आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय चुकले ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी तेव्हा एका वर्तमानपत्रात काम करत होते. होळीसाठी अमरावतीवरून गावी जाण्यासाठी निघाले. कळमेश्वर माझे गाव. नागपूरपासून पंचवीस किलोमीटर दूर. होळीच्या दिवशी बसचा प्रॉब्लेम असतो म्हणून धुळवडीच्या आदल्या दिवशी अर्ध्या दिवसाची सुटी मागितली. ती नामंजूर झाली. त्यामुळे मला धुळवडीच्या दिवशी निघावे लागले. सकाळी साडेसहाची मोर्शी मार्गे जाणारी अमरावती-नागपूर बस माझ्या गावावरूनच जाते. शहर सोडल्यानंतर वाहकाकडून कळले की, बस फक्त वरुडपर्यंतच आहे. पुढे कसे हा विचार मनात आला, पण नाइलाज होता. कारण शहर खूप मागे पडले होते. मधूनच परतीचा मार्ग नव्हता. महत्त्वाचे म्हणजे माझ्यामध्ये असलेल्या साहसाची या दिवशी तरी मला परीक्षा घ्यायची नव्हती. मोर्शीपर्यंतचे तिकीट काढले. तिथे चौकशी केली तर इथून बस नाही, वरुडवरून मिळेल असे सांगण्यात आले.
आमच्या पोहोचायच्या वेळात जर तिथून सुटणारी कोणती बस असेल तर ती कृपया काही वेळ थांबवायला सांगा, अशी आम्ही दोन प्रवाशांनी विनंती केली, पण त्या विनंतीची दखल घेण्याइतपत सौजन्य त्यांच्याजवळ नव्हतेच. ते आपल्या गप्पांमध्ये रंगले. वरुडवरून बस मिळेल हा विचार करून पुन्हा बसमध्ये बसले.

वरुड डेपोत शिरतोय तोच नागपूरला जाणारी बस सुटली. चौकशीनंतर कळले, इथून आज एकही बस नाही. धुळवडीचा आनंद लुटायला आलेल्या शहरातील एसटी कर्मचा-यांची हळूहळू तिथे बैठक जमत होती. काहींनी बस येईल, पण उशिरा, असा धीर दिला, तर काहींनी मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्नही केला, पण आज घरी जायचेच हा एकच निश्चय मनामध्ये होता. एखाद दीड तासाने कंटाळून आजूबाजूला बघायला लागले, तर एक पानठेलेवाला त्याच्या खोक्यातून डोकावून बघत होता. त्याच्याकडे जरा गुर्रावून बघितले, तर तो सपकला. परत त्याने हिंमत केली नाही. पण माझी हिंमत सुटत चालली होती. दुसरीकडे एकाचे जरा दुरूनच मागेमागे फिरणे सुरू झाले. एखादी आलेली बस आपली आहे का म्हणून पाहायला गेले, तर ‘त्या’चे वेध घेणे सुरूच होते. पुन्हा फलाटावर आले. स्त्री प्रवासी कुणीही नव्हते. अधूनमधून माझा एक मित्र फोन करून विचारत होता, ज्याने मला एकटी जाण्याऐवजी अमरावतीला परत जाण्याचा सल्ला दिला होता. पण त्याच्या बोलण्याचा राग डोक्यात होता. पूर्वी अपडाउनमध्ये नेहमीच्या बसमध्ये वाहक असलेले काका तेवढे सोबत भेटले. तीन तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांनी एकदाचे सांगितले, ‘पोरी, बस आली.’ बसमध्ये बसल्यानंतर जीव भांड्यात पडला. हा तीन तासांचा काळ मला विसरता येणार नाहीच. कारण तिथे मला धीर देणारे पुरुषच होते, पण त्यातल्या काहींवर होळीचा अंमल चढलेला होता. त्या अमलाचा कदाचित वाईट परिणामही झाला असता. त्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवत होते, दुसरे मन मात्र विश्वास ठेवायला तयार नव्हते. मी गर्भात असतानाच सैनिक असणा-या वडिलांनी कठीण प्रसंगी हिंमत न हारण्याचे धडे दिले होते, पण त्याच वेळी त्यांनी वेळप्रसंग पाहून वागण्याचेही सुचवले होते. म्हणूनच दुसरे मन लोक कितीही चांगले असले तरी विश्वास ठेवायला धजावत नव्हते. त्याला कारण होते आजूबाजूला घडणा-या घटना. सुरक्षेसाठी जर मुलींनी किंवा महिलांनी समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाखवला तर कुठे चुकले? काही अनुचित घडल्यानंतर हातात शिल्लक काहीच नसतंच.