आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री प्रभावाचा चलत्चित्र उत्सव!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चित्रपट म्हणजे कथाकथन असते. फक्त शब्दांसह चित्र, ध्वनी यांच्या साथीने दिग्दर्शक आणि त्याची टीम ते सांगत असते. नट या कथेतल्या व्यक्तिरेखा उभ्या करतात, ते आपल्या कल्पनाशक्तीनं; कारण ‘अ‍ॅक्टिंग इज इमॅजिनेशन...’ जगविख्यात अभिनेत्री सुसान सॅरेनडॉन आपल्या मास्टरक्लासमध्ये सांगत होत्या.. 44व्या गोवा ‘इफ्फी’मधलं प्रमुख आकर्षण असलेला सुसानचा हा मास्टरक्लास उपस्थितांच्या कायमचा आठवणीत राहील असा झाला...
पाच वेळा अकॅडमी अवॉर्डसाठी नामांकन मिळवणारी ही 67 वर्षीय अभिनेत्री तिचं वलय, झगमग सर्व दूर ठेवून वावरली. सुसानच्या हस्ते ‘इफ्फी’ महोत्सवाचं उद्घाटन झालं आणि ‘बाँडगर्ल’ मिशेल यो हिनं ‘इफ्फी’च्या सांगता सोहळ्यात आपल्या उत्फुल्ल वावरण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. महोत्सवात ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना सिनेमा शताब्दी जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेखही समारोपासाठी आवर्जून उपस्थित होत्या. कर्तृत्ववान स्त्रीशक्तीची अशी अर्थपूर्ण उपस्थिती चित्रपट महोत्सवातील स्त्रीशक्ती अधोरेखित करणारी ठरली.
यंदाच्या महोत्सवात 76 देशांच्या 326 चित्रपटांत स्त्री दिग्दर्शकांचे चित्रपट सर्वाधिक स्मरणात राहिले. ‘इफ्फी’मध्ये सर्वाधिक चर्चेतला चित्रपट म्हणून वीणा बक्षी दिग्दर्शित ‘द कॉफिन मेकर’चा उल्लेख करायला हवा. अँतोन गोम्स (नसिरुद्दीन शहा) आणि मृत्यू (रणदीप हुडा), बायको (रत्ना पाठक शहा) यांच्या अप्रतिम अभिनयाने या चित्रपटाला वेगळीच उंची दिली आहे. शवपेट्या बनवण्यात उभी हयात गेलेल्या अँतोनीसमोर प्रत्यक्ष मृत्यू उभा राहतो आणि
जगण्याचा खरा अर्थ त्याला कसा उमगतो, याचे अप्रतिम दर्शन वीणा बक्षी यांनी घडवले आहे. कॉफिन मेकरचे चार वेळा रिपीट शो होऊनही अजून शो हवा, ही रसिकांची मागणी कायम होती.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागातला बेट्टी रेइसचा ‘बिएटर्स वॉर’ हा तर महोत्सवातील सुवर्णमयूर आणि 40 लाखांचे पारितोषिक मिळवणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. बेट्टीसोबत लुगी आॅकिस्टोनेही हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. उत्कृष्ट अभिनेत्री ठरलेल्या बझास्का मागदालेनाचा ‘इन हायडिंग’देखील वैशिष्ट्यपूर्ण होता. पोलिश फिल्ममेकर अ‍ॅग्नियेझेका हॉलंड यांनी दिग्दर्शित केलेले सहा चित्रपट रेट्रोस्पेक्टिव्ह विभागात दाखवले गेले. युक्रेनच्या व्हिक्टोरिया ट्रोफिमेन्कोचा ‘ब्रदर्स’, ‘द फायनल कन्फेशन’ हा चित्रपट तिचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न असूनही लक्षणीय होता. दिवसागणिक वृद्ध होत जाणार्‍या दोन व्यक्तींच्या आयुष्यात अचानक आलेल्या एका स्त्रीमुळे सगळेच संदर्भ कसे बदलत जातात, याचे चित्रण व्हिक्टोरियाने अतिशय प्रगल्भपणे केले होते. इंटरनॅशनल ज्युरींपैकी एक असणार्‍या क्लॅरिए डेनिस या फ्रेंच फिल्ममेकरचाही आवर्जून उल्लेख करायला हवा. याशिवाय पौरन डेरेन्क्शादेह दिग्दर्शित ‘हश... गर्ल्स डोंट स्क्रीम’ हा इराणी चित्रपट कोंडमारा झालेल्या स्त्रीमनाची कैफियत मांडणारा होता. जेसिका वुडवर्थने मांडलेला ‘द फिफ्थ सीझन’ हा चित्रपट अनेक अर्थांनी लक्षणीय होता. एका गावात एकदा अचानक निसर्गचक्रच बदलते. वसंताचे आगमनच होत नाही. गाई दूध देईनाशा होतात, कोंबड्या अंडीच देत नाहीत, बीजं अंकुरत नाहीत... हे सारे कशामुळे होते, याचा रहस्यमय शोध जेसिकाच्या दिग्दर्शकीय कुशलतेचा उत्तम नमुना होता.
