आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayant Lele Article About Dr Babasaheb Ambedkar\'s Caste Conversion

परिवर्तनाचे आंबेडकरी पर्व: डॉ. आंबेडकर यांच्या धर्मांतराची फलश्रुती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म आणि धर्मांतर हा वर्तमानातला राजकारणप्रेरित मुद्दा. त्यात विचारांचे अधिष्ठान दिसत नाही की धर्म चिकित्सेचा आग्रह लावून धरला जात नाही. या अनुषंगाने बाबासाहेबांनी बौद्धधर्म स्वीकारला त्यावेळची पार्श्वभूमी आणि धर्मांतराची फलश्रुती यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘परिवर्तनाचा वाटसरू’ मासिकातील जयंत लेले लिखित आणि अभय कांता अनुवादित प्रदीर्घ लेखाचा हा संक्षिप्त अंश.

राजकीय आणि सामाजिक सुधारणेच्या आघाडीवर मोठी कामगिरी केल्यानंतर १९३५ मध्ये डॉ. आंबेडकर एका महत्वाच्या तर्कशुध्द निष्कर्षावर पोहचले. ज्या शहरातील एका मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी संघर्ष केला होता, त्यापासून केवळ शंभर किलोमीटर कमी अंतरावर असलेल्या गावातच त्यांनी ‘मी हिंदू म्हणून जन्मलेलो असलो तरी, हिंदू म्हणून मरणार नाही’, अशी घोषणा केली. त्यांचा हा धर्मांतराचा निर्णयही एक चिकित्सक व्यवहार्य कृती म्हणून आपण समजून घेतला पाहिजे. राजकीयदृष्ट्या आकर्षक असे अन्य संभाव्य पर्याय उपलब्ध असताना त्यांचा त्यानंतरचा बौध्द धर्म स्वीकारण्याचा निर्णय, हाही त्यांच्या विवेकी श्रद्धेशी मिळताजुळता होता. हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यामधले नाते एकेरी नसून गतिशील आहे आणि हिंदू धर्म ह्या नावाखाली झाकलेल्या पण मूलत: मानवी आणि म्हणूनच एकात्म असलेल्या भारतीय परंपरेच्या प्रभुत्ववादी अपहरणाची बौद्ध धर्म ही एक मूलगामी चिकित्सा असल्याची जाणीव त्यांच्या या भूमिकेत होती.
१९२० मध्ये टिळकांच्या आणि १९२२ मध्ये शाहूंच्या मृत्युनंतर महाराष्ट्रातील हितसंबंधी राजकारणाचे एक महत्वपूर्ण युग हळूहळू लयाला गेले. काँग्रेस पक्षाचे नेतृत्व संथ गतीने का असेना,पण गांधींकडे सरकू लागले. टिळकांच्या उघड-उघड सनातनी आणि आक्रमक ब्राह्मणवादाकडून गांधींच्या सूक्ष्म आणि सुविकसित, पण वरदहस्तवादी ब्राह्मणवादाकडे वळणारे हे स्थित्यंतर हळूहळू स्थिर होत अत्यंत प्रभावी झाले. १९३६ मध्ये आंबेडकरांनी सुधारणेचा मार्ग सोडून धर्मांतराची नाट्यमय रीतीने घोषणा करणे, हे गांधींनी पुरस्कारलेल्या नव्या अर्थाच्या हिंदू धर्माच्या वाढत्या प्रभावामुळे आलेल्या नैराश्यातून झाले होते. हिंदू धर्मावरील त्यांची टीका ही अधिक परखड होत गेली, पण तरीही ती रानडे आणि फुुले यांनी बनवलेल्या मानवतावादी चौकटीत राहिली.
खरं तर गांधींच्या नेतृत्वाखाली भारत पुन्हा एकदा अंधारयुगात जाऊन ठेपला होता. या ऱ्हासाला आंबेडकर गांधींना जबाबदार मानत होते. कारण, गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आपले सवर्ण जातींमध्ये आणि श्रीमंत व मध्यमस्तरीय शेतकऱ्यांमध्ये आपला आधारगट विस्तारण्यातून यशस्वी झाली होती. त्यामुळे अस्पृश्यांचे राजकारण ब्राह्मणेतर राजकारणाशी जोडण्याची आंबेडकरांची संकल्पना धुळीस मिळाली होती. भारतीय समाजाचे एकात्मिक सामाजिक-राजकीय आणि आध्यात्मिक परिवर्तन करण्याचा प्रत्येक प्रयत्न राजकीय स्वातंत्र्याच्या तातडीच्या, व्यूहरचनात्मक प्रकल्पासमोर बाजूला पडत गेला. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारतात खरी लोकशाही साकारण्याची शक्यता नाही, असे आंबेडकरांना वाटू लागले होते. औपचारिक लोकशाहीच्या अपयशाच्या मूलगामी कारणांचा त्यांनी शोध घेतला तो असा.
