आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत भाग्यविधात्याचे आगमन !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आफ्रिकेतील सत्याग्रह संपल्यानंतर गांधीजींनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. फिनिक्स आश्रमात त्यांचा मोठा गोतावळा होता. त्या गोतावळ्यासह ते भारतात परतणार होते. परंतु त्यांच्यासमोर प्रश्न होता की, भारतात परतल्यावर कोणत्या प्रकारे आयुष्य जगायचे? ज्या सत्याग्रहाची यशस्विता द. आफ्रिकेत साधण्यात आली, त्या ‘सत्याग्रहाचा’ विकास भारतात परतल्यावर कसा करता येईल, हाच विचार त्यांच्या मनात रुंजी घालत होता. भारतात लोक गरिबीत राहतात. त्यांना दूध, तूप, मिळत नाही. तेव्हा आहारातून त्याची गच्छंती करण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती व आपल्या सहकार्‍यांनाही प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत होते.

म. गांधी भारतात परतले तेव्हा ते ४६ वर्षांचे होते. कोट, टायऐवजी त्यांनी शेतकर्‍याचा पोशाख; पगडी, अंगरखा व धोतर धारण केले होते. द. आफ्रिकेतील २२ वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी बौद्धिक आदर्शांना व्यावहारिक रूप दिले होते. रस्कीनचे ‘Unto this last’ निबंध वाचून आपली जीवनशैली बदलली होती. फिनिक्स येथे आश्रम स्थापून त्यांनी शेतकर्‍याची जीवनशैली अंगीकारली होती. द. आफ्रिकेचा प्रवास संपला तेव्हा गांधीजींचे जीवन आत्मानुशासनाद्वारे कठोर बनले होते.
९ जानेवारी १९१५ रोजी ते भारताच्या किनार्‍यावर मुंबई शहरात उतरले. मुंबईत पाऊल टाकताच पत्रकारांनी त्यांना घेरले. ‘बॉम्बे क्रॉनिकल’च्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले, ‘मला माहीत नाही मी येथे काय करेन? परंतु माझी सेवा श्री.गोखल्यांना समर्पित आहे. मी त्यांना अनेक वर्षांपासून मार्गदर्शक व नेता मानत आहे. माझ्या येथील दिनक्रमाचे नियोजन बरेचसे ते करतील.’ पुढे ते असेही म्हणाले, ‘भारताबद्दल निश्चित निष्कर्ष काढण्याची मला सध्या गरज नाही. गोखल्यांनी सांगितल्यानुसार मला एक प्रेक्षक व विद्यार्थी म्हणून काही दिवस घालविले पाहिजेत.’

जसा गोखल्यांनी सल्ला दिला होता तसेच सर फिरोजशहा मेहतांनीही त्यांना आपल्या उपरोधिक शैलीत सुनावले होते. ‘हिंदुस्थान म्हणजे द. आफ्रिका नव्हे, हे लक्षात ठेवून पुढील कार्यक्रम आखा.’

गांधीजी मुंबईत उतरले त्याच्या चौथ्या दिवशी त्यांच्या स्वागतासाठी पेटीट यांच्या घरी समारंभ ठेवला होता. त्या काळी पुढारपण इंग्रजी शिक्षण घेतलेल्यांच्या हाती होते. गांधीजी आपल्या आत्मकथेत लिहितात, ‘तेथे मला गुजरातीमध्ये उत्तर देण्याची हिंमतच झाली नाही. त्या महालामध्ये व डोळे दिपवणार्‍या भपक्यामध्ये गिरमिटिया मजुरांच्या सहवासात राहून आलेल्या मला खेडवळासारखे वाटू लागले.’ मात्र, त्यानंतर आयोजित गुर्जर सभेत त्यांनी गुजराती भाषेत भाषण केले. त्या सभेच्या अध्यक्षस्थानी बॅ. मोहंमद अली जिना होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात कपोल विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात बोलताना गांधीजी म्हणाले, ‘इंग्रजी व गुजरातीची खिचडी बनवून बोलण्याऐवजी आपल्या मातृभाषेत बोलावे.’ मातृभाषेचा आग्रह सुरुवातीपासूनच त्यांचा होता.

गांधीची भारतात परतले तेव्हा काँग्रेसची सूत्रे मवाळांच्या हाती होती. काँग्रेस फुटण्यापूर्वीचे महत्त्व काँग्रेस-सभांना उरले नव्हते. लो. टिळक मंडाले येथील तुरुंगवासाची शिक्षा भोगून परतले होते. पंजाब व बंगालमध्ये असंतोष खदखदत होता. राष्ट्रीय आंदोलनाचा जोर कमी झाला होता. अ‍ॅनी बेझंट यांनी जहाल व मवाळांत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न चालविला होता. काँग्रेस व मुस्लिम लीगमध्ये जवळीक निर्माण झाली होती. क्रांतिकारी व्यक्तिगत पातळीवर हाराकिरी पत्करत होते. मात्र, समाज सुस्त होता.