इटालियन दिग्दर्शिका ईमा दान्तेचा ‘ए स्ट्रीट इन पालेर्मो’ हा चित्रपट स्त्रीमनाची गुंतागुंत दर्शवणारा होता. कुठल्या परिस्थितीत वेळीच माघार घेणे इष्ट, हे न समजू शकलेल्यांच्या आयुष्यात काय घडते, हे यातून दाखवले होते. कॅनडाच्या लुईसे अर्चम्बल्टने एका कलावंत मुलीच्या आयुष्यातला स्वातंत्र्यासाठीचा आणि प्रेमासाठीचा संघर्ष मांडला होता. निकोल गार्चिया या फ्रेंच दिग्दर्शिकेनं ‘गोइंग अवे’ चित्रपटातून मानवी नात्यांची गुंतागुंत स्पष्ट केली होती. जॉर्जियाच्या नैना एक्विमिशिव्हलीने ‘इन ब्लूम’ चित्रपटात सोव्हिएत युनियनच्या पाडावानंतरचा जॉर्जिया, दोन मुलींच्या आयुष्यावर तेथील अस्थिरतेचा, हिंसाचाराचा काय परिणाम होतो, याचे प्रत्ययकारी चित्रण केले होते. नानुक लिओपोल्ड या जर्मन-नेदरलँडच्या दिग्दर्शिकेनं ‘इट्स आॅल सो क्वाएट’ या चित्रपटात वडील-मुलगा आणि तिसरी पिढी यांची गोष्ट सांगितली होती. सर्बियाच्या जेलेना जोसिकने ‘लेड’ या चित्रपटात 1970च्या दशकातील खेड्यामधले जीवन चित्रित केले होते.
रुमानियाच्या इव्हा पेर्व्होलव्हिचिने ‘मारुशिया’ या चित्रपटातून घराच्या शोधात भटकणार्‍या आई व मुलीची गोष्ट सांगितली होती. डेल्फिने लेरेन्ची या स्वित्झर्लंडच्या कलावतीने ‘पपी लव्ह’मधून पौगंडावस्थेतील मुलीचे पूर्ण स्त्रीमध्ये होणारे रूपांतर दाखवले होते. क्लोए रॉबिन्चडने सारा नावाच्या खेळाडूचे आयुष्य लग्नामुळे कसे बदलते, याचा वेध घेतला होता. अ‍ॅना ग्यूएव्हरा आणि लेटिएका जॉर्ज या दिग्दर्शक लयीने ‘सो मच वॉटर’मधून एका पित्याचे आपल्या
मुलींशी असलेले नाते शोधण्याचा प्रयत्न केला होता. काटेल क्युलिवेरे या फ्रेंच दिग्दर्शिकेने ‘सूझाने’ या चित्रपटात आपली उमलत्या वयातील मुलगी अचानक गरोदर असल्याचे समजल्यावर तिच्या वडिलांची होणारी अवस्था चित्रित केली होती. कॅनडाच्या इनग्रीड वेनिगरने ‘द अ‍ॅनिमल प्रोजेक्ट’मधूनही टीन एज मुलांचे भावविश्व शोधण्याचा प्रयत्न केला होता. अर्जेंटिनाच्या ल्यूसिया प्यून्झोने ‘द जर्मन डॉक्टर’ या चित्रपटात एका रहस्यमय प्रवासात भेटलेल्या व्यक्तीचे
खरे स्वरूप समजल्यावर उडणार्‍या गोंधळाची कथा मांडली होती.

