आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उर्जा देणारा गणवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘गणवेश’ परिधान केल्याबरोबरच विशेष अशी ऊर्जा जणू शरीरात येते, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कर्तव्याची जाणीव होते. कर्तव्याबद्दलची दक्षता वाढलेली दिसते. आपापल्या कार्यक्षेत्राची आवड मनातून तयार होते. सोबतच समानतेची भावना निर्माण होते.

घरात प्रवेश करताच छोटीशी रचू पळत आली आणि तिच्या चाॅकलेटच्या चिकट हातांनीच तिने मला पकडण्याचा प्रयत्न केला. मी नकळत ओरडले, ‘अगं, सरक सरक बाजूला. किती घाणेरडे हात तुझे, माझा गणवेश खराब होईल.’ तरीही माझं वाक्य पूर्ण होण्याच्या पूर्वीच तिने मला पकडलं. माझी गणवेशाची साडी खराब झाली, माझ्या गणवेशाला तिचे चिकट हात लागले ते पाहून मी संतापले आणि दोन जोरदार फटके तिच्या पाठीत घातले. तसे रचू मोठमाेठ्याने रडू लागली आणि रडता रडता म्हणू लागली, ‘मम्मी, तू बिलकुल अच्छी नहीं है.’
 
तिला कसंबसं शांत केलं. पण तिचे शब्द, तिचं रडणं माझ्या हृदयात घर करून गेलं. मनात विचार आला, मी माझ्या लाडक्या मुलीला का रागावले? साडीच खराब झाली ना, अशा तर माझ्याकडे किती तरी साड्या पडल्या आहेत. मी एवढी का रागावले? पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला, साडी नाही, माझा गणवेश खराब झाला. साडीत माझा अजिबात जीव नव्हता, अधिक प्रिय होता तो माझा गणवेश.
 
प्रसंग कसाबसा निभावला, पण मनात विचाराचं  काहूर माजलं. पुढची सगळी कामं करत असताना वारंवार डोळ्यांसमोर येत होता गणवेश. गणवेशधारी अनेक व्यक्ती आणि त्यांचे वेगवेगळे गणवेश. गणवेशाचा प्रभाव, परिणाम आठवत होता. आपण अगदी लहान असतो, घरातील किंवा शेजारपाजारची लहान मुलं गणवेश घालून शाळेत जाताना पाहत असतो. तेव्हाच नव्हे, तेव्हापासूनच मनाच्या विशेष कोपऱ्यात बसलेला असतो गणवेश. त्याच्या आकर्षणाची ठिणगी तेव्हापासूनच मनात पडलेली असते. शाळेत जाणारी मुलं, पाेलिस, परिचारिका, डाॅक्टर, वाहनचालक, पोस्टमन, सैन्यातले जवान बघून मनात कधी भीती, तर कधी आपलेपणा, आनंद वाटत असतो.
 
आता मात्र जवळपास सर्व क्षेत्रांत गणवेशधारी व्यक्ती दिसून येतात. कुठल्याही माॅलमध्ये जा, नाही तर सोन्याचांदीच्या दुकानात, विमानतळावर जा, नाही तर शाळेत, आॅफिसात जा किंवा बँकेत, प्रत्येक ठिकाणी विशेष गणवेशधारी व्यक्ती दिसून येते.
‘गणवेश’ परिधान केल्याबरोबरच विशेष अशी ऊर्जा जणू शरीरात येते, प्रत्येक व्यक्तीला आपापल्या कर्तव्याची जाणीव होते. कर्तव्याबद्दलची दक्षता वाढलेली दिसते. आपापल्या कार्यक्षेत्राची आवड मनातून तयार होते. सोबतच समानतेची भावना निर्माण होते. या गणवेशाच्या आकर्षणामुळे आपल्यापैकी बऱ्याच जणांना विविध व्यवसाय किंवा क्षेत्रांत काम करायची इच्छा लहानपणी एकदा तरी झालेली असते. गणवेशधारी व्यक्ती फक्त पुरुषच असल्याचा काळ मागे लोटला.
‘गणवेश’ खूप महत्त्वाचा आहे. समाजात, परस्परांमध्ये एकात्मतेची, आपलेपणाची, समानतेची भावना सहजतेने वाढवण्यासाठी गणवेशाचे विशेष असे स्थान आहे. गरीब-श्रीमंत यातील दरी दूर करण्यासाठी गणवेश महत्त्वपूर्ण ठरतो. शिवाय कार्यक्षेत्राची ओळख परिधान केलेल्या आपापल्या विशेष गणवेशामुळे सहजतेने होत असते. गणवेशामुळे नको असलेली फॅशन थोडीशी दूर राहते व सहजच अनावश्यक खर्चाला लगाम बसतो.
 
