावादी समाजसेविकेत रूपांतर झाले. शेवटी तुम्ही धर्माचा कसा अर्थ लावता, यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. एक मात्र खरे, लक्ष्मीबाईंचा तो प्रवास जरी या आधी महाविद्यालयीन आयुष्यात वाचला होता, आता २५ वर्षांनी पुन्हा वाचताना जीवनाकडे बघण्याची एक नवीन दृष्टी देऊन गेला, निश्चितपणे!
इसिस ज्यांना काफिर ठरवेल त्यांचे गळे निर्घृणपणे चिरणे, ही या जिहादी जॉनची खासियत होती. तो मेल्यावर त्याच्या जागी कोण, असा प्रश्न विचारला जात असतानाच इसिसने पंधरवड्यापूर्वी एक चित्रफित प्रसिद्ध केली, ज्यात इसिसचे लोक आपल्या ताब्यातील काही जणांना डोक्यात गोळ्या घालून थंडपणे संपवत असल्याची दृश्ये होती. त्यांचे नेतृत्व जिहादी जॉन-२ करत असल्याचे इसिसकडून नंतर सांगण्यात आलं.
janhavip@yahoo.com
पुढे पाहा, संबंधित फोटो....