आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वारी'च्या व्यवस्थापिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात अनेक उत्सव, समारंभ नियमित साजरे होतात. त्यात हजारो नागरिकांचा सहभाग असतो. उत्सवी वातावरण असते. एकाच वेळी हजारो लोक त्याचा आनंद घेतात. मात्र लक्षावधी लोक स्वयंशिस्तीने, स्वयंप्रेरणेने एका ध्यासाने एका मार्गावर एका दिशेने आणि परमानंदाने तब्बल अडीचशे किलोमीटर अंतर पायी जातात, हे घडते फक्त महाराष्ट्रातल्या आषाढी वारीमध्ये.
अशा एकमेवाद्वितीय वारीमध्ये स्त्रियांचा सहभागही लक्षणीय असतो. केवळ सहभाग नव्हे तर या स्त्रिया संपूर्ण वारी छानपैकी ‘मॅनेज’ करतात. वारीचे दैनंदिन व्यवस्थापन प्रामुख्याने बायकाच हाताळतात. ज्या कौशल्याने त्या आपापल्या घरातल्या गोष्टी ‘मॅनेज’ करतात, त्याच सहजतेने, कौशल्याने त्या लक्षावधी वारकऱ्यांची ही अजोड पदयात्राही हाताळतात. सातशे वर्षांहूनही अधिक काळ या स्त्रियांचे हे कार्य निर्विघ्नपणे सुरू आहे. कुणाची ना तक्रार, ना आक्षेप.
वारीचे वेध स्त्रियांना लागतात ते वटपौर्णिमेपासूनच. वारीच्या आजवरच्या इतिहासात डोकावले तर सुरुवातीपासूनच त्यात स्त्रियांचा सहभाग होता, हे समजते. भारतीय संतपरंपरेतही स्त्री-संतांची मोठी संख्या आहे. मुक्ताई, जनाबाई, सखू, सोयरा, कान्होपात्रा, अशी अनेक नावे सांगता येतील. संसाराचा गाडा तीन आठवड्यांसाठी बाजूला ठेवत सुरुवातीपासूनच स्त्रिया वारीत सहभागी होत आल्या आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे वारीची सर्वसमावेशकता आणि समानता.
या व्यवच्छेदक लक्षणांमुळे वारीतील स्त्रियांचा सहभाग मध्ययुगीन काळापासून चढता आलेख दर्शवणारा आहे. आधुनिक काळातही वारीतली स्त्रियांची संख्या वाढते आहे. अनेकदा काही विदेशी अभ्यासक, संशोधक स्त्रियाही वारीत हौसेने सहभागी होताना दिसतात. बरीच वर्षे वारीतील स्त्रिया बहुधा ग्रामीण भागातील असत. हे चित्रही आता बदलते आहे. सुशिक्षित, अधिकारपदावरच्या, आधुनिक विचारांच्या स्त्रियाही वारीत दिसतात. या स्त्रियांचा वयोगटही पन्नाशीच्या आसपासचा आहे.

गैरसोयींची वाच्यता नाही
वारीत चालताना एरवी जाणवणाऱ्या गैरसोयी स्त्रिया सहज मान्य करतात. त्या गैरसोयींची वाच्यता न करता, त्यातून मार्ग काढतात. वारीत चालणाऱ्या स्त्रियांना जाणवणारी पहिली मोठी समस्या ही स्वच्छतागृहाची असते. तीन आठवड्यांहून अधिक काळ दिवस-रात्र ही मुख्य गरज त्या कशी भागवतात, हा प्रश्न अनेकांना पडतो. पण वारीत चालणाऱ्या स्त्रिया या गैरसोयीचा बागुलबुवा करत नाहीत. पहाटेपूर्वीच्या काळोखातच नित्यकर्मे उरकून, शुचिर्भूत होऊन त्या न्याहरीच्या तयारीला लागलेल्या असतात, हे दृश्य अनेकांच्या परिचयाचे आहे. थोडक्यात वारीतल्या स्त्रिया ही मूलभूत गरज ‘मॅनेज’ करतात.

