आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सेक्स फ्रेंडली' इंडिया ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचाराने बुरसटलेल्या ज्या भारतीय समाजावर आज टीकाटिप्पणी होत आहे त्याच भारतीय समाजात एकेकाळी सेक्सबाबत खुलेपण होते. विचारांत मोकळेपणा होता. हा देश वात्स्यायनाचा देश आहे. श्लील-अश्लीलतेची यथायोग्य जाण असणा-यांचा हा देश आहे. येथे खजुराहो आहे. केवळ खजुराहोच नव्हे, ओडिशामधील मंदिरांवरही प्रणयी शिल्पे कोरलेली आहेत. या मंदिरांना भेट देण्यासाठी आपण जेव्हा सहपरिवार जातो, तेव्हा मनात कोणतीही शंका, अवघडलेपण न आणता, आपण ती शिल्पे पाहतो, अभ्यासतो. प्रसंगी त्यांचा आस्वादही घेतो. अशा या एकेकाळच्या विचारांनी प्रगल्भ असलेल्या देशाला ‘सेक्शुअल फोबिया’ झालेला आढळून येतो, तो मात्र स्युडो-ख्रिश्चियन प्रभावामुळे; असे माझे ठाम मत आहे. स्पष्टच सांगायचे तर मोगल राजवटीत लैंगिक अभिव्यक्तीवर बंधने आली; परंतु इंग्रजांनी जेव्हा आपल्यावर राज्य करायला सुरुवात केली, तेव्हापासूनच भारतात हा ‘सेक्शुअल फोबिया’ वाढीस लागला. म्हणूनच मला असेही सांगावेसे वाटते की, हा फोबिया मूळचा भारतीय नसून इंग्लंडमधून ‘इम्पोर्ट’ झालेला आहे. कधी काळी आपल्या देशाच्या संस्कृतीवर व्हिक्टोरियन संस्कृतीने आक्रमण केल्यानेच आज आपली संस्कृती व्हिक्टोरियन रंग दाखवत आहे. अर्थात, आता आपण हळूहळू त्या व्हिक्टोरियन प्रभावापासून मुक्त होत असल्याचे मला जाणवत आहे.
आज आपल्याला काय चित्र दिसते? कारणे काहीही असतील; पण फ्रिज विकणारा असो वा मिनरल वॉटर विकणारा, सगळेच जण आपले प्रॉडक्ट विकण्यासाठी स्त्री शरीराचे प्रदर्शन मांडत असतात. आम्ही तर बोलूनचालून नाच-गाण्यांच्या म्हणजेच मनोरंजनाच्या पेशाशी जोडले गेलेलो आहोत. एका विशिष्ट मर्यादेत राहून आम्हीसुद्धा तेच करत असतो; परंतु चित्रपटाच्या 100 वर्षांच्या इतिहासात मला असा एक तरी चित्रपट दाखवून द्या, ज्यामुळे भारतीय संस्कृतीला हादरे बसले आहेत आणि ती नष्ट होण्याच्या मार्गावर पोहोचली आहे. असे कधीही घडत नाही. घडलेले नाही. तरीही हिंदी चित्रपटांमुळे, त्यात दाखवल्या जात असलेल्या सेक्समुळे संस्कृती रसातळाला जात असल्याची ओरड करणारा एक वर्ग तेव्हाही होता, आजही आहे. माझे म्हणणे आहे की, एखाद्या चित्रपटामुळे वा त्यातील शृंगारिक दृश्यांमुळे रसातळाला जाण्याइतकी भारतीय संस्कृती तकलादू नाही. मुळात, हिंदी चित्रपट भारतीय संस्कृतीवर घाला घालत आहे, असे गृहीत धरून 40 वर्षांपासून जे प्रश्न उपस्थित करण्यात आले, तेच आजही विचारले जात आहेत. रेहाना सुलताना आणि बी. आर. इशारा यांना त्या वेळेस जे प्रश्न विचारले तेच प्रश्न आजही विचारले जात आहेत. प्रश्न विचारणारे कुणीही असतील; पण ते अजूनही ‘कोलोनियल माइंडसेट’मध्ये वावरत आहेत. त्यांचे अस्सल भारतीय विचारपरंपरेशी देणे-घेणे नाही. तरीही चित्रपटामुळे भारतीय संस्कृती बुडत असल्याची डायलॉगबाजी केली जात आहे. हे सरळसरळ ढोंग आहे. व्हिक्टोरियन प्रभावातून आलेले हे ढोंग आपण का वठवतो आहोत, याचा गांभीर्याने विचार होण्याची आणि त्या अनुषंगाने प्रश्नांची मांडणी करण्याची खरी गरज आहे.
