आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांकडूनच मी शिकले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीनाताईंच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आता आजोबा होण्याच्या वयाचे आहेत. पण ‘बाई’ कुठेही भेटल्या की, अजून छोटे विद्यार्थी बनून जातात. रस्त्यात, समारंभात कुठेही बाई भेटल्या, दिसल्या की, आधी धावत जाऊन बाईंना मिठी मारणारे विद्यार्थीही भेटतात. आज ७७व्या वर्षी हे त्यांच्या आनंदाचे क्षण आहेत.
 
४० वर्षांपेक्षा अधिक काळ विद्यार्थीमय असं जीवन मिळण्याचं भाग्य लाभलेल्या ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका आणि विद्यार्थिप्रिय शिक्षिका म्हणजे मीनाताई चंदावरकर. वयाची ७७ वर्षं पूर्ण झाली आहेत, पण आजही सतत विद्यार्थ्यांचा, शाळांचा, पालकांचा, नव्या प्रयोगांचा विचार मनात सतत सुरू असतो. ‘मी विद्यार्थ्यांना शिकवलं, असं म्हणणं आता जरा धाडसाचं वाटतं. विद्यार्थीच मला शिकवत राहिले,’ असं वाक्य मीनाताईंच्या बोलण्यात सातत्यानं येतं. मीनाताईंच्या पहिल्या बॅचचे विद्यार्थी आता आजोबा होण्याच्या वयाचे आहेत. पण ‘बाई’ कुठेही भेटल्या की, अजून छोटे विद्यार्थी बनून जातात. रस्त्यात, समारंभात कुठेही बाई भेटल्या, दिसल्या की, आधी धावत जाऊन बाईंना मिठी मारणारे विद्यार्थीही भेटतात. नव्या पिढीतले ‘स्मार्ट’ विद्यार्थीही त्यांच्या ‘मीनाज्जी’ला प्रेमाची, स्नेहाची कव घालतात, तेव्हा मीनाताईंना सगळं भरून पावल्यासारखं वाटतं.
 
आपल्या प्राचीन परंपरेत असणारं विद्यार्थ्यांचं ‘अर्जनपर्व’ म्हणजे आधुनिक काळातला माँटेसरीपासून दहावीपर्यंतचा शैक्षणिक कालखंड. गेल्या ४० वर्षांत असंख्य विद्यार्थ्यांचं हे ‘अर्जनपर्व’ मीनाताईंच्या व्यक्तिमत्त्वातल्या प्रेमळ, स्नेहमयी, प्रयोगशील, खंबीर शिक्षिकेनं सार्थ ठरवलंय. त्याचं समाधान मीनाताईंशी बोलताना पटकन जाणवतं. वयोमानानं शरीर थकलं असलं तरी त्यांच्या नजरेतलं, स्पर्शातलं विद्यार्थ्यांविषयीचं अपरंपार प्रेम पूर्वीसारखंच ताजं, प्रसन्न आणि अम्लान आहे. गेल्या तीन वर्षांपासून मीनाताईंनी पूर्ववेळाचं शैक्षणिक काम थांबवलं आहे. पण आजही त्या शिक्षकांसाठीच्या विशेष कार्यशाळा आवर्जून घेतात. मार्गदर्शनासाठी तर त्या कायमच तत्पर असतात. 
 
मीनाताईंना भेटल्यावर स्वाभाविकच थोडं स्मरणरंजन झालं. छोट्या मुलांमध्ये इतकं रममाण होण्याविषयी त्या पटकन म्हणाल्या, “अगदी लहानपणापासून मला मुलांची खूप म्हणजे खूपच आवड होती. माझ्या घरातही मला ती पुरवता आली कारण आम्हा सगळ्या भावंडांची मी ताई होते. मी थोरली असल्याने माझी चारही लहान भावंडं, त्यांचे तान्हेपणाचे दिवस, त्यांचं मोठं होत जाणं, हट्ट, मी जवळून अनुभवले आहेत. मी मूळची कुडाळ-सावंतवाडी भागातली. माझं चौथीपर्यंतचं शिक्षण खेड्यातल्या शाळेत मग हायस्कूलसाठी कोल्हापूरमध्ये ताराराणी विद्यालय, राजाराम कॉलेज मग पुण्यात वाडिया कॉलेजमध्ये उच्च शिक्षण झालं. कोल्हापूरच्या शिक्षणाचा, शाळेचा, शिक्षकांचा मला कृतज्ञतेनं उल्लेख करावासा वाटतो इतकं त्या शाळेनं, शिक्षकांनी मला दिलं. शिकण्याची ओढ, उर्मी जबरदस्त असल्यानं मी शिक्षणासाठी सुरुवातीपासून धाडसी निर्णय घेतले, घरापासून दूर राहण्याचे. त्या काळात ते धाडसच समजलं जायचं.”
 
