आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कळी काश्मीरची खुलली !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीर सरकारच्या पर्यटन विभागाच्या निमंत्रणावरून साधारणपणे पाच वर्षांपूर्वी तेथील माहोलचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध झाली होती. दोन दशकांहून अधिक काळ भारताचा शिरोभाग अतिरेकी कारवाया आणि रक्तरंजित उच्छादांमुळे जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे. देशालाही हीच डोकेदुखी अनेक दशकांपासून सतावत आहे. या घडामोडींचा परिपाक म्हणजे, काश्मिरी नागरिकांमध्ये वेगळेपणाची भावना अधिकाधिक दृढ होत गेली. ‘आप हिंदुस्थानी, हम काश्मिरी’ अशी वक्तव्ये त्यांच्या सहज बोलण्यातूनही व्यक्त होऊ लागली. देश-विदेशातून येणारा पर्यटक हाच आपला भाग्यविधाता आहे; तो आला तर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील; त्यायोगे खिशामध्ये पैसा खुळखुळू लागेल, याची पुरेपूर जाणीव असूनही कट्टर अतिरेक्यांच्या दबावापुढे त्यांचे काहीएक चालत नव्हते. दल लेकमधील शिकारे असो की हाउस बोट; वास्तविकत: जे काश्मीरच्या सौंदर्यात भर घालतात, त्या बाबी वापरात न आल्यामुळे धूळ खात पडल्यासारखी स्थिती होती. पर्यटकही भीतीपोटी त्याकडे पाठ फिरवत राहिल्याने काश्मिरींवर उपासमारीची वेळ आली होती. जम्मू ते श्रीनगर या तीनशे किलोमीटरच्या अंतरावर भारतीय लष्कराचा पावलागणिक खडा पहारा होता. रस्त्यावरून पर्यटक तर सोडाच, स्थानिक काश्मिरी नागरिक वा चिटपाखरूदेखील फिरताना दिसत नसे. आता, पाच वर्षांनंतर काश्मीरच्या परिस्थितीमध्ये आमूलाग्र कायापालट झाला आहे. पदोपदी नजरेस पडणारे लष्करी जवान आणि लष्करी कॉन्व्हॉयचा वावर बव्हंशी कमी झाला आहे. काश्मीरच्या परिवर्तनाला चालना देणार्‍या जम्मू ते श्रीनगर या तीनशे किलोमीटर अंतराचा राष्ट्रीय महामार्ग प्रशस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. रेल्वेचे जाळे उधमपूरपर्यंत पोहोचलेच आहे. खुद्द काश्मीरच्या काही भागात रेल्वे धावू लागल्याने दुर्गम वा अतिदुर्गम अशा डोंगरदर्‍यांमध्ये दळणवळणाची साधने आता बर्‍यापैकी उपलब्ध झाल्याची सुचिन्हे दिसत आहेत. याअगोदरच्या भेटीमध्ये गुलमर्ग, पहेलगाम, अनंतनाग वा श्रीनगर मार्गावर अनेक ठिकाणची घरे जळलेल्या अवस्थेत दिसली होती. ते चित्र यंदा पूर्णत: पालटले असून घरांची नव्याने बांधणी, रंगरंगोटी, दुरुस्ती यांसारखी कामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिलासादायक चित्र आहे. दल लेक सरोवरानेही कात टाकली आहे. पूर्वी श्रीनगरमध्ये हॉटेल, दुकानांचे फलक फक्त उर्दू भाषेत दिसायचे. पण देशाच्या कानाकोपर्‍यातून येणार्‍या पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता हाउस बोट आणि शिकारे यांची संख्या वाढली आहे. तसेच अनेक दुकानांचे बोर्ड हिंदी भाषेत लिहिलेले दिसून आले. पूर्वी काश्मीरमध्ये फक्त मांसाहारीच जेवण मिळते, असे चित्र लोकांच्या मनात असायचे. पण आता त्या राज्यात अनेक ठिकाणी शुद्ध शाकाहारी वैष्णव ढाबे सुरू झाले आहेत. शीख व्यावसायिकांनी आपली दुकानेही मोक्याच्या ठिकाणी थाटली आहेत. हे बदल म्हटले तर छोटे तरीही महत्त्वाचे आहेत. काश्मीरची हवा बदलत असल्याचेच हे सुलक्षण म्हणता येईल

अंतर्गत कारवायांना वेळीच चाप
1) काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची कार्यपद्धती येथील वातावरण बदलण्यास कारणीभूत ठरली आहे. दहशतवाद, गुन्हेगारी आणि काही राजकीय पक्ष नेत्यांच्या अंतर्गत कारवायांना वेळीच चाप लावल्याचा हा परिणाम आहे. वर्षभरामध्ये सुमारे दहा लाख पर्यटकांनी काश्मीरला भेट देणे आणि निर्भयपणे निसर्गसौंदर्याचा आनंद घेणे, ही लक्षणे त्याचे द्योतक मानायला हवीत. - समीर आरिफ, हॉटेलचे संचालक, श्रीनगर
2) गुलमर्गला यंदा पर्यटकांची अक्षरश: झुंबड उडाली आहे. ऑफ सीझनमधील अडचणींना तोंड देत, नैसर्गिक संकटावर मात करत प्रथम एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत, ही अत्यानंदाची बाब आहे. - महंमद इस्माईल बट, तनमर्ग, गरम कपडे, कोट, बूट भाडेतत्त्वावर देणारे दुकानदार
3) पर्यटकांची वर्दळ वाढल्यामुळे केशर, अक्रोड, बदाम यांची मागणी वाढली आहे. हंगामामध्ये केशराची बर्‍यापैकी विक्री होऊ लागल्याने उपासमारी टळली आहे.- बशीर अहमद लोन, श्रीनगर, केशर व शिलाजित विकणारा शेतकरी
4) पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत गेल्या वर्ष-दीड वर्षात काश्मीर की हवा का रुख बदल गया है। क्राइम कम होने की वजह से टुरिस्ट काफी संख्या में आने लगे हैं। - फारुख लोन, तनमर्ग, सुमोचालक

jaiprakash.p@dainikbhaskargroup.com