गेल्या 20 वर्षांत जागतिकीकरणाच्या प्रभावातून घडून आलेल्या माध्यमक्रांतीमुळे माहिती आणि मनोरंजनाशी संबंधित त्याला जे हवे ते सगळे एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे; परंतु आधीच्या पिढीला चुटकीसरशी माहिती मिळवण्याची सुविधा नव्हती, तशीच पोर्नोग्राफिक चित्रपट पाहण्याची आजच्यासारखी सोयही नव्हती. गुप्तज्ञान, कामसूत्र असे चित्रपट लैंगिक शिक्षणाच्या नावावर आपल्याकडे तयार केले जात होते.
समाजात सेक्सबद्दल दबलेपण असल्याने असे चित्रपट तयार करणारे निर्माते खो-याने पैसे कमावत होते. पोर्नोग्राफिक चित्रपट त्या पिढीला तेव्हाही पाहावेसे वाटत होते; परंतु आजच्या इतके तंत्रज्ञान प्रगत झाले नसल्याने ते सहजशक्य नव्हते. अशा वेळी एखाद्या मित्राकडे एकत्र जमून असे चित्रपट पाहिले जात, तेही चोरून. परंतु आज तसे घडत नाही. आज कधीही, कोणीही असे चित्रपट जरा एकांत मिळाला की पाहू शकतो. यात फक्त मुले वा पुरुष आहेत असे नाही, तर तरुणवयीन मुली-स्त्रियाही आहेत. याचा अर्थ, या स्त्रिया-मुली वाया गेलेल्या आहेत का? अजिबात नाही. पुरुषांप्रमाणे महिलांच्याही शरीर-मनाच्या काही गरजा असतात. ज्या समाज म्हणून आपण कधीही मान्य केलेल्या नसतात. समजा तुमच्या-माझ्याप्रमाणे एखाद्या तरुणीला पोर्नोग्राफिक फिल्म बघण्याची इच्छा झाली तर? साधनांची उपलब्धता असताना तिने ही इच्छा का दाबून ठेवावी? नऊ वर्षांपूर्वी जॉन अब्राहम-बिपाशा बासू अभिनीत ‘जिस्म’ प्रदर्शित झाला, तेव्हा मी दिल्लीतील एका चित्रपटगृहात गेलो होतो. तेथे उपस्थित प्रेक्षकांमध्ये 70 टक्के महिला होत्या. मी त्यातल्या अनेकींशी संवाद साधला, तेव्हा माझ्या लक्षात आले, त्या सर्व चांगल्या घरातील महिला होत्या. त्या वेळी इतर कुणाला हा संस्कृतीचा ºहास वगैरे वाटला असता, मला मात्र ती घटना समाजाच्या, विशेषत: स्त्री वर्गाच्या बदलत्या मानसिकतेचे निदर्शक वाटली.
‘जिस्म- 2’मध्ये आम्ही पोर्न स्टार सनी लियोनला घेतल्याने आमच्या क्षेत्रातील मंडळींना फारसे काही वाटले नाही. काही तथाकथित संस्कृतिरक्षकांना मात्र संस्कृतीवर हल्ला झाल्यासारखे वाटले; परंतु सनी लियोन ‘बिग बॉस’च्या माध्यमातून भारतातील घराघरात गेली होती. असंख्य घरांत आई-वडिलांनी आपल्या मुला-मुलींसोबत सनी लियोनला शोमध्ये पाहिले होते. म्हणजेच एक प्रकारे जाहीर नसेल; पण त्यांनी तिचा स्वीकार केला होता. परंतु हे सगळे 20 वर्षांपूर्वी शक्य झाले नसते. कदाचित मीसुद्धा तिला चित्रपटांत घेतले नसते. खरे तर ज्या समाजाची क्रयशक्ती (बाइंग पॉवर) वाढते, तेथे शरीर-मनाला उत्तेजना देण्याची मागणीही वाढते. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेजची मागणी वाढते, तेव्हा ग्राहकाला ‘प्लेझर’ देण्याची चढाओढ सुरू होते.
