आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्‍मीरची आर्त हाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि फुटीरवादी संघटनांचा उच्छाद... हे काश्मीरचं एक वास्तव आहेच, पण हे वास्तव टेलिव्हिजन मीडिया अतिरंजित स्वरूपात पेश करत असल्याने काश्मीरची प्रतिमा विनाकारण कलंकित होत असल्याची व्यथा या घटकेला सामान्य काश्मिरींसोबतच मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याही तोंडी येत आहे.
यात केंद्राच्या पातळीवरची अस्थिरतेला धग देणारी उदासीनता काश्मिरींना अधिकच व्यथित करत असल्याचा काश्मीरचा सांगावा आहे...

प्रज्ञा, शील आणि करुणा या विचारतत्त्वांनी अवघ्या जगाला शांतीचा मार्ग दाखवलेल्या बुद्धाच्या मूर्ती काश्मीर खोऱ्यात आढळून आल्यानंतर या शांतीदूताच्या माध्यमातून प्रतिमा संवर्धनाचे काम जम्मू आणि काश्मीर सरकारने प्राधान्याने हाती घेतले. तरीही दहशतवादामुळे काश्मीरच्या भाळी लागलेला कलंक दूर होण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘आम्ही काश्मिरी असलो तरी हा प्रांत भारताचाच एक अविभाज्य घटक आहे, आम्ही भारताचेच नागरिक आहोत, आमची भाषा व परपंरा सुफी पंथाशी नाते सांगणारी अाहे. आम्ही खऱ्या अर्थाने शांतताप्रिय नागरिक आहोत,’ असे काश्मिरी माणूस आर्जवाने जगाला सांगत असतानाही त्याच्या प्रत्येक कृतीकडे जबर संशयाने बघितले जात आहे...
 
मध्यप्रदेश, राजस्थान व महाराष्ट्रात उग्र स्वरूपाचे शेतकरी आंदोलन झाले. त्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला. याची बातमी एक-दोन दिवसांच्या पलीकडे चॅनेलवर दिसली नाही. आजवर नक्षलवादी हल्ल्यांत कित्येक जवान शहीद झाले, पोलिस मारले गेले, तरीदेखील नक्षलवाद्यांचे हल्ले थांबलेले नाहीत. हरियाणातल्या जाट आंदोलनात जनतेची मोठ्या प्रमाणात होरपळ झाली. देशाच्या अनेक शहरांमध्ये आजही क्षुल्लक कारणांवरून दंगल होते. गोळीबार होतो. खून पडतात. अशा असंख्य घटना आसपास घडत असताना त्याची बातमी तास-दोन तासापुरतीच राहते. पण काश्मीरमध्ये एखादी किरकोळ घटना घडली, तरीही चोवीस तास जुनेच चित्रण दाखवून बातमी रंगवून सादर केली जाते...’
 
‘काश्मीर खोऱ्यात प्रचंड असंतोष धगधगत आहे. दर दिवसाला माणसं मारली जात आहेत. तरुण तोंडाला फडकी बांधून दगडफेक करीत आहेत. ठिकठिकाणी बॉम्बस्फोट होत आहेत. गोळीबाराच्या फैरी झडत आहेत. सैन्य दल व नागरिकांमध्ये झडप होत आहे. असे जे चित्र काश्मीरच्या बाहेर उभे केले जाते आहे, तसे वास्तवात अजिबातच नाही. न पेक्षा सैन्याच्या वाहनाला अपघात झाला वा काही अघटित घटना घडलीच, तर त्यातील जखमी जवानांची सुश्रूषा करण्यासाठी काश्मिरी नागरिक पुढे येतात, वेळप्रसंगी रक्तदान करतात. या सकारात्मक बाबी देशवासीयांसमोर मांडल्याच जात नाहीत...’
 
जम्मू-काश्मीर सरकारचा पर्यटन विभाग आणि पुणेस्थित ‘सरहद’ या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने राज्यातील आघाडीच्या वर्तमानपत्रांच्या संपादकांसमवेत अलीकडेच झालेल्या काश्मीर खोऱ्याच्या दौऱ्यात अनुभवास आलेले हे व्यथित उद्गार सामान्य काश्मिरी जनतेच्या वाट्याला आलेले कमनशिबीपण पुन:पुन्हा अधोरेखित करत होते...

