आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देअर इज ऑलवेज अ चान्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्यात प्रत्यक्ष माफी मागण्याचे प्रसंग आलेच नाहीत. माझं वागणं असं झालं त्याला बुद्धिबळही कारणीभूत आहेच. डाव कसाही खेळलेला असू दे, रात्री झोपायच्या अगोदर त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे, ही एक सवय मला लागली. ही सवय खेळापुरतीच नाही, तर प्रत्येक प्रसंग घडल्यानंतरही त्याचं तशा प्रकारे विश्लेषण करण्याची सवय लागली.
माझ्या खेळाबरोबर माझा अभ्यासही चांगला होता. दहावीपर्यंत तर मी राष्ट्रीय विजेता झालो होतो. बारावीत वर्षभर केलेल्या अभ्यासानं मला ९५ टक्के मार्क दिले; पण या वर्षानं माझ्या खेळाची लय मात्र बिघडवली. खेळ चांगला असूनही हे ‘करिअरचं डेव्हिएशन’ मला मारक ठरलं. याचसाठी मला बुद्धिबळ या खेळाची आणि स्वतःचीच मला माफी मागावीशी वाटते. बुद्धिबळाच्या डावाप्रमाणेच माझ्या आयुष्यातल्या डावातली एक मुव्ह चुकीची झाली होती.
माझा चुलत भाऊ श्रीपाद गोखले यानं मला अगदी लहानपणी बुद्धिबळ या खेळाची ओळख करून दिली. त्याला हा खेळ प्रचंड आवडायचा. तेव्हा त्याला हरवायला एक पार्टनर हवा होता, म्हणून तो माझ्याशी खेळायचा. पण त्यामुळे मला या खेळाची प्रचंड गोडी लागली. मग पुढचा सगळा प्रवास बुद्धिबळ आणि मी असाच सुरू झाला. अगदी पहिल्यांदा जेव्हा आंतरशालेय स्पर्धेत मी भाग घेतला होता, तेव्हा माझी कामगिरी अगदी सामान्य झाली होती. त्यानंतर दुसऱ्या वर्षीच्या स्पर्धेत मात्र मी पहिला आलो. त्या वेळी वर्तमानपत्रात फोटो वगैरे छापून आला होता, तेव्हा माझंच मला खूप कौतुक वाटलं होतं. नंतर या खेळाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊ या, म्हणून पुण्यातले मोहन फडके आणि मंदाकिनी फडके यांच्याकडे जायला लागलो. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये मी भाग घेत गेलो. जिंकतही गेलो. खेळामध्ये प्रगती झाली. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये मी तिसरा आलो. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये (अंडर फोरटीन) मी पहिला आलो. १९ वर्षाच्या खालच्या गटात मी पाचवा आलो. त्या वेळी विश्वनाथन आनंद यांच्याबरोबर खेळताना माझी ड्रॉ झाली होती. हा सगळा बुद्धिबळाचा प्रवास मी मुद्दाम सांगितला. कारण बुद्धिबळाच्या खेळातून एक गोष्ट मी शिकलो, की तुमची एखादी मुव्ह चुकली की पुढचा डाव हा बिघडत नाही; पण डावाची लय त्यातून बिघडू शकते. हे आयुष्याबाबतही तितकंच लागू आहे. माझ्या बाबतीत झालं असं की, माझा खेळ खूप चांगला होता. मी मॉडर्न शाळेत होतो. या शाळेचे मुख्याध्यापक पंचनदीकर सरही माझ्या खेळाच्या बाजूनं कायम पाठीशी असायचे. घरातून तर मला पूर्ण पाठिंबा होता. माझ्या खेळाबरोबर माझा अभ्यासही चांगला होता. दहावीपर्यंत तर मी राष्ट्रीय विजेता झालो होतो. तेव्हा भारताचं प्रतिनिधित्व करणारा पुण्यातला मी एकमेव खेळाडू होतो. तोपर्यंत अमेरिका, सिंगापूर, रशियालाही खेळण्यासाठी जाऊन आलो होतो. बुद्धिबळ या खेळाला पुढे इतके चांगले दिवस येतील, याची कल्पना तेव्हा फारशी नव्हती. पण तरीही माझ्या घरून मला या खेळासाठी कायम पाठिंबा मिळाला. वडील तर म्हणायचे, ‘डॉक्टर-इंजिनिअर खूप होतात. चेसप्लेअर कुणी होत नाही. माझी ताकद आहे, तू बिनधास्त खेळ.’ खेळासाठी दहावीत आपण ड्रॉप घेऊ, असंही मला वडिलांनी सुचवलं होतं; पण त्याचं हे असं माझ्या बाजूनं उभं राहणं इतकं मला भावलं आणि मी दहावीचा अभ्यास जानेवारीनंतर सुरू केला आणि मला ८७ टक्के मार्क मिळाले. माझ्या अनेक मित्रांनी सायन्सला अॅडमिशन घेतली. त्या वेळी करिअरच्या बाबतीत जरासा ‘फियर फॅक्टर’ माझ्या मनात होता. त्यामुळंच मी सायन्सला गेलो. सायन्सला गेल्यानंतर बुद्धिबळ या खेळाकडे तितकं लक्ष देता यायचं नाही. बारावीत तर प्रॅक्टिकल, कॉलेज, अभ्यास या गोष्टींमुळं वर्षभर मी बुद्धिबळ या खेळाला हातच लावला नाही. माझे सगळेच मित्र अभ्यास करताहेत, मीही केला पाहिजे, असं मला वाटायचं. यामुळे झालं असं की, मी वर्षभर या खेळापासून दूर राहिलो, माझ्या बरोबरचे वर्षभरानं पुढं गेले आणि मी वर्षभर सगळ्यांच्या मागे राहिलो. ‘इन्फर्मेटर’ नावाचं तेव्हा एक जाडजूड पुस्तक निघायचं, वर्षभरातून दोनदा. ही पुस्तकंही माझी बुडाली. यामुळं साहजिकच खेळात असणाऱ्या आत्मविश्वासावर परिणाम झाला. बारावीनंतर परत खेळात मी आलो; पण खेळाच्या मोशनमध्ये येणं ज्याला आपण म्हणू, त्याला जरा वेळ लागला. यामुळे माझ्या खेळाचं नुकसान झालं. बारावीत वर्षभर केलेल्या अभ्यासानं मला ९५ टक्के मार्क दिले; पण या वर्षानं माझ्या खेळाची लय मात्र बिघडवली. खेळ चांगला असूनही हे ‘करिअरचं डेव्हिएशन’ मला मारक ठरलं. याचसाठी मला बुद्धिबळ या खेळाची आणि स्वतःचीच मला माफी मागावीशी वाटते. बुद्धिबळाच्या डावाप्रमाणेच माझ्या आयुष्यातल्या डावातली एक मुव्ह चुकीची झाली होती.
प्रत्यक्ष माफी मागण्याचा प्रसंग याच बारावीतला आहे. माझं मॅथमेटिक्स खूप चांगलं होतं. बारावीला मी क्लासही लावला होता. क्लासमध्येच अतुल सबनीस नावाच्या मित्रानं ‘व्हेक्टर्सचे प्रॉब्लेम कुणी केले आहेत का?’ असं विचारलं. जरा इंप्रेशन पडावं आपलं, म्हणून मी माझे प्रॉब्लेम झाले आहेत, असं खोटंच सांगितलं. मग त्यानं माझी झालेल्या प्रॉब्लेम्सची वही मागितली. पुढे तो रोज व्हेक्टर्स प्रॉब्लेमची वही मागायचा, आणि मी त्याला काही तरी कारणं सांगून टाळायचो. समोर दिसला तरी बाजूनं जायचो. हे सारखंच व्हायला लागलं. वही द्यायला माझा काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण माझी पूर्णच नव्हती वही तर मी देणार कुठून, असा प्रश्न होता. हे सगळं असं जवळपास दोन महिने सुरू होतं. नंतर एकदा तो म्हणाला, की अरे ते प्रॉब्लेम सोडवायला खूप अडचणी येताहेत मला. मी वही घ्यायला तुझ्या घरीच येतो. तेव्हा मात्र माझं धाबं दणाणलं. त्याच रात्री जागून वही पूर्ण केली आणि दुसऱ्या दिवशी त्याला दिली आणि लगेच माफी मागितली. मी कसं खोटंच त्याला सांगत होतो, कसं त्याला टाळत होतो, तेही सांगितलं. तो चिडला आणि म्हणाला, अरे तेव्हाच सांगायचं होतं मला, आपण मिळून सोडवले असते प्रॉब्लेम. तू देणार म्हणून मी निश्चिंत राहिलो होतो. या प्रसंगानंतर आपण एखाद्याला शब्द देताना काळजी घेतली पाहिजे, हेही शिकायला मिळालं.