जागोजागी होणार्‍या सत्कारांत त्यांनी कोठेही बडेजावपणा दाखविला नाही. प्रत्येक सत्काराच्या उत्तरात ते हेच सांगत, ‘मी या सार्‍या सद्भावना आणि स्नेहपूर्ण शब्दांना आपला आशीर्वाद मानतो. मी व माझ्या पत्नीने आपल्या कर्तव्याव्यतिरिक्त अधिक काहीही केलेले नाही. आम्ही तर येथे शिकण्यासाठी म्हणून आलो आहोत.’

गांधीजींचे फिनिक्स आश्रमातील सहकारी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनात डेरा टाकून होते. त्यांची कायमस्वरूपी व्यवस्था करणे गरजेचे होते. त्यांना भारतात आश्रम उघडायचा होता. भारतात परतताच पाचच महिन्यांत त्यांनी अहमदाबादजवळील कोचरब गावात आश्रमाची स्थापना केली व त्याला नाव दिले सत्याग्रह-आश्रम! आश्रमाचा उद्देश होता, आत्मत्यागी लोकांसाठी प्रशिक्षण केंद्र तयार करणे. आश्रमीय जीवन म्हणजे कठोर अनुशासन! अनुशासन जसे व्यक्तीसाठी गरजेचे आहे तसेच ते राष्ट्रासाठीही गरजेचे आहे, असे गांधीजी मानायचे. कारण त्यांना राष्ट्राचे जीवन सुव्यवस्थित व स्वच्छ करायचे होते. गांधीजी भारतात आले तेव्हा ते ब्रिटिशांनी भारतातून निघून जावे, या मताचे नव्हते. साम्राज्याअंतर्गत सरकारने कल्याणकारी असावे, इतकीच त्यांची माफक इच्छा होती. मात्र, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांची ही भूमिका बदलली.

गोखल्यांच्या सांगण्यावरून गांधीजी भारतभ्रमण करीत होते. मात्र, त्यांचा हा प्रवास तिसर्‍या वर्गाच्या रेल्वेच्या डब्यातून चालला होता. तिसर्‍या वर्गाचा त्यांचा हा प्रवास जिकिरीचा होता. त्याचे मोठे मार्मिक वर्णन त्यांनी आपल्या आत्मकथेत केले आहे. कराची येथून कलकत्त्यास जाताना लाहोरला गाडी बदलावी लागायची. गाडीत लोक खचाखच भरले होते. हमालाने गांधींना खिडकीतून आत ढकलले. बरेच तास गांधीजी दोन पायांवर उभे होते. लोक त्यांना हाडहूड करत होते. शेवटी एकाला दया आली. त्याने त्यांना त्यांचे नाव विचारले. गांधींचे नाव ऐकताच लोक खजील झाले. गांधींना पाहिले नसले तरी त्यांचे नाव लोक ऐकून होते. शेवटी गांधींना बसायला मिळाले. भारताचे खरे दर्शन गांधी घेत होते. अनुभवत होते. त्यांच्या मनाचा चिवटपणा, कष्ट सहन करण्याची ताकद, धैर्य यांची परीक्षाच जणू होत होती.

भारत भ्रमणात, सरकारांना उत्तरे देताना गांधीजी जी मते मांडत, ती ठाम असायची. प्रवाहाच्या विरुद्धही असायची. पण त्याची त्यांनी पर्वा केली नाही. ते म्हणत, त्यांची भाषणे म्हणजे स्वत:शीच चाललेला संवाद होता. मातृभाषा, राष्ट्रभाषेचा आग्रह, हिंदू-मुस्लिम ऐक्य, हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेविरुद्ध विद्रोह, हिंसेला विरोध या विषयांवर ते मते मांडत फिरत होते.

समाजाच्या चांगुलपणावर त्यांचा विश्वास होता. लोकांवर भरवसा होता. मद्रास येथील सभेत ते म्हणाले, ‘समाजसेवेसाठी रुपये नाहीत, माणसं पाहिजेत. आणि ती माणसे चांगल्या प्रकारची हवीत. त्यांच्या भावना चांगल्या प्रकारच्या हव्यात. त्यांच्यात अतूट प्रेम व औदार्य असावे. तसेच आपल्या कार्यावर त्यांचा अतूट विश्वास असावा. जर तुमच्याकडे अशी माणसे असतील तर रुपया न मागताही तुमच्याकडे येईल.’
sampurna.kranti1975@gmail.com