आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौसष्‍ट कलांचा स्वामी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंगमंचावर महाभारतातला एक प्रसंग साकारतोय... बोलतोय श्रीकृष्ण, ऐकणारी (लौकिकार्थानं सुभद्रा); पण प्रत्यक्षात श्रीकृष्णाचं सांगणं ऐकतोय सुभद्रेच्या पोटातला गर्भावस्थेतला अभिमन्यू. चक्रव्यूह नावाच्या युद्धरचनेचा भेद करून आत प्रवेश कसा करायचा, याचा मंत्र श्रीकृष्ण सांगतोय आणि गर्भावस्थेतल्या अभिमन्यूनं तो मंत्र ग्रहण केलाय; पण चक्रव्यूहात शिरल्यानंतर बाहेर कसं पडायचं, हा प्रश्न अनुत्तरितच राहिलेला.. खरं तर महाभारतातला हा प्रसंग आपल्या सर्वांच्या परिचयाचा. लहानपणी आपल्या क्रमिक पुस्तकांतूनही तो भेटलेला असतो. कौरव-पांडवांच्या युद्धात गुरू द्रोणाचार्यांनी मांडलेली चक्रव्यूहाची युद्धरचना भेदण्याचं सामर्थ्य फक्त श्रीकृष्ण, अर्जुन, कर्ण अशा मोजक्या वीरांकडे असतं, याची कौरवपक्षाला जाणीव असते. श्रीकृष्णानं युद्धापूर्वीच शस्त्रत्याग करून हातात अर्जुनाचं सारथ्य घेतलेलं असतं. अर्जुन दुस-या बाजूला युद्धात मग्न राहील, याची काळजी आधीच घेण्यात आल्यानं चक्रव्यूह भेदायला पांडवांच्या बाजूचं कुणीच समर्थ नसल्यानं कौरवसेना निर्धास्त.. अशा परिस्थितीत कोवळ्या वयाचा अभिमन्यू आपल्या मामाकडून चक्रव्यूह भेदण्याचा मंत्र अवगत करून पांडवसेनेचं नेतृत्व करतो, चक्रव्यूह भेदतो; पण त्यातून बाहेर पडण्याचा मंत्र अवगत नसल्यानं अखेर चक्रव्यूहातच मृत्युमुखी पडतो... पण हे झालं कथानक. या कथानकाच्या माध्यमातून माणसाच्या मनातला विचार-विकार-वासना-आशा-आकांक्षा-सत्तापिपासा-द्वेष-मत्सर-असूया-वर्चस्ववादी वृत्ती-त्यातून उद्भवणारे संघर्ष, झगडे यांचा चक्रव्यूहही तसाच अभेद्य आणि आपण सारेच अभिमन्यू... आत जाता येतंय, पण बाहेर पडायचा मार्ग माहीत नाहीये..अशा असहाय अवस्थेत निरुपयानं जमेल तोवर लढत राहणारे जीव... महाभारतातील या चिरपरिचित कथाबीजाचा विश्वात्मक पट रतन थिय्याम नावाच्या रंगकर्मीनं दोन तासांच्या सादरीकरणात प्रेक्षकांसमोर अशा काही सामर्थ्यानं मांडला होता की, त्याच्या नुसत्या आठवणीनंही थरारून जावं..
काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी पुण्यात रतन थिय्याम यांच्यावरील महोत्सवाचं आयोजन केलं होतं. तेव्हा पाहिलेला चक्रव्यूहचा प्रयोग आज पुन्हा आठवला, तो या प्रयोगाचे अध्वर्यू रतन थिय्याम यांना भेटल्यावर..
रतन थिय्याम नावाचा लेखक, दिग्दर्शक, संगीतकार, चित्रकार, नट वयाच्या 22व्या वर्षापासून कादंबरी लेखनाकडे वळला, मग नाटकानं त्याला वेड लावलं आणि ते वेड या माणसानं उराशी जपून पुढची चाळीस वर्षांची देदीप्यमान वाटचाल केली. आज वयाच्या पासष्टीत, जगप्रसिद्ध रंगकर्मी असं बिरुद मिळूनही मी फक्त माझ्या समाधानासाठी नाटक करतो, माझ्या मातृभाषेत करतो, माझ्या मातीतलं नाटक करतो... असं अभिमानानं म्हणणारा रतन थिय्याम नावाचा अजबगजब माणूस हे वेगळंच रसायन असल्याचं लक्षात येतं. भरत नाट्यशास्त्रातील तत्त्वांनी प्रभावित असलेले थिय्याम यांचे प्रयोग ग्रीक आणि जपानी पारंपरिक रंगभूमींचाही असर दाखवतात. त्याचबरोबर मणिपूरमधील पारंपरिक लोककलागुरूंकडून त्यांनी अस्सल मणिपुरी मातीतले स्वत्व बाणवले आहेच. चक्रव्यूह आणि उरुभङ्गम् तसेच ऋतुसंहारम् आणि उत्तरप्रियदर्शी अशा त्यांच्या नाटकांमधून हे जाणवते. थिय्याम यांची नाटके जगभरात पाहिली जात असली; ती प्रचंड लोकप्रिय ठरत असली; तरी मला अद्याप थिएटर गवसले नाही, त्यामुळे मी नाटक करतो, असेच ते सांगतात. कोरस रिपर्टरी थिएटर, इंफाळमध्ये स्थापन करून मणिपुरी भाषेत, मणिपुरी कलाकारांसोबत, मणिपुरी मातीतले नाटक करत असूनही जगभरातील रंगकर्मींना थिय्याम काय करत आहेत, याची उत्सुकता असते. माणसाच्या मनातील अंधा-या बाजूंविरुद्ध शांतीसाठी चाललेला झगडा दर्शवणारे सम्राट अशोकावरील उत्तर प्रियदर्शी असो, वा धर्मवीर भारतींचे अंधायुग... मी स्वत:च्या आनंदासाठी रंगभूमीवर काम करतो, ही भूमिका थिय्याम सोडत नाहीत. मात्र, प्रेक्षक हा घटक रंगभूमीसाठी अनिवार्य असल्याची मला जाणीव आहे, असेही ते आवर्जून सांगतात.
