आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महफिल ए जुबाँ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकप्रकारचा तिरस्कार आणि तेढ वातावरणात भरून राहिली आहे. केवळ माणूसच नव्हे, तर त्याची भाषा, त्याचा वेश आणि त्याची जीवनशैली लक्ष्य ठरू लागली आहे. अशा  वातावरणात उर्दू भाषेच्या प्रेमापोटी मराठमोळ्या पुणेकर तरुणांच्या समूहाने पुढे येणं आणि अभिव्यक्ती
स्वातंत्र्याचा नादमय पुकारा करत मैफल सजवत जाणं ही मोठीच सुखावह घटना आहे...

असह्य होत चाललेल्या काळोखाची सद्दी संपवत मेंडोलिनचे आर्त सूर थिएटरचा अवकाश व्यापतात. दिव्यांच्या मंद प्रकाशात पडदा बाजूला सारला जातो आणि पाठोपाठ संथ लयीत ‘लाहोर के उस पहले जिले के, दो परगना में पहुँचे...’ही पीयूष मिश्रांनी लिहिलेली नज्म डाव्या अंगाला बसलेल्या गायकाच्या गळ्यातून थेट प्रेक्षकांचं काळीज चिरत जाते. तोच धीरगंभीरपणा, तोच ठहराव धरत नज्म पुढे सरकते... 
रेशम गली के दुजे कुचें के चौथे मकाँ में पहुँचे, 
और कहते हैं जिसको, दुजा  मुल्क, उस पाकिस्ताँ में पहुँचे... 
इथे गायकाच्या स्वराची आर्तता टिपेला पोहोचते, तसा अंगावर सरसरून काटा येतो. डोळे पाणावतात. शब्दा-शब्दांतून, सुरांच्या चढ-उतारांतून उलगडत जाणारी ती नज्म सीमेपलीकडे गेलेल्या हुस्नाच्या मागे राहिलेल्या प्रियकराची विरह-वेदना मांडत असते. फाळणीला, फाळणीनंतर घडत आलेल्या विध्वंसाला जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला जाबही बिचारत असते... ही नज्म भरल्यापोटी आलेल्या उमाळ्याची खोटी कहाणी मांडत नसते. तर रक्ताच्या, हृदयाच्या नात्यांवर कुऱ्हाडीचे घाव सोसल्यांची विछिन्न व्यथा मांडत असते...
उर्दू भाषेच्या निस्सीम प्रेमापोटी एकत्र आलेल्या मराठमोळ्या पुणेकर यार-दोस्तांनी बसवलेला ‘सुखन’ हा कार्यक्रम इथून पुढे उर्दू भाषेच्या सौंदर्य आणि अदबीचं, नजाकत आणि मादकतेचं मनमोहक दर्शन घडवत जातो. प्रेमात पडलेले, प्रेमात फसलेले, रुसलेले, गालिब-मीर-फैज-साहिरच्या शब्दांचं गारूड कायम असलेले, काळ्याचे पांढरे होत चाललेले असे सगळे तरणेताठे, मध्यमवयीन आणि साठी-सत्तरीकडे झुकलेले बुजुर्ग या हृदयस्पर्शी सौंदर्य यात्रेत सामील होत जातात. कधी एखादी गझल ऐकता-ऐकता समाधी अवस्थेत जात या अनेकांचे डोळे मिटतात, कधी एखादा फर्मास शेर ऐकल्यावर वाह क्या बात है...ची सामूहिक दाद घुमते, तर कधी एखादी उदास विराणी ऐकून भावनावेग अनेकांना अनावर होतो. ‘उर्दू अदब और हिंदुस्थानी मौसिकी की महफिल’ मात्र उत्तरोत्तर रंगतच जाते...
पण, मराठी मुलं, त्यात ती पुण्यातली? सदाशिव पेठ-कोथरुड आणि कर्वे रोडची. उर्दूचा लहेजा कसा पकडणार? लखनऊचा नबाबकाळ, पुराण्या दिल्लीचा गालिबकाळ कसा जिवंत करणार? कार्यक्रमापूर्वी मनात शंका घोंगावत असतात. पण दाढीचे खुंट वाढलेला,  एका बेफिकिरीत  अधून-मधून डोईवरच्या केसांतून हात फिरवणारा ओम भूतकर अस्खलित उर्दू भाषेत निवेदनाला प्रारंभ करतो.  डोळ्यांत त्याच्या  मिश्किल भाव असतात. चेहरा उत्फुल्ल असतो. त्याच मस्तीत तो ख्वाजा मोहंमद वजीर लखनवीचा शेर ऐकवतो-
तिरछी नजरसें न देखो आशिक-ए-दिल-गिर को, 
कैसे तिरंदाज हो, सिधा तो करो तीर को... 