अलेक्झांड्रा स्ट्रेल्यायना या रशियाच्या युवतीने ‘द सी’ चित्रपटात डॉक्युमेंटरी पद्धतीने समुद्रकिनारी वर्षानुवर्षे राहणार्‍या व्यक्ती, प्रदूषणाचे परिणाम, समुद्राशी असलेले नाते उलगडले होते. चिलीच्या मार्केला सेडने ‘द समर ऑफ फ्लाइंग फिश’मध्ये कौटुंबिक नाती मांडली होती. हॅना अस्पिया या फिलिपाइन्सच्या दिग्दर्शिकेने विमानतळावरील इमिग्रेशनच्या नव्या नियमांमुळे होणारे गोंधळ चित्रित केले होते. अ‍ॅन झोहरा बेराचेड या जर्मन दिग्दर्शिकेने ‘टू मदर्स’मधून समलिंगी व्यक्तींच्या आयुष्यातील विचित्र वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला होता.याशिवाय मौली सूर्या (इंडोनेशिया), मार्गारेट ट्रोट्टा (जर्मनी), सूसाने बेअर (डच), चार्ली डेनिस (फ्रेंच), क्लॅरी सायमन (इंग्लंड), अ‍ॅक्झेल रोपर्ट (फ्रेंच), क्लोडिया ल्यूस (मेक्सिको), ओल्गा मालिया (ग्रीस), पेनी पॅन्योटोपोल्यू (ग्रीस), एलिना पॅयस्कू (ग्रीस), मारिया डाऊझा (ग्रीस), हेलेना आॅनेन (स्वीडन), लुइगी फालोर्नी (मंगोलिया), टी. सी. मॅक्लुआन, स्टफिनी स्प्रे, अरिना देलावरी अशा अनेक देशांचे प्रतिनिधित्व करणार्‍या दिग्दर्शिकांचे चित्रपट इफ्फीत समाविष्ट केले होते.
या सार्‍या चित्रपटांचे विषय, आशय, मांडणी यांचा विचार करता वैविध्य हे वैशिष्ट्य जाणवले. युद्धापासून घरातल्या वादांपर्यंतचे विषय दिग्दर्शिकांनी हाताळले होते. स्त्री म्हणून जगाच्या कुठल्याही ठिकाणी वावरताना त्यांना येणारे अनुभव, त्यांना जाणवलेल्या समस्या, उभी ठाकलेली आव्हाने तपशिलांचे फरक वगळता समान गाभ्याची होती, असेही या चित्रपटांतून दिसले. अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया अशा जगाच्या सर्व दिशांतून त्यांनी टिपलेले स्त्रीमनाचे विश्व, तिचे दु:ख, वेदना, अपेक्षा, स्वप्ने, अधिकार यांचे विश्वदर्शन यातून घडले. स्वातंत्र्याच्या अतिरेकाने निर्माण झालेली दु:खे त्यात सर्वाधिक जाणवली. स्पेस हवी, ही नव्या पिढीची मागणी मानवी नात्यांमधला उबदारपणा पातळ करत चालली आहे, एकटेपणा आणि एकाकीपण यातला फरक समजेनासा झाला आहे, भौतिक सुखामागे धावताना हे सारे नेमके कशासाठी आहे, या प्रश्नाचे उत्तरच न सापडणे, अनुत्तरित प्रश्नांची भीती घालवण्यासाठी व्यसनांच्या आहारी जाणे, हिंसाचार, अत्याचार करणे, राजकीय-आर्थिक-सामाजिक-सांस्कृतिक दर्‍या निर्माण होणे, त्यातून समाज आणि पर्यायाने व्यक्ती-व्यक्तींमधील नातेसंबंध दुरावणे, संवाद तुटणे... हे सारे घडले-बिघडलेपण या दिग्दर्शिकांनी संवेदनशीलतेनं टिपलेलं जाणवलं आणि भावलंसुद्धा...!
jayubokil@gmail.com