आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागिरे स्‍वर्गीय रचना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या रचनेत ‘मोरिबाना स्वर्गीय रचना’ प्रकाराप्रमाणेच मुख्य फांद्या सरळ व उंच म्हणजेच स्वर्गाच्या दिशेने वाढणाऱ्या निवडतात. बांबूच्या फांद्या, ग्लाडिओलस, निशीगंध, सरळ वाढलेल्या गुलाब, जरबेरा, शेवंती, झेंडू, कार्नेशनच्या फुलांच्या काड्या, गवताचे किंवा राजगिऱ्याचे उंच तुरे, ज्वारी बाजरीची कणसे, गव्हाच्या ओंब्या, नागफणीची पाने, आॅर्किड तसेच लिलियमच्या फुलांच्या काड्या, इत्यादी निवडता येतात.

साहित्य :
पात्र :
‘नागिरे’ रचनेस नेहमीच उंच उभे पात्र निवडतात.
फांद्या उभ्या करण्यासाठी पात्राच्या मानेच्या आकारानुसार क्राॅससारखी काडी निवडावी किंवा दोन काड्या अधिकच्या फुलीप्रमाणे मध्यभागी बांधून ती व्यवस्थितपणे बसवून घ्यावी. स्पंज नाहीतर फुलझडीच्या तारेसारख्या तारेचा गोळा करून पात्रात बसवावा. काचेच्या गोट्या, लहान दगड वापरले तरी चालतील.
फांद्या : मुख्य म्हणजेच स्वर्ग फांदी तसेच मानव फांदी म्हणून कांद्याची फुले निवडली आहेत तर पृथ्वी फांदी म्हणून कार्नेशनचे मोठे पांढरे फूल निवडले आहे. पृथ्वीफांदीला पूरक फांद्या म्हणून आॅर्किडच्या तीन लहान फांद्या घेतल्या आहेत. तसेच मानव फांदीला पूरक फांदी म्हणून एक लहान कार्नेशनचे पांढऱ्या रंगाचे फूल निवडले आहे. स्वर्गफांदीला पूरक फांदी म्हणून उजव्या बाजूला एक लहान कमी उंचीचे कांद्याचे फूल निवडले आहे.
पाणी : फुले ताजी राहण्यासाठी ग्रीष्म ऋतूत पात्रातील पाणी रोज बदलावे. गरज पडल्यास पात्रात दिवसातून दोनदा हळुवारपणे पाणी ओतावे. एकदोन वेळा रचनेवर पाणी फवारावे.
कृती : या रचनेत मुख्य स्वर्ग फांदी पात्राच्या उंची दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक भाग बाहेर दिसेल इतक्या उंचीची निवडतात. (पात्रात आत जाणारा भाग लक्षात घ्यावा) व ती पात्रात अगदी मधोमध १० अंश समोरच्या बाजूस झुकवून उभी करतात. (फोटोत उंच कांद्याचे फूल.) दुसरी फांदी म्हणजेच मानव फांदी स्वर्ग फांदीच्या अर्धी किंवा थोडी अधिक अशी निवडतात व तिला स्वर्ग फांदीच्या डाव्या किंवा उजव्या बाजूस ज्या बाजूंनी रचना करायची आहे त्यानुसार १५ अंश त्या बाजूला आणि ३० अंश समोर झुकवून उभी करतात. (फोटोत मध्यम उंचीचे डाव्या बाजूने कांद्याचे फूल.)
पृथ्वी फांदी ही स्वर्ग फांदीच्या एक तृतीयांश इतकी निवडतात व तिला स्वर्ग फांदीशी साधारण ७० अंशाच्या कोन करून तिच्या अगदी समोर उभी करतात.रचनेला पूर्णत्व प्राप्त होण्यासाठी जिथेजिथे रिकामी जागा वाटेल तिथे मुख्य फांद्यांजवळ पूरक फांद्या खोवतात. ही रचना पात्राच्या अगदी मध्यभागातून बाहेर निघते आहे अशी भासते. या रचनेत मुद्दाम फक्त फुलांचाच वापर केला आहे. ‘इकेबाना’ फक्त फुलांचीच असावी असे आवश्यक नसते. फुले उपलब्ध नसल्यास किंवा फक्त पाने असलेल्या आकर्षक फांद्या किंवा फक्त पानांचीच रचनासुद्धा करता येते.
बैठक : रचना तीन बाजूंनी बघता येते म्हणून खोलीच्या कोपऱ्यात किंवा भिंतीलगत करावी. रचना जिथे ठेवायची असते तिथेच ती केली जाते.