याच दौऱ्यात मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्याशी तब्बल चाळीस मिनिटांचा अगदी खेळीमेळीत संवाद झाला. काश्मीरमध्ये शांतता नांदत नाही, रमजानचा पवित्रा महिना सुरू असतानाही काही भागांत दगडफेकीच्या तसेच चकमकीच्या घटना घडत आहेत. याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, ‘अन्फॉर्च्युनेटली’ एवढेच सूचक उद‌्गार त्यांनी काढले. त्यात एक प्रकारची असहाय्यता डोकावत होती, हतबुद्धता जाणवत होती. महबूबा यांच्याशी सुरू असलेल्या संवादादरम्यानच दोन चॅनेलच्या महिला प्रतिनिधी कॅमेऱ्यासह खोलीत प्रवेश करत्या झाल्या. महबूबा यांनी त्या दोघींकडे एक कटाक्ष टाकला, चेहऱ्यावर त्यांच्या काहीशी नापसंती झळकली आणि नंतर ग्रुप फोटोच्या नियोजित कार्यक्रमालाही फाटा देत त्या थेट हॉलच्या बाहेर निघून गेल्या. सामान्य जनता आणि नेत्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांविषयीचा रोष किती पराकोटीचा आहे, हेच या प्रसंगातून आम्हाला जाणवले...
 

आता वास्तवाची आणखी एक बाजू
काश्मीर खोऱ्यातील अशांतता हा २० वर्षांपूर्वीही चिंतेचा अन् चर्चेचा मुद्दा होता, आजही आहे. पण त्यावर सर्वमान्य तोडगा वा सुवर्णमध्य साधायचा कसा, यावर कुणीही बोलायला तयार नाही. अगदी मुख्यमंत्री महबूबा मुफ्तीदेखील नाहीत. हा प्रश्न चर्चेच्या अर्थात परस्परसंवादाच्या माध्यमातून सुटायला हवा, यावरही जवळपास सर्वांचेच एकमत आहे. परंतु ही चर्चा कुणी व कधी सुरू करायची, पुढाकार कोणी घ्यायचा, त्यात कोणकोणत्या पक्षाची मंडळी असेल, याबाबत ठोस अशी सूचना करायला कुणीही तयार नाही. एक मात्र खरे की, स्वतंत्र काश्मीरची मागणी करणारी हुरियत कॉन्फरन्स असो की कम्युनिस्ट पक्षाचे आमदार वा सत्ताधारी पीडीपीचे नेते; काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा हा केवळ परस्पर संवादाच्या माध्यमातूनच निघू शकतो, यावर सगळ्यांचे एकमत आहे. मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी स्पष्ट शब्दांत सांगून टाकले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हिंमत आणि इच्छाशक्ती आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे त्यांनी काश्मीरचा प्रश्न सोडविण्याकामी पुढाकार घ्यावा. तेच हा प्रश्न सोडविण्याकामी योगदान देऊ शकतात. एवढंच काय, तर त्यांना हा प्रश्न सोडविल्याबद्दल नोबेल पुरस्कारही मिळू शकतो.’ त्यामुळे आता जो काही धाडसी निर्णय घ्यायचाय, तो पंतप्रधान मोदींनीच घ्यायचा आहे, असेही मुख्यमंत्री महबूबा यांना या वक्तव्यातून सुचवायचे आहे.
 
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी खरं तर पाकिस्तानशी संवाद सुरू करून वातावरण निर्मिती करून ठेवली आहे. त्यामुळेच भाजपा काश्मीरमध्ये सत्तेत सहभागी झाली, तेव्हा काश्मीरचा तिढा सोडविण्याच्या दृष्टीने केंद्राच्या पातळीवरही हालचाली गतिमान होतील, अशी अपेक्षा होती. परंतु, काश्मीर प्रश्नाकडे सोयीस्कररीत्या कानाडोळा केला जात असल्याची भावना पीडीपीच्या काही नेत्यांसह दस्तुरखुद्द मुख्यमंत्री महबूबा यांनी या भेटीत व्यक्त करावी, याचाच अर्थ तेथेही युतीतील परस्पर संवाद फारसा आशादायक दिसत नाही, असेही चित्र या दौऱ्यात समोर आले.
 
