आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शताब्दी प्रारंभ: चंपारणचे सत्य आणि गांधीजींचा आग्रह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंपारण संस्थानिकांनी ठेक्याने दिलेल्या जमिनींवर असलेल्या नीळनिर्मिती कोठ्या म्हणजे ज‌ळवाच होत्या. त्यांनी चंपारणच्या सामान्य रयतेला गुलाम करून टाकले होते. या शोषणातून जनतेची मुक्तता करण्यासाठी गांधीजींनी सुरू केलेल्या चंपारण सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाला आज, १७ एप्रिल रोजी प्रारंभ होत आहे. त्यानिमित्त...
राजकुमार शुक्ल यांनी सतत लावलेल्या टुमण्यामुळे केवळ दोन दिवसांच्या बोलीवर महात्मा गांधी चंपारणला गेले होते. परंतु तेथील भीषण परिस्थिती पाहून त्यांनी तेथेच तळ ठोकला. चंपारण संस्थानिकांनी व्यापले होते. संस्थानिकांनी आपल्या जमिनी ठेक्याने दिल्या होत्या. ४६ टक्के जमिनीवर इंग्रज ठेकेदारांचा अधिकार होता. ठेकेदारांनी गावेच्या गावे वेठीस धरली होती. गांधीजी गेले, तेव्हा तेथे ७० हून अधिक कोठ्या (निळेचे कारखाने) होत्या. या कोठ्या म्हणजे, ज‌ळवाच होत्या. त्यांनी चंपारणच्या रयतेची उभारी संपवून त्यांना गुलाम करून टाकले होते. कोठ्यांच्या शोषणामुळे रयत भयभीत झाली होती. नीळरूपी सर्पाने चंपारणच्या रयतेला करकचून आवळून धरले होते.
गांधीजींची काम करण्याची एक पद्घत होती. त्यांचे एक तंत्र होते. ज्याच्याविषयी पाऊल उचलायचे त्याला प्रथम त्याची कल्पना देणे, हे सत्याग्रही या नात्याने ते आपले कर्तव्य मानत. त्याप्रमाणे चंपारण जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ते मुजफ्फरपूर येथील कमिशनरांना भेटले. शेतकरी, जमीनदार व नीळवाले यांच्यात समेट घडवण्यासाठी ते तेथे आल्याचे कमिशनरांना सांगितले. मात्र, कमिशनरांनी त्यांना चंपारण्यातून निघून जाण्यास सांगितले.
गांधीजींना सुगावा लागला होता की, इंग्रज त्यांना पकडणार. तेव्हा सरकारतर्फे ज्या कारवाया होतील, त्या रयतेसमोर व्हाव्यात, या उद्देशाने त्यांनी मोतीहारी गाठले. मोतीहारी चंपारण जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते. मोतीहारीत पोहोचताच रयतेची रीघ लागली. जो तो आपले दु:ख सांगू लागला. गांधीजींवर याचा परिणाम होऊ लागला होता.
मोतीहारीत पोहोचताच दुसऱ्या दिवशी गांधीजींना जिल्हा मॅजिस्ट्रेटने नोटीस दिली. तो िदवस होता, १७ एप्रिल १९१७! गांधीजींच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होईल, भयंकर दंगे माजतील म्हणून त्यांनी जिल्ह्यातून निघून जावे, असे नोटिसीत बजावले होते. परंतु गांधीजींनी चंपारण जिल्हा सोडून जाण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, चळवळ करण्यासाठी नव्हे, तर सत्यस्थितीचा शोध घेण्यासाठी, ते येथे आले आहेत. नोटिसीच्या दुसऱ्या दि‌वशी गांधी कोर्टात उभे राहिले. गांधीजींनी स्वत:चा खटला स्वत:च लढविला. त्यांनी आपले निवेदन वाचून दाखविले. ‘जनतेत राहूनच जनतेची सेवा करता येते. ते त्यांचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच त्यांनी कायदेभंग करून शिक्षा सहन करण्याचे ठरविले आहे,’ असे गांधीजी या वेळी म्हणालेे. मॅजिस्ट्रेट गोंधळून गेला. त्याला वाटले होते की, खटला काही दिवस चालेल. त्याला कळेना निर्णय देईपर्यंत, गांधीजींचे काय करायचे ते. मॅजिस्ट्रेटने निर्णय चार-पाच दिवसांपर्यंत टाळला.
कमिशनरने दिलेल्या या नोटिसीला बिहार सरकारने चुकीचे पाऊल ठरवून खटला मागे घेतला. सविनय कायदेभंगात आदर असावा लागतो. तिच्यात केव्हाही उद्धटपणा येता कामा नये. तिच्यात द्वेष व घृणेची भावना असता कामा नये. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ही ऐतिहासिक घटना होती. देशाच्या पहिल्या सविनय कायदेभंगाची म्हणजेच सत्याग्रहाची ही सुरुवात होती.
