आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Janvi Khandekar About Book Hirkaniche Bihrad, Autobiography, Rasik, Divya Marathi

हिरकणीचं बिऱ्हाड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नकारात्मक प्रभाव टाकणारे घटक आसपास खूप असतात, पण एखादं आत्मचरित्र जगण्याचा नवा दृष्टिकोन देऊन जातं... अशाच प्रभावी आत्मचरित्रांच्या रूपाने समोर येत गेलेल्या संघर्ष-समाधानाच्या स्वगताची ही उजळणी...
आत्मचरित्र हे एक स्वगतच असतं. त्यातून एक अख्खं आयुष्य आपल्यासमोर उलगडलं जातं. आत्मचरित्र वाचताना जणू काही त्या माणसाशी संवाद साधल्याचा, त्या व्यक्तीची गोष्ट ऐकल्याचा आनंदही मिळतो. बरेचदा आत्मचरित्रातून एकच बाजू समजते, त्यातून स्वतःचा मोठेपणा दाखवणारे चित्रण केले गेले असण्याची शक्यताही असते. तरीही हे मान्य केलंच पाहिजे की, आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणापासून सुटका होण्यासाठी लागणारी सकारात्मक ऊर्जा आपल्याला आत्मचरित्रातून मिळते. प्रसंगी आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या संघर्षांवर मात करण्याची प्रेरणा देण्याचीही ताकद या आत्मचरित्रांमध्ये असते. ‘स्वगताच्या संगती’नं प्रवास करायचा ठरवलं, ते त्यामुळंच.
काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात मेघा पाटील आणि इंद्रजीत कुलकर्णी या अवघ्या सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केलेल्या तरुण जोडप्याची निर्घृण हत्या झाली. मेघाच्या दोन सख्ख्या लहान भावांनी ही हत्या केली. केवळ दुसऱ्या जातीच्या मुलाशी बहिणीनं लग्न केलं आणि त्यावरून भावकीतल्या मंडळींकडून डिवचले गेले म्हणून भर वस्तीत या हत्या केल्या गेल्या. आर्थिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रात प्रगती केलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटनांचे प्रमाण कमी असले तरी अजूनही आंतरजातीय विवाह आपल्या समाजाने सर्वार्थाने स्वीकारलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर, सुमारे ५० वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाहाने ज्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले, त्या सुनीता अरळीकरांची आठवण आल्याशिवाय राहात नाही.

‘हिरकणीचं बिऱ्हाड' हे नाव सार्थ करणारी सुनीता अरळीकरांची जीवनकथा आहे. व्यक्तिगत, कौटुंबिक, जातीय, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भावनिक अशा प्रत्येकच बाबतीत अडथळ्यांवर मात करत स्वतःच्या आणि आपल्या सबंध कुटुंबाच्या आयुष्याची उभारणी करणाऱ्या बाईची ही गोष्ट- अगदीच खरीखुरी!

सुमारे ६५ वर्षांपूर्वीचा तो काळ. मराठवाड्यातील एका दलित कुटंुबातला सुनीता यांचा जन्म. पण बाराव्या दिवशीच त्यांच्या मातेने प्राण सोडले. या माउलीच्या वाट्याला अतोनात हाल आले होते. तेच हाल नंतर सुनीताच्या वाट्यालाही आले. जन्मदात्या बापाने एकदा नाही तर तीनदा जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या तान्ह्या बाळाची जबाबदारी नको म्हणून अवघी पंधरा दिवसांची असताना वडिलांनी चक्क खड्ड्यात पुरले. आज्ज्याने (आईचे वडील) वेळीच बाहेर काढले, म्हणून त्या जगल्या, एवढेच. स्वतःची स्थिती अतिशय हलाखीची असतानाही याच आजोबांनी नंतर छोट्या सुनीताला वाढवले. परिस्थितीशी झगडायलाही शिकवले. निष्ठुर बापाची सावलीही तिच्यावर पडू नये, म्हणून तिला आपलं नावही दिलं - शिवकांता कुंडलिक माने. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही दहावीपर्यंत शिकवलं. दरम्यान, सावत्र आईने विषप्रयोग करून पाहिला. गोड बोलणाऱ्या काकाने प्राणघातक हल्ला केला. नशीब बलवत्तर म्हणून दर वेळी छोटी सुनीता बचावली, एवढेच.

या पार्श्वभूमीवर अवघ्या १६व्या वर्षी दहावी पास सुनीता नोकरीसाठी लातूरला येते काय, विवेकानंद हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी करते काय आणि तिथेच काम करणारे दिलीप अरळीकर तिच्या प्रेमात पडतात काय!! एखाद्या रोमँटिक सिनेमात असावा, तसा हा सारा घटनाक्रम आहे.

पण या प्रेमकहाणीत हळुवार, रोमँटिक असं काहीच घडलं नाही. उलट सुरुवातीची काही वर्षे तरी या दाम्पत्यासाठी हे प्रेमप्रकरण आणि त्यातून केलेला विवाह म्हणजे, जणू काही धगधगत्या निखाऱ्यांवरून अनवाणी पायांनी केलेला प्रवासच ठरला. ब्राह्मण मुलाने दलित मुलीशी केलेला आंतरजातीय विवाह त्या काळच्या सामाजिक स्थितीत सहजासहजी स्वीकारला गेला नाही. दिलीपरावांच्या वडिलांकडून टोकाचा विरोध तर झालाच, शिवाय सुनीताला बदनाम करून दिलीपपासून तोडण्याचा प्रयत्नही झाला. अशा वेळी विवेकानंद हॉस्पिटलमधले डॉक्टर, दिलीपरावांचे स्नेही या दोघांच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. एकीकडे अडथळे आणणारी माणसे आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी आधार देणारी माणसेच.

