आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jayashri Deshmukh Story About Heavy Schoolbags, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओझेवाल्याचा'ओ'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोन दिवसांपूर्वीच ताईच्या तिसरीत आणि केजी टूमध्ये गेलेल्या मुलांची शाळेतून पुस्तके आणली. नावीन्याची ओढ म्हणून मुलांनी स्कूल बॅग पाठीवर लावली. बॅग घेताना त्यांची कसरत होत होती. सहज म्हणून मुलांचे आणि त्यांच्या शालेय साहित्याचे वजन केले. वीस आणि पंधरा किलो वजनाच्या मुलांच्या पाठीवर आपण तीन किलोपेक्षा जास्त वजनाची पुस्तके देतोय. जिथे मोठ्या माणसांना दोन किलो वजन उचलणे जड जाते, तिथे तर या चिमुकल्यांना रोजच ही कसरत करावी लागते. आम्ही लहान असताना चौथीपर्यंत भाषेचे एक पुस्तक, गणित आणि भाषारचना यापलीकडे पुस्तकेच नव्हती. शिक्षकांनी सांगितलीच तर एक स्वाध्यायमाला. हसतखेळत शिक्षण व्हायचे. खेळायला भरपूर वाव असायचा; पण आजच्या मुलांच्या पाठीवरील ओझे पाहून त्यांचे बालपण कुठेतरी हरवत असल्याचे दिसून येत आहे.
पहिलीतील मुलांना मराठीची अक्षरओळख शिकवताना अ, आ, ई सोबत ओझेवाल्याचा ‘ओ’ शिकवला जातो; परंतु आज स्पर्धेच्या युगात टिकाव धरण्यासाठी विद्यार्थीच दप्तराच्या भारामुळे ‘ओझे’वाला बनू लागला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त वजनाचे दप्तर घेऊ नये, असे कायदा सांगतो; पण कायदा पायदळी तुडवणा-या आम्हाला मुलांना स्पर्धेच्या मागे पळवताना कायदा म्हणजे ‘किस खेत की मूली’ असेच वाटते. दप्तराच्या ओझ्याने पाठीचा कणा दुखत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. शाळेत शिक्षक मुलांना ‘ताठ मानेने’ जगावे, असे शिकवतात. पण पाठीवरच्या ओझ्यामुळे वाकलेली ही मुले ताठ मानेने कशी उभी राहतील, याचा विचारच कुणी करताना दिसत नाही.

चिमुकल्यांच्या पाठीवरील दप्तरांचे ओझे वाढवण्यात शाळा-शाळांमधील स्पर्धाही तितकीच कारणीभूत ठरत आहे. पालकांनाही या गोष्टीचे फारसे काही वाटत असल्याचे दिसत नाही. छोट्या-मोठ्या शाळाही या स्पर्धांमध्ये उतरल्या आहेत. पर्यायाने शिकून भविष्यात ‘माणूस’ बनणारा विद्यार्थी मात्र आज ‘ओझेवाला’ बनत आहे, याची खंत वाटते.
विद्यार्थ्यांच्या पाठीवर जास्त ओझे देऊ नका, असे शिक्षण विभाग म्हणतो, पण नियम कागदावर अन् ओझे खांद्यावरच आहे. गुणवत्तेची कसोटी जपताना सगळ्या गोष्टी कौतुकास्पद असल्या, तरी शिक्षण व्यवस्थेसह पालकांनाही विचार करायला लावणारी ही बाब आहे. किंबहुना ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम राबवण्याची आज नितांत आवश्यकता आहे. पुढारलेल्या देशांतील शिक्षण व्यवस्थेमधील चांगले घटक आपल्याकडे प्राथमिक शाळांनी स्वीकारल्यास काय गैर? आज शाळा प्रशासन, शिक्षक, पालकांमधील संवाद व नियोजन तसेच मुलांच्या आरोग्याकडे सजगतेने पाहिले, तर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होऊ शकते; अन्यथा ‘मी जगलो मरणाचे ओझे घेऊन, मी मेलो जगण्याचे ओझे घेऊन, मी रांगलो शरीराचे ओझे घेऊन, मी उभा राहिलो पुस्तकांचे ओझे घेऊन’ असे म्हणत त्यांचा ‘ओ’ ओझेवाल्याचा झाल्याविना राहणार नाही.