प्रत्यक्ष माफीचा नाही; पण जरा अडचणीत आणणारा आणखी एक प्रसंग आहे. खेळाडूंना स्पोर्ट कोट्यातून नोकरी मिळते, तशी मला एका कंपनीत नोकरी मिळाली होती. माझ्याबरोबर बॅडमिंटन खेळणारी एक माझी मैत्रीणही होती. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर तिनंही नाव कमावलं होतं. तेव्हा आमची नेमणूक मेन स्ट्रीम एम्प्लॉई म्हणजे कंपनीचे नियमित अधिकारी म्हणून करावी, असा कंपनीचा विचार होता. पण ते करताना कंपनीला काही गोष्टी तपासायच्या होत्या. माझी जी मैत्रीण होती, तिच्याबाबत कंपनीला जरा साशंकता होती, की ती प्रॅक्टिसच्या वेळात स्वतःचं कोचिंग करते. प्रॅक्टिससाठी जास्त वेळ घेते. वगैरे. तर कंपनीचा कर्मचारी म्हणून हे नेमकं काय आहे, हे शोधायची जबाबदारी माझ्यावर टाकली. कंपनीतूनही तिला फोन गेले होते. त्यामुळं आपल्यामागे अशा पद्धतीनं वॉच ठेवला जातो आहे, याची तिला कल्पना आली होती. त्यामुळं तिनं मला एकदा या सगळ्या गोष्टीची तुला काही कल्पना आहे का, असं विचारलं होतं. तेव्हा, मात्र मला कानावर हात ठेवावे लागले. माझी द्विधा मनःस्थिती झाली होती. कारण ती जे करत होती, त्यात तिचाही नाइलाज होता. तिच्याही कौटुंबिक अडचणी होत्या. ती ते सगळं मला मित्र म्हणून सांगायचीही. त्यामुळं तिचं चुकत होतं, असंही नव्हतं; पण कंपनीनं माझ्यावर विश्वास टाकून ही कामगिरी सोपवली होती. त्यामुळं कुणाच्या बाजूनं थांबायचं, हा माझ्यापुढं प्रश्न होता. मी कंपनीच्या बाजूनं जायचं ठरवलं. तिला मी हे सांगू शकलो नाही. नंतर आम्ही दोघंही ‘मेन स्ट्रीम एम्प्लॉई’ म्हणून काम करू लागलो. पण ही बाब तेव्हा गुप्तच राहिली. मी तिच्याशी तेव्हा खोटं बोललोे. मी तिचं नाव सांगू शकत नाही, पण या कारणासाठी मला तिची माफी मागावीशी वाटते.
आयुष्यात प्रत्यक्ष माफी मागण्याचे प्रसंग आलेच नाहीत. याचं कारण आई-वडिलांची शिकवण. कुणाविषयी कधीही वाईट विचार करायचा नाही, कोणाबद्दल मनात असूया वाटता कामा नये, ही माझ्या वडिलांची शिकवण होती. दुसऱ्यांकडे न पाहता स्वतःकडे पाहून समाधानी जगावं, हेच त्यांनी शिकवलं. त्यामुळं सरळ रेषेत आयुष्य जगतो आहे. यामुळं कुणाशी वादही झाले नाहीत. माझं वागणं असं झालं, त्याला बुद्धिबळही कारणीभूत आहेच. डाव कसाही खेळलेला असू दे, रात्री झोपायच्या अगोदर त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे, ही एक सवय मला लागली. ही सवय खेळापुरतीच नाही, तर प्रत्येक प्रसंग घडल्यानंतरही त्याचं तशा प्रकारे विश्लेषण करण्याची सवय लागली. हे विश्लेषण आपल्या बाजूनंही करायचं नाही, आपल्या विरोधातही करायचं नाही. अगदी तटस्थपणे, मनाला समाधान मिळेपर्यंत करायचं. त्यामुळे झालेली चूकही कळते आणि ती पुढे होणार नाही, याची काळजीही घेता येते.
‘लॉ ऑफ अव्हरेजेस’ आणि ‘देअर इज ऑलवेज अ चान्स’ ही गोष्ट मला या खेळानं शिकवली. राजा असू दे किंवा प्यादे; काळी सोंगटी असू दे किंवा पांढरी; जिंकलेल्या सोंगट्या असू दे किंवा हरलेल्या... दिवसाच्या शेवटी या सगळ्या सोंगट्या एकाच बॉक्समध्ये जातात, हेच सत्य आहे. आयुष्याच्या बाबतीतही हेच सत्य लागू होतं. माझा जसा रोल महत्त्वाचा आहे, तसाच समोरच्याचाही. या खेळात जितकं महत्त्व मला आहे, तितकंच समोरच्यालाही.. हे कळलं आणि सगळ्यांशी नातं चांगलं राहिलं. माफी मागण्याच्या आणि माफ करण्याच्या बाबतीतही ‘देअर इज ऑलवेज अ चान्स’ ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. आपल्या एका चुकलेल्या ‘मुव्ह’मुळे नात्याची लय बिघडू शकते. पण माफी मागण्यामुळे किंवा माफ करण्यामुळे पुन्हा आयुष्याच्या खेळात पहिल्यासारखं ‘कम बॅक’ करता येऊ शकतं, हे मला बुद्धिबळामुळेच कळलं.
(जयंत गोखले हे राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते आहेत.)
शब्दांकन : अभिजित सोनवणे
abhi.pratibimb@gmail.com