आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayanti Kshirsagar Article About Liver Transplant

आधुनिक सावित्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी व माझे पती निवृत्त आहोत. माझे पती अविनाश यांनी महिंद्रा अँड महिंद्रामधून 2002 मध्ये, तर मी वायुसेनेतून 2003 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. आम्हाला एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगी पुण्यात, तर मुलगा अमेरिकेत आहे. संसाराच्या जबाबदारीतून निवांत झालो, असे म्हणत असतानाच अविनाश यांना 2008मध्ये बरे वाटेनासे झाले. खानदानी मधुमेह डिटेक्ट झाला. मार्च 2009मध्ये सुजाता बिर्ला हॉस्पिटलला डॉ. विवेक पटवर्धनांकडे तपासणीसाठी गेलो. त्यांनी अ‍ॅडमिट करून घेऊन सोनोग्राफी व इतर टेस्ट केल्या. त्यात क्रिप्टोजेनिक (Unkn
own reason) लिव्हर सिरॉसिस असल्याचे निदान झाले. अविनाशला तर कशाचेच व्यसन नव्हते. डॉक्टरांनी अजून एक टेस्ट करण्यास सांगितली. बालपणी काविळीमुळे किंवा तरुणपणी डेंग्यूच्या वेळी प्लेटलेट घेतल्यामुळे संसर्ग झाला असेल, असे वाटत होते. दुस-या डॉक्टरची ट्रीटमेंट सुरू झाली. दहा महिने झाले, पण आराम नव्हता. 11 फेब्रुवारी 2010ला तब्येत जास्त झाली. डॉक्टर प्रकाश जोशींकडे गेल्यावर त्यांनी लगेचच एंडोस्कोपी केली व स्पष्ट सांगितले की, यावर औषध नाही.
मी : आता काय? यावर काही पर्याय आहे का?
डॉ : एकच पर्याय आहे. लिव्हर ट्रान्सप्लांट! खूपच खर्चिक आहे.
हे ऐकून मी सुन्नच झाले. स्वत:ला सावरून विचारले, कधी व कुठे करावे लागेल? किती वेळ आहे?
डॉ : लवकरात लवकर करावे. हे ऑपरेशन मुंबई, पुण्यात होत नाही. भारतात फक्त तीन ठिकाणी म्हणजे दिल्ली, हैदराबाद अन् कोचीन येथेच होते.
मी मुलांना कळवले. 14 फेब्रुवारी 2010ला अविनाशची तब्येत बिघडल्यामुळे वेकार्टला अ‍ॅडमिट केले. मुलगा, सून, लेक, जावई यांनी इंटरनेटवरून सर्व माहिती घेतली. डॉ. स्वाइन मुंबईला महिन्यातून एकदा एक तास येतात हे कळल्यावर त्यांची अपॉइंटमेंट घेतली. मुलगी व जावई 17 फेब्रुवारीला अविनाशचे रिपोर्ट्स व फाइल घेऊन मुंबईला गेले. डॉ. स्वाइन यांनी सांगितले की,
1) लिव्हर ट्रान्सप्लांट अत्यंत जरुरीचे आहे.
2) जवळचे रक्ताचे नातेवाईक (पती, पत्नी,
मुलगा, मुलगी) ते एकमेकांना देऊ शकतात.
3) डोनर 18 ते 55 वर्षांचा हवा.
4) खर्च 25 लाखांपर्यंत येईल.
मी दवाखान्यात विचार करीत बसले होते. मुलगी अबोली, तिचे नुकतेच लग्न झाले आणि सून मानसीला पाच वर्षांनंतर दिवस गेलेले आणि पाचवा महिना लागलेला. तरीही मुलगा अनुप व मुलगी अबोली लिव्हर डोनेट करायला तयार होते; पण या तरुण मुलांचा संसार आताच सुरू झालेला, मला ते मान्य नव्हते. मग मी स्वत:चा विचार करू लागले. मला छप्पन्न वर्षे पूर्ण होत आली होती; पण मी निर्धार केला आणि ठरवले की, आधी सीझर आणि हिस्टेरेक्टोमी होऊनही माझी तब्येत ठणठणीत आहे. ईश्वराने मला शक्ती द्यावी आणि मला डोनेट करता येवो.
अविनाश अजून अ‍ॅडमिट होते. त्यांच्या पोटात पाणी झाले होते. 19 फेब्रुवारी रात्री साडेनऊ वाजता मी दवाखान्यातूनच डॉ. स्वाइन यांना फोन लावून माझी इच्छा सांगितली. डॉ. म्हणाले की, तुम्हाला दिल्लीला येऊन ब-याच टेस्ट द्यायला लागतील. लिव्हर सूट होते की नाही ते पाहिले जाईल. त्यासाठी 15-20 दिवस इथे राहायला लागेल. मी होकार दिला आणि मुलांना सांगितले. मुलीने रजा घेण्याचे ठरवले. ऑपरेशनच्या आधी अमेरिकेहून मुलगा यायचे ठरले.
