आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमात पाडणारे गुलाब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेमीजीवांच्या आजच्या अधीरतेला रूप, रंग, गंध आणि स्पर्शाच्या माध्यमातून अधिक गहिऱ्या करणाऱ्या मनमोहक गुलाब पुष्पांविषयीची ही कव्हर स्टोरी, व्हॅलेंटाइन डेनिमित्त...

भाषा प्रभू गडकरींनी आपल्या ‘महाराष्ट्रगीता’त महाराष्ट्राला  प्राजक्त फुलांचा दळदारी देश, असं म्हटलं असलं तरी सध्या हवा तरल बनली आहे, ती ‘फुलांचा राजा’ अशी उपाधी मिरवणाऱ्या गुलाबगंधानं. आजच्या व्हॅलेंटाइन डेसाठी सारं जग अधीर झालं आहे आणि त्या अधीरतेला रूप, रस, गंध, स्पर्शानं अधिक गहिरं करणारी गुलाबपुष्पं आपल्या महाराष्ट्रातल्या मावळ प्रांतातून रवाना झाली आहेत. मुख्य म्हणजे, गुलाबपुष्पांचं हे उद्यान विकसित केलंय मेघा बोरसे, अंजली चोपडे अशा मराठी स्त्रियांनी.

गुलाबाचं शेत फुलवणाऱ्या मेघाताई, अंजलीताई ‘मधुरिमा’च्या वाचक मैत्रिणींसाठी आपल्या फार्मची माहिती देताना म्हणाल्या, “गुलाबाच्या फुलांना सर्वाधिक मागणी असते, ती अर्थातच व्हॅलेंटाइन डेच्या आसपास. साधारणपणे डिसेंबरपासून आमची तयारी सुरू होते. गुलाबाचं पीक सुमारे ५० ते ६० दिवसांत तयार होतं. तो पहिला टप्पा असतो. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू होतो तो मार्केटिंगचा. मग मागणीनुसार पॅकिंग आणि प्रत्यक्ष मालाची पाठवणी, असा तिसरा टप्पा. आणि सर्वांत शेवटी स्थानिक बाजारपेठेत माल पाठवण्याची प्रक्रिया असते. या प्रत्येक टप्प्यावर सतत जागरूक राहून, दर्जेदार माल वेळेत, उत्तम स्थितीत परदेशात पाठवायचा असतो. प्रत्येक टप्प्यावर गुलाबपुष्पं निरनिराळ्या निकषांवर तपासली जातात.”

मेघाताई म्हणाल्या, “आमचं रोझ फार्म चार एकरांचं आहे. साधारणत: एका एकरात ३० ते ३२ हजार गुलाबाची रोपे असतात. आम्ही दहा वर्षांपासून गुलाबांची निर्यात करत आहोत. आता आमची टीम छान सेट झाली आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा सीझन असतो. या काळातले थंड, गारव्याचे हवामान गुलाबांच्या वाढीसाठी पोषक असते. यंदा थंडीने साथ दिल्याने उत्तम पीक आहे. मात्र युरोपमध्ये ब्रेक्झिटमुळे मागणी कमी आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेवर अधिक लक्ष आहे.”

अंजलीताई म्हणाल्या, “आम्ही या क्षेत्रात थोडे नवीन आहोत. पाच वर्षांपूर्वी सुरुवात केली. सध्या ४० गुंठ्यावर गुलाब फुलवले आहेत. आम्ही थेट विदेशात गुलाब स्वत: पाठवत नाही. काही मध्यस्थांमार्फत फुले विदेशी पाठवली जातात. स्थानिक पातळीवर अधिक फुले पाठवली जातात. त्यात औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई येथील बाजारपेठ महत्त्वाची असते.” निर्यातीसाठी गुलाबफुलांचा आकार ४० ते ६० सेमी दरम्यान असावा लागतो. देठ लांब असावा लागतो. फुलांचा रंग गडद लाल, गुलाबी असावा, ही अपेक्षा असते. अर्धोन्मीलित गुलाबाला चांगली किंमत मिळते. निर्यातीसाठी फुले पाठवताना पॅकेजिंगलाही अतोनात महत्त्व असते. फुले टिकाऊ असावी लागतात. ती तजेलदार, देखणी असणे आवश्यक असते.
 
- ऑक्टोबर ते डिसेंबर फुलांची लागवड आणि वाढ
- जानेवारीमध्ये विपणाचे काम केले जाते
- फेब्रुवारीच्या १ ते १० दरम्यान फुलांची निर्यात होते
- ११, १२, १३ फेब्रुवारीदरम्यान स्थानिक बाजारपेठेत माल पाठवतात
 
- गुलाबकळ्यांना मोठी मागणी 
- दांडी जितकी लांब, तितकी चांगली किंमत 
- गुलाबाची विक्री सिंगल फ्लॉवर पद्धतीने 
- निर्यात मात्र ८,१०, १२, २० अशा बंचमध्ये केली जाते
- विदेशात फुलांचा आकार, रंग, देठ यालाच महत्त्व
- स्थानिक बाजारपेठ मात्र सुगंधालाही महत्त्व देते
 
jayashree.bokil@dbcorp.in
 
बातम्या आणखी आहेत...