आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकप्रियतेच्या कळसावर...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘मदद करो संतोषी माता’ हे सत्तरच्या दशकातले अफाट लोकप्रियता मिळवलेले गीत होते, हे सांगितले तर आजच्या पिढीला आश्चर्याचा धक्का बसेल. ‘जय संतोषी माँ’ हा एक भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला लोकप्रिय चित्रपट आहे. या दशकात जसे ‘दीवार’, ‘शोले’, ‘त्रिशूल’ असे चित्रपट गाजले तसेच हाही. ‘त्रिशूल’सारख्या चित्रपटात सामान्य परिस्थितीतला नायक आपल्या ‘कर्तृत्वा’ने वर चढतो. ‘माझ्या आईने या इमारतीच्या कामावर मजूर म्हणून काम केलंय. आज मी ही इमारत तिला बक्षीस म्हणून देतोय.’ हे दमदार वाक्य प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारे होते. गावातून मुंबईत येणा-या, राब-राब राबणा-या, पदवी असून बेकार असणा-या अनेकांना अमिताभच्या ‘त्रिशूल’ने त्या वेळी दिलासा दिला, आशा दिली. पण हे झाले पुरुषांचे, स्त्रियांचे काय? सासुरवास, हुंड्यासाठी छळ, घरात राब-राब राबणे, मुले- संसार यांचा भार उचलता उचलता थकून जाणे, हेच त्या काळातल्या स्त्रीचे प्राक्तन होते. आज स्त्रीची परिस्थिती बदललीय; पण ती शहरात. खेडोपाडी मात्र अजूनही स्त्रीच्या वाट्याला येणारे भोग तेच आहेत. अर्थात, त्या वेळी पुरुषांना ‘अँग्री यंग मॅन’ होण्याची संधी होती, पण स्त्रीला? तिचे सामर्थ्य तर सहनशीलतेत होते. ‘जय संतोषी माँ’मधली स्त्री उपासतापास करते, सासूच्या छळाला तोंड देते; पण तिच्या शुक्रवारच्या व्रताला अखेर संतोषीमाता प्रसन्न होते. खरे तर, वर्षानुवर्षे अशा कहाण्या चतुर्मासात स्त्रिया वाचत होत्या. पण रुपेरी पडद्यावर ते पाहण्याची जादू काही आगळीच होती. तर्काच्या पलीकडचीसुद्धा होती.

मुंबईतील खार उपनगरातल्या जयहिंदनगर या कामगार वस्तीत मी राहायचो. आजूबाजूला क्वचित फॅक्टरीत किंवा गिरणीत नोकरी करणा-या स्त्रिया दिसायच्या, पण त्यांचे प्रमाण नगण्य होते. छोट्याशा खोलीत तीन-चार मुले, नवरा, सासू-सासरे यांचा संसार रेटणे, सार्वजनिक नळावर पाणी भरण्यापासून ते रेशनकार्डावर रांगा लावण्यापर्यंत सगळ्या जबाबदा-या घरातल्या स्त्रीच्या आणि मुलांच्या होत्या. आणीबाणी, श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेला गिरणी संप, अन्नधान्य टंचाई, धान्याचा काळाबाजार हे सारे याच दशकातले. या सा-याशी लढायला सामर्थ्य केवळ देवाकडून वा देवीकडूनच मिळणे शक्य होते. ‘जय संतोषी माँ’ चित्रपटाने ती जागा पुरेपूर भरून काढली होती. या चित्रपटाबद्दल मी पहिल्यांदा ऐकले ते माझ्या मानलेल्या बहिणीकडून. तिनेच हा चित्रपट दाखवला आणि लगोलग सोळा शुक्रवारचे व्रतही सुरू केले. गूळ आणि चणे यांचा खपही वाढला. आश्चर्य वाटेल, पण उत्साहाने सगळ्या बायका जाऊन चित्रपट पाहत. पडद्यावर देवी आली की मनोभावे नमस्कार करत. फुले किंवा पैसे पडद्यावर टाकत. समाजशास्त्रज्ञ या प्रकाराला ‘युटोपिया’ म्हणतील; पण ‘संतोषी माँ’सारखा चित्रपट भारतीय समाजाचा खरेखुरे टॉनिक ठरला, हे त्या वेळचे वास्तव होते.

आता 16 शुक्रवारची सद्दी संपली आहे. त्याची जागा ‘महालक्ष्मी व्रतकथे’ने घेतली आहे. हे व्रत मार्गशीर्षात म्हणजे डिसेंबरमध्ये केले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यापेक्षा मार्गशीर्षाचे महत्त्व वाढले आहे. महालक्ष्मी व्रतकथेत तीर्थ-प्रसाद याबरोबर इतरांना महालक्ष्मी व्रतकथेच्या पुस्तिकेचे वाटप करणे अभिप्रेत आहे. एकेकाळी मी ज्या प्रकाशकांकडे दिवाळी अंकाचे काम करायचो, ते ‘महालक्ष्मी व्रतकथा’ प्रसिद्ध करत. त्याचा खप कोणत्याही पुस्तकापेक्षा मोठा म्हणजे तब्बल वीस लाखांवर होता. गंमत म्हणजे कोणीतरी एका माणसाने शंभर रुपये मानधन घेऊन त्यांना ही व्रतकथा दिली होती.

मग यात इतरही प्रकाशक शिरले आणि त्यांनीही व्रतकथांची दणक्यात विक्री केली. हा लेख लिहिताना मी ‘जयपूर लिटररी फेस्टिव्हल’मध्ये होतो. तेथे ‘ग्लोबल सोल’ या विषयावर झालेल्या चर्चेत सहभागी महिलांनी म्हटले, की ‘आम्ही आमची माती, देश, आमची रिच्युअल्स कोणती असा विचार करतो.’ रिच्युअल्स म्हणजे कर्मकांड आवश्यक असतात, कारण ती आपल्याला आयडेंटिटी देतात. त्या अर्थाने ‘महालक्ष्मी व्रतकथा’ हे विसाव्या शतकाचे नवे रिच्युअल आहे, आणि ‘जय संतोषी माँ’ हा स्त्री मनाला दिलासा, आशा देणारा सर्वात लोकप्रिय चित्रपट...

shashibooks@gmail.com