आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayshree Deshmukh Article About Women's Self Help Groups, Divya Marathi

रोजगार निर्मितीचा ट्रॅक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बचत गट ही महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची उत्तम संधी आहे. आत्मसन्मानासह रोजगारनिर्मितीचा मार्गही याच ‘ट्रॅक’वर मिळतो. शिवाय या माध्यमातून एकीचे बळ व संघभावना जोपासण्यासाठीही मदत होते. केवळ दोन पैसे गाठीला बांधून ठेवणे हा बचत गटाचा उद्देश नाही, तर त्यातून स्त्रियांच्या हाताला काम मिळून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळावी हे त्यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

बचत गटांच्या स्थापनेमुळे बचतीच्या सवयीबरोबरच स्वयंरोजगार करण्याची प्रेरणाही महिलांना मिळाली आहे. ‘चूल आणि मूल’ या मर्यादित विश्वात न राहता बचत गटाच्या माध्यमातून आज त्या उंबरठ्यापलीकडील जगाच्या संपर्कात आल्या आहेत. खेड्यापाड्यात, शहरात आज महिलांनी अनेक उद्योग व व्यवसाय याद्वारे उभारले आहेत. त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून शासनही प्रयत्न करीत आहे. महिलांमध्ये असणारे संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, आर्थिक जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याची तयारी, परिस्थिती हाताळण्याची कला, त्यामध्ये यशस्वी होण्याची क्षमता, नेतृत्वगुण, कामातील व व्यवहारातील चोखपणा या अंगभूत उद्योजकीय कौशल्याचा वापर करून आज त्या भरारी घेऊ लागल्या आहेत. बहुतेक वेळा ‘आम्ही हे करू शकू काय,’ या विचारानेच त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहतो आणि इथेच त्यांच्या स्वप्नांना तडा जातो. पण अमरावती शहरातील झाशीची राणी महिला बचत गट आणि त्या अनुषंगाने कार्यरत जवळपास शंभर बचत गट याला अपवाद ठरले आहेत.

2001 मध्ये अलका सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाशीची राणी महिला बचत गटाची स्थापना झाली. पूर्वी केवळ कर्ज घेणे आणि देण्यापर्यंतच हा गट मर्यादित होता. पण 2004मध्ये नावाप्रमाणेच या बचत गटाने भरारी घ्यायला सुरुवात केली. अलका सरदार या अंबानगरीच्या नगरसेविका आहेत. घरून पाठबळ नाही, परंतु स्वत:साठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काहीतरी करायचे या धडपडीतून त्यांनी हातपाय हलवायला सुरुवात केली. रमाई महिला बचत गट, सोनिया महिला बचत गट, विश्वकर्मा महिला बचत गट, स्वाभिमान महिला बचत गट यासारख्या शंभर बचत गटांना त्या मार्गदर्शन करीत आहेत. या सर्व बचत गटांतील कोणत्याही महिलेचे हात आज रिकामे नाहीत. लेदरबॅग्ज, लोणची, पापड, कुरडया, शेवया, मेस, किराणा दुकान, ब्यूटी पार्लर, ड्रेस डिझायनिंग, जेवणाच्या ऑर्डर, शालेय पोषण आहार या सर्वांमध्ये या महिला कुठेही कमी नाहीत. याशिवाय समाजकल्याण व आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील भोजनाचे कंत्राटही या महिला घेत असतात. 2004 ते 2012 या काळात महानगरपालिकेच्या शाळा, महिला कल्याण अंगणवाडी येथे सकस आहारदेखील या महिला बचत गटांनी पुरवला आहे. शिवाय समाजातील गरजू महिलांना या माध्यमातून ड्रेस डिझायनिंग, ब्यूटी पार्लरचे प्रशिक्षण देऊन त्यांनाही समाजाच्या प्रवाहात आणून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात सदैव समोर आहे.

बचत गटाच्या माध्यमातूनच कारखाना उभा करण्याचा मानसही या महिलांनी त्यांच्याशी बोलताना व्यक्त केला. काही कायदेशीर अडचणी निपटल्यावर हा कारखानाही शहरात डौलाने उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, तसेच या ‘महिला काय करू शकतात,’ असे कुत्सितपणे बोलणार्‍यांना ‘हम भी किसी से कम नहीं,’ हेच हा कारखाना लोकांना पटवून देईल, असा आत्मविश्वासही या महिलांच्या डोळ्यात दिसत होता.

बचत गटाच्या माध्यमातून आज प्रत्येक महिला आपल्या अंगभूत कौशल्याने घरी बसून महिन्याला दहा ते पंधरा हजार रुपये कमवत आहे. त्यांच्या तयार मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देऊन मार्केटिंगची जबाबदरी अलका सांभाळतात.

आत्मनिर्भरतेसाठी बचत गटांची मदत होत असून या सर्व बचत गटांच्या व्यवसायांनी चांगलेच बाळसे धरले आहे. केवळ उत्पादन करून न थांबता विक्रीसाठी योग्य ते प्रयत्न करण्यातही त्या मागे पडत नाहीत. आपल्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी या महिला शहरात विविध प्रदर्शने भरवून तेथे स्टॉल्स लावत असतात. नागरिकांकडून त्याला उत्तम प्रतिसादही मिळत असतो. उन्हाळ्याच्या दिवसात हातावरच्या बारीक, पांढर्‍या शेवयांना तर शहरात विशेष मागणी आहे. कुरडया, पापड, वड्या यांच्याही बाबतीत लोकांकडून कौतुकाचीच थाप मिळत आहे. केवळ वीस रुपये प्रति महिन्यापासून सुरू झालेली ही ‘झाशीची राणी’ आज प्रत्येक घरात पोहोचली आहे. बचत गटातील महिलांची एकूण संख्या जवळपास चारशे इतकी आहे. बचत गटाची सुरुवात महिला संघटित व्हाव्यात, त्यांच्यातील वाद मिटावेत, त्यांनी एकत्रित येऊन विकासाची कामे हाती घ्यावीत या हेतूने झाली होती. आज त्याचा वटवृक्ष झाला आहे.

बचत गटांच्या माध्यमातून होणारी इतर कामे
हे सर्व बचत गट सामाजिक उपक्रमही राबवतात. संंजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मार्गदर्शन करणे, समाजकल्याण व आदिवासी विभागाच्या योजना गरजूंपर्यंत पोहोचवणे, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मदत करणे, एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्पांतर्गत मार्गदर्शन करणे, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे, मिटकॉनच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करून त्यांना स्वयंपूर्ण बनवणे यासाठी सतत प्रयत्नरत आहेत.

बचत गटातील पैशांचे नियोजन
बचत केलेला पैसा हा महिलांच्या व्यवसायासाठीच उपयोगात यावा असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे कोणीही घरगुती कारणास्तव कर्ज उचलले नाही. त्यांचे पैसे एका योग्य गुंतवणूक योजनेत ठेवण्यात आले आहेत. त्याशिवाय महिलांचे स्वतंत्र गट करून त्यांची बँकेत खाती काढण्यात आली आहेत.

अलका सरदार म्हणतात...
नशिबालाही संधीची गरज असते. अशी ही संधी माणसाच्या आयुष्यात कधीमधी डोकावत असते. महिला बचत गटाच्या स्वरूपात मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेऊन महिलांनी आपला विकास साधला आहे. अजून पल्ला गाठायचा बाकी आहे.