आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आपले प्राणतत्‍व!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसा गणपती, जशी सरस्वती, तशीच लता. किंबहुना लता हीच साक्षात सरस्वती आहे, असं म्हणायला हरकत नाही. लताकडून नवीन पिढीला काय शिकण्यासारखे आहे? सरस्वतीकडून आपण काय शिकतो? खरं तर ‘सरस्वतीकडून’ किंवा ‘लताकडून’ शिकणे हा वाक्प्रचार चुकीचा आहे. आपण लताकडून शिकत नाही, तर लता शिकतो. लता ही शिक्षिका नाहीये, लता हीच अभ्यासक्रम आहे... 


तुम्ही लताचं गाणं पहिल्यांदा कधी ऐकलंत? प्रश्न थोडा विचित्र वाटेल. पण मला स्वत:ला जर हा प्रश्न विचारला तर लताचं गाणं आयुष्यात पहिल्यांदा कधी ऐकलं हे मला  नाही सांगता येणार. किंबहुना, भारतातल्या कोणालाच नाही, सांगता येणार. कारण प्रत्येकाला कदाचित आईच्या पोटात असल्यापासूनच लता माहीत असते. लता अशा प्रकारे प्रत्येक भारतीयाच्या जीवनाचा एक घटक आहे. प्राणवायूसारखा... 


माफ करा, मी लतादीदींचा इथे एकेरी उल्लेख करतोय, पण आपल्याकडे देवतुल्य व्यक्तीला एकेरी संबोधायची  पद्धतच आहे - जसा गणपती, जशी सरस्वती, तशीच लता. किंबहुना लता हीच साक्षात सरस्वती आहे, असं म्हणायला हरकत नाही. लताकडून नवीन पिढीला काय शिकण्यासारखे आहे? सरस्वतीकडून आपण काय शिकतो? खरं तर ‘सरस्वतीकडून’ किंवा ‘लताकडून’ शिकणे हा वाक्प्रचार चुकीचा आहे. आपण लताकडून शिकत नाही, तर लता शिकतो. लता ही शिक्षिका नाहीये, लता हीच अभ्यासक्रम आहे. गुरू किंवा शिक्षक आपल्याला  मार्ग दाखवतो; लता आपल्याला जिथे पोहोचायचं, ते ठिकाण दाखवते. ‘मंझिल’ दाखवते. 


खरं तर आपण लता ऐकत असतो, तेव्हा आपोआपच शिकत असतो; तिची भक्ती करत असतो, लतामय होऊन जात असतो. कोणीही संगीतकार, गायक हा कीर्तनकारासारखा, तिच्या मूर्तीसमोर उभं राहून तिला, आपली कला अर्पण करतो. ज्याची भक्ती अधिक खोल, तो अधिक चांगला कलाकार. तो जास्त चांगला गातो, वाजवतो. पण कोणीही लतासारखं तंतोतंत गाऊ शकत नाही, शकणारच नाही. कारण लताची अशी शैलीच नाही, जिचे सहज अनुकरण केले जाऊ शकेल. प्रसिद्ध गायक संगीतकार आणि व्हॉइस कल्चरचे जाणकार किशोर कुलकर्णी यांनी मला ही गोष्ट फार छान समजावून सांगितलीय. 


गायकाची शैली म्हणजे काय? तर ज्याच्या गायकीत जे काही कमी आहे किंवा व्यंग आहे. ते भरून काढण्यासाठी किंवा लपवण्यासाठी जे केलं जातं, ती म्हणजे, त्या गायक/गायिकेची शैली. लतामध्ये काहीच कमी नाही. पूर्णत्व आहे. अव्यंग गायकी आहे ती. त्यामुळे शैली नाहीय. म्हणजे, आपल्याला लताचा आवाज ओळखू येतो; गायकीही ओळखू येते, पण तिची नक्कल करता येत नाही. पट्टीचे नकलाकारसुद्धा तिच्या बोलण्याची  किंवा तिच्या पन्नाशीनंतर आवाजाला नैसर्गिकरित्या जे जडत्व प्राप्त होते, त्याची नक्कल करतात. पण त्या आधीच्या  ऐन भरातल्या लताची नक्कल कोणीच करू शकत नाही.तिच्या गायकीचे व्यंगचित्र काढता येत नाही,कारण मुळात काही व्यंगच नाही आणि मला वाटतं, अशी अव्यंग गायकी जात्याच असावी लागते. ‘घेऊन’ यावी लागते. 


यशवंत देव म्हणतात की, लता हळूहळू शिकत गेली वा तिची गायकी काळानुसार बहरत गेली, असं दिसत नाही. कारण, ती आधीपासूनच दैवी आहे. जसं पुरणाकथेत देव हे आधीपासूनच देव असतात; ते जन्माला आल्यावर हळू हळू त्यांना देवत्व येत नाही तशातलाच हा प्रकार. सगळं ती ‘तिकडूनच’ घेऊन आलीय आणि इथे फक्त त्याची भरभरून, मनसोक्त उधळण करतेय. ही उधळण तिच्या प्रत्येक गाण्यात, नव्हे तर प्रत्येक गाण्याच्या  प्रत्येक ओळीत दिसते.  दीदींनी पाट्या टाकल्यायत, असं एकही गाणं सापडणार नाही. कारण दीदींनी गाण्यावर मनापासून प्रेम केलंय. प्रत्येक गाणं जगलंय. त्यामुळेच श्रोता ते ऐकताना स्वत्व विसरून लताच्या स्वरांमध्ये विलीन होतो. त्यामुळे रसिकाभिमुख किंवा रसिकपराङ््मुख अशी काही भानगडच उरत नाही. म्हणजे, कलाकारांमध्ये सर्वसाधारणपणे असे दोन गट असतात. एक गट रसिकाला आवडेल ते करतो. दुसरा स्वतःला आवडेल, ते रसिकांसमोर ठेवतो. दीदींचे गाणे यापैकी कुठल्याच गटात मोडत नाही. एखादं गाणं गाताना दीदी त्यात एवढं प्रेम ओतते, की श्रोत्यालाही त्या गाण्यावर प्रेम करण्यावाचून दुसरा कुठला पर्यायच उरत नाही. तोही त्या गाण्यावर तेवढंच प्रेम करू लागतो, जेवढं लता करते. देव आणि भक्त या ठिकाणी एकरूप होतात आणि आमच्यासारखे कीर्तनकार हाच विचार करतात,की असं प्रेम करता आलं पाहिजे राव! जे आपल्याजवळ आहे ते पूर्णपणे त्या गाण्यात कसं अर्पण करता येईल, याचाच  प्रयत्न आयुष्यभर केला पाहिजे.


थोडक्यात सांगायचे झाले, तर नवीन पिढीला, किंवा कोणालाही लताकडून शिकायचेच  झाले, तर हे शिकण्यात अर्थ नाही की, ही ओळ कशी गायलीय, हा शब्द कसा उच्चारलाय, ही जागा कशी घेतलीय... शिकता येईल, ते एकच परम तत्त्व- प्रेम! अर्थात, प्रत्येक शब्दात, प्रत्येक सुरात स्वतःला पूर्णपणे ओतणे! अध्यात्माच्या भाषेत,विलीन होणे. स्वत:चं शरीर आणि मन गायनकलेत समर्पित करणे...

 

- जसराज जोशी 

बातम्या आणखी आहेत...