आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ये हौसला कैसे झुके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागेश कुकूनूर या प्रतिभावंत दिग्दर्शकाचा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘डोर’. झीनत आणि मीरा या दोन काहीशा परस्परविरोधी व्यक्तिरेखांभोवती चित्रपटाची कथा गुंफण्यात आली होती. या व्यक्तिरेखा रंगवणाऱ्या गुल पनाग व आयेशा टाकिया यांनी त्यावर्षीचा क्रिटिक्स अवॉर्ड फॉर बेस्ट अॅक्ट्रेस पटकावला होता.

ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके
मंज़िल मुश्किल तो क्या, बुंदला साहिल तो क्या
तनहा ये दिल तो क्या, हो...

दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, निर्माता आणि निर्देशक अशी चतुरस्र प्रतिभा लाभलेलं बॉलिवूडमधलं व्यक्तिमत्त्व म्हणजे, नागेश कुकूनूर. इक्बाल, हैदराबाद ब्लूज, रॉकफोर्ड, आशाएँ, यांसारख्या समांतर चित्रपटांची रसिकांना मेजवानी दिलेल्या, सामाजिक विषयांच्या हळुवार हाताळणीसाठी प्रसिद्ध असलेल्या नागेशजींची डोर ही अशीच एक उत्कृष्ट कलाकृती. झीनत (गुल पनाग) व मीरा (आयेशा टाकिया) या दोन स्त्री व्यक्तिरेखांभोवती फिरणारा, त्यांच्यातले भावनांचे बंध, गुंतागुंत उलगडणारा हा चित्रपट. एकीकडे पारंपरिक जोखडाखाली दबलेल्या मीराची मानसिकता, तिचे पतिविरहाचे दु:ख, तर दुसरीकडे सर्व अडथळे पार करत पतीच्या बचावासाठी प्रयत्नशील असणारी झीनत. यो दोघीं समाजातल्या सर्वसामान्य महिलांचे प्रतिनिधित्व करतात. या दोन अभिनेत्रींनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक महिलेला स्फूर्ती देणाऱ्या आहेत.

काश्मीरच्या निसर्गसौंदर्यामध्ये आपल्याच विश्वात रममाण असणारी, सर्व जबाबदाऱ्या पार पाडून आत्मनिर्भरतेने घराकडे लक्ष देणारी झीनत हा सामंजस्याचा, उत्साहाचा खळखळता झरा. तर दूर राजस्थानातील एका खेड्यात रखरखत्या वाळवंटात चिरेबंदी वाड्याच्या चार भिंतींच्या आत असलेली, परंपरावादी घरात पती हयात असेपर्यंत त्याच्या सहकार्याने शक्य होईल तितका स्वातंत्र्याचा उपभोग घेणारी अल्लड मीरा. सनातनी राजपूत कुटुंबातली सून मीरा. परंपरा, रूढी स्वीकारत आपला अल्लडपणा बाजूला ठेवत नशिबी आलेल्या भोगाशी एकरूप होऊ पाहणारी.

झीनत ही अगदी त्याच्या विरुद्ध प्रवाहातील. काश्मिरातील एका मुस्लिम कुटुंबातील, स्वावलंबी व आत्मनिर्भर असलेली स्त्री. आखाती देशात नोकरीसाठी गेलेल्या पतीच्या, आमीरच्या माघारी सासू-सासऱ्यांचे तिच्याबाबत असलेले गैरसमज दूर करत त्यांना आपलेसे करणारी. आपापल्या जगात दोघीही रममाण असताना एका घटनेने त्यांचे आयुष्य बदलते. आयुष्यात आलेल्या वादळाने दोघीही कोलमडतात. मीरा आहे ती परिस्थिती स्वीकारते. तर झीनत आपली आशा कायम ठेवते. हातात केवळ एक फोटो घेऊन ‘मंजिल तक पहुचण्या’चा चालवलेला आटापिटा करते. त्यामध्ये आलेले खाचगळगे पार करण्याची ठेवलेली हिंमत तिच्यामध्ये असलेल्या स्त्रीशक्तीचे दर्शन घडवते.

परिसरातीलच एका बहुरुप्याच्या मदतीने िनश्चयपूवर्क मीराचा शोध घेत तिच्यापर्यंत पाेहचण्यात यशस्वी होते. मीराच्या सासू-सासऱ्यांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीनंतरही मीराचा कल जाणून घेत ितच्याशी मैत्री करणारी झीनत. मीरामध्ये दबून बसलेल्या स्वातंत्र्याला मोकळी वाट करून देत आयुष्य मोकळेपणाने कसं जगतात, याची अनुभूती देत तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्यामध्ये विराम आलेल्या विश्वाच्या कक्षा विस्तारण्यास मदत करणारी, स्वातंत्र्याचा मनसोक्त उपभोग घेण्यासाठी प्राेत्साहन देणारी झीनत. मीराला तिच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देणारी, तिच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरणारी झीनत.

मात्र पतीच्या मृत्यूस कारण ठरलेल्या व्यक्तीच्या माफीनाम्यावर सही करण्यास मीरा साफ नकार देते. स्वत:शीच बराच काळ चाललेल्या द्वंद्वानंतर ठाम निश्चयापर्यंत पोहोचून सासऱ्याने कुणाची तरी रखेल म्हणून ठेवण्याच्या निर्णयाला विरोध करते. परंपरा, मूल्यं यांना
झुगारून देत झीनतने दाखवलेला स्वातंत्र्याचा मार्ग स्वीकारत चिरेबंडी वाड्यातून बाहेर पडत मोकळा श्वास घेते. आणि मीरामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करते ती झीनत. झीनत आणि मीरा. एक समंजसपणा वाग‌वणारी तर दुसरी अल्लडपणा जपणारी. दोघी दोन ध्रुवांवरच्या. पण संकटं आली, तरी डगमगून न जाता धीराने परिस्थितीचा सामना करणाऱ्या. ‘ये हौसला कैसे झुके’ म्हणत आपल्यासारख्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करणाऱ्याच!

जयश्री देशमुख, अमरावती
jayashree.deshmukh@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...