* शाळेच्या वेळा करतात परिणाम
पाठीवरील ओझ्याप्रमाणेच विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळाही मुलांच्या आरोग्यावर परिणाम करू लागल्या आहेत. काही शाळा तर अगदी सात वाजताच सुरू होतात. त्यातही या चिमुकल्यांचाच भरणा जास्त होत आहे. सातच्या शाळेसाठी अगदी सहा वाजताच मुलांना घर सोडावे लागते. कारण शाळा घरापासून पंधरा-वीस किमी अंतरावर असतात. पुरेशी झोप न झाल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.
* पाठीवरील ओझ्यामुळे
मुलांना होणारे आजार
पाठीवरील पुस्तकांच्या अतिरिक्त वजनामुळे खेळण्या-बागडण्याच्या वयामध्येच
मुलांना आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वरवर हे ओझे फार गंभीर वाटत नसले तरी त्यामुळे मणका, पोटरी, हाडांची झीज होणे, हातात मुंग्या येणे, डोके दुखणे, पाठीला पोक येणे, अशा आजारांसोबत त्यांच्या मज्जारज्जूंवर परिणाम होत आहे. त्याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
* क्रमिक पुस्तकांसह इतरही...
मुलांना शाळेमध्ये क्रमिक पुस्तकांसह इतरही पुस्तकांचे, वस्तूंचे विनाकारण ओझे वाहावे लागते. दप्तरातील शालेय वस्तू कमी केल्या, तर शाळेत लागणा-या गोष्टी न आणल्यामुळे मुलांना शिक्षा होईल या भीतीपोटी क्रमिक पुस्तकांसह इतर साहित्य द्यावेच लागते, ही जवळपास सर्वच पालकांची तक्रार आहे. काय असते दप्तरात?
इयत्ता पहिली व दुसरीसाठी मराठी, इंग्रजी व गणित, तर त्यापुढील इयत्तांसाठी मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, कला कार्यानुभव, शारीरिक शिक्षण आदी विषय आहेत. प्रत्येक विषयासाठी वर्गपाठ व गृहपाठाच्या स्वतंत्र वह्या आहेत. त्याव्यतिरिक्त इतर पुस्तके, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, खेळण्याचे साहित्य या गोष्टीही विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे वाढवत असतात. पाठीवरचे ओझे सांभाळण्यासोबतच एका हातात डबा/बाटलीची पिशवी, तर दुस-या हातात प्रकल्प सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागते.
* नियोजनाचा अभाव
शिक्षक व पालकांच्या मते, शाळेने सांगितल्यानुसार खासगी प्रकाशनाची पुस्तके व शालेय साहित्य पालकांना खरेदी करावे लागते. मुख्य म्हणजे शाळा प्रशासन व पालकांमध्ये नियोजनाचा अभाव दिसतो. या ‘कणा’मोड आधुनिक शिक्षण पद्धतीविरोधात पालकही आवाज उठवायला तयार नसतात. विद्यार्थी व पाल्याच्या आरोग्याच्या दृष्टीने
विचार करता शाळा प्रशासन व पालकांनी योग्य नियोजन केल्यास पाठीवरचे ओझे काही अंशी कमी करता येऊ शकते.
* शाळेतच दप्तर ठेवण्याची योजना
काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या वह्या शाळेतच ठेवल्या जातात. त्यामुळे मुलांवरील थोडा ताण कमी होतो. शाळेतच दप्तर ठेवण्याची योजना अमलात आणली, तर विद्यार्थ्यांना शाळेत येणे-जाणे सुलभ होईल. आधुनिक तंत्रज्ञानात सीडी, प्रोजेक्टर, ई-क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहे. हा बदल स्तुत्य आहे, पण मुलांच्या पाठीवरच्या ओझ्यामध्ये त्यामुळे काहीही फरक पडलेला नाही.

...तर त्रास वाचेल
शाळेच्या दप्तरात क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त इतरही पुस्तके , वस्तूंचे विनाकारण ओझे मुलांना वाहावे लागते.या वस्तू शाळेनेच उपलब्ध करून दिल्या तर दप्तराचे ओझे कमी होऊन मुलांचा खूपसा त्रास वाचेल...
ayashree.deshmukh@dainikbhaskargroup.com