मला चांगले आठवते, आमच्या शाळेत पालक सभा आयोजित केली गेली आणि त्यामध्ये काही पालकांनी विद्यार्थ्यांना वर्षभरात एक दिवस (वाढदिवस) गणवेशातून सूट मिळण्याची मागणी ठणकावून सर्वांसमोर ठेवली व त्याचा विशेष आग्रह धरला.
पालक सभेत मीसुद्धा उपस्थित होते, क्षणभर मलाही वाटले की, पालकांची मागणी रास्त आहे. मुलांच्या आयुष्यात त्यांचा वाढदिवस महत्त्वाचा असतो आणि त्या दिवशी जर मुलांना गणवेशातून सूट मिळाली तर काय बिघडेल? सगळी मुले आनंदी होतील. मुलांना थोडासा बदल मिळेल. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील मुले आपापला वाढदिवस स्मरणात ठेवतील, सोबतच एका दिवसाने एवढी कोणती शिस्त मोडली जाईल? असाही विचार मनात आला आणि नकळत पालकांच्या या विनंतीला मीही अनुमोदन दिले.
 
थोड्या वेळानंतर आमचे मुख्याध्यापक सर बोलू लागले. त्यांनी खूप छान सुरुवात करत म्हटले की, मी एक दिवस गणवेशाला सूट देण्यासाठी तयार आहे, पण तुम्ही विचार करा. तुमची मुले फॅशनेबल कपडे घालून येतील, प्रत्येकाचा नवीन ड्रेससाठी हट्ट असेल, प्रत्येक पालकाला नवीन ड्रेस प्रत्येक वाढदिवसाला घ्यावा लागेल, त्यात प्रत्येक मुलाची इतर मुलांबरोबर स्पर्धा लागेल. जे पालक सक्षम आहेत त्यांचे सोडा, पण ज्या घरात तीन-चार मुले आहेत, पालक गरीब, मजुरी करणारे आहेत, ज्यांच्या घरची आर्थिक स्थिती बेताची आहे, त्या पालकांना आणि मुलांना कसे वाटेल याचा क्षणभर विचार करा. त्या मुलांनी जर पालकांकडे हट्टच धरला तर ते पालक काय करतील? यातून जर मुलांनी गैरमार्गाने पैसे मिळवून नवीन कपडे एका दिवसासाठी घेण्याचा प्रयत्न केला तर? तर खरंच शाळेचा, शिक्षणाचा आपला मूळ उद्देश सफल होईल का? जर एखाद्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी नवे कपडे मिळाले नाहीत आणि त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला तर? जर अशा एखाद्या गरीब मुलाला वर्गातील इतर मुलांनी चिडवले तर? त्या दिवशी चांगले कपडे (नवीन) नसल्यामुळे त्याने शाळेत येण्याचेच  टाळले तर? असे अनेक प्रश्न सरांनी पालक सभेसमोर ठेवले.
 
सगळ्या पालकांच्या माना खाली गेल्या, नाही- हो म्हणण्याचा प्रश्नच उभा राहिला नाही, कुणीच काहीच बोलले नाही, सर्वांना आपल्या विचारातील चूक लक्षात आली, आणि ‘गणवेशाचे’ फक्त महत्त्वच नव्हे, तर त्याचे शालेय जीवनातील गांभीर्यदेखील लक्षात आले.
बातम्या आणखी आहेत...