आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांवर \'घरात\'च आत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घर ही सर्वांत सुरक्षित आणि हक्काची जागा समजली जाते. खुल्या जगात आपण काय आणि आपली मुले काय, अनेक बाबतीत असुरक्षित असतात. पण ‘घर’ सुरक्षित असते. जिव्हाळ्याच्या, मायेच्या, प्रेमाच्या धाग्याने बांधलेले असते, असे आपण समजतो. पण ‘युनिसेफ इंडिया’च्या ताज्या अहवालानुसार, मुलांवर ‘घरा’त होणारे अत्याचार वाढत असून त्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. सुमारे ३२ टक्के मुलांना वेगवेगळ्या कारणांनी ‘घरा’ची भीती वाटते. हे प्रमाण अस्वस्थ करणारेच नाही का? कळत-नकळत आपल्याकडून आपल्या पिल्लांवर आपण अन्याय तर करत नाही ना, हे तपासून पाहण्याची गरज त्यातून निर्माण झाली आहे.

इयत्ता पाचवीतली सविता (नाव बदलले आहे) म्हणते, ‘मला घरी जायची रोज भीती वाटते, कारण वडील मला मारतात. आई सारखी डोळे वटारते. काका सतत मारण्याची धमकी देतात.’
इयत्ता नववीमधला सचिन सांगतो, ‘घरी मला आवडत नाही. आई सतत टीव्हीसमोर बसलेली असते. मी घरी गेलो तर माझ्याशी ती काही बोलत नाही. तोंडावर बोट ठेवून गप्प बसायला सांगते. मी एकटाच असतो मग खोलीत. बाबा खूप उशिरा येतात.’

ही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. पण ती मुलांवरील अत्याचाराचे ‘घरा’तले प्रमाणही चिंताजनक असल्याचे सिद्ध करतात. युनिसेफ इंडियामार्फत दर तीन वर्षांनी भारतातील मुलांच्या संदर्भातील विस्तृत अभ्यास, अहवाल सादर केले जातात. ताज्या अहवालानुसार, ‘घरा’त कळत-नकळत होणारे अत्याचार वाढल्याचे दिसत आहे. देशातील १३ ते १७ या वयोगटांतील हजारो मुलांशी संवाद साधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

मुलांच्या वाढीसाठी निकोप, सुरक्षित वातावरण, शिक्षणाच्या सुविधा, कौशल्यांचे प्रशिक्षण देणाऱ्या विविध यंत्रणा कार्यरत असूनही, देशातील मुलांवरील अत्याचारांचे प्रमाण भयावह आहे. त्यातही मुलांवर ‘घरा’त होणारे अत्याचार ही चिंताजनक बाब आहे. एरवी ‘घर’ ही सर्वांसाठी सुरक्षित जागा समजली जाते, पण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या ‘घरा’तच मुलांवर अत्याचार होतात, हे वास्तव धक्कादायक आणि विचारप्रवृत्त करायला लावणारे आहे.

भारतासारख्या कुटुंबप्रधान देशात ‘घरा’त मुलांना हिंसाचाराचा सामना करावा लागतो आणि तो दुर्लक्षित राहतो. पण मुलांच्या भावविश्वावर या हिंसेचा विपरीत परिणाम खोलवर होत असल्याचे मुलांशी झालेल्या संवादातून पुढे आले आहे. आईवडिलांची फक्त भीती वाटते, अशी प्रतिक्रिया शेकडो मुलांनी दिली आहे. याशिवाय कुटुंबात होणारा लैंगिक छळही मुले सोसतात, असे आढळून आले आहे. लैंगिक छळ करणाऱ्यांत वडील, भाऊ, काका, मामा, आजोबा अशा नातेवाइकांचे उल्लेख मुलांनी वारंवार केले, असेही दिसून आले.

अशी केली चाचणी
युनिसेफने सर्वेक्षणासाठी ‘प्ले इट सेफ’ या उपक्रमाअंतर्गत मुलांशी संवाद साधला.
- या मुलांपैकी ४१ टक्के मुले शाळेत नियमित जाणारी होती.
- ३८.९५ टक्के मुले विविध कारणांनी शाळेत जात नव्हती.
- आश्रमशाळेतील काही मुलांचाही सहभाग होता.
- बालगृहांमधील मुलांचेही प्रतिनिधित्व होते.
- राज्यातील आठ जिल्ह्यांतील पाच हजार मुलांचा समावेश.

