आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुआयामी!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठी रंगभूमी, चित्रपट, छोटा पडदा सगळीकडे आपल्या कर्तृत्वाची ठळक मुद्रा उमटवणारे विनय आपटे बहुतांश कलाकारांप्रमाणे कॉलेजच्या दिवसांत केलेल्या एकांकिकांतून घडले. राज्य नाट्य स्पर्धांतून गाजले. 1970च्या दशकाच्या सुरुवातीला आपल्याकडे छोटा पडदा आला आणि या नव्या माध्यमाचा नेमका वापर कसा करता येतो, हे विनय आपटेंनी निर्माता म्हणून दाखवून दिलं. उत्तमोत्तम कल्पना राबवल्या. चांगलं साहित्य लघुनाटिकांमधून प्रेक्षकांसमोर आणलं. उत्तमोत्तम कलाकार छोट्या पडद्यावर आणून त्यांना बोलतं केलं...
अभिनेते म्हणून रंगभूमी, छोटा आणि मोठा पडदा गाजवत असतानाच निर्माता या भूमिकेत आपटे शिरले आणि ताज्या दमाच्या कलावंतांची ऊर्जावान फळी त्यांनी रसिकांसमोर आणली. त्यात सचिन खेडेकर, सुनील बर्वे, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी, महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सतीश पुळेकर अशी कित्येक नावं होती. या कलाकारांना संवादफेक, भाषेचं प्रेम, अभिनयाचे धडे आपटेंनीच दिले. आज ही सर्व नावं आपापल्या क्षेत्रात लक्षणीय काम करत आहेत. गुणी कलावंतांचं हे देणं कलाक्षेत्राला देऊन आपटे स्वत:वरच्या कलाऋणातूनही उतराई झाले.
ज्या क्षेत्रात आपटे वावरले, तिथे तिथे त्यांनी एक नवा पायंडा पाडला आणि तो प्रस्थापितही केला. दूरदर्शनवर त्यांनी ‘गजरा’ सुरू केला. ‘आभाळमाया’ या मालिकेच्या रूपानं पहिली मराठी महामालिका सुरू केली. ‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या मालिकांनी मिळवलेली लोकप्रियता सर्वज्ञात आहे. जाहिरात क्षेत्रातही ते यशस्वी दिग्दर्शक म्हणून वावरले. मित्राची गोष्ट, सवाल अंधाराचा, कुसुम मनोहर लेले, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय, कबड्डी कबड्डी, अफलातून, मी नथुराम गोडसे बोलतोय... आपटेंच्या नाटकांची नामावली वाचली, तरी त्या नाटकांनी निर्माण केलेला ट्रेंड लक्षात येतो. भूमिका आणि गणरंग या नाट्यसंस्थांच्या माध्यमातून ते व्यावसायिक, हौशी, प्रायोगिक रंगभूमीवर दीर्घकाळ वावरले. हिंदी चित्रपटांतही मोजक्या कामांतून त्यांनी ठसा उमटवला. आक्षेपार्ह भाषा बोलण्यात भूषण मानण्याच्या आजच्या काळात आपटे यांचं भाषाप्रेम कुणालाही सहज जाणवायचं. स्वच्छ, शुद्ध, योग्य उच्चार आणि विरामचिन्हांचं बोलतानाही असणारं लख्ख भान, हे त्यांचं बलस्थान होतं. त्यांच्या सहवासात वावरलेले सचिन खेडेकर, सुनील बर्वे हे अभिनेते भाषेच्या संदर्भात आपटे यांचं नाव आवर्जून घेतात. भाषेच्या जोडीला लाभलेला भारदस्त आणि हृदयाला भिडणारा आवाज, आपटेंचा प्लस पॉइंट होता. त्यांच्या कोणत्याही भूमिकेत त्यांचा आवाज आणि त्यांची भेदक नजर हा ‘यूएसपी’ ठरायचा...
अभिनेता म्हणून कार्यरत असतानाच आपटे निर्माता, दिग्दर्शकाच्या भूमिकेतही शिरले होते आणि तिथेही त्यांनी लक्षणीय योगदान दिले. नाट्यसंस्था, जाहिरात संस्था, छोट्या पडद्यावरचे निर्माते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कार्यवाह... एकाच माणसाची ही सारी रूपे होती आणि त्यातील प्रत्येक पैलू लखलखता होता. कलाक्षेत्रात संकीर्ण कला म्हणून नृत्यकलेचा उल्लेख केला जातो; कारण नृत्यामध्ये साहित्य, गायन, वादन, चित्रकला, शिल्पकला, अभिनय, प्रकाशयोजना, ध्वनी, शब्द... हे सारे कलाप्रकार या ना त्या रूपानं अंतर्भूत असतात. विनय आपटे नावाच्या माणसाचं वर्णन ‘बहुआयामी’ कलाधर्मी अशाच शब्दांत करावंसं वाटतं.
या माणसाकडे काय नव्हतं...भारदस्त व्यक्तिमत्त्व, उत्तम आवाज, सहज अभिनय, भाषाप्रेम, दिग्दर्शकीय कौशल्य, निर्माता म्हणून व्यावसायिक गुण, रंगभूमीच्या प्रत्येक घटकाचं ज्ञान, चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील तांत्रिक बाबींचं नेमकं भान, गुणी माणसं हेरणारं रत्नपारखीपण, सहवासात येणा-या प्रत्येकाला आपलेपणा वाटावा अशी मैत्री, जो कलाप्रकार आपण हाताळतोय त्याविषयीची नेमकी आणि निश्चित भूमिका, आपल्याला जे मांडायचं आहे ते स्पष्ट शब्दांत मांडण्याचं वाक्चातुर्य, वादळं अंगावर घेण्याची हिंमत (अन्यथा नथुराम..त्यांनी केलंच नसतं.), युनिटमधल्या प्रत्येकाची काळजी वाहण्याचा स्वभाव आणि जिवाला जीव देणारं माणूसपण... हे सारं या एकाच माणसात एकवटलं होतं, संकीर्ण स्वरूपात...
नवी पिढी घडवली
आपटेंसोबत अनेक वर्षे वावरलेल्या त्यांच्या स्नेहीमंडळींनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी ऐकताना आपटेंचं कलावंतपण, व्यावसायिकता आणि मनस्वीपणाही अधोरेखित झाला. रिमा लागू, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, दिलीप प्रभावळकर, सचिन खेडेकर, सुनील बर्वे,
प्र. ल. मयेकर... अशा अनेकांनी आपटेंच्या आठवणींचा कोलाज माध्यमाच्या प्रतिनिधींपाशी शेअर केला. त्यातून डोकावणा-या आपटेंच्या रूपांमध्येही त्यांचं हे मोठंपण प्रतीत होत राहिलं.
jayubokil@gmail.com