...आणि पहिल्या वाक्यालाच साऱ्या शंका, सारे संशय फिटून जातात.  त्याच्या आवाजातला कंप, शब्द आणि वाक्याच्या पुनरुक्तीचं त्याला असलेलं भान आणि त्यातून शेर आणि वाक्याला येत जाणारं वजन प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद घेऊन जातं. मिश्किलपणा राखतच पुढे तो,’ 
बेदिली में क्या यूँ ही दिन गुजर जायेंगे, 
जिंदा रहें हम तो युँ ही मर जायेंगे... 
हा टाळ्या घेणारा शेर ऐकवतो. 
कधी  भावव्याकूळ होत, 
‘बेनाम सा यह दर्द ठहर क्यों नही जाता, 
जो बीत गया वह गुजर क्यों नही जाता...’ 
असा पिळवटून टाकणारा सवाल विचारतो.  कणभरही हातचं राखून न ठेवणारा हा निवेदक त्याच्या उर्दू बोलीने क्षणात समोर बसलेल्या प्रेक्षकांचा दोस्तच होऊन जातो. जणू गालिबचा कुणी सोबतीच आपल्याला भेटलेला असतो. त्याच्या बोलण्यात, निवेदनात अनौपचारिकता असते. ओतप्रोत आपलेपण असतं. ‘अपने सब यार काम कर रहे है ‘कुशल खोत’ और हम हैं के नाम कर रहे है...’असं त्याचं समोर बसलेल्या मित्र-मैत्रिणींना उद्देशून शेर म्हणणं प्रेक्षकांत मस्त खसखस पिकवून जातं. एक गजल संपते. ओम भूतकरचं निवेदन सुरू होतं. निवेदनात शेजारीच बसलेले ‘नचिकेतमियाँ’ सहज आपला सूर त्यात मिसळतात. तेवढ्यात मुक्ता जोशींनी हलकेच 
‘आपकी याद आती रही रात भर... 
चश्मेनम मुस्कुराती रही रात भर’ 
म्हणत तान घेतलेली असते... एका लयीत वाहणारं हे गाणं संपतं. कव्वालीचा ठेका पडतो. कव्वालीचा सूर जसा टिपेला जातो, तसा प्रत्येक जण त्यात सामील होत जातो. समोर बसलेला प्रेक्षक गगनझुल्यावर मस्त झुलत असतो... कव्वाली संपते. नुसरत फतेह अली खानसाहेबांच्या आवाजात कधी तरी ऐकलेलं सादगी तो हमारी जरा देखिए, ऐतबार आपके वादें पर कर लिया’ हे सुफी शैलीतलं गाणं पुन्हा एकदा मनाची पकड घेतं. गाणं संपतं. परंपरावादी समाज आणि हुकूमशाही राज्यसत्तेशी सुरू असलेला निकराचा झगडा सांगणारी ‘कुछ इश्क किया कुछ काम किया’ ही फैज अहमद फैजची नज्म सादर होते. पुन्हा मनमुराद दाद मिळते, प्रेक्षकांची. उर्दूचा उत्सव सुरू आहे आणि त्यात साहीर लुधियानवी नाहीत, असं कधी होत नाही. इथेही हा शायर हमखास भेटतो.  त्याने कधी काळी लिहून ठेवलेलं असतं, 
‘जिन शहरोंमें गुँजी थी गालिब की नवाबरसो, 
उन शहरों में उर्दू अब बेनामो निशाँ ठहरी, 
आजादी-ए-कामिल का ऐलान हुआ जिस दिन, 
मातुब जुबाँ ठहरी, गद्दार जुबाँ ठहरी...’ 
जणू वर्तमानातल्या उर्दू बोलीच्या, ती बोलणाऱ्या समाजाच्या दु:खालाच तो वाचा फोडत असतो. रंजन, कला, साहित्य आणि या सगळ्याचं आपल्या नजरेसमोर  होत असलेलं ‘सुखन’चं स्वप्नवत सादरीकरण कधी संपूच नये, अशी ऊर्जा, अशी सळसळ वातावरणात भरून राहिलेली असते. या काळात प्रेक्षकामधला प्रत्येक जण उर्दू भाषेच्या, ही भाषा सादर करणाऱ्या ओम भूतकर आणि त्याच्या दोस्तांच्या पुन:पुन्हा प्रेमात पडलेला असतो.  सीमेअलीकडच्या आणि पलीकडच्या डोळ्यांत विद्वेषाचं रक्त साकळलेल्या प्रत्येकाला, म्हणजे, परधर्मद्वेषाची दीक्षा देणारे राजकारणी, धर्मगुरू, मौलवी, युद्धासाठी उतावीळ असलेले माध्यमवीर यातल्या प्रत्येकाला आत्ता इथे आणून बसवावं, अशी तीव्र भावना कार्यक्रम संपवून थिएटरबाहेर पडताना मनात दाटून येते. सहजच.