20 फेब्रुवारीला अविनाशच्या पोटातून साडेसहा लिटर पाणी काढले. थोडा आराम पडला व 22 फेब्रुवारीला डिस्चार्ज मिळाला. मुलांनी आर्थिक, मानसिक बळ दिले. डॉ. स्वाइनची 8 मार्चची अपॉइंटमेंट मिळाली. मी, अबोली, माझा मोठा भाऊ व अविनाश आम्ही 7 मार्चला दिल्लीला पोहोचलो. 8 तारखेला डॉ. स्वाइन यांना भेटलो. त्यांनी माझ्या टेस्ट सुरू केल्या. पायापासून डोक्यापर्यंत, एक्सरे, एमआरआय, सोनोग्राफी, गायनॅक, मॅमोग्राम, सीटी स्कॅन, इको, हार्ट टेस्ट, वेगवेगळ्या ब्लड टेस्ट केल्या. माझ्या सर्व नॉर्मल होत्या.
5-6 दिवसांनी सीटी स्कॅन केल्यावर 95% ओके आहे, असे कळले. त्यानंतर कायदेशीर बाबी सुरू झाल्या. मेडिकल कोर्टात इन कॅमेरा व्हिडिओ शूटिंग असते. कोर्टात मॅजिस्ट्रेटसमोर एकएक करून आमच्या चौघांची मुलाखत घेतली. मी सासरच्या दबावात हे करीत नाही ना याची खात्री केली गेली आणि 23 मार्च 2010 ही ऑपरेशनची तारीख ठरली. मुलगा ताबडतोब अमेरिकेहून आला. ऑपरेशनकरिता 20 बाटल्या रक्त जमा करायचे होते. दिल्ली आम्हाला नवीन, कसे काय होईल असे वाटले; पण जावयाने ब्लड डोनेशनकरिता पोस्टर्स बनवून मेल केले तर माझ्या मुलीने त्याच्या प्रिंट काढल्या. भावाने आणि अबोलीने आजूबाजूच्या कॉलेज व क्लासेसमध्ये जाऊन हे पोस्टर्स चिकटवले, तर पुतण्याने थरमॅक्स कंपनीत मेल पाठवला.
सर्व नातेवाइकांना आता ऑपरेशनची कल्पना दिली. मेजर ऑपरेशन आहे. मी फार नशीबवान की, आम्हाला खूप जीव लावणारे नातेवाईक आहेत आणि मुलीच्या सासरचे तर आधारच होते. रक्तदान करायला गाडी भरून लोक आले. लोकांची रांग लागली. दोन दिवसांतच 20 बाटल्या रक्त गोळा झाले. इतके लोक आले की, शेवटी ब-याच जणांना परत पाठवायला लागले.
21 मार्चला अविनाशला व 22 मार्चला मला अ‍ॅडमिट केले. 23 मार्चला लिव्हर ट्रान्सप्लांट झाले. ऑपरेशन 12 तास चालले. मला नंतर कळले की, आपल्या शरीरात लिव्हर हा असा एकच अवयव आहे, जो निम्मा दिल्यावर नंतर वाढतो व पूर्ण होतो. आमचे एक महिन्याने टाके काढले. ऑपरेशन सक्सेसफुल झाले. ऑपरेशननंतरची काळजी, तपासण्यास दिल्लीच्या चकरा या सा-यातून आम्ही आमच्या गुणी मुलांच्या व नातेवाइकांच्या शुभेच्छांनी बाहेर पडलो. आज दोघेही व्यवस्थित आहोत.
माझी सकारात्मकता, व्यायाम, कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे, स्वीकार व देवावर श्रद्धा यांमुळेच आम्ही या परिस्थितीतून बाहेर पडलो. ऑपरेशन झाल्यावर माझ्या मोठ्या जाऊबार्इंनी मला ‘आधुनिक युगातील तू सावित्री आहेस’ म्हटले आणि माझ्या हास्यक्लबच्या सख्यांनीदेखील मला हीच प्रेमाची उपाधी दिली.
प्रकृती उत्तम,
तीही वयाच्या पन्नाशीत, असल्याने मला पतीसाठी लिव्हर दान करणे शक्य झाले. अन्यथा अनेक तरुण मुलेमुलीही प्रकृतीच्या बारीकसारीक कारणांमुळे अवयव दान करू शकत नाहीत.
पतीला अवयवदान
करणा-या पत्नीवर कोणाचाही, विशेषत: सासरच्या व्यक्तींचा दबाव नाही ना याची कसून चौकशी केली जाते. त्यातून या व्यक्तीची शारीरिक प्रकृतीच नव्हे, तर मानसिक स्थितीही बळकट आहे, याची खात्री करून घेतली जाते.