Home | Magazine | Madhurima | jayashri-joshi-success-story

उत्पादनाचा दर्जा महत्त्वाचा

वंदना धनेश्वर | Update - Jun 03, 2011, 09:27 PM IST

काही वेगळं करायचं ही ऊर्मी प्रत्येकीत असते. सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. लग्र, संसार, मुलं यामध्ये मग उगवलेला दिवस कधी मावळला ते समजतही नाही, पण ही चौकट मोडायचं धाडस काहीजणी करतात. स्वत:चं आभाळ शोधण्यासाठीचा धडपडत, ठेचकाळत सुरू झालेला त्यांचा प्रवास जाणून घेऊयात उंबरठ्यापल्याड या सदरातून ....

 • jayashri-joshi-success-story

  महिला उद्योजिकेची यशकथा तयार करायची म्हणून जयश्री जोशी यांच्या ऑफिसात गेले. त्यांना यायला थोडा वेळ होता म्हणून वाट पाहत थांबले. त्यांच्या खुर्चीच्या मागच्या बाजूला लावलेल्या एका चित्राने माझे लक्ष वेधून घेतले. त्या चित्रात प्लॅटफॉमवर धावणा-या रेल्वेच्या पाश्र्वभूमीवर घड्याळ दाखवलेले होते आणि खाली वाक्य होते, टेक अॅण्ड मेक डिसीजन क्विकली. गती आणि वेळ याचं महत्त्व पटवून देण्यासाठी किती सूचक प्रतीके वापरली होती. त्या चित्राच्या निवडीवरूनच जयश्रीताईंच्या एकंदर प्रवासाची थोडक्यात कल्पना आली. भारतीय संस्कृतीत सणावारांची कमतरता नाही. प्रत्येक सणांना लागणारे खाद्यपदार्थ, त्यांची पूर्वतयारी हे तसे जिकिरीचे काम. त्यातही स्त्री नोकरदार असेल तर आणखीनच कठीण. पण हेच जर खाद्यपदार्थांसाठीची पूर्वतयारी आपल्याला रेडिमेड मिळाली तर! चकलीसाठीची भाजणी, उपवासाच्या थालिपीठासाठीचे भगर, साबुदाणा, राजगिरा पीठ, उकडीच्या मोदकासाठीची तांदळाची पिठी, हे जर तयार मिळाले तर घरातल्या स्त्रीचा कितीतरी त्रास आणि वेळ वाचू शकेल आणि हीच गरज ओळखून औरंगाबादच्या जयश्री उज्ज्वल जोशी यांनी आदिश्री गृह उद्योगाची सुरुवात केली.
  शून्यातून सुरुवात
  घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. माहेरी अथवा सासरी उद्योग-व्यवसायाची कोणतीच पाश्र्वभूमी नसताना व्यवसायाचा विचार करणे म्हणजे जरा धाडसाचेच काम. पण स्वत:च्या जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्तीवर विश्वास ठेवत त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेणे जेवढे महत्त्वाचे त्याहीपेक्षा महत्त्वाचे तो निर्णय निभावून नेणे. जयश्रीताईंनी हे आव्हान स्वीकारत घरातल्या छोट्याशा हॉलमध्ये केवळ एका पल्वरायझर यंत्राच्या मदतीने १९९९ मध्ये गृहउद्योगाची मुहूर्तमेढ रोवली. केवळ तीन प्रकारच्या गृह उत्पादनापासून आपल्या व्यवसायाची सुरुवात करणा:या जयश्रीताई आज जवळपास ३५ प्रकारची उत्पादने तयार करतात. घरातल्या छोट्याशा हॉलमध्ये सुरू झालेला व्यवसाय आता सातारा परिसरातल्या तीन हजार स्क्वेअर फुटांमध्ये विस्तारला आहे, तोसुद्धा सुसज्ज यंत्रसामग्री आणि अधिक सहका-यांच्या मदतीने. ग्राहकांची मागणी वेळेत पूर्ण करणे, उत्पादनासाठी स्वच्छ आणि कसदार असा कच्चा माल निवडणे, दर्जातले सातत्य, आकर्षक पॅकिंग आणि रास्त किंमत यांच्या जोरावर आदिश्रीची वार्षिक उलाढाल आज पंचावन्न लाखांच्या घरात गेली आहे.