१३ ऑक्टोबर १९३५ रोजी आंबेडकरांनी ती सुप्रसिद्ध घोषणा केली. हिंदू धर्माची अवनती पूर्णपणे ब्राह्मणवादामध्ये झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या अस्पृश्य अनुयायांना, तो सोडण्याचा सल्ला दिला. शांतता आणि स्व-सन्मान देणारी धर्मश्रद्धा त्यांनी स्वीकारावी, असे त्यांनी सांगितले. दर्जा, संधी आणि व्यवहाराच्या समतेची खरी हमी जी श्रद्धा देईल, तीच तुम्ही स्वीकारा,असे आवाहन त्यांनी केले. मंदिरप्रवेशाच्या चळवळीला नुकतेच आलेले अपयश, उच्चजातीय सामाजिक सुधारकांची दांभिक आणि दुटप्पी नीती तसेच दडपणुकीला आळा घालण्यासाठी कायदेशीर प्रयत्न करण्यास सरकारची अनुत्सुकता, ही आंबेडकरांच्या निर्णयामागील महत्त्वाची कारणे होती.
आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार नागपूर येथे दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी केला. त्यांच्या हजारो अनुयायांनी त्यांच्यासोबत धर्मांतर केले. या ऐतिहासिक क्षणी श्रद्धावान आंबेडकरांमधील भाबडे मूल आणि प्रौढ चिकित्सक यांनी आपल्यातील अंतर्गत तणावावर विजय मिळवून नास्तिकाला दूर ठेवण्यात यश प्राप्त झाले. धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भविष्याबाबतचा त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आगामी दहा ते पंधरा वर्षांत देशभरात बौद्ध धम्माची लाट येईल,अशी त्यांना आशा होती. बौद्ध धम्माचे जानी दुश्मन म्हणजे, ब्राह्मण वगळता अन्य सर्व समाज बौद्ध धम्माकडे वळतील,असा त्यांचा होरा होता. तळागाळातील वर्गांतील लोकांचा शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय व्यवहारात जसजसा सहभाग वाढेल, तसतशी त्यांच्यातील राजकीय जाणीव विकसित होईल आणि ब्राह्मणवादाच्या दडपणुकीच्या अंगाचे त्यांना सुस्पष्ट भान येईल, आंबेडकरांनी जेव्हा सुस्पष्टपणे मांडलेला बौद्ध धर्माचा पर्याय सर्वांसमोर ठेवला, तेव्हा त्यांना अशी खात्री वाटत होती की लोक मोठ्या संख्येने ब्राह्मणवादाला नकार देऊन बौद्ध धर्माचा स्वीकार करतील. या अपेक्षेमागे त्यांचा सर्वंकष मानवी विवेकशिलता आणि सदाचारासाठीचा दैवी मानवी आवेग यावर असणारा काहीसा भाबडा विश्वास होता. आपल्या उत्साहाला त्यांनी रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर जनसामान्यांनी केलेल्या सामूहिक धर्मांतराच्या ऐतिहासिक दाखल्याची जोड देऊ पाहिली. त्यांना असा विश्वास होता की, बौद्ध धर्मातील सर्व अंतर्गत भेदांवर मात करण्यात त्यांच्या ‘नव बौद्धवादा’ला यश मिळेल आणि तळागाळातील लोकांच्या जाणिवेत एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून तो रुजलेला राहील. आपण आपल्या पुस्तकांमधून आणि शिकवणुकीमधून असे लोकशिक्षण चालू ठेवू,असे त्यांना आश्वासन दिले.
नव्या नैतिक समाजात राजकारण आणि धर्माचे पूर्णत: एकात्मिकरण होईल, या त्यांच्या धारणेला अनुसरून त्यांनी एका नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. या पक्षाचे नाव, त्यांनी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष असे ठेवले.
