आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक विशेष : केदारनाथ एक बार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धाम परिसरात आलेल्या प्रलयाला यंदा दोन वर्षे उलटत आहेत. त्याची तीव्रता एवढी भयावह होती की, तब्बल दोन वर्षांनंतरही उत्तराखंडमध्ये फेरफटका मारला तरी अंगावर शहारे येतात. त्या प्रलयामध्ये इमारती, छोटी-मोठी घरे, रिसॉर्ट, शेकडो किलोमीटरचे रस्ते वाहून गेले. त्यानंतर जी अवस्था या धार्मिक स्थळाला आली, त्याने इकडे येणाऱ्या भाविक व पर्यटक दोहोंचेही पाय थबकले.
याचा खोलवर परिणाम स्थानिक जनजीवनासह अर्थव्यवस्थेवर झाला. मात्र, त्यानंतर एकदिलाने झालेल्या पुनर्निर्माणाच्या कार्यामुळे आता अवघा उत्तराखंड, केदारनाथसह बद्रीनाथ, गंगोत्री व यमनोत्री या चारधाम यात्रेला जगभरातून येणाऱ्या भाविकांकडे अपेक्षेने डोळे लावून बसला आहे.
एका बाजूला उंचच उंच पहाड, तर दुसरीकडे डोळे गरगरावे अशा भयावह खोल दऱ्या-खोऱ्यांतून वाट काढत जाणारा प्रदेश म्हणजे, उत्तराखंड. येथे थेट केदारनाथपासून ते खाली हरिद्वार-ऋषिकेशपर्यंत मानवी वस्तीचे पुंजके ठिकठिकाणी नजरेस पडतात. लहान-मोठे डोंगर असो की बारमाही खळखळणाऱ्या अलकनंदा, मंदाकिनी, भागीरथी या प्रमुख नद्यांसह लहानमोठ्या अनेक नद्या असोत; नदीकिनारी पाया तयार करायचा अन् त्याच्या आधारे किंबहुना त्याच्यावरच, घरं असो की बहुमजली इमारत उभारायचे कसब स्थानिकांनी अंगीकारले आहे.
समुद्रसपाटीपासूनची उंची व दाट जंगल यामुळे येथे कधी बर्फाचा वर्षाव होईल आणि कधी मुसळधार पाऊस कोसळेल, याचा अंदाज वर्तवणे जरा धाडसाचेच. अशाही परिस्थितीत उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रा सहा ते आठ महिन्यांपर्यंत चालते वातावरण मग ते प्रतिकूल असो की अनुकूल; स्थानिक लोक येथे येणाऱ्या लाखो भाविक वा पर्यटकांच्या सेवेत सदैव तत्पर असतात. १७ जून २०१३च्या प्रलयामध्येही स्थानिक जनतेने परराज्यातील अनोळखी भाविक वा पर्यटकांना आपलेपणाच्या भावनेतून मदतीचा हात दिला. घरात उपलब्ध असेल तेवढा दाणा-पाणी खाऊ घालून भाविकांच्या जिवाची काळजी घेतली.

उत्तराखंडमधील श्रीनगरच्या प्रकाश नारायण सत्यनारायण बाभूळकर शास्त्री यांनी सांगितलेला अनुभव तर माणुसकीवरचा विश्वास दृढ करणारा ठरावा. प्रलयानंतर बद्रीनाथ येथे हजारो भाविक अडकले होते. त्यांचे अन्नपाण्यावाचून प्रचंड हाल होऊ लागले. त्या वेळी शास्त्रीजींनी त्यांच्याकडे उतरलेल्या नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीचा नारायण नामक स्वयंपाकी व व्यवस्थापकासह काही यात्रेकरूंच्या मदतीने लंगर सुरू केला. एक, दोन नव्हे, तब्बल पंधरा दिवस अडकलेल्या भाविकांना मोफत जेवण उपलब्ध करून दिले. एवढेच नाही, तर जेवणासह अडकलेल्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यालाही प्राधान्य दिले. हे आवर्जून नमूद करण्याचे कारण असे की, ज्यांनी प्राणांची पर्वा न करता दारी आलेल्या पाहुण्यांना सुरक्षित ठेवले,
त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून उत्तराखंडातील भाविकांची संख्या रोडावल्याने बेरोजगारीची वा उपासमारीची पाळी आली आहे. डेहराडूनपासून ते सोनप्रयागपर्यंतच्या प्रवासात ठायीठायी अशाच स्वरूपाची भावना, एक प्रकारची वेदना, तसेच काळजीचा स्वर उमटत होता.
उत्तराखंडावर निसर्गाची अवकृपा झाली तर त्याचे परिणाम किती खोलवर होतात अन् ते कोणाकोणाला भोगावे लागतात, हेच त्यातून प्रकर्षाने जाणवत राहते.अर्थातच, प्रलयाची दोन वर्षांपूर्वीची परिस्थिती अन् सद्य:स्थिती यात बरेच अंतर पडले आहे. हरिद्वार वा ऋषिकेशपासूनचा केदारनाथ-बद्रीनाथ मंदिराचा पल्ला लांबचा असला, तरी बीआरओ अर्थात सीमा सडक संगठनने रस्त्यांची कामे समाधानकारक केली आहेत. मात्र, अलीकडे रस्ता सुरक्षेचे दायित्व सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतले आहे. या मुद्द्यावरून सध्या बरीच भवती न भवती सुरू आहे.
तथापि, दऱ्याखोऱ्यातील रस्त्यांचे रुंदीकरण बव्हंशी ठिकाणी झाले आहे. दरडी पडण्याचा धोका जेथे जेथे संभवतो, त्या जवळपास सर्वच ठिकाणी दगड व लोखंडी जाळीचा वापर करून तो कमी करण्याची दक्षता घेतली गेली आहे. दरडी पडल्याने प्रमुख रस्ता मोठ्या काळासाठी बंद राहील, अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही. ऊन, वारा, पाऊस, बर्फ यांपासून भाविकांना आसरा मिळावा, म्हणून प्रशासनाने यात्रा मार्गावरील गौरीकुंड, सोनप्रयाग, रामवाडा या प्रमुख ठिकाणांवर फायबर राहुट्या उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सुमारे पाच हजार भाविकांच्या निवाऱ्याची व्यवस्था होऊ शकते. गौरीकुंड ते केदारनाथ मंदिर हा पूर्वी १४ किलोमीटरचा पायी रस्ता होता. मात्र, प्रलयामध्ये गौरीकुंड व रामबाडा ही दोन गावं भूतलावरूनच नष्ट झाली. प्रशासनाने आता अपर लीनचौली व लोअर लीनचौली अशा दोन टप्प्यांमध्ये नवीन रस्ता तयार केला आहे. त्यामुळे सात किलोमीटरने वाढून हा रस्ता २१ किलोमीटर इतका झाला आहे. त्या उपरही यात्रा व भाविक दोन्ही सुखकर पार पडेल, यासाठी यंत्रणेसह उत्तराखंडच्या सामान्य जनतेने कंबर कसली आहे.