  जोडीदाराचा सक्रिय सहभाग
  जयश्रीताईंचे पती उज्ज्वल जोशी हे कृषी अधिकारी आहेत. आपल्या पत्नीची जिद्द आणि क्षमता लक्षात घेऊन त्यांनी जयश्रीताईंना नेहमीच प्रोत्साहन दिले. मालाचे उत्पादन करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री आणि मालाचे विपणन या दोन्ही बाजू उज्ज्वल जोशी यांनी भक्कमपणे पेलल्या, तेसुद्धा स्वत:ची नोकरी सांभाळून. व्यवसायातल्या प्रत्येक चढ-उताराच्या क्षणी पतीची लाभलेली साथ, याविषयी जयश्रीताईंना वाटणारी कृतज्ञता त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. खरे तर वैवाहिक आयुष्यात जिथे एकमेकांच्या विकासाला पूरक असे वर्तन दोघांकडून घडते तिथेच असे यश मिळू शकते. जयश्रीताईंना मिळालेले अनेक पुरस्कार हे त्याच यशाचे प्रतीक आहेत.
  गुणवत्तेला प्राधान्य
  ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या उत्पादक नाना क्लृप्त्या लढवताना दिसतात. खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर ही स्पर्धा अधिकच जीवघेणी बनत चालली आहे. कोणत्याही व्यवसायात, विस्तार आणि लोकप्रियता हा जसा यशाचा मापदंड असू शकतो तसेच उत्पादनाचा दर्जा हासुद्धा महत्त्वाचा मापदंड मानला जातो. विस्तार, लोकप्रियता आणि पदार्थांची गुणवत्ता याबाबतीत आदिश्रीने पहिल्यापासून सातत्य राखले आहे. व्यवसायाचा विचार करत असताना आणि ग्राहकांची मागणी पुरवत असताना आदिश्रीने गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल उच्च दर्जाचा वापरला जातो. तसेच ग्राहकांची मागणी वेळेत पूर्ण करण्यासाठी सक्षम वितरण व्यवस्था यामुळेच आदिश्रीने मराठवाड्याच्या सीमा केव्हाच ओलंडलेल्या आहेत. या प्रवासात अनेक चढउतार आले, प्रतिस्पध्र्यांनी अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण यामुळेच आलेल्या अनुभवांनी सतत पुढे जाण्याची ताकद मिळाली, ग्राहकांच्या विश्वासाला न्याय देण्याची क्षमताही या प्रवासातल्या अनुभवावरून मिळाल्याचे जयश्रीताई म्हणाल्या.
  कर्मचारी नाही, कुटुंब सदस्य
  सातारा परिसरातल्या कारखान्यात किती कर्मचारी आहेत, असे विचारल्यानंतर माझ्याकडे कर्मचारी नाहीत, कारखान्यात काम करणारे सर्व माझे कुटुंब सदस्यच आहेत, असे जयश्रीताई म्हणाल्या. त्यांची प्रामाणिक आणि अथक मेहनत यामुळेच इथपर्यंत पोहोचू शकल्याचे त्या म्हणाल्या. आम्ही सर्व सण-समारंभ मिळून साजरे करतो. कारखान्यातील प्रत्येक जण एकमेकांच्या अडीअडचणींत धावून जातो. त्यामुळे कारखाना म्हणजे मला माझे दुसरे घरच वाटते, असेही त्या म्हणाल्या.
  भविष्यातील योजना
  स्थानिक आणि राज्य पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळविलेल्या जयश्रीताईंनी आपल्या व्यवसायाला आणखी उंचीवर नेण्याचे स्वप्र पाहिले आहे. उत्पादन वितरणात त्यांनी मराठवाड्याच्या बाहेर केव्हाच झेप घेतली आहे, त्यांना आता राज्य आणि देशाच्या सीमा ओलांडून आकाशाला गवसणी घालायची आहे. जिद्द, चिकाटी इच्छाशक्ती, प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या जोरावर त्या हे नक्कीच करून दाखवतील. त्यांच्या या चविष्ट खाद्यप्रवासाला आमच्या पोटभर शुभेच्छा.

  आदिश्रीला मिळालेले पुरस्कार
  उद्योग सेवा पुरस्कार २००४
  महिला भूषण पुरस्कार २
  ००
  सावित्री पुरस्कार २
  ००७-०८
  महाराष्ट्र उद्योगिनी पुरस्कार २
  ००
  महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स
  इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चरचा पुरस्कार २
  ००७-०८

Trending