द सायलेन्स ऑफ व्हायलन्स
घरातल्या घरात मुले शारीरिक, लैंगिक, मानसिक, आर्थिक आणि दुर्लक्षित करणे, या प्रमुख अत्याचारांचा सामना करत असतात. काही मुलांनी तर जवळचे नातेवाईक सतत भीतिदायक गोष्टी सांगतात, मारल्याची अॅक्शन करून भीती दाखवतात, केस ओढतात, चिमटे काढतात, गुद्दे घालतात, अंगावर धावून येतात आणि मी घाबरलो की हसत सुटतात, चेष्टा करतात, अशा तक्रारी केल्या आहेत. मुलांना सुरक्षित आणि उबदार वाटेल, असे घरकुल निर्माण करण्याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे.

असाही हिंसाचार आपण करतो का?
आपल्या मुलाची शारीरिक आणि मानसिक कुवत जाणून न घेता अपेक्षांची ओझी लादत राहणे. (हे प्रमाण तब्बल ५९ टक्के आढळले.)
मुलींकडे मुलांच्या तुलनेत दुर्लक्ष करत राहणे. (हे प्रमाण ५२ टक्के आहे.)
एखाद्या परीक्षेत, स्पर्धेत यश मिळाले नाही की लगेच कायमसाठी निरुपयोगी किंवा बिनकामाचा ठरवून टाकणे. (याचे प्रमाण ६४ टक्के)
सतत दुसऱ्या मुलांशी तुलना करत राहणे. (हे प्रमाण ५२ टक्के) 
याशिवाय मुलांशी चुकीचे वर्तन, लज्जास्पद वागणूक, भय दाखवणे, कोंडून ठेवणे किंवा एकटे टाकणे, मुलांची फजिती वेशीवर टांगणे असे प्रकार करूनही मुलांवर अन्याय केला जात असल्याचे लक्षात आले आहे.

आकडे बोलतात
आईकडून शारीरिक मार खाणारी २५ टक्के मुले, वडिलांकडून मारहाण होणारी २१ टक्के मुले, घरातील इतरांकडून थोबाडीत मारण्याचा प्रकार सहन केलेली २५ टक्के मुले, कान पिरगाळणे, लाथा घालणे, वस्तूने मारणे असे प्रकार सहन करणारे ६ टक्के, तर भाजण्यात (चटके देणे) आलेली २ टक्के मुले, सर्वेक्षणात आढळली आहेत. 

रोखणार  कसे?
आपला मुलांविषयीचा पारंपरिक दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून मुलांचा आदर करणे आवश्यक आहे. मुलांना आदर, माया, प्रेम, स्नेह, जिव्हाळा यांच्या जाणिवा स्वत:च्या वागण्यातून विकसित करण्यासाठी मदत करणे, हे पालकांचे आद्य कर्तव्य आहे असे, हे अत्याचार रोखण्यासाठीच्या उपायांबद्दल अहवालात नमूद केले आहे.

‘घरा’तच विविध प्रकारच्या हिंसाचाराला, छळाला, अनैसर्गिक वागणुकीला बळी पडणारी मुलांची कोवळी मने या अत्याचारांनी कोडगी बनण्याचा धोका असतो. घरातल्या जवळच्या नात्यांवरचा विश्वास ढासळण्याचा धोका वाढतो. मुलांच्या मनात सतत संशय, भीती, एकटेपणा, अनिश्चितता वाढते आणि मुलांच्या निकोप वाढीला पायबंद बसतो. मुले चुकीच्या मार्गाकडे वळण्याचा धोकाही संभवतो.
- संतोष शिंदे, चिल्ड्रन प्रोटेक्शन विभागाचे राज्य समन्वयक, युनिसेफ 

- जयश्री बोकील, पुणे
jayashree.bokil@dbcorp.in 
बातम्या आणखी आहेत...