हा विवाह म्हणजे, सुनीताच्या आयुष्याला वळण देणारी घटना ठरली. जोडीदाराच्या मोकळ्या विचारांमुळे सुनीतामधल्या लढवय्या कार्यकर्तीला अनेक सामजिक प्रश्नांवर लढे उभारता आले. लातूरमधल्या एका छोट्या आंदोलनात जखमी झालेल्या कार्यकर्त्यांवर उपचार करताना कुमार सप्तर्षी आणि ‘युक्रांद’शी (जातीविहीन, शोषणमुक्त समाज हे उद्दिष्ट नजरेपुढे ठेवून डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली युवक क्रांती दलाची स्थापना झाली.) त्यांचा संपर्क आला आणि मग या पतीपत्नींनी तन-मन-धनाने ‘युक्रांद’ला वाहून घेतलं.

त्या काळात त्यांनी केलेली आंदोलने वाचताना अंगावर काटा उभा राहतो. दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सुनीताबाईंनी लातूर दौऱ्यावर आलेल्या राज्यपालांची गाडी रस्त्यावर अडवून स्वतःच्या तान्ह्या मुलाला दुपट्यात गुंडाळून सरळ राज्यपालांच्या गाडीच्या टपावरच ठेवून दिलं. तेव्हा स्वतः राज्यपालांनी कारमधून उतरून, त्या बाळाला रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवलं. यानंतरही राज्यपालांचं भर सभेतलं भाषण त्यांनी बंद पाडलं होतं. स्वतःच्या समस्या बाजूला ठेवून किंवा स्वतःच्या संसारात रमून जाण्याऐवजी समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याची सुनीताबाईंमध्ये असलेली ऊर्मी ‘हिरकणीचं बिऱ्हाड’मध्ये पानोपानी जाणवत राहते, आणि आपल्याला नवं बळ देत राहते.

आणीबाणी आली तेव्हा ‘युक्रांद’मध्ये सक्रिय असलेल्या या अरळीकर दाम्पत्याला सहकुटुंब तुरुंगात जावे लागले. येरवड्यातील महिलांसाठीच्या बराकीत सुनीताबाई आणि त्यांची मुले, तर पुरुषांच्या बराकीत दिलीपराव... जेलमध्ये सहकुटुंब वास्तव्य करून असलेल्या या अरळीकर दाम्पत्याविषयीची चर्चा आणि कुतूहल तेव्हा देशभर होते. या आत्मचरित्रामध्ये सगळ्यात भावणारी गोष्ट हीच आहे की, आजूबाजूला सगळे प्रतिकूल घडत असताना सुनीताबाई आणि दिलीपराव एकमेकांना धीर देत खंबीरपणे परिस्थितीशी मुकाबला करत होते. या काळात संघटनेतल्या सहकाऱ्यांनीही त्यांना कशी मोलाची साथ दिली; प्रमिलाताई दंडवते, मृणाल गोरे, कमल देसाई यांच्यासारख्या महनीय कार्यकर्त्यांकडून त्यांना कोणते संस्कार मिळाले; कुमार आणि उर्मिला सप्तर्षींसह ‘युक्रांद’चे अनेक कार्यकर्ते त्यांना कसे मदत करत राहिले, हे सारे पुस्तकात मुळातून वाचावे असे आहे.

सामाजिक कामाबरोबरच नगरसेवकपदाची निवडणूक जिंकून सुनीता यांचे राजकीय करियरही सुरू होतेच. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून जिल्हा स्तरावरही काम केलं. आणीबाणीचा काळ संपला, काही वर्षांतच इंदिराजींची हत्या झाली आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातल्याही राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली. एव्हाना सुनीताची ओळख ‘अरळीकर मॅडम’ अशी रूढ झाली होती. ‘युक्रांद’ पर्व संपलं होतं. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एसमधून सुनीता अरळीकर आपली राजकीय कारकिर्द घडवत होत्या. त्यांनी स्व. विलासराव देशमुखांसह अन्य काँग्रेसजनांच्या सहकार्याने जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून दीर्घ काळ काम पाहिले. हौसिंग फायनान्सचेही काम केले. आज स्त्री भ्रूण हत्या विरोधी लढ्यात त्या यथाशक्ती कार्यरत आहेत. सामाजिक-राजकीय जीवनातले संघर्ष आणि त्यातील चढउतार चालू असतानाच कौटुंबिक पातळीवर मात्र सुनीताबाई सर्वार्थाने यशस्वी ठरल्या. दोन्ही मुलांनी नेत्रदीपक शैक्षणिक प्रगती केली. थोरला मुलगा, सून अमेरिकेत उच्च तंत्रज्ञ तर धाकटा मुलगा, सून मुंबईत प्रथितयश डॉक्टर म्हणून समाधानी आयुष्य जगत आहेत.

सुनीताबाईंची आत्मकथा वाचताना एक गोष्ट जाणवत राहते की, अन्याय करणारीही माणसेच असतात आणि अन्यायाचे परिमार्जन करणारी त्याविरुद्ध लढायला बळ देणारीही माणसेच असतात. कधी माणसांच्या साथीने आयुष्य घडवायची संधी मिळते, तेव्हा फक्त आपलेच नाही तर इतरांचेही आयुष्य घडवण्यासाठी झटणारी सुनीता आणि दिलीप अरळीकरसारखी माणसे समाजात असणे महत्त्वाचे.
(janhavip@yahoo.com)