गांधीजींनी रयतेची निवेदने िलहून घेण्यास सुरुवात केली. कार्यकर्ते निवेदने लिहीत. त्यामुळे आपले दु:ख ऐकणारेही कोणीतरी आहे, ही रयतेची झालेली भावना, ितचे व गांधीजींचे मनोधैर्य उंचावण्यास कारणीभूत ठरली. त्यांचे दु:ख ऐकून गांधीजींसमवेतील कार्यकर्त्यांचेही प्रबोधन झाले. स्वराज्याचा अर्थ केवळ गोऱ्यांना हाकलणे नव्हे, तर लोकांची दशा सुधारेल तेव्हाच स्वराज्य अवतरेल, ही गांधीजींची दृष्टी कार्यकर्त्यांच्यात अवतरली. सशस्त्र बंडासाठी सशस्त्र शिक्षण आवश्यक असते. त्याचप्रमाणे सत्याग्रहासाठी विधायक कार्याच्या प्रशिक्षणाची आवश्यकता असते. यासाठी गांधीजींनी चंपारण्यात तीन आश्रम (शाळा) उघडले. हे केवळ आश्रम नव्हते. लोकांनी एकत्र येण्याचे स्थान होते.
विरोधकांबाबत सौजन्य, त्यांचा दृष्टिकोन समजावून घेण्याची इच्छा, विरोधकांमध्ये जे सर्वोत्कृष्ट आहे त्याला आ‌ळवणे यात साधुत्व आहे. सत्याग्रहाचे ते अंग आहे. गांधीजींनी आश्रमाच्या कामासाठी कर्मचाऱ्यांचे सहकार्य मागितले. तसेच कोठीवाल्या इंग्रजांनाही कार्यात मदत करण्याचे आवाहन केले. सत्याग्रह हा जसा अन्यायनिवारणाचा लढा आहे, तसाच तो आत्मशुद्धीचाही लढा आहे. यासाठी बाह्य आचरण कसे असावे, याचा वस्तुपाठ गांधीजींनी कार्यकर्त्यांना दिला. दुसऱ्याच्या हातचे कधीच न खाणारे डॉ. राजेंद्रप्रसाद सामूहिक रसोईत जेवू लागले. स्वत:चे कपडे स्वत: धुऊ लागले. स्वत:ची खरकटी भांडी स्वत: घासू लागले. गांधीजी खेड्यांना भेटी देत होते. त्याचप्रमाणे रयतेवर होणाऱ्या अन्यायाबाबत नीळकोठींच्या मॅनेजरांना जाब विचारत होते. नीळवाल्यांनी गांधीजींना घालवून देण्यासाठी आणि त्यांचे कार्य निष्फळ करण्यासाठी कोणतीही उणीव राहू दिली नव्हती. गांधीजी व त्यांच्या सहकाऱ्यांना ताबडतोब चंपारण्यातून घालवून द्यावे, अशी नीळवाल्यांची सरकारकडे मागणी होती. शेवटी सरकार नमले. चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीत गांधीजींना सदस्य करुन घेतले. गांधींची रणनीती, रयतेची एकजूट फळाला आली. सरकारने कायदा केला. त्यामुळे शोषणातून मिळणारी आवक बंद झाली. नीळवाल्यांना चंपारण्यात राहण्यात रस राहिला नाही. त्यांनी त्यांच्याकडे होते नव्हते, ते विकून टाकले. रयतेला मुक्ततेचा आनंद मिळाला.
गांधीजींचे वय त्या वेळी अठ्ठेचाळीस वर्षांचे होते, त्यांचे सहकारी डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी वगैरे त्यांच्यापेक्षाही वयाने लहान होते. तरुणांनी लढविलेला हा लढा होता. गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहाबाबत आचार्य कृपलानी लिहितात, ‘रयतेचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी हाती घेतलेले आंदोलन, असे चंपारणच्या आंदोलनाचे खरे तर निखळ रूप होते. परंतु गांधीजींनी कधीच अर्थशास्त्राला राजकारण आणि सामाजिक सुधारणांपासून वेगळे केले नाही. चंपारण सत्याग्रहातून बिहारच्या जनतेच्या आत्मसन्मानाची झालेली उपलब्धी राजकीय लाभापेक्षा महान होती.’ चंपारण सत्याग्रहाचे चपखल वर्णन याहून अधिक समर्पक शब्दांत होणे शक्य नाही!
बातम्या आणखी आहेत...