नव्या पिढीविषयी आस्था
नव्या पिढीविषयी त्यांना आस्था आहे. विश्वास आहे. नवे कलाकारच नाट्यचळवळीची धुरा आपल्या युवा खांद्यांवर घेऊन पुढे नेतील. त्यांना प्रोत्साहन, पाठबळ आणि संधी मात्र मिळायला हवी, असे सांगून थिय्याम म्हणाले, महाराष्‍ट्र आणि बंगाल येथे इंग्रजी अंमल अधिक प्रभावी ठरल्याने ब्रिटिशांविरुद्ध उठावासाठीही हीच राज्ये अग्रेसर होती. रंगभूमीचा वापरही त्यासाठी केला गेला. त्यामुळे या दोन्ही राज्यांत आजही रंगभूमीचा सर्वाधिक प्रेक्षक तयार झालेला दिसतो. त्याचा परिणाम म्हणून या दोन्ही ठिकाणी प्रायोगिक रंगभूमीही अधिक सशक्त आहे; पण तरीही या दोन्ही ठिकाणी ब्रॉडवे का नाही, ही मला सतावणारी चिंता आहे.
रंगभूमी ही प्रयोगशाळा
रंगभूमी मला प्रयोगशाळाच वाटते. विविध कल्पना, संकल्पना, विश्लेषणे, मते, विरोधाभास यांच्या प्रयोगांची रंगभूमी ही लॅबोरेटरीच आहे. ते प्रबोधनाचे माध्यम समजण्यापेक्षा कलावंत आणि रसिकांमधील संवादाचे व्यासपीठ आहे, असे मी मानतो. अशा प्रकारची सांस्कृतिक केंद्रे शासकीय मदतीविना उभी राहावीत, असे मला वाटते. कारण सांस्कृतिक उन्नयनाकडे सरकारचे प्रथमपासून संपूर्ण दुर्लक्षच आहे. दरवर्षीच्या अंदाजपत्रकात सांस्कृतिक बजेट जवळपास शून्य टक्के असते, हे वास्तव आहे. कलेप्रती संवेदनशीलता बाळगण्याची राजकीय इच्छाशक्तीच दिसत नाही. राजकारणी मंडळींना निवडणुका, सत्ता, व्होटबँक यातच फक्त रस आहे. त्यामुळे जगभरात श्रीमंत असलेल्या आपल्या सांस्कृतिक क्षेत्राची घरी मात्र उपेक्षाच होत राहते. लोकसभेत कला विषयाला कुठलेही स्थान नाही, कुणीही कुठल्याही कलाविषयक मुद्द्यावर आवाज उठवत नाही. ही उदासीनता देशात सार्वत्रिक दिसते, याचे वाईट वाटते.
आता मॅकबेथ करणार
सध्या नवे काय सुरू आहे आणि एनएसडीचे अध्यक्ष म्हणून काय योजना आहेत, यावर मॅकबेथ करण्याच्या प्रयत्नांत आहे. नाटकाशिवाय माझ्यापाशी काहीच नाही; तो ध्यास, श्वास, प्राण, जीवन, सारे काही आहे, असे उत्तर थिय्याम देतात. एनएसडीच्या रिपर्टरीज राज्याराज्यांत असाव्यात, अशा प्रयत्नांत आहे. शिवाय देशातील मृतप्राय कला प्रकारांचे दस्तऐवजीकरणही एनएसडीतर्फे केले जाणार आहे. कलाध्यापनात नवी माध्यमे, नवे तंत्र, प्रशिक्षण पद्धती स्वीकारल्या जातील, याची काळजी घेतली जात आहे. रंगभूमीचे भवितव्य आपण आपल्या युवा पिढीतच शोधायचे असल्याने नवी पिढी जी भाषा, जे तंत्र आपलेसे करते, तेच माध्यम एनएसडीनेही काही प्रमाणात स्वीकारावे, असा प्रयत्न आहे.