१९५६ मध्ये आंबेडकरांना पुन्हा अशी आशा वाटत होती की, आताच्या बदललेल्या परिस्थितीत आधीपेक्षा वेगळे फलित आपल्या हाती लागेल. याची दोन कारणे होती. एका बाजूला वासाहतिक हितसंबंध आणि त्यांचे विभेदनाचे राजकारण देशाच्या मंचावरून नाहीसे झाले होते. तर दुसरीकडे महात्मा गांधींच्या मृत्यूला ८ वर्षे झाली होती. काँग्रेस पक्ष अजूनही प्रभुत्वशाली असला तरी प्रादेशिक, भाषिक आणि वर्गाधारित विरोधाचे आवाज जागोजागी बुलंद होत होते. काँग्रेसविरोधी पक्षांची एक व्यापक पायांवर उभी असणारी आघाडी आकार घेत होती. स्वातंत्र्योत्तर काळातही पूर्वीपासून विशेषाधिकार असणारे वर्गच सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात प्रभावशाली राहिले होते. या पार्श्वभूमीवर दडपल्या गेलेल्या सर्व वर्गांना सामावून घेणारी विश्वदृष्टी असणाऱ्या बौद्ध धर्माच्या पुनर्स्थापनेमुळे भारतीय परंपरेमध्ये घट्टपणे रुजलेली एक नवी वैचारिक रचना आकारात आल्याने तसेच धर्मांतरदेखील मोठ्या संख्येने झाल्यामुळे आंबेडकरांची दृष्टी अत्यंत सकारात्मक होती आणि तरीही हा प्रयत्न फसला.
डॉ. आंबेडकरांना आपल्या चळवळीला आवश्यक अशी दिशा देण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला नाही, असं म्हणता येईल, कारण धर्मांतरानंतर काही महिन्यातच त्यांचे निधन झाले, अन्य पक्षांनी केलेले असे प्रयत्नही अपुरे पडले. आंबेडकरांच्या अपेक्षेनुसार बुद्ध हा मार्क्सला पर्याय होऊ शकतो,हा विचार सफल झाला नाही. त्याचबरोबर भारतीय डाव्यांनाही जातभेदांच्या पलीकडे जाणारी जनचळवळ उभी करता आली नाही, ही तर अधिकच नाट्यमय बाब म्हणावी लागेल. आज श्रीमंतांसाठी चैनीच्या महागड्या वस्तू आणि आयातीवर आधारलेली आणि आर्थिक वाढीवर भर देणारी उदारमदवादी धोरणे प्रचंड वेगाने आणली जात असताना भारतीय डावे एक तर त्यामध्ये साथीदार म्हणून किंवा केवळ असहाय्य बघ्याच्या रुपात कार्यरत आहेत. याहूनही अधिक धोकादायक बाब म्हणजे, या भांडवली आक्रमणाच्या विरोधात हिंसा आणि सट्टेबाजीवर उभारल्या जाणाऱ्या भांडवलाचा अंश वेगाने वाढतोआहे आणि तो कष्टकरी जनतेमधील गुन्हेगारी घटकांना टोळीयुद्ध, मादक पदार्थ व्यवहार आणि अन्य गुन्ह्यांमध्ये अडकवण्यास कारणीभूत ठरतो आहे. याच काळात नवहिंदुत्ववादी गटांचे पुन्हा बळकट होणे आणि त्यातून मुस्लिम आणि अस्पृश्य (दलित) यांच्यावरील हिंसक हल्ले वाढत आहेत, ही अर्थातच काही योगायोगाची बाब नाही.
स्वातंत्र्य चळवळीमध्ये काँग्रेसचे नेतृत्व गांधींकडे असताना हिंदु धर्माचा जुना, प्रभुत्वशाली चेहरा अस्तित्वात होता. हिंदू अभिजनांनी चिकित्सक विचार करावा, यासाठी आंबेडकरांचे बहुआयामी प्रयत्न त्यामुळेच अयशस्वी ठरत होते आणि परिणामी ते निराश झाले होते. जुना हिंदू धर्म हा ग्रामीण प्रभुत्वशाली जमीनदार जातींच्या मूक पाठिंब्यावर उभा होता. आजचा आक्रमक हिंदुत्ववाद हा प्राय: बेरोजगार तरुण आणि सवर्ण मागास जातीतील (इतर मागास जाती, ओबीसी) श्रमिकांच्या बळावर उभा आहे. आरक्षणाच्या धोरणामुळे अस्पृश्यांमध्ये निर्माण झालेल्या अल्पशा अभिजन वर्गाची प्रगती किंवा ग्रामीण भागातील दलित कष्टकरी वर्गाकडून येणारी योग्य वेतनाची अथवा कर्जमाफीची मागणी त्यांना सहन होतनाही आणि ते प्रभुत्वशाली जातींच्या अभिजनांबरोबर दलितविरोधी आघाडीमध्ये सामील होतात.
