आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayshree Bokil Artical On Marathi Language Classic Status

मराठीच्या अभिजात दर्जासाठी आता हवी राजकीय इच्छाशक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा केंद्र सरकारकडून अधिकृत रीतीने मिळावा, यासाठी गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र शासन तसेच मराठीचे अभ्यासक, संशोधकांच्या पातळीवर जोमाने प्रयत्न सुरू आहेत. नुकताच याबाबतचा अंतिम अहवाल राज्य शासनाला सुपूर्द करण्यात आला आहे. अभ्यासक, संशोधनाच्या पातळीवरचे काम संपले असून, आता पुढील वाटचाल फक्त राज्य शासनाच्या राजकीय इच्छाशक्तीवर अवलंबून आहे. भाषा समितीचे अध्यक्षपद स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांनीच या कामी पुढाकार घेऊन अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली. समितीने आपले काम व्यवस्थितरीत्या पार पाडले आहे. आता मराठीसाठीची लढाई हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. केंद्र सरकारकडे ते यासंदर्भातील पाठपुरावा कसा करतात, यावर मराठीच्या अभिजात दर्जाचे भवितव्य अवलंबून आहे.
अ भिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने आजवर तामिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांना दिला आहे. या दर्जामुळे त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्राकडून भरीव अनुदान मिळते. भाषेची प्रतिष्ठा वाढते. भाषेच्या श्रेष्ठतेवर राजमान्यतेची मोहोर उमटते. भाषेच्या विकास कार्यास अधिक चालना मिळते. त्यामुळे मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, अशी तमाम मराठी भाषकांची इच्छा आहे. त्यासाठी सखोल संशोधन व अभ्यास करून मराठी ही हजारो वर्षांचा इतिहास असलेली प्राचीन भाषा आहे, हे सिद्ध करणारे पुरावे एकत्रित करण्यात आले आणि विहित नमुन्यात तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
०समितीच्या सात बैठका, तीन वेळा मुदतवाढ, मसुदा उपसमितीचीही स्थापना : या कामासाठी महाराष्ट्र शासनाने 10 जानेवारी 2012 रोजी अभिजात मराठी भाषा समितीची स्थापना केली. या समितीला प्रथम तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. कामाची व्यापकता पाहून या समितीला 18 जून 2012, 14 ऑगस्ट 2012 व 12 मार्च 2013 अशी क्रमश: मुदतवाढ देण्यात आली होती. अंतिम अहवाल 31 मे 2013 पर्यंत सादर करण्यास सांगितले होते. या समितीच्या एकूण सात बैठका घेण्यात आल्या. 14 मार्च 2012 रोजी मसुदा उपसमितीची स्थापना करून अहवाल लेखनाचे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आले. मसुदा उपसमितीच्या 19 बैठका झाल्या.
०समितीत कोण कोण आहेत : अध्यक्ष - प्रा. रंगनाथ पठारे, सदस्य - प्रा. हरी नरके, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीकांत बहुलकर, प्रा. मधुकर वाकोडे, सतीश काळसेकर, डॉ. कल्याण काळे, प्रा. आनंद उबाळे, डॉ. मैत्रेयी देशपांडे, परशुराम पाटील
शासकीय सदस्य - संचालक - भाषा संचालनालय, संचालक - राज्य मराठी विकास मंडळ, संचालक - दर्शनिका विभाग, सचिव - महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, सचिव - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, सदस्य-सचिव - अवर सचिव, मराठी भाषा विभाग, मंत्रालय. याशिवाय मसुदा उपसमितीत अध्यक्ष प्रा, रंगनाथ पठारे, समन्वयक प्रा. हरी नरके तर सदस्य म्हणून डॉ. श्रीकांत बहुलकर आणि डॉ. मैत्रेयी देशपांडे यांचा समावेश आहे.
०मसुदा उपसमितीचे कार्य : मसुदा उपसमितीने मान्यवर भाषातज्ज्ञ, साहित्य संस्था, भाषाविषयक काम करणारे कार्यकर्ते व नागरिक यांच्याशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.
* आवश्यक ते सर्व संदर्भग्रंथ मिळवून त्यांचे सखोल वाचन करण्यात आले.
*प्रस्तावासाठी उपयुक्त ठरणारी विस्तृत टिप्पणी तयार करण्यात आली.
