आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारागृहाच्या भिंती झाल्या नि:शब्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दगडाला पाझर फुटत नाही, असे म्हणतात. त्यातच जर त्या कारागृहाच्या भिंती असतील तर त्यांना कुठला जिव्हाळा, ओलावा अन् प्रेम? कधी कधी कारागृहातच घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या त्या साक्षीदार असतात अन् कळत-नकळत हातून घडलेल्या गुन्हेगाराच्या पश्चात्तापाच्याही. जहाँ परिंदा भी पर नहीं मार सकता, त्या अमरावती कारागृहाच्या भिंतींना मात्र वेगळाच अनुभव आला गेल्या आठवड्यात. निमित्त होते बंदिजन अन् त्यांच्या मुलांच्या भेटीचे. औचित्य होते बालदिनाचे.

कारागृहात कार्यरत अधिकारी, कर्मचारी अन् बंदिजन यांच्या मनात कितीही भावनिक गुंता असला, तरी तो ना या भिंतींपर्यंत पोहोचत, ना येथे असणाऱ्यांपर्यंत. परंतु अमरावती मध्यवर्ती कारागृह अाणि त्याच्या भिंती या सर्व गोष्टींना अपवाद ठरल्यात. तुरुंगात असणाऱ्या कैद्यांसोबत जाळीच्या बाहेरून काही अंतरावर उभे राहून संवाद साधणारे त्यांचे नातेवाईक हे दृश्य बहुतेक कारागृहात पाहायला मिळते. मात्र बंदिजन व त्यांच्या मुलांच्या गळाभेटीचा अनोखा सोहळा या कारागृहाने याचि देही अनुभवला. बालक दिनी अमरावतीच्या कारागृहाच्या भिंतींनी या अनुपम सोहळ्याचे मूक साक्षीदार बनत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बंदिजनांना त्यांच्या मुलांच्या मिलनाचा आनंद घेता यावा, यासाठी कारागृहाचे अधीक्षक डॉ. भाईदास ढोले यांनी एक पाऊल उचलले. गुन्हेगार म्हटले की, जगाच्या नजरा अनेक प्रश्न करू लागतात. मात्र त्या गुन्हेगारांच्या शरीरातही एक इवलेसे हृदय असतेच. त्यात आपल्या मुलांप्रती अपार प्रेम असते, हे जगाला कधी कळणार? डाॅ. ढोले यांच्या या निर्णयामुळे चार वर्षांपासून ज्या मुलांनी व वडिलांनी कारागृहातून सुटी न मिळाल्याने एकमेकांचा चेहरा बघितला नव्हता, त्यांनी एकमेकांना मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून िदली. मुलांनी काय केलं या वेळात? दहा वर्षांची चिमुकली सहा दिवसांपासून घरच्या नळाला पाणीच आले नाही म्हणून सकाळी उठून आईसोबत हापशीवरच्या गर्दीत पाणी भरून तिला कशी मदत करते, शेजारच्या इन्याचं लग्न कसं झालं, यासह ही मुलं गावातली दस बडी खबरे सांगून वडिलांना कारागृहातून जणू गावातच घेऊन गेली. खाऊसाठी बापाजवळ हट्ट करणारी चिमुकली इवल्याशा एका हाताने वडिलांना बिस्किट भरवत दुसऱ्या हाताने त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत होती; तर दुसरीकडे वयात येऊ पाहणारा लेक वडिलांच्या खांद्यावर डोके ठेवून अश्रूंना वाट मोकळी करून देत होता.

चार वर्षांपासून वडिलांचा चेहराही न पाहिलेल्या १६ वर्षीय सोनलने येथील प्रत्येक बंदिजनाला व त्याच्या मुलामुलींना दिलेली हिंमत दाद देणारी होती. कारागृहात आईवडील किंवा अन्य कोणतेही नातेवाईक असतील, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हिंमत हरायला नको. बंदिजन असलेल्या आपल्या नातेवाइकांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आपण जोमाने व हिमतीने पुढे जात जगाशी चार हात करायला हवे, हा तिने दिलेला कानमंत्र प्रत्येकाचे हृदय हेलावून गेला. मात्र या निमित्ताने सोनल व १४ वर्षांचा तिचा भाऊ तुषार हे ठाण्याहून वडिलांना भेटण्यासाठी आले होते. कायद्याला भावनांचे वावडे असते, असे म्हणतात; मात्र केवळ अर्ध्या तासाच्या या कार्यक्रमात त्याचा कुठेही अडसर आला नाही. जिथे एकमेकांचा आवाज ऐकणे शक्य नाही, तिथे प्रत्यक्ष एकमेकांना डोळ्यांसमोर पाहून थरथरत्या ओठांनी साधलेल्या या संवादाने कारागृहही नि:शब्द झाले. बापलेकांना बालक दिनाची ही अविस्मरणीय भेट देण्यासाठी जेलर गजेंद्र ठाकरे, महेंद्र जोशी, चंद्रकांत कदम, मोहन चव्हाण, माया दतुरे, ज्योती आठवले, अशोक जाधव, पांडुरंग भुसारे, पवन पांडे या अधिकाऱ्यांसह कर्मचारी व सेवाभाव जपणाऱ्या नागरिकांनी सहकार्य केले.

जयश्री देशमुख, अमरावती
jayashree.deshmukh@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...