आंबेडकरांची महती यासाठी होती की, त्यांनी एका प्रतिप्रभुत्वशाली प्रकल्प निर्माण केला ज्यातून भारतीय परंपरेतल्या ब्राह्मणवादाच्या वैचारिक आधारावर उभ्या असलेल्या दडपणुकीच्या विविध प्रकारांना आव्हान निर्माण झाले. त्याच भारतीय परंपरेतील एका गतिशील-चिकित्सक क्षणामध्ये उभ्या राहिलेल्या बौद्ध विचारप्रणालीची एक नवी चिकित्सा त्यांनी उभी केली. या चिकित्सेतील कळीचा घटक म्हणजे प्रत्यक्षात नाकारला गेलेला पण वैश्विक आणि पवित्र नैतिकतेच्या (धम्माच्या) आधारावर नव्याने उभा राहू शकणारा जनसमूह(संघ) हा होता.
बौद्धधर्माने जरी ब्राह्मणवादाची आणि जातीची चिकित्सा केलेली असली तरी जातीय उतरंड शाबूत ठेवली होती. आंबेडकरांनी तिचे नवसंकल्पन करण्याचा असा प्रयत्न केला, की ज्यातून ती ब्राह्मणवाद आणि जातिव्यवस्था याच्याविरुद्ध एक सक्षम हत्यार बनेल आणि माणुसकीचे रक्षण होऊ शकेल. जर आंबेडकर अधिक जगले असते तर त्यांनी ते कदाचित अधिक ताकदीने करून त्यामार्गे भांडवलशाहीच्या समर्थक साधनवादाला आणि त्याने पोसलेल्या सामाजिक-आर्थिक संस्थांना ते भिडू शकले असते. भाडंवलशाहीच्या भयकारी सांस्कृतिक परिणामांची चिकित्सा न करण्यातून तसेच बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनाच्या प्रकल्पामधून संतांची भूमिका पूर्णपणे वगळण्यामुळे आंबेडकरांच्या तत्त्वांची सुस्पष्टता आणि प्रस्तुतता मंदावली. दुसऱ्या बाजूला मार्क्सचे वाचन केवळ अर्थवादी दृष्टीतूनच करणे हाही एक मोठा अडसर ठरला. भांडवली आधुनिकतेला केवळ आपला राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी विरोध करणाऱ्यांच्या तसेच निव्वळ शांततेच्या पुरस्कारासाठी संतांचा उदोउदो करणाऱ्यांच्या प्रभुत्वशाली हेतूंमुळेच आंबेडकर या दोन्हींपासून दूर राहिले. मूळ विचारांना लक्षपूर्वक ऐकून घेण्यापेक्षा त्यांच्याबद्दल साशंक राहणे त्यांनी पसंत केले. या बाबत त्यांच्यातला आधुनिक नास्तिकतावादी, निरागस बालकापेक्षा काकणभर अधिक वरचढ ठरल्याचे स्पष्टच दिसते.
विशेषाधिकारी अभिजन आणि दारिद्र्यात अडकलेले बहुजन यांचे ध्रुविकरण जसजसे वाढत जाते आणि कनिष्ठ वर्गांचे सांस्कृतिक जीवन झपाट्याने उद्ध्वस्त केले जाते, तस तसे भविष्यासंबंधीची स्वच्छ दृष्टी पोसण्याचे काम कळीचे ठरत जाते.आंबेडकरांची दृष्टी ही अशीच कळीची होती. आज आक्रमक आणि चतुर नवब्राह्मणवाद आंबेडकरी जनतेच्या वैध आकांक्षांनाही अडसर निर्माण करण्याचे काम अधिकच जोमाने करताना दिसतो आहे. आज अस्पृश्यांचा बौद्धधर्म हा दडपणुकीच्या विरोधातील लढ्यामध्ये आणि चिकित्सेच्या गतिशील परंपरेमध्ये निर्माण झालेला आणखी एक क्षण होऊन राहिला आहे. तो एक असा क्षण आहे की, जो सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्षित झाला आहे, मात्र अत्यंत अल्पसंख्य असणाऱ्या अस्पृश्य अभिजनांकडून तो स्वहितासाठी वापरला जातो आहे. ब्राह्मणवादाला, त्याच्या सर्व रूपांना आव्हान देऊ शकतील आणि सर्वंकष भारतीय परंपरेतील खऱ्या स्मृतींना आणि स्वप्नांना आवाहन करून सोप्या आणि अनुकरणीय रुढींच्या अंधपालनात गुंतलेल्या जनांना दूर नेण्यात यशस्वी होतील, अशा नव्या प्रचारकांच्या आणि अर्थनिर्णयनकारांच्या प्रतीक्षेत हा क्षण उभा आहे.
lelejk@gmail.com