*राज्यातील विविध संस्थांमध्ये जाऊन या विषयाची माहिती नागरिकांना देण्यात आली
*वृत्तपत्रे, नियतकालिकांतून लेखन करण्यात आले
*सर्व विद्यापीठे, साहित्य संस्था, साहित्य महामंडळ, साहित्यिक यांना पत्रे लिहून सूचना मागवण्यात आल्या.
*प्रसारमाध्यमांतून पुरावे व साहित्य समितीकडे पाठवण्याचे आवाहन करण्यात आले.
*त्यानंतर आराखडा मुख्य समितीला सादर करण्यात आला.
*अंतरिम अहवाल जानेवारी 2013 तर अंतिम अहवाल मे 2013 मध्ये सादर, इंग्रजी अनुवाद सुरू
*मसुद्यावर साधकबाधक चर्चा करून सदस्यांनी आपले अभिप्राय दिले
*त्यानुसार मसुद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या.
*समितीचा अंतरिम अहवाल जानेवारी 2013 तर अंतिम अहवाल मे 2013 मध्ये शासनाला सादर करण्यात आला.
*केंद्र सरकारकडे अहवाल इंग्रजीतून देणे आवश्यक असल्याने इंग्रजी अनुवादाचे काम अविनाश पंडित यांच्याकडे सोपवण्यात आले.
०अभिजाततेसाठी काय आहेत केंद्र सरकारचे निकष : भाषेची प्राचीनता, मौलिकता व सलगता, भाषिक व वाङ्मयीन परंपरेचे स्वयंभूषण, प्राचीन भाषा व तिचे आधुनिक रूप यांच्यात पडू शकणा-या खंडासह जोडलेले-असलेले नाते
० मराठीची प्राचीनता व अभिजातता : मराठीचा प्रवास प्राचीन महारट्ठी, मरहट्टी भाषा, महाराष्ट्री प्राकृत भाषा, अपभ्रंश मराठी भाषा आणि आजची मराठी भाषा असा आहे.
महाराष्ट्री प्राकृत, महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची तीन रूपे आहेत. मराठीतला आज उपलब्ध असलेला सातवाहनकाळातील गाथासप्तशती हा ग्रंथ सुमारेदोन हजार वर्षे जुना आहे.
लीळाचरित्र आणि ज्ञानेश्वरी हे मराठी भाषा अतिशय प्रगल्भ झाल्यानंतरचे श्रेष्ठ ग्रंथ आहेत. (भाषा एकाएकी प्रगल्भ होत नाही. ती तशी होण्यासाठी अनेक शतके जावी लागतात. हे जागतिक तोडीचे ग्रंथ आठशे वर्षांपूर्वी ज्या भाषेत लिहिले गेले, ती भाषा त्यापूर्वी किमान पंधराशे वर्षे समृद्ध स्वरूपात अस्तित्वात होती)
३नाणेघाटातील ब्राह्मी लिपीतील 2220 वर्षांपूर्वीचा शिलालेख व त्यातील महारठ्ठीनो हा उल्लेख
*दीपवंश, विनयपीटक, महावंश या ग्रंथातील महाराष्ट्राचे उल्लेख
*हालसातवाहनाच्या गाथासप्तशतीतील श्रेष्ठ दर्जाचे मराठी काव्य
*रामायण, महाभारत, बृहत्कथेत येणारे असंख्य मराठी शब्द
*पतंजली, कौटिल्य, टॉलेमी, वराहमिहीर, ह्युएन त्संग अल्बेरुनी यांचे लेखन
अकरा कोटी लोकांची मराठी, 250 कोटींची लेखन बाजारपेठ
मराठी भाषा ही जगातील पहिल्या पंधरा क्रमांकांत येणारी कोट्यवधींची भाषा आहे. मराठी बोलणारे लोक आज जगातील 72 देशांत पसरलेले आहेत. देशातली सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत. मराठीत दरवर्षी सुमारे दोन हजारांहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. पाचश्ेहून अधिक दिवाळी अंक निघतात. सुमारे दोनशे छोटी-मोठी साहित्य संमेलने होतात. साहित्य संमेलनाला लाखो मराठीप्रेमींची उपस्थिती असते. तिथे कोट्यवधींच्या मराठी पुस्तकांची विक्री होते. मराठी लेखनाची बाजारपेठ सुमारे 250 कोटी रुपयांची आहे. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी 25 टक्के ग्रंथालये फक्त महाराष्ट्रात आहेत.