पूर्वीच्या काळी वारीतल्या स्त्रिया साऱ्यांसाठी जेवण बनवणे, पाणी भरणे, जमेल तिथे कपडे धुणे, सोबतचा शिधा पुरवणे, दुखलेखुपले पाहणे, आजाऱ्यांची काळजी घेणे, अशी कामे करत. आता बदलत्या काळाबरोबर वारीत सामानाचे ट्रक वा टेंपो असतात. त्यात महिनाभराचे आवश्यक सामान साठवलेले असते. शिवाय रस्त्यातल्या प्रत्येक ठिकाणी भाविक आणि अन्य यंत्रणा वारकऱ्यांची काळजी घेतात. त्यांना सुविधा पुरवतात. कुणी आजारी पडले तर तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध असते. पण तरीही वारीतल्या स्त्रिया आजही हौसेने ही सारी कामे वाटून घेऊन करतात.

व्यवस्थापन तत्त्वांचे पालन
सोबत आणलेला शिधा शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीने टिकवणे, पुरवणे, प्रत्येकाच्या जेवणाची, न्याहरीची, मधल्या खाण्याची काळजी घेणे, वारीतला आपला क्रम सांभाळणे, इतरांसह जुळवून घेणे, कुणी मागे पडत असेल त्याला सांभाळून घेणे, घरगुती औषधे वापरणे, परिस्थितीचा चटकन अंदाज घेऊन निर्णय बदलणे वा करणे, फक्त स्वत:पुरता विचार न करता समूहाचा विचार व कृती करणे, प्रसंगानुसार एखादीचे नेतृत्व मान्य करणे, मोठ्या कामांची छोट्या विभागात वाटणी करणे आणि कामे विभागून घेणे, दिवसभराचे उद्दिष्ट ठरवून घेतल्यावर ते वेळेत पूर्ण करण्यासाठी उत्साहाने प्रयत्नशील असणे, अशी मॅनेजमेंटची किती तरी तत्त्वे वारीतल्या स्त्रिया कळत-नकळत अनुसरताना दिसतात.
राज्यातल्या कानाकोपऱ्यांतून वारीत सहभागी होणाऱ्या स्त्रियांना वारी नेमके काय देते, याची विचारणा केल्यावर मिळालेली उत्तरे विविध प्रकारची होती.

समता आणि सर्वसमावेशकता
वारीत चालणाऱ्या स्त्रिया प्रत्यक्ष चालताना कधीच रिकामटेकडेपणाच्या गप्पा करताना दिसत नाहीत. मुखी फक्त विठ्ठलाचे नाव, एखादा अभंग, ओवी हेच असते. तो वारीतल्या वातावरणाचा परिणाम असतो. कुणीच कुणाच्या कागाळ्या, तक्रारी, भांडणे, मतभेद यांची चर्चा करत नाहीत. वारीतल्या भक्तिमय वातावरणात असे विचार मनातही येत नाहीत, असे या बायका सांगतात. वारीत कुणी मोठा, छोटा, श्रीमंत गरीब नसतो. इथे प्रत्येक जण फक्त वारकरी असतो. ‘एकमेकां लागतील पायी रे’ हा एकच भाव असल्याने वारी हे सर्वसमावेशकता आणि समता यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे.

अदेखणेपण असू नये
कुठल्याही कामाला प्रामाणिकपणा, जबाबदारी, खरेपणा आणि मन:पूर्वकता यांचा स्पर्श झाला की ते काम अंतर्बाह्य देखणे बनून जाते, याचा अनुभव वारीमधील स्त्रियांच्या झपाट्यातून येतो. या स्त्रिया कुठून कुठून येतात, कोणत्या परिस्थितीतून येतात, कुठली ओढ त्यांना खेचून आणते आणि वारीत दाखल झाल्यानंतर त्या कोणकोणत्या भूमिका पार पाडतात, याचे निरीक्षण केल्यावर त्यांची प्रत्येक कृती सुंदर दिसू लागते. प्रत्येक कामात त्या अक्षरश: जीव ओततात, तेव्हा ‘अदेखणेपण असू नये’ या समर्थवचनाचे त्या जणू अनुसरण करत असतात.
पुढील स्लाइडमध्ये, काय देते वारी
बातम्या आणखी आहेत...