आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्धविहार नव्हे ज्ञानदान केंद्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाजच्या धकाधकीच्या काळात माणूस माणसापासून दुरावत असताना सामाजिक बांधिलकी, समाजासाठी काही करण्याची धडपड या सर्व गोष्टी फार क्वचितच पाहायला मिळतात. निष्काम सेवा अभावानेच पाहायला मिळते. जो तो स्वत:मध्ये रममाण असताना समाजाचे ऋण फेडण्याची तळमळ, चूल अन् मूल असं जग असणाऱ्या ग्रामीण भागातील महिलांमध्ये दिसून येते. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील महिलांनी एकत्र येऊन बौद्धविहाराला ज्ञानदान केंद्र बनवले. सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे धडे येथे विद्यार्थी आपसूकच गिरवत आहेत.

कोरडवाहू शेतपट्टा असल्याने केवळ सहा ते सात महिनेच हाताला काम, अशी अवस्था असताना कसाबसा संसाराचा गाडा रेटण्यात येथील प्रत्येक जण गुंतलेला आहे. गरिबी पाचवीला पुजलेली असतानाही आपल्या मुलामुलींसह अन्य ग्रामस्थांच्या मुलामुलींनीही दर्जेदार शिक्षण घ्यावे, अशी जिद्द उराशी बाळगणाऱ्या येथील महिला खऱ्या अर्थाने साक्षर झाल्या आहेत. दिवसाला १०० ते १५० रुपये कमाई असतानाही आपल्या मुलांनी उच्चशिक्षित व्हावे, ही मनिषा बाळगली; पण महागडे शिक्षण घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे येथील कष्टकरी महिलांनी बौद्ध विहारात एक पेटी बसवून त्यामध्ये २०१२पासून आठवड्याचे वीस रुपये अशी रक्कम जमा केली. प्रथम त्यातून जीर्णशीर्ण झालेल्या विहाराचा जीर्णोद्धार केला, तिथे विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय उभारलं. गावातील युवकांनी पुढकार घेऊन विनामोबदला विहारातच गावातील मुलांची शिकवणी घेणे सुरू केले. युवतींनीही यासाठी पुढाकार घेत ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे सुरू ठेवले आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयीन युवकांनाही त्याविषयीचे धडे दिले जातात, तेही अगदी नि:शुल्क! इंग्रजी, गणित, विज्ञान या विषयात मुले केवळ आर्थिक परिस्थिती नसल्याने मागे राहू नयेत, याची जाणीव होऊन या मुलांना सायंकाळी मोफत शिक्षण दिले जाते. सर्व समाजाची जवळपास ७० छोटी मुले इथे शिकत आहेत. गावातच लहानाच्या मोठ्या झालेल्या पूजा चंडकापुरे व भावना गुळदेे या युवतींनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीवर मात करून संघर्ष करत उच्चशिक्षित होऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला. पालकांची होणारी फरपट या दोघींनी जवळून अनुभवली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या मुलामुलींची शिक्षणासाठी धडपड पाहता या दोघींनी विनामूल्य अध्यापनाचे कार्य सुरू केले. या बौद्ध विहारातून होत असलेले बुद्धी विकासाचे व ज्ञानदानाचे कार्य असेच पुढेही सुरू राहील, गोरगरिबांची मुले शिक्षणात कुठेही कमी पडू नयेत व त्यांना पुढे नेण्याचे ध्येय आमच्या मंडळाचे राहील, असे मत संतोष मुरकुटे व्यक्त करतात. तर ज्ञानेश्वर मेश्राम म्हणतात, बौद्धविहार हे संस्कार केंद्र झाले पाहिजे. शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्याचे काम गावातील शिक्षित युवक-युवतींनी करण्याची गरज आहे. गावातील मुले कुठेही कमी पडू नयेत, हा प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणतात.
बातम्या आणखी आहेत...