आज कोणतीही इंग्रजी वा प्रादेशिक भाषेतील न्यूजसाइट उघडून बघा. तेथे रोजच्या बातम्यांबरोबरच बिकिनीतील नव्हे, नग्न मुलींची चित्रे आणि सेक्ससंदर्भातील ‘आक्षेपार्ह’ गोष्टी प्रसिद्ध केलेल्या असतात; परंतु कुणीही त्या विरोधात तक्रार करताना दिसत नाही वा संस्कृती बुडाल्याची बोंब ठोकत नाही. उलट सेक्सचा स्वीकार करून खुलेपणाने तो विकत घेण्याकडे समाजाचा सध्या कल दिसत आहे. हे कशाचे द्योतक आहे? माध्यमांचे आधुनिकीकरण आणि त्या अनुषंगाने समाजात सामूहिक पातळीवरआलेला खुलेपणा याचा हा एकत्रित परिणाम आहे, हेच खरे.
माझ्या चित्रपटात सनी एका पोर्न स्टारचीच भूमिका करत आहे; परंतु चित्रपटात केवळ सेक्स नव्हे, तर एक वेगळे आणि सशक्त कथानकही आहे. असो, आपला विषय चित्रपटाचा नसून समाजाच्या आचार-विचारांत झालेल्या बदलांचा आहे. एका पातळीवर आपला समाज विचाराने सहिष्णू आणि प्रगल्भ होत आहे. आपण जसे आहोत तसे स्वीकारले जाऊ, याची त्याला खात्री वाटू लागली आहे. समाजात दुतोंडीपणाला, मुखवटा खालून फिरणा-यांना फारशी जागा राहिलेली नाही. प्रसारमाध्यमांच्या आक्रमकतेमुळेच कधी नव्हे ते जगण्यात पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा गरजेचा ठरू लागला आहे. अर्थात, आपण आताही अत्यंत मॉडरेट लेव्हलवर चालत आहोत; परंतु वेगवेगळ्या माध्यमांतून दिसत असलेल्या सेक्सच्या स्वीकाराचे एक वर्तुळही आता पूर्ण होत असल्याचे मला जाणवत आहे. भारतीय समाज आपला मार्ग शोधत आहे. हा मार्ग सेक्सला नकार देण्याचा नव्हे, खुलेपणाने स्वीकार करण्याचा आहे. जी माझ्या दृष्टीने
अत्यंत स्वागतार्ह बाब आहे.
बँडिट क्वीन व संस्कृतिरक्षक - सबंध समाज हा मूर्ख आहे, श्लील-अश्लीलतेचे त्याला जराही भान नाही, हे गृहीत धरून उठसूट विरोधी मत नोंदवण्याचीही आपल्याकडे जणू प्रथाच पडली आहे. शेखर कपूरने जेव्हा ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट बनवला तेव्हा त्यात तर फ्रंटल न्यूडिटी होती. त्या वेळीसुद्धा किती गदारोळ माजला होता; परंतु तथाकथित संस्कृतिरक्षकांच्या म्हणण्यानुसार सेक्सचे प्रदर्शन मांडणारे जे दृश्य चित्रपटात होते, ते प्रत्यक्षात मन विषण्ण करणारे असे होते. प्रेक्षक ‘सेक्स’ म्हणून चित्रपटातील ते दृश्य पाहायला गेला नव्हता. किंवा आम्ही तो सीन ‘एन्जॉय’ केला, असे सांगणारा एकही प्रेक्षक मला त्या वेळी भेटला नव्हता.
(शब्दांकन- चंद्रकांत शिंदे)