गरजेपोटी नोकरी पत्करली
घरची परिस्थिती जेमतेम होती. कुटुंबातली मोठी व्यक्ती, आक्का म्हणून मी घराला हातभार लावणं हे माझं कर्तव्य होतं. कॉलेजशिक्षण पूर्ण होतानाच मी नोकरी स्वीकारली. हिंदुस्थान लीव्हर, टाइम्स ऑफ इंडिया, धर्मयुग आणि आयबीएम या माझ्या पहिल्या चार नोकऱ्या होत्या. त्यासाठी मी मुंबईला गेले आणि तिथलं धकाधकीचं, व्यस्त, गतिमान जीवन अनुभवलं. त्यापैकी आयबीएमच्या नोकरीमुळे मला जरा आर्थिक स्थैर्य मिळालं. १९६५मध्ये मी भास्कर चंदावरकर यांच्याशी लग्न केले. रोहितचा जन्म झाला. तो ‘अभिनव’मध्ये शिकू लागला आणि माझ्यातल्या शिक्षिकेचाही जन्म झाला. त्याच्या जोडीनं मीही बऱ्याच गोष्टी नव्यानं शिकू लागले पुढची ३० वर्षं माझं आयुष्य ‘अभिनव’मय होऊन गेलं. त्यानंतर दहा वर्षं मी ‘न्यू इंडिया स्कूल’मध्ये काम केलं. हा काळ होता २००३ ते २०१२ च्या दरम्यानचा. पुढे ‘ज्ञानदा प्रतिष्ठान’च्या बालमंदिरमध्ये मी तीन वर्षं काम केलं. हा सगळा काळ एकत्रित पाहिला तर सुमारे ४३ वर्षं मी विद्यार्थ्यांच्या सहवासात राहिले आणि समृद्ध झाले. विद्यार्थ्यांच्या अखंड सहवासात मी बदलून गेेले. मला नवी दृष्टी मुलांनीच दिली. नव्या तंत्रयंत्रयुगाच्या चाहुली मला विद्यार्थ्यांनीच शिकवल्या. शाळेत प्रयोगशाळा असतात, तशी संपूर्ण शाळाच आम्ही प्रयोगशाळा केली. स्वत:सकट सगळ्यांवर ‘प्रयोग’ केले. काही यशस्वी झाले, काही फसले. पण त्यातून मिळालेले ‘धडे’ पाठ्यपुस्तकांपेक्षा मोलाचे होते. सुरुवातीला जे अर्जनपर्व म्हटले ना, ते विद्यार्थ्यांपेक्षा माझ्याबाबतीतच अधिक खरे ठरले. ‘अभिनव’मधले दिवस ‘नित्य नवा दिस प्रयोगाचा’ होते. सारखं काहीतरी सुचायचं. हे करून पाहू, अशा पद्धतीने मुलांना हे चांगलं समजेल, या विचाराने प्रयोग चालायचे. माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची प्रयोगांना उत्साही आणि खंबीर साथ असायची. आमच्या प्रयोगांना मिळालेलं यश हे माझ्या सहकाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचंच यश होतं. मग तो शाळेतला ओव्हरनाइट स्टे असो, मोठ्या वर्गातल्या मुलांनी छोट्या वर्गातल्या मुलांना दत्तक घेणं असो, सर्व प्रयोग सामूहिक होते आणि त्यातून अपेक्षित ती मूल्ये, संस्कार, विवेक आम्ही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करू शकलो, याचे समाधान खूप मोठे आहे.
 
jayubokil@gmail.com
बातम्या आणखी आहेत...