आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्तवेधक अणुगाथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अणुऊर्जेचा विषय निघाला की, काही विरोधासाठी विरोध या चुकीच्या तत्त्वाला जागतात, काही निव्वळ अज्ञानातून विरोधाचा सूर आळवतात, तर काही माहिती-ज्ञानाची विघातक जोड-तोड करून आपलं ईप्सित साध्य करतात. मात्र हे सारं टाळून मनोविकास प्रकाशनाचं डॉ. आल्हाद आपटे लिखित ‘भारताची अणुगाथा’ हे पुस्तक आपल्याला विषयाचं वस्तुनिष्ठ आणि सकारात्मक दर्शन घडवतं... 
 
‘नो एनर्जी इज मोअर एक्सपेन्सिव्ह दॅन नो एनर्जी’ या सत्तर वर्षांपूर्वीच्या डॉ. भाभा यांच्या उद‌्गारांची आठवण पदोपदी आपल्या देशात होते. जेव्हा जेव्हा विद्युत निर्मितीसाठी धरणे, वारा, कोळसा वा तेल वापरण्याचा विचार होतो, तेव्हा चर्चा, विराेध, अडथळे, आयात खर्च वा उत्पादन खर्चवाढ ठरलेली असते. यात कायम चर्चेत असणारी आणि वादग्रस्त ठरणारी आणखी एक ऊर्जा म्हणजे, अणुऊर्जा. 

काही दिवसांपूर्वी भारत सरकारने दहा अणुभट्ट्यांच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. परत एकदा अणुशक्तीच्या गुणवत्तेविषयी चर्चा होणार, हे नक्की. याच वेळेला ‘भारताची अणुगाथा’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे. त्यामुळे जिज्ञासूंसाठी अणुशक्ती म्हणजे काय, अणुऊर्जेसाठी भारतातले प्रयत्न आणि यश-अपयश जाणून घ्यायचे असेल तर सदर पुस्तक उपलब्ध झाले आहे. 

भारतातल्या या अणुगाथेला सुरुवात झाली, ती सन १९४४मध्ये डॉ. होमी भाभा यांनी एक पत्र सर दोराब टाटा ट्रस्टला लिहिले तेव्हापासून. या पत्रात मूलभूत संशोधनाचा विचार डॉ. भाभांनी मांडला आणि टाटा ट्रस्टने तो उचलून धरला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या प्रस्तावाला पंडित जवाहर नेहरूंनी मुक्त साहाय्य केले. तुरळक अपवाद वगळता शासनाने अनेक अडचणींवर मात करून गाथा विकसित केली. डॉ. भाभांची दूरदृष्टी, पंडित नेहरूंचा संपूर्ण पाठिंबा, डॉ. भाभा यांच्या मृत्यूनंतर डॉ. विक्रम साराभाई यांचे लाभलेले समर्थ नेतृत्व आणि त्यानंतरच्या सर्व संचालकांचे आणि वैज्ञानिकांचे अथक परिश्रम म्हणजेच भारतीय अणुशक्तीची गाथा आहे. वाचकांसाठी ती पुस्तकरूपाने चित्तवेधक केली आहे, आल्हाद आपटे आणि मनोविकास प्रकाशनाने. 

भारताच्या अणुगाथेमध्ये अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. त्यातही अणुऊर्जा आयोगाची स्थापना, अप्सरा अणुभट्टीतले संशोधन; सायरस, झर्लिना, प्लुटोनियम संयंत्रांचे कार्य; थोरियमपासून युरेनियम वेगळे काढणे, तारापूर येथून अणुवीज निर्मितीला सुरुवात, अणुशक्तीचा वैद्यकीय उपचारासाठीचा विभाग ‘आयसोमेड’ची सुरुवात, डॉ. भाभांचा अकाली अपघाती मृत्यू, डॉ. विक्रम साराभाई यांचा अचानक मृत्यू, पोखरण येथील पहिली अणुचाचणी, प्रगत राष्ट्रांनी भारतावर अणुशक्ती विकासावर घातलेली बंधने, अणुकचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न, नरोरा येथे भारतीय मानक रचनेची अणुभट्टी कार्यान्वित, काकरापार कल्पाक्कम येथे अणुभट्ट्या, पोखरण येथे दुसरी अणुचाचणी, अणुशक्तीचा कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करून कृषी उत्पादनांची निर्यात, अनेक देशांप्रमाणे अमेरिकेबरोबर नागरी आण्विक करार, युरेनियम आयात करण्यात यश, अरिहंत पाणबुडीवर अणुभट्टी, प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्सची यशस्वी निर्मिती इत्यादी घटनांचा समावेश असलेली ही गाथा आहे. या काळात ज्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय दडपणे आली, त्याप्रमाणे देशांतर्गत टीकेला, विरोधाला, निदर्शनांना अणुशक्ती आयोगाला सातत्याने तोंड द्यावे लागले. भारतीय अणुकार्यक्रम राबवणाऱ्यांना टीकेला यापुढेही तोंड द्यावेच लागणार आहे. हा सर्व इतिहास आपटे यांनी समर्पकरीत्या या पुस्तकातून मांडला आहे. 