उर्दू अदब और हिंदुस्थानी मौसिकी की महफिल
कवितांचे सादरीकरण, कवितेचे गीतगायन, त्यांचा एकत्रित आस्वाद, कवितेतील अर्थ-आशयाशी सुसंगत अशी रंगमंचीय वातावरणनिर्मिती, सामाजिक भाष्य करणाऱ्या ‘दास्तान’चे प्रभावी सादरीकरण यामुळे ‘सुखन’चा आविष्कार सध्या चर्चेत आहे.  ‘सुखन’चा दिग्दर्शक ओम भूतकर युवा पिढीतला प्रतिभावंत, प्रयोगशील रंगकर्मी म्हणून परिचित आहे. ‘सुखन’विषयी ओम म्हणतो, ‘काही वर्षापूर्वी मिर्झा गालिब यांच्यावर नाटक लिहीत असताना उर्दू भाषेच्या संपर्कात आलो. या भाषेच्या, साहित्याच्या प्रेमात आकंठ बुडालो. उर्दू भाषेतलं हे सौंदर्य आपल्या मंडळींसमोर कसं मांडता येईल, असा प्रश्न छळू लागला. 

त्यातूनच ‘सुखन’ची निर्मिती झाली. नुसरत फतेह अली हे माझे आवडते कलाकार. त्यांच्या वाढदिवसाचं निमित्त करून मग आवडलेल्या काही रचनांचं मित्रमंडळींसोबत सादरीकरण केलं. ते सगळ्यांना फक्त आवडलं असं नाही, तर सारे वेडे झाले. त्या वेडाचं आजचं रूप म्हणजे ‘सुखन’ आहे. सुरुवात झाली, तेव्हा फक्त आवडलेल्या रचनांचा समावेश होता. पण नंतर सगळ्यांना उर्दूचं वेड लागलं आणि आवडत्या रचनांमध्ये सतत भर पडत गेली, पडते आहे. मी, नचिकेत, जयदीप, अभिजित, देवेंद्र... सगळेच सतत उर्दूच्या व्यवधानात असतो, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे जे आवडेल, छान वाटेल ते लगेच शेअर केलं जातं आणि सर्वसंमतीनं ते ‘सुखन’चा भागही बनतं. त्यामुळे ‘सुखन’ सतत ताजं राहतं. 
 