हे खरे की, काश्मीरचे एकूण वातावरण शांत आहे. येथे जे काही घडते आहे, त्याचे अवास्तव चित्रण प्रसारमाध्यमांतून दाखविले जात आहे. त्यामुळेच पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’मध्ये देशवासीयांना काश्मीरमध्ये जाण्याचे आवाहन केले तरीही बराच फरक पडू शकतो, अशी येथील जनतेची भावना आहे. अमरनाथ यात्रा सुरू झालीच आहे. त्याचा मुहूर्त साधून खरं तर मोदींनी ‘मन की बात’ केली असती तरी चालले असते. पण हे त्यांना सांगायचे कोणी, असाही प्रश्न मुख्यमंत्री महबूबा यांना पडला आहे. अटलबिहारी आणि मनमोहन सिंग यांनी काश्मीरचा तिढा सुटावा, म्हणून बरेच प्रयत्न केले आहेत. किंबहुना, ही पार्श्वभूमी लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक पाऊल टाकणे अपेक्षित असताना जवाहर बोगद्याच्या उद‌्घाटन प्रसंगी ‘टेरेरिझम’ हवा की ‘टुरिझम’, असा अविश्वास व्यक्त करणारा प्रश्न करून पंतप्रधान देशाच्या जनतेला काश्मीरबाबत काय संदेश देऊ पाहात आहेत, असा सवालही येथील काही व्यावसायिकांनी विचारला आहे. मध्यंतरी भाजपाच्या एका आमदार महोदयांनीदेखील वादग्रस्त विधान करीत अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांनी काश्मिरींकडून कोणतीही चीजवस्तू खरेदी करू नये, असे आवाहन केले होते. म्हणजे, मोदी असो की त्यांच्याच पक्षाचे आमदार-खासदार, अशा रीतीने तेढ निर्माण करणारी विधाने करत असतील तर स्वर्गवत खोऱ्यातील परिस्थिती सुधारण्याऐवजी ती दिवसागणिक चिघळत जाण्याची भीती स्थानिकांना वाटते आहे. काश्मीरमध्ये अटलजींप्रती आजही प्रचंड आदरभाव अन् विश्वास आहे. मात्र, मोदींप्रती या भावना उलट असल्याचे स्थानिकांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे...
 
वास्तवात काश्मीर खोऱ्यातील २२ जिल्ह्यांपैकी पुलवामा, कुलगाम व शोफिया या तीन जिल्ह्यांचा अपवाद सोडला, तर अन्यत्र वातावरण शांत आहे. पण चित्र असे उभे केले जात आहे, की संपूर्ण काश्मीरमध्ये अतिरेकी वा दहशतवादी राजरोस उच्छाद मांडत आहेत. मुळात कट्टर अतिरेक्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी आहे. ज्यांना तुरुंगात डांबले आहे वा जे चकमकीत मारले गेले आहेत, त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे...’ मूळचे कोल्हापूरच्या शाहूवाडीचे आणि गेल्या पाच वर्षांपासून अतिरेक्यांशी दोन हात करीत असलेले पोलिस अधीक्षक श्रीधर पाटील यांनी आत्मविश्वासाने वास्तव आमच्यापुढ्यात मांडले. पुढे आमचा अनंतनागपासून कारगिलपर्यंतचा प्रवास कोणत्याही अडथळ्याविना पार पडला. कुठेही दगडफेक झाली नाही, वा कुठेही आम्हाला कुणी हटकले नाही. अधीक्षक पाटील यांच्या म्हणण्यात खरोखरच तथ्य असल्याचा प्रत्ययही आम्हाला येत गेला...   
 
आता अमरनाथ यात्रेच्या निमित्ताने देशभरातील लाखो भाविक खोऱ्यात दाखल होतील. या निमित्ताने काश्मिरी अन् काश्मीर एका अर्थाने उर्वरित भारताच्या जवळ येतील. अटलबिहारी वाजपेयींना अपेक्षित ‘इन्सानियत, जम्हुरियत और कश्मिरीयत’ कशा रीतीने साध्य करायची, हे आता सर्वस्वी मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या हाती असणार आहे. जगाच्या पाठीवरील स्वर्ग म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते. मात्र, अन्याय्य पद्धतीने चित्र रंगवले गेल्यामुळे  उपासमारीचे संकट काश्मीरवर घोंगावत आहे. प्रसिद्ध दाल लेकमधील हजारो हाउसबोट्स ओसाड पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा वेळी प्रश्न, राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर काश्मीरच्या वाट्याला आलेली कमनशिबी दूर करण्याचा आहे...
 
लेखकाचा संपर्क - ८३९०९०५७४६
jaiprakash.p@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...