भारतामध्ये अणुशक्तीची सुरुवात कशी झाली आणि विकास कसा झाला, इतपतच सांगण्याचा लेखकाचा हेतू नाही. सापेक्षता सिद्धांत ते जपानवर पडलेले अणुबाँब हा प्रवासही एका प्रकरणामध्ये समर्पकरीत्या आलेला आहे. कोणकोणत्या शास्त्रज्ञांनी कसे कसे संशोधन केले, याचा आढावा या पुस्तकात आहे. अमेरिका जर्मनी इथे ज्या वेळेला अणुबाँबची चर्चा चालू होती, तेव्हा त्या युद्धाच्या वातावरणातही, प्रत्यक्ष इंग्लंडमध्ये असूनही डॉ. भाभा मूलभूत संशोधनाविषयी, अणूपासून ऊर्जा कशी मिळवता येईल याचा विचार करत होते, याचे मनोवेधक वर्णन या प्रकरणामध्ये आले आहे. 

पुस्तकाची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये माहितीचा ओघ तुटू नये म्हणून विस्ताराने जे सांगायचे आहे, ते परिशिष्टांच्या स्वरूपात सांगितले आहे. उदाहरणार्थ, अणुऊर्जा तत्त्वाचा भारताला परिचय करून देताना महत्त्वाचे ठरलेले डॉ. भाभा यांचे सन १९४४चे पत्र आणि अणुऊर्जेविषयीच्या अभिक्रियांची वेगळी परिशिष्टे आहेत. ‘ट्रॉम्बे’चा विस्तार करण्यासाठी उपयुक्त झालेले डॉ. भाभा यांचे पंडित नेहरूंना लिहिलेले पत्र आणि अणुऊर्जा विभागाची कार्यउद्दिष्टे यांची परिशिष्टे आहेत, त्याचप्रमाणे अणुशक्ती विभागातूनच इतर अनेक संस्था कशा निर्माण झाल्या, यावर एक परिशिष्ट आहे. डॉ. भाभा यांचा विचार, दूरदृष्टी, कामाची पद्धत, सहकाऱ्यांची निवड, असे विविध पैलू चरित्रात्मक परिशिष्टात आहेत. 

अणुऊर्जा किती सुरक्षित आहे, यावर सतत चर्चा-वाद होत असतात. वेगवेगळे विचारप्रवाह पुढे येत असतात. अशा वेळी एक परिशिष्ट ‘सुरक्षिततेचे मजबुतीकरण’ यावर बेतण्यात आले आहे. संदर्भग्रंथ म्हणून हे पुस्तक उपयुक्त ठरावे म्हणून संदर्भसूची, शब्दावली, विषयसूची, नामसूची, स्थळसूची ही महत्त्वाची परिशिष्टे यात आहेत. 

आल्हाद आपटे (कवी सतीश सोळांकूरकर यांचे ‘परमाणू गीत’ श्री. आपटे यांनी स्वरबद्ध केले आहे. YouTubeवर ‘BARC Paramanu Geet 2007’ लिंक https://youtu.be/hVtc74DvrXM) यांनी चाळीस वर्षे भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये वेगवेगळ्या पदांवर काम केलेले असल्याने या संस्थेची खडान््खडा माहिती त्यांना आहे. त्यांचा प्रत्यक्ष अनुभव संगणक डिजिटल क्षेत्राचा आहे. परंतु तिथल्या ट्रेनिंग स्कूलने कर्मचाऱ्यांची घडणच अशी केलेली असते, की विविध विषयांचा अभ्यास सोपा होतो. म्हणूनच अणुविज्ञान त्या अनुषंगाने येणारे वैज्ञानिक जग याची सफर सर्वसमावेशक तसेच रंजक झाली आहे. 
jayanterande@rediffmail.com 
 
भारताची अणुगाथा 
लेखक : आल्हादआपटे 
प्रकाशक: मनोविकासप्रकाशन पृष्ठे: ३६०मूल्य: ~४३०/- 
बातम्या आणखी आहेत...