सारे तीरथ बार बार, केदारनाथ एक बार, असा लौकिक असलेल्या केदारनाथ यात्रेचा मुहूर्त २४ एप्रिलचा. बद्रीनाथ धामाचा शुभारंभ २६ एप्रिलचा. गंगोत्री व यमनोत्री या धामांचा यात्रा मुहूर्त याच काळातील. अगदी अलीकडेपर्यंत हवामान खराब होते. पाऊस व बर्फ सुरू होता, तो आता कुठे थांबला आहे. १६ व १७ जूनच्या प्रलयाचा जो आघात भाविकांच्या मनावर झाला होता, तोही आता हळूहळू ओसरू लागला आहे.
रुद्रप्रयागपर्यंत भाविकांची वर्दळ काही प्रमाणात सुरूही झाली आहे. शिवाय राफ्टिंग वा सन बाथच्या निमित्ताने शेकडो देशी अन् परदेशी पर्यटकांच्या गर्दीनेही ऋषिकेशसह शिवपुरीपर्यंतचा परिसर फुलू लागला आहे. तथापि, उत्तराखंडला अपेक्षा आहे, ती येत्या चारधाम यात्रेच्या निमित्ताने भाविकांनी आपली पावलं पुन्हा एकवार देवभूमीकडे वळवण्याची.
आश्वासक सूर

केदार-बद्रीनाथ यात्रेचा मार्ग निर्धोक करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रतिकूल वातावरणातही प्रशासनाने रस्ते व इतर सुविधा निर्माण करण्यात यश मिळवल्याने मनात कोणतीही भीती न बाळगता यात्रेला यावे. बी. डी. सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी,
केदारनाथ-बद्रीनाथ मंदिर समिती, उत्तराखंड

नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीने आजवर हजारो भाविकांना केदार-बद्रीनाथाची यात्रा घडवली. दोन वर्षांपूर्वीही आमचे यात्रेकरू अडकले, पण सुयोग्य नियोजन व स्थानिक पातळीवरील जनतेच्या सहकार्यामुळे सर्वच भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले होते. पंधरा दिवस लंगर सुरू केल्याने आमच्यासह अन्य यात्रेकरूंना दिलासाच मिळाला.
ब्रिजमोहन चौधरी, व्यवस्थापकीय संचालक, चौधरी यात्रा कंपनी, नाशिक
उत्तराखंडातील चारधाम यात्रेला २० एप्रिल २०१५पासून सुरुवात होत आहे. गेल्या प्रलयाच्या भीतिदायक वातावरणातून लोक हळूहळू बाहेर पडू लागले आहेत. योग्य नियोजनामुळे चारधाम यात्रा दहा दिवसांत पूर्ण करता येऊ शकते. यात्रेसाठी सुमारे दीड हजार मिनी बसेस तसेच हजारो कार यात्रेकरूंच्या सेवेसाठी सज्ज आहेत. भाविकांची साहाय्यता व सेवेसाठी उत्तराखंड सज्ज आहे.नरेश गोयल त्रिमूर्ती टॅव्हल्स, हरिद्वार