‘सुखन’चा अर्थच मुळी संवाद असा आहे.  कविता किंवा बोलणारा (व्यक्त करणारा) असाही अर्थ आहे. या साऱ्या अर्थच्छटांना सामावून घेणारे ‘संवादीपण’ हेच ‘सुखन’चे इंगित आहे. सादरीकरणासाठी आपण नाट्यगृह स्वीकारतो म्हणून रंगमंच आणि रसिक यांच्यात एक सीमा निर्माण होते. पण ‘सुखन’ ती सीमा नकळत पार करत जातो - तो या ‘संवादी’ असण्याने. त्यामुळे गालिब ते अलीकडच्या कुमार विश्वास... असा उर्दू रचनाकारांचा विस्तीर्ण पट ‘सुखन’मधून भेटतो. कार्यक्रमात ओमची सोबत करणारा नचिकेत देवस्थळी म्हणतो,‘उर्दू साहित्य, अभिजात भारतीय संगीत आणि सुफियाना संगीत यांच्या जोडीला उर्दूतील कथाकथन (दास्तानगोई) - गझल, नज्म, कौल, कव्वाली...यांचा समावेश असणारी ही मुक्त महफिल आहे. 

मिर्झा गालिब, मीर तकी मीर, फैज अहमद फैज, साहिर लुधियानवी, हाफिज जालंधरी, अमीर खुसरो, मुताबा हुसैन, दाग देहलवी, मुहंमद इक्बाल, निदा फाजली... परवीन शाकीर, कुमार विश्वास... असे विविध काळांचे प्रतिनिधित्व करणारे उर्दू रचनाकार ‘सुखन’चा भाग आहेत. मूळ संकल्पना ओमची. नंतर सगळ्यांनी त्यात ‘इम्प्रोवाइज’ केले आहे. ओम, मी, जयदीप वैद्य, अभिजित ढेरे, देवेंद्र भोमे, शंतनु घुले, केतन पवार, मुक्ता जोशी, मानस गोसावी, अवधूत रहाळकर, सिद्धांत बोरावके, अपूर्वा पेठकर, अवधूत गांधी, संदेश तळपे, क्षितिज विचारे, शुभम जिते, अजेय, भैरवी खोत, कुशल खोत..या साऱ्यांचा सहभाग ‘सुखन’चा ताजेपणा वाढवणारा आहे. 
 
‘सुखन’चे सुरुवातीचे प्रयोग घराघरांत झाले. ज्यांना रस असेल त्यांनी पुढाकार घेऊन हे प्रयोग केले. मग कर्णोपकर्णी ‘सुखन’चा पैस वाढत गेला. दिल्लीमध्ये झालेला प्रयोग हा तर कळसाध्याय ठरला. इतर प्रसंगी उर्दू कसे कळणार, असे म्हणणाऱ्या मंडळींना ‘भाषा फक्त ‘नाद’ म्हणून अनुभवा’ असा संदेश ‘सुखन’ देतो. जिथे आवश्यक आहे, तिथे अर्थही सांगितला जातो. त्यामुळे ‘सुखन’मधली प्रत्येक रचना त्या कलाकारापुरती राहत नाही, ती रसिकांची होऊन जाते. त्यातून कलाकार-रसिक यांच्यातली सीमा धूसर होत जाते. ‘सुखन’चा प्रेक्षक त्याच्याही नकळत स्वत:मधील तटस्थता, साक्षीभाव सोडतो आणि  कलाविष्काराचा एक अविभाज्य भाग बनून जातो.  तो तालावर डोलतो. ठेका धरतो. स्वत:वरच हसतो, रुसतो, रागावतोही, अस्वस्थ होतो.. 

मुख्य म्हणजे, हे सारे नकळत घडते. त्याच्यातल्या संवेदनशीलतेला, विवेकाला एक नादमय आवाहन ‘सुखन’ करतो, भाषेच्या माध्यमातून. भाषिक अस्मिता विस्मरणात जाते आणि उरतो, तो फक्त माणूसपणाला साद घालणारा भाषिक नाद... कुठल्याही विधायक चळवळी, मोर्चे, आंदोलने. यात उतरणारी सामूहिकता आणि त्या समूहाची मानसिकता जशी एकतानता पावते, तोच अनुभव कलाविष्काराच्या पातळीवर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नि:संशय ‘सुखन’ करतो.

jayubokil@gmail